Login

तुज संग प्रीत लगाई सजना भाग 1

एका मधुर प्रेमाची गोष्ट

तुज संग प्रीत लगाई भाग 1

" सारिका, असे येरझाऱ्या घालून येणार आहे का ती लवकर ?" सुयोग जरा चिडलाच .
" हे मला संगण्यापेक्षा लाडक्या लेकीला सांगायचेस ना ! रात्रीचे अकरा वाजलेत सुयोग . "
सारिकाने वैतागून उत्तर दिले .

खरतर सुयोग देखील अस्वस्थ होता . मेघा मैफिल संपल्यावर जास्तीत जास्त दहा वाजेपर्यंत पोहोचत असे घरी . तिने निघाले असा मॅसेज देखील केला होता . परंतु आता दोन तास उलटून देखील ती अजून घरी पोहोचली नव्हती .

" सुयोग , मी काय म्हणते एकदा श्रीरंगला फोन कर ना . " सारिका अस्वस्थ येरझाऱ्या घालत म्हणाली .

" मेघा इतक्या रात्री त्याच्यासोबत कशी असेल ? " सुयोग थोडासा चिडला .

" अरे पण ती नक्की निघाली का ? कशी येत होती ? इतके माहित असेल त्याला ."
सारिकाने फोन हातात देत उत्तर दिले .

तुज संग प्रीत लगाई सजना! सुमधुर रिंगटोन ऐकू आली आणि त्यानंतर ऐकू आला श्रीरंगचा नमस्कार .

" बाबा इतक्या रात्री का फोन केलात ? " त्याने काळजीने विचारले .

" श्रीरंग अरे मेघा अजून घरी पोहोचली नाही . " सुयोग म्हणाला .

" काय ? पण ती नऊ वाजता निघाली होती . तुम्ही फोन केला का तिला ? "
त्याने अधीर होऊन विचारले .

" फोन लागतोय पण उचलला जात नाहीय . " सुयोग हताश स्वरात उद्गारला .

" बाबा मी निघतोय . तुम्ही पोलिसांना फोन करा . " श्रीरंग म्हणाला .

" पोलीस! पोलीस कशाला ? " सुयोग जरा घाबरलाच .

श्रीरंग दहा मिनिटात गाडीवर बाहेर पडला . तासाभराचे अंतर रात्री वाहतूक नसल्याने अर्ध्या तासात कापून तो मेघाच्या घरी पोहोचला .


" बाबा,येताना मी संपूर्ण रस्त्याने पाहिले आहे . मेघा कुठेच आढळली नाही . "
श्रीरंग देखील आता घाबरला होता .

इतक्यात एका अनोळखी नंबर वरून सुयोगला फोन आला .

" सुयोग कारखानीस ? " पलीकडून प्रश्न आला .

" हो,आपण कोण ?" सुयोगने विचारले .

" तातडीने सिटी हॉस्पिटलला या . मी हवालदार शिंदे बोलतोय . " इतके सांगून फोन कट झाला .

" श्रीरंग गाडी काढ . आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल . " सारिका ,सुयोग आणि श्रीरंग तिघेही जायला निघाले .


हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्यांना. इन्स्पेक्टर सलोनी भेटली .

" तुमच्या शेवटच्या कॉल वरून हा फोन केला आहे . " तिने माहिती पुरवली .

" इन्स्पेक्टर मेघा कुठेय ? तिला काय झाले ? ती इथे कशी ? " सारिका रडत विचारत होती .

" हे बघा मावशी आपण आत जाऊन बोलूया . " सलोनी त्यांना कसेबसे समजावून आत घेऊन आली .

" इन्स्पेक्टर त्या मुलीचे नातेवाईक आले का ? " डॉक्टर असे बोलत असतानाच त्यांनी समोर पाहिले .

" सुयोग ? इथे काय करतोय तू ? " डॉक्टर विवेक पाटील चिंतेने म्हणाले .

" सर हेच आहेत तिचे नातेवाईक . " सलोनी म्हणाली .


त्याक्षणी डॉक्टरांनी त्यांना आत केबिनमध्ये यायचा इशारा केला .

" विवेक काय झाले माझ्या मेघाला ? " सुयोग आता घाबरला होता .

" सुयोग, बी ब्रेव्ह . शी सफर फ्रॉम गँग रेप . ती अतिशय गंभीर परिस्थितीत आहे . आता आपण फक्त तिला वाचवायचे प्रयत्न करूया . "

डॉक्टर विवेकचा एकेक शब्द सारिका आणि सुयोगचे काळीज चिरत होता .


दोघेही सुन्न होऊन ऐकत होते . पुढचे काहीही विचारायचे भान त्यांना राहिले नव्हते .

