भाग १o
कॉलेजच्या कट्ट्यावर आता शांतता असायची. एक एक दिवस जणू काही एका एका वर्षासारखा वाटत होता. स्निग्धा ला कॉलेजला यायला सुद्धा तिला नको वाटत होतं.
आपल्या आयुष्याची चाबी दुसऱ्याच्या हातात देऊ नये कधी. दुसऱ्यांच्या भरवशावर आयुष्य जगायचं नसतं तर आपल्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर आपली ही काही ध्येय असायला हवीत. समजत होतं पण उमगत नव्हतं.
राजनच्या आठवणीने फक्त वेड लागायचं बाकी राहिलं होतं. त्याची आठवण आल्यावाचून तिचा एक क्षण ही जात नव्हता.
राजनला कंपनी कडून एक चांगली संधी चालून आली. त्याला एका प्रोजेक्टसाठी जर्मनीला जावं लागणार होतं. लवकरच तो जर्मनीला निघून गेला. प्रोजेक्टमध्ये त्याने स्वतःला पुरतं गुंतवून घेतलं होत. या सगळ्यात, दूरदेशी भारतात आपली कोणी आतुरतेने वाट बघतय हे ही कदाचित तो विसरून गेला होता.
कधीकाळी अधूनमधून ग्रुप वर येणार, एखादा जुजबी मेसेज ही आता येण्याचं बंद झालं होतं. स्निग्धा इंजिनिअरिंग पास झाली होती. अपेक्षेपेक्षा मार्क्स कमीच पडले म्हणून दादाकडूनच तिला खूप ऐकावं ही लागलं होतं.
सगळ्या मित्र मैत्रिणीं कुठे ना कुठे कॅम्पस मिळून नोकरी जॉईन केली होती तर कुणी उच्च शिक्षणासाठी विदेशात ही जाणार होते.
"दिवे लावलेच आहेस.. तूझ्या मार्कांचा उजेड तसा पडला आहेच. नोकरीसाठी दरदर भटकण्यापेक्षा आता सरकारी नोकरीसाठी परीक्षेची तयारी कर" समीरने स्निग्धाला सुचवलं. या सगळ्यात तिने स्वतःच नुकसान केलयं तिला तिची चूक उमगली होती. आता सगळं विसरून तिने परीक्षेची जय्यत तयारी सुरू केली.
स्निग्धाच्या लग्नासाठी आता इकडून तिकडून चांगले निरोप यायला लागले होते. निरंजन, एका आमदाराचा मुलगा. स्निग्धासाठी निरंजनचा निरोप समोरून चालून आला. सरकारी नोकरीत बढतीच्या दृष्टीने राजकारणातल्या लोकांशी संबंध फार महत्वाचे असतात. 360डिग्री ने आयुष्य फिरवण्याची ताकद या राजकारणी लोकांमध्ये असते. या राजकारणी लोकांचा डोक्यावर वरद हस्त म्हणजे नशिब पालटण्याची मिळालेली संधी. पुढून चालून आलेली सोयरिक, उगाच ही संधी दवडायची नाही. समीरला या स्थळाची भुरळ पडली.
लग्नासाठी, स्निग्धा मनापासून तयार नव्हतीच तरी तिच्या मर्जिविरुद्ध बघण्याचा कार्यक्रम ठरवला गेला. बघण्याचा कार्यक्रम झाला. बघून गेल्यानंतर लगेच निरंजन आणि त्याच्या कुटुंबाकडून पसंतीचा होकार हि आला.
दूर कुठेतरी, या सगळ्यापासून दूर.. आपण पळून जावं स्निग्धाला वाटत होतं पण स्निग्धा काहीच करू शकत नव्हती. राजन जर्मनीला गेल्यानंतर, एवढ्या दिवसात साधा एक कॉल करून साधी विचारपूस ही केली नव्हती. गप्प बसून चालणार नव्हतं पण घरच्यांच्या विरुद्ध बोलण्याच धाडस आज ही स्निग्धामध्ये नव्हतं.
