टर्निंग पॉइंट भाग ११

अनपेक्षित वळणावर कहाणी तिची
भाग ११


बंगल्यात, वरच्या मजल्यावर, फुलांनी सजवलेल्या एका रूममध्ये तिचं सामान ठेवण्यात आलं होतं. काही लागल्या सवरल्याला हाताशी नोकरचाकर ही होती. वंदना... काम करणाऱ्या मावशीची सतरा अठरा वर्षाची मुलगी स्निग्धाच्या दिमतीला हजर होती. 


सासूबाईंनी पहिल्याच दिवशी, घरातल्या सर्वांची स्निग्धाशी ओळख करून दिली. 


दिवसभराच्या धावपळी नंतर स्निग्धा खूप थकली होती. "जा सूनबाईना त्यांची रूम दाखवं" आशाबाईंनी वंदनाला सांगितलं.


"हो बाईसाहेब" वंदनाच्या मागे, स्निग्धा रूममध्ये पोहचली. 


"वहिनी, काही लागलं सवरलं तर हाक मारा जी" वंदनाने दरवाजातून स्निग्धाला आत सोडलं.


"हो", हलकेच मान हलवत स्निग्धा रूम मध्ये शिरली. बेड छान फुलांनी सजवला होता. फुलांनी सजवलेला बेड बघून स्निग्धा खूप घाबरली. 


'काय हे? आजच.. घाई काय ह्या सगळ्याची.' अजूनपर्यंत मी धड त्यांना नीट बघितलं सुद्धा नाहीये. फोनवर एक दोन वेळा बोलणं पण त्या बोलण्यातही तितकासा मोकळेपणा नव्हता. असं कसं आयुष्य एका अनोळखी माणसाला वाहून द्यायचं?' 


तिला बघूनच कसंस झालं. 


रूममध्यल्या भिंतीवर टांगलेल्या, एका मोठ्या आरशासमोर स्निग्धा उभी होती. लाल चुटूक्क रंगाचा भरजरी शालू सरदेसाई घराण्याला शोभतील असे सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली.. तळहातावरच्या मेहंदीचा रंग ही छान गर्द झाला होता. 


"स्निग्धा निरंजन सरदेसाई."....... एक नवी ओळख.... तिने मेहंदी रंगल्या हाताकडे बघितलं आणि बघतच राहिली. डोळ्यातल्या अश्रूचा एक टपोरा थेंब तिच्या मेहेंदीवर ओघळला. दोन्ही हातांच्या मुठींना तिने घट्ट छातीशी कवटाळून घेतलं. 


स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत, मेहेंदी भरल्या हातावर, बारीक अक्षरात लिहिलेलं नवऱ्याच्या नावावर तिचं लक्ष गेलं.. निरंजन.... ती स्वतः शीच पुटपुटली. "झाले गेले विसरून जावे पुढे पुढे... चालावे जीवनगाणे.... 

रडगऱ्हाणे... रहाटगाणे गातच रहावे!" फुलांनी सजवलेल्या पलांगाकडे बघतचं राहिली. 


"टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ".... 

आजपासून नवीन घर, नवी ओळख घेऊन सुरुवात, "स्निग्धा निरंजन सरदेसाई" ती स्वतःशीच पुटपुटली.. 


"

'हा काही सिनेमा आहे का पहिली रात्र लग्नानंतर लगेच पहिल्या रात्री साजरी करायला. ह्यांच्या कडे दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा, देवदर्शन वगैरे नसतात वाटतं. काय पण नविन च.'


'पण मी मात्र त्याच्याकडे वेळ मागून घेणार.. एकमेकांना ओळखतो तरी कुठे आम्ही?" एकत्र, एकटे भेटलो सुद्धा नाही आम्ही. लग्न ठरलं, ते त्यांच्या व्यापात आणि मी माझ्या.... मला तर हे लग्न करायचंच नव्हतं.....!' स्निग्धाच्या डोक्यात विचारांचं वादळ घोंघावत आलं. 