" डॉक्टर मला तिला पहायचं आहे . माझ्या पोरीला साधी सुई टोचली तरी डोळ्यात पाणी येते रे विवेक . तिने कसे सहन केले असेल सगळे ."
धाय मोकलून सुयोग रडत होता .


सारिकाची शुद्ध हरपली होती . श्रीरंगने कसेबसे सुयोगला सावरले .


" सुयोग ,आपण तिला इथून हलवू . हे सरकारी हॉस्पिटल आहे . इथे प्रेस वगैरे सगळे प्रकार हाताळता येणार नाही . "

आपल्या मित्राच्या मुलीसाठी आता विवेक भराभर निर्णय घेत होता .


क्रिटिकल कंडीशन असे कारण देऊन त्याने रात्री दोन वाजता ॲम्ब्युलन्स बाहेर काढली .


फाटलेले ओठ , सुजलेला चेहरा आणि बाकी संपूर्ण शरीर झाकून होते .


" मला तिला संपूर्ण बघू देत . " सारिका निर्धाराने म्हणाली .


" इथे नको,आपण आधी तिला आय. सी. यू. मध्ये शिफ्ट करूया . "
विवेकने तिला थांबवले .


श्रीरंग मागे कार घेऊन येत होते . साधे पाणी पिताना ठसका लागला तरी मेघाच्या डोळ्यात पाणी येते. कसे सहन केले असेल तिने . आता मेघा शुद्धीवर येणे महत्वाचे होते . तरीही अनेक आठवणी मनात रुंजी घालत होत्या.


कितीही लपवायचे प्रयत्न केले तरी सोशल मीडिया बातमीला अनेक वाटांनी सगळीकडे पसरवतो . नव्या पिढीच्या शास्त्रीय गायिका मेघा कारखानीस यांच्यावर बलात्कार . अशी हेडलाईन झळकली आणि इकडे श्रीरंगचा फोन खणखणायला सुरुवात झाली .


तिचे आणि श्रीरंगचे नाते उघड गुपित होते . आता जास्तवेळ न थांबता तू घरी जावेस असे त्याला डॉक्टर विवेक म्हणाले . तरीही त्याचा पाय निघत नव्हता . तितक्यात बाहेर गोंगाट ऐकू यायला लागला . वाहिन्यांच्या एबी व्हॅनस एक सनसनाटी कव्हर करायला पोहोचल्या होत्या .


तितक्यात आईचा फोन आला .

" हे बघ श्री. लगेच घरी निघून ये . तुला यात प्रसिद्धी मिळायला नकोय . "
आईचा कडक स्वर कानावर येताच श्रीरंग हादरला .


आजवर मेघाची कायम स्तुती करणारी आई आज तिला सर्वाधिक गरज असताना निघून ये म्हणत आहे .


" श्रीरंग तू खरच घरी जा . सुयोग आणि सारिका दोघांनाही थोडावेळ अगदी एकटे राहू देत . "
डॉक्टर विवेक निर्वाणीचे बोलले .


श्रीरंग नाईलाजाने बाहेर पडला आणि कॅमेरा फ्लॅश त्याच्यावर पडले .

" मेघा इतक्या रात्री कुठे गेली होती ? तुम्ही आता तिला स्वीकारणार का ? किती जणांनी केला बलात्कार ? तिला एकटे कसे सोडले तुम्ही ? "

चारही बाजूंनी असंख्य प्रश्न त्याला घायाळ करत होते . सगळ्यांना टाळत त्याने कशीबशी गाडी काढली .


एका रात्रीत सगळे बदलून गेले होते . गोड गुलाबी पहाट रक्तरंजित झाली होती . श्रीरंगला अजूनही हे एक वाईट स्वप्न असेल हेच वाटत होते .

मेघा त्याच्या आयुष्यात कितीतरी रंग घेऊन आली होती . आनंदाचे , मैत्रीचे ,प्रेमाचे . आजही त्याला तिची पहिली भेट राहून राहून आठवत होती आणि डोळे आपोआप भरून येत होते . मनाची प्रचंड घुसमट झाली होती आणि अचानक त्याने गायला सुरुवात केली .


एक अबोली रंग प्रेमाचे घेऊन आज आली .
पाहून तिला ही कसली धुंदी मनावर आली .

जसजसे श्रीरंग गात होता त्याच्या आठवणी उफाळून येत होत्या .


ही प्रेमकहाणी अशीच संपून जाईल का ?
मेघा बरी झाल्यावर काय होईल ?
श्रीरंग तिच्यासोबत उभा राहील का ?
वाचत रहा.
तुज संग प्रीत लगाई सजना.

©®प्रशांत कुंजीर .
अष्टपैलू 2025 स्पर्धा

🎭 Series Post

View all