Login

तुझा हक्क नाही.. भाग ५(अंतिम)

कथा एका हक्काची..
तुझा हक्क नाही.. भाग ५ (अंतिम)
©अनुप्रिया


डोक्यात थैमान घातलेल्या विचारांनी विनायक एकदम रडवेला झाला. अचानक त्याच्या छातीत जोरात कळ आली. डोळ्यासमोर अंधार दाटू लागला. आणि विनायक जागीच खाली कोसळला. आवाज ऐकून सर्वजण बाहेर आले. विनायक दारात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. अनघा धावतच त्याच्याजवळ आली.

““अहो, उठा नां.. काय झालं तुम्हाला? डोळे उघडा नं.. असं काय करताय? उठा बघू मला भीती वाटतेय.. उठा बरं..”

अनघा त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती पण विनायक काहीच प्रतिसाद देत नव्हता. प्रसादही घाबरला आणि त्याने पटकन एम्ब्युलन्सला फोन करून बोलवून घेतलं. तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं पण तिथे पोहचण्याआधीच खेळ संपला होता. विनायकला हृदयविकाराचा इतका तीव्र झटका आला की त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अनघावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आजूबाजूच्या लोकांनी पटापट ईश्वरी आणि सिद्धार्थला फोन करून बोलवून घेतलं. ईश्वरी तातडीने घरी निघून आली. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. विनायकची अंतिम इच्छा म्हणून त्याचं पार्थिव अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांच्या गावी आणण्यात आलं. विनायकचं पार्थिव स्मशानभूमीकडे घेऊन जाऊ लागले; ईश्वरी आईच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागली; पण अनघाच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब नव्हता. जमलेल्या बायकांनी तिला रडवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती रडली नाही. विनायकच्या जाण्याचा तिला प्रचंड मोठा धक्का बसला होता. ती एकटक शून्यात पाहत होती. आजही अनघा तशीच ईश्वरीच्या कुशीत पडून होती.

आज एखाद्या चित्रपटफितीप्रमाणे साऱ्या घटना ईश्वरीच्या डोळ्यासमोर सरकत होत्या. विनायकचा आतापर्यंतचा सगळा प्रवास तिला आठवत होता. तिची भावंडे संपत्तीसाठी वाद घालत होती. ते पाहून तिला प्रचंड त्रास होत होता.

“अगं आई बोल काहीतरी.. माझं म्हणणं पटतंय नं तुला? मी तर म्हणतो आपण तुझंही नाव नको द्यायला. पुन्हा कागदपत्र करताना आपल्यालाच डबल खर्च येईल. त्यापेक्षा आताच फायनल करून टाकू.. काय म्हणतेस? आणि प्लिज, आता पप्पा गेल्याने तुला किती दुःख झालंय असा उगीच ड्रामा करू नकोस. वय झालं होतं त्यांचं.. आपल्याला सत्य स्वीकारलं पाहिजे.”

इतका वेळ ईश्वरी शांत बसून त्यांचं बोलणं ऐकून घेतलं होतं. पण आता मात्र तिच्या संयमाचा बांध तुटला आणि ती उद्विग्न झाली. अखेर ईश्वरीने आपलं मौन तोडत बोलायला झालं.

“दादा, तू हे काय बोलतोयस? आई ड्रामा करतेय? अरे तिचा आयुष्याचा जोडीदार गेलाय. आपले पप्पा गेलेत. त्याच पप्पांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं. कधी काही कमी पडू दिलं नाही. सगळं विसरून गेलास तू? इतका कृतघ्न कसा झालास?”

“ईशु, उगीच इमोशनल होऊन विचार करायला मी तुझ्या इतका मूर्ख नाही. आपण प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे नं?”

प्रसाद रागातच तिच्याकडे पाहून म्हणाला.

“काय प्रॅक्टिकली विचार करायचाय दादा? अरे आपल्या आईबाबा आहेत ते. परिस्थिती काय आहे आणि तू काय बोलतोयस? अरे, लहानपणी याच आईच्या तू साड्या धुतल्यास. स्वयंपाक करण्यात तिला मदत केलीस. पप्पांचे हातपाय चोळून दिलेस. आपण कधीच एकमेकांना सोडून राहणार नाही असं त्यांना वचन दिलं होतंस. सगळं विसरलास? दादा, तू मला तुझ्या खाऊतला हिस्सा किती सहजपणे द्यायचास! अंधाऱ्या खोलीत तुझा हात पकडताना किती आधार वाटायचा! पप्पा नेहमी म्हणायचे, ‘प्रसाद आणि शुभदा ईशु आणि सिद्धार्थला सांभाळून घेतील. आपल्यानंतर तेच आता दोघांचे आईबाबा.’ पण तो मानही तू राखला नाहीस. किती रे बदललास! दादा, आता तुला प्रत्येक गोष्टीत व्यवहार पाहायचाय? माझा हिस्सा नाकारतोयस? माझा सोड तू तर आईलाही संपत्तीतून बेदखल करायला निघाला आहेस. आणि हा सिद्धार्थ पण तुझ्या पावलांवर पाऊल टाकत चाललाय. त्यालाही काहीच दयामाया उरली नाहीये.”

“ईशु, तू उगीच वाद घालू नकोस. आईला ठरवू दे काय ते? तू मधे बोलू नकोस. बोल आई.. ”

असं म्हणत सिद्धार्थने अनघाकडे पाहिलं. ती तशीच एकटक शून्यात पाहत होती.

“आई काय बोलणार आहे? मीच सांगते. मला तुमच्या संपत्तीतलं काही नकोय. मी हक्कसोड पत्रावर सही करायला तयार आहे. आण ते पेपर्स.. माझ्यासाठी माझी आई महत्वाची. मी आयुष्यभर तिचा सांभाळ करेन. मला माझी आई जड नाही. समजलं?”

ईश्वरीचं बोलणं प्रसाद आणि सिद्धार्थच्या पथ्यावरच पडलं. पडत्या फळाची आज्ञा मानून त्याने लगेच ईश्वरीसमोर पेपर्स धरले. ईश्वरीने रागानेच पेपर्स हिसाकून घेत भराभर त्यावर सह्या केल्या आणि प्रसादच्या अंगावर पेपर्स भिरकावले. तिच्या डोळयांतून अंगार बरसत होता. तिने आईकडे पाहिलं आणि म्हणाली,

“आई, चल आपल्याला कोणाचीच गरज नाही. तुझी लेक तुझी काळजी घेण्यास समर्थ आहे. नको आपल्याला काही. नको जमीनजुमला