टर्निंग पॉइंट भाग ९
गप्पा टप्पा... सर्वांनी छान फूड एन्जॉय केलं. आठवणीत राहील अशी संध्याकाळ साजरी झाली होती.
आत्ता घरी जायला निघाव लागणार होतं. सगळे एकमेकांना भेटत होत. हळवा क्षण होता तो.
"यार.. तुमचं बरंय हा..... तुम्ही एका नात्यात.. नेहमी भेटत राहणार... तुम्हाला भेटण्यासाठी निमित्ताची गरजच नाहीये!" स्नेहा कुजबुजली..
"तसं काही नाहीये.. आपण सगळेच भेटत राहू.. लग्नाला बोलवा बर का. येऊ आम्ही." राजनच्या या एका वाक्यावर, भावूक झालेले सगळे क्षणात हसायला लागले.
उशीर झाला होता. सगळ्यांनी आपआपल्या गाड्या काढल्या.. राजन उद्या बंगलोरला निघून जाणार होता... राजनला एकदा डोळे भरून बघावं त्याच्याकडे बघतच रहावं स्निग्धाला वाटलं. मात्र तिने सावरलं होतं स्वतःला.
"काय झालं?" एका मैत्रिणीने, बोटांची चुटकी वाजवत स्निग्धाची तंद्री भंग केली..
"काही नाही!" उशीर होतोय आई वाट बघत असेल. हातातल्या घड्याळाकडे बघत.. तिने हात हलवत, सर्वांना बाय केलं. राजनकडे न बघता च तिने तिची गाडी स्टार्ट केली आणि लगेच निघून गेली.
"मला राजनबद्दल वाटतं ते राजन ला माझ्याबद्दल वाटत नाही."
माझं पहिलं प्रेम अधुरं राहिलं... अधुरं... स्निग्धाच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली.
'मित्र चिडवायचे तेव्हा, हा काहीच बोलत नव्हता?
माझ्याकडे का हा चोरून चोरून बघायचा?
मला उशीर झाला, की त्याची नजर का मला शोधत राहायची? त्याच्या डोळ्यात प्रेम वाचू शकेल एवढं ते स्पष्ट होतं, ते सगळं च खोटं होतं का? जाताजाता, स्निग्धाला ह्या सगळ्याची उत्तर हवी होती.
'आज चक्क त्याने माझ्या लग्नाचा विषय छेडला.. तो त्याच्यापासून मला वेगळं... म्हणजे माझं प्रेम एकतर्फी होतं!' माझं च चुकलं. मलाच कळलं नाही. मीच वाहवत गेले. त्याच्या वागण्याला प्रेम समजून बसले.
आमच्यात जे होतं ते फक्त एक, आकर्षण होतं त्यापलीकडे काहीच नाही... तिला रडू आवरत नव्हतं.
'तूच माझ्या स्वप्नातला राजकुमार आहेस. नाहीच कळलं तुला'
'मी आज एवढी छान तयार झाले... फक्त तुझ्यासाठी'
'शब्दाने कौतुक नाही की, नजर वर करून बघितलं नाहीस'
'मित्र मैत्रिणींनी आम्हाला, एकटं सोडलं. सगळ्यांना कळतं, मग ह्यालाच कळू नये!'
त्याच्या मनात माझ्या बद्दल प्रेम असतं. तर आजची संधी त्याने कधीच सोडली नसती? आजवर मला वाटत होतं ते फक्त एक मृगजळ होतं!! अश्रूंना तिने मोकळी वाट करून दिली.
स्निग्धा निघून गेली होती...
"मित्रा आज तरी, बोलायचं होत रे तिच्याशी.!" तुमच्यात काय झालं? काय बिनसलं माहिती नाही? पण एकमेकांसाठी बनला आहात तुम्ही दोघे" अमेय आणि साकेत बोलत होता. स्नेहाने दोघांच्या बोलण्यात होकार भरला.
"तू कॉलेजला यायचा नाही, ती बिच्चारी, वाट बघत बसलेली असायची तुझी. लेका भरभरून प्रेम करते ती तुझ्यावर. आम्हाला दिसत तुला नाही का रे दिसत. अमेय बोलत होता.
