Login

तुज संग प्रीत लगाई सजना भाग 4 अंतिम

एका मधुर प्रेमाची गोष्ट
तुज संग प्रीत लगाई सजना भाग 4 ( अंतिम)

मागील भागात आपण पाहिले की श्रीरंग गाण्यातून मेघाच्या जवळ जायचा प्रयत्न करतो . मेघाच्या मनातले दुःख ती त्याला सांगते . आता पाहूया पुढे .


मेघाच्या मनातील सल ऐकली आणि श्रीरंग स्तब्ध झाला . आपल्याच शरीराबाबत घृणा घेऊन मेघा जगत आहे . तिचे जगणे थांबले आहे . आपल्याला ते फुलवायला हवे . आयुष्य म्हणजे एखादी घटना नाही . श्रीरंग घरी जाताना सतत हाच विचार करत होता . त्याने सारिकाला फोन केला .

" काकू , तुमचे दोघांचे आणि मेघाचे काही क्षण , आठवणी मला सांगाल ? आपल्याला त्याचादेखील उपयोग होईल . "
श्रीरंगने विचारले .

" सांगते,आज संध्याकाळी आमच्या घराजवळ असलेल्या मंदिरात भेटूया . "
सारिकाने आश्वासन दिले .


संध्याकाळी सारिका आणि श्रीरंग भेटले .

" श्री मेघा लहानपणापासून प्रचंड हळवी आहे . तिला दुसऱ्यांना मदत करायला आवडते . "

असे म्हणून काही शाळेतील प्रसंग सारिकाने त्याला सांगितले . त्यांच्या कुटुंबातील काही प्रसंग सांगितले . श्रीरंगसोबत बोलून सारिका बऱ्याच दिवसांनी मोकळी झाल्यासारखी वाटत होती .


दुसऱ्या दिवशी मेघा सकाळी कॉफीचा मग हातात घेऊन तशीच बसली होती . तितक्यात बाबांचा फोन वाजला . नेमके बाबादेखील बाहेर गेलेले . फोन तीन वेळा वाजला तेव्हा तिने नाईलाजाने फोन उचलला . जवळपास दोन महिन्यांनी मेघा अशी फोनवर बोलत होती .


" हॅलो! सुयोग कारखानीस का ?"
पलीकडून पुरुषी आवाज ऐकून मेघा फोन ठेवणार होती .

" काका फोन ठेवू नका प्लीज . मेघाचा नंबर बंद आहे . तिला सांगा बोबड्याने फोन केला होता . "

हे ऐकताच मेघाच्या ओठावर नकळत हसू आले . पलीकडून तो बोलत होता आणि मेघा फक्त ऐकत होती . शेवटी त्याने फोन ठेवला आणि मेघा आत निघून गेली . सुयोग लांबून सगळे बघत होता .

खरोखर श्रीरंगने सांगितलेला उपाय नक्की आपल्या मुलीला बरे करेल असा विश्वास नकळत निर्माण होत होता .


श्रीरंग जाणीवपूर्वक मेघाच्या अवती भवती सकारात्मक वातावरण ठेवत होता . तिच्या आवडीचे गाणे गाऊन , कधी तिच्या आवडत्या बाईंना घरी बोलावून तर कधी तिचा आवडता पदार्थ बनवून .

मेघा शांत होत असली तरी एकांती श्री सोबत नकळत तिच्या मनातील भीती बाहेर डोकावत असे आणि ती स्वतःच्या कोषात बंद होत असे .


एक दिवस पंडित भास्कर यांचा फोन आला .

" मेघा , बाळा माझे काही फार दिवस उरले नाहीत . मला माझी आवडती बंदिश ऐकायची आहे . "

गुरुजींनी दिलेली आज्ञा मानून मेघा कितीतरी दिवसांनी बंदिश गायली .



त्या दिवशी मेघाला तिचे गाणे परत मिळाले . श्रीरंग रोज घरी येत होता .


त्याने हळूच विचारले, " मेघा सवाई गंधर्व महोत्सवाचे निमंत्रण आपल्याला दोघांना आहे . "

" तू एकटा मैफिल सादर कर . मला नाही जमणार."
मेघा कठोर आवाजात म्हणाली .