"दादा, मला शिकायचंयं अजून खूप. नोकरी करायची आहे. स्वतःच्या पायावर उभ राहायचं आहे. प्लीज!" स्निग्धा गयावया करत समीर ला समजावण्याचा प्रयत्न करत होती.
"आई तू तरी समजून घे ना ग!" स्निग्धा रडत रडत आईच्या कुशीत शिरली.
"आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांच्या घरच्या मुलींना दिवा घेऊन शोधलं तरी एवढं मोठ घराणं मिळणार नाही. एकुलता एक मुलगा, वडिलोपार्जित श्रीमंती, घरंदाज लोक, एक सोडून अनेक बिझनेस. जमीन जुमला, शेतीवाडी, मुलाचे वडील आमदार आहेत. उद्या चालून, मुलगा ही राजकारणात पाऊल ठेवेन. आयुष्याचं सोन होईल बाळा सोन. तुला काहीच कमी पडू देणार नाहीत ते लोक. आपल्या सर्वसामान्य लोकांना, अजून पाहिजे तरी काय?"
परीक्षा काय आज ना उद्या.. इथून नाही तिथून... सासरी गेल्यावर ही देता येतील ग बाळा. पण असं स्थळ, शोधून सापडणार नाही पुन्हा. आईबरोबर च समीर ही स्निग्धा ला समजावून सांगत होता. त्याने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला.
"बाळा, लग्न मुलं बाळ योग्य वयात झालेली चांगली असतात. मुलगा चांगला आहे श्रीमंत आहे. सुशिक्षित आहे. अजून काय हवंय आल्याला. आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांच्या नशिबी नसते एवढी श्रीमंती. राजयोग असेल तूझ्या नशिबात म्हणून तुला एवढं चांगल स्थळ समोरून चालून आलं. बाळा नाही, म्हणू नको. जे होत ते नेहमी चांगल्यासाठी होतं, लक्षात ठेव." सीमाताईं स्निग्धाला समजावत होत्या.
'शेवटी श्रीमंत घरात पडलीच पोट्टी.. नशिब अजून काय. आता तर काय? आमदाराचंच घर, राज्य करेन पोट्टी. आणि एक मी... मरतेय मर मर इकडे. फुटकं नशिब, अजून काय?' अपूर्वाचा जळफळाट होत होता.
'पण असो.. माझा भाऊ राजन, सुटला एकदाचा ह्या सगळ्यातून... आईने शपथ घातली आणि जन्म देणाऱ्या आईवरचं प्रेम..त्याच्या पहिल्या प्रेमासमोर भारी पडलं' कोपऱ्यात उभी राहून, अपूर्वा मिश्कीलपणे हसली.
आमदाराच्या कुटुंबाशी सोयरिक, सर्वार्थाने कामी येणार आजच्या परिस्थितीत ते जास्ती महत्वाचं. अपूर्वा मनोमन सुखावली होती.
मागची पाटी कोरी करून.. सगळ्या आठवणी पुसून टाकून... पुढचा अध्याय लिहायचा आणि पुढच्या आयुष्यात पाऊल टाकायचं, स्निग्धाने ठरवलं.
"काय ग.. डायरेक्ट लग्नालाच बोलवलंस" साक्षी आणि समिधा लग्नाला आल्या होत्या. राजन ला माहिती आहे का? त्यावर स्निग्धा ने काहीच बोलायचं नाकारलं होतं.
निरंजनच्या हातात हात देऊन, स्निग्धा बोहल्यावर चढली. सप्तपदीची सात पावलं ती निरांजच्या साथीने चालत होती. निरंजनची पत्नी. आमदाराची सून म्हणून तिचा गृहप्रवेश झाला होता. हातावरच्या रंगलेल्या मेहंदीत आता निरंजनच नाव होतं. आमदाराच्या मोठ्या बंगल्यात तिचा गृहप्रवेश झाला होता.
क्रमशः