"आम्ही फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत आणि एक नातं आहे आमच्यात जे अतिशय नाजूक आहे."
"या सगळ्यात, त्या नात्याला धक्का नको." एव्हढ बोलून, "चला निघतो मी" म्हणत राजनने गाडीला किक मारली
"काहीच नाही तुमच्यात, मग करण ने डान्ससाठी आग्रह केला तर चिडला कशाला त्याच्यावर?"
"का त्याने तिचा हात पकडला, तेव्हा तुला राग आला त्याचा."
"तूझ्या डोळ्यात तिच्याविषयी प्रेम सा....ल्या स्पष्ट दिसतय कोणापासून लपवतोयस आमच्यापासून... जा उशीर होत असेल तुला." कधी न चिडणारा अमेय राजनवर चिडला होता.
आज राजन बंगलोरला जाणार होता. अपूर्वाने मुद्दाम त्याच्यासाठी ओल्या नारळाच्या करंज्या बनवल्या होत्या. आज तो जाणार म्हणून, ती ही माहेरी गेली होती.
राजन निघणार तोच, अपूर्वा माहेरी आली. राजन ने सर्वांना खाली वाकून नमस्कार केला. आशिर्वाचा हात डोक्यावर ठेवताना, वसुधाताईंच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली.
"करंजा बनवून आणल्यात बघ मी, तुला आवडतात अगदी तशा..ओल्या नारळाच्या." अपूर्वाने करंजाचा डबा, राजनला दिला.
"माझ्या आवडीनिवडी च तुला काय?" हातात घेतलेला करंजाचा डबा त्याने तसाच ठेवून दिला.
वसुधाताईंच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबत नव्हते. एवढं सगळं घरी असताना. एव्हढ मोठ घर आहे तरी लेकरू असं भटकणार नोकरीसाठी. बाहेर काय खाणार? कसा राहणार? वसुधाताई मनातली खळबळ बोलून दाखवत होत्या.
"आई अगं हेच हवं होत ना आपल्याला. दूर जाईल तर त्याच्या डोक्यातलं प्रेमाचं भूत हि पळून जाईल. त्याचा आपल्यावरचा राग काहीच दिवसांचा ग. बघ लवकर च सगळं सुरळीत होईल.
तुझ्यापासून आणि या एकुलत्या एका लाडक्या बहिणी पासून तो जास्ती दिवस अबोला नाहीच धरू शकणार तो. अपूर्वा वसुधाताईंना समजावत होती.
एकदा का आमच्या घरच्या बयेच लग्न झालं की आपण बोलवून घेऊ त्याला.. एका शपथेवर तो तिला दूर करू शकतो तर एक शपथ त्याला तुझ्याजवळ आणण्यासाठी पुरेशी ग मम्मा!" लाडात येऊन अपूर्वा बोलत होती.
काय बोलताय तुम्ही हे? प्रेमाचं भूत वगैरे... ही बया कोण? आणि मला कानोकान कल्पना नाही. कोण आहे ती मुलगी. आवाज उंच करत, अपूर्वाच्या वडिलांनी अपूर्वाला विचारलं.
"अहो, तुम्ही नका काळजी करू" आम्ही निस्तारला तो विषय आमच्या परीने."
"पण कोण होती ती मुलगी.. मला सांगेल का कोणी!"
"स्निग्धा.. माझी नणंद..!" घाबरत च अपूर्वाने उत्तर दिलं.
" तूला कळतंय का किती आडमुठेपणाने वागलीस तू राजनशी. तूझ्या भावाच प्रेम असणारी ती मुलगी, तुझी नणंद आहे. फक्त एवढ्यासाठी तू अशी वागलीस."
"पप्पा... चांगली मुलगी मिळेल त्याला..!" अपूर्वा पुढे बोलणार तोच अपूर्वाचे वडील जोरात चिडले.
"गप्प बस! पुढे आयुष्यात त्याला चांगली मुलगी मिळेल ही, पण पहिलं प्रेम तो विसरू शकेल का कधी? तुम्हा मयलेकीला समजणं अवघड आहे." एवढं बोलून ते तावातावात रूममध्ये निघून गेले होते.
क्रमशः