" माझ्यावर रोखलेले संशयी डोळे , हिचा कोणीतरी उपभोग घेतला हे सांगणाऱ्या नजरा . मला नाही जमणार श्रीरंग ."

तिने सरळ विषय संपवला .

बघता बघता महोत्सवात गायचा दिवस उद्यावर येऊन ठेपला . श्रीरंग गेले दोन दिवस आलाच नव्हता .


आज सवाई गंधर्व महोत्सवात श्रीरंग मैफिलीला बसणार . मेघाचे एक मन किमान त्याला ऐकायला जा . असे सांगत होते . तर दुसरीकडे तिला दिसत होत्या त्या असंख्य नजरा आणि लागलेला तो डाग .


इतक्यात एक कुरिअर आले . आई बाबा केव्हाच कार्यक्रमासाठी गेले होते . मेघाने तो लिफाफा घेतला . आत एक पत्र होते .


प्रिय मेघा ,

हो प्रियच कारण तुझ्याशी झालेली पहिली भेट एका अल्लड बालकाचे पुरुषात रुपांतर करणारी होती . तुला आठवते आपण सोबत गाताना तू कोणती तान घेणार हे मला न सांगता समजायचे .

गेले पाच वर्षे तुझ्या सहवासातील असंख्य मैफिलीत रंग भरले कारण तू सोबत होतीस .


मेघा माझे प्रेम तुझ्या दिसण्यावर सुरुवातीला असेलही पण आता ते तुझ्या असण्यावर आहे . तुझ्यासोबत माझ्या जगणं ,माझे सूर सगळे काही जोडले आहे .

तू मला म्हणालीस तुझ्या शरीरावर दिसणाऱ्या त्या खुणा तुला सतत त्या नग्न श्वापदांची आठवण करून देतात .

पण मेघा तुझ्या आठवणीत असेल तुझ्या बाबांनी तुला उचलून घेतलेला पहिला स्पर्श . तो देखील एक पुरुष आहे .

बोबड्या ज्याची बाजू घेऊन आख्ख्या वर्गाशी भांडलीस त्याने एक मित्र म्हणून मारलेली मिठी . त्यात होती का वासना ?

आजोबांनी प्रेमाने घेतलेला पापा , गुरुजींनी पाठीवर दिलेली शाबासकी असे असंख्य पुरुषी स्पर्श आहेत तुझ्या मनात .

तू मैफिलीत शेजारी गायला बसायची तेव्हा होणारे पुसट स्पर्श मनात पारिजात फुलवायचे .


आजची मैफिल यांत्रिक आणि शास्त्राने फुलेल देखील पण मेघा तू आलीस तर मैफिल फुलेल प्रेमाने.
तुझाच रंगा .


मेघाच्या अश्रूंनी पत्रतील अक्षरे पुसत होती आणि मनातील गोंधळ संपला होता . मेघा उठली तिने त्याला आवडणारी डाळिंबी पैठणी नेसली , कपाळावर चंद्रकोर रेखली . केसात मोगरा माळला आणि शेवटी पहिली व्यावसायिक मैफिल झाल्यावर श्रीने भेट दिलेली शाल पांघरून मेघा टॅक्सीत बसली .



इकडे संपूर्ण खचाखच भरलेल्या मैदानात श्रीरंग मैफिलीसाठी तयार झाला . त्याच्या शेजारी असलेली रिकामी जागा पाहून एक दुखरी कळ मनात उठली आणि त्याने डोळे बंद करून सूर लावला .

सा.......आणि त्याची तान पूर्ण होताच स्वर घुमला .


आज आंबिया बाग में सजना चले आवो
देखत तुमरी राह गोपिका मेरे किशन कन्हैया .


त्याचक्षणी संपूर्ण मैदानात नीरव शांतता पसरली . पुढील जवळपास दीड तास मैफिल सुरू होती . भैरवी संपली आणि सुरू झाला टाळ्यांचा कडकडाट .

मेघा उठली आणि तिने हात पुढे केला . श्रीरंगने तिच्या हातात हात दिला आणि दोघे व्यासपीठावरून खाली उतरू लागले .


पुढचा गायक गायला बसला आणि आसमंती सूर घुमले.
तुज संग प्रीत लगाई सजना...


©® प्रशांत कुंजीर.
अष्टपैलू 2025 स्पर्धा

🎭 Series Post

View all