'भेटलो नाही म्हणून ह्यांना ओळखत नाही.... भेटून तरी माणसं कुठे ओळखीची होतात. दोन वर्ष सातत्याने भेटून देखील, कुठे ओळखू शकलो आम्ही एकमेकांना' राजनचा विचार तिच्या मनात डोकावून गेला. 


'कधीकधी एका क्षणाची भेट तरी खूप आपलीशी आणि जूनी हवीहवीशी, ओळखी ओळखीची वाटते तर कधी खूप जुनी ओळख असून ही अनोळखीच'...


'मी स्वतःला तरी कुठे ओळखू शकले?' 

 

"आहेत कुठे हे? रूममध्ये नाहीत वाटतं. मला वाटलं, वॉशरूम मध्ये असतील, बराच वेळ ती एका सेटीवर बसली होती. तिने हळूच वॉशरूमचा दरवाजा ठोठावला. आतून काहीच प्रतिसाद आला नाही, तिने दरवाजा ची कडी उघडली. 


'अरे हे नाहीतच रूममध्ये.' ती फ्रेश झाली. बॅगओपन करून सगळं सामान, कपडे काढावं लागणार होते. तिथल्या च एका सेटीवर बसून, बॉटलमधलं पाणी ती घटाघटा प्यायली. 


सेटीवर क्षणभर विसावली. थकली होती तिचा डोळा कधी लागला तिला ही कळलं नाही. बाहेर कसल्याशा आवाजाने तिला जाग आली.. तिचं लक्ष भिंतीवरच्या घड्याळावर गेलं. रात्रीचे तीन वाजून गेले होते. ती घाबरली... 


'माझा डोळा लागला बघून त्यांनी उठवलं नसेल मला. रूममध्ये उशिरा आले असतील आणि झोपले असतील.' तिने बेडकडे बघितलं. बेडवर निरंजन नव्हताच.'


'कुठे गेले असतील?'


'आजच लग्न झालंय आमचं. लग्नानंतरची ही पहिली रात्र..... केवढी ही तयारी आमच्या पहिल्या रात्रीची.


'गृहप्रवेशा नंतर, उपरण माझ्याकडे सोपवून गेले कुठे असतील हे? तेव्हापासून दिसलेच नाहीच.'


'आपण लग्न करून आणलेली आपली, जीच्यासोबत सात फेरे घेतले. जी बायको आपलं घर सोडून आपल्यासोबत आली. अग्नीच्या साक्षीने सोबतीने राहण्याच वचन दिलं ती आपली बायको अनोळखी घरात अनोळखी माणसात एकटी, ह्याची किंचित ही जाणीव त्यांना नसावी?' तिच्या मनात विचारांनी गर्दी केली.


'असो, तशी ही थकली होती मी. तिने लांब उसासा घेतला. निदान आज तरी, जागरण मला अजिबातच झेपलं नसतं.


अंगावरचा भरजरी शालू काढून तिने हलकी शी एक साडी कशीबशी लपेटली. दागिने काढून कपाटात ठेवले. फ्रेश होऊन झोपणार तोच रूमच्या बाहेर काहीतरी हालचाल जाणवली.


"कोण?" तिने आतूनच आवाज दिला. 


"कुणी नाही... आम्ही आहोत!" सासूबाईंचा आवाज आला तसा स्निग्धा ने दरवाजा उघडला. 


"झोपल्या नाही. जाग्या आहात अजून." सासूबाईंनी विचारलं.


तीने नाही म्हणत, हलकेच मान डोलावली. 


"निरंजन राजे, मित्रांसोबत होते वाटतं." उशिराच परतले घरी. तुम्हाला डिस्टर्ब  होऊ नये म्हणून, बाजूच्या रूममध्ये जावून झोपलेत. दरवाजा लावून घ्या आतून, आणि झोपा तुम्ही निवांत.'


"काही हवंय का तुम्हाला?" सासूबाईंनी विचारलं


"नाही,"  स्निग्धाने नाही म्हणत हलकेच मान डोलावली. 


स्निग्धाने दरवाजा बंद केला.
क्रमशः


🎭 Series Post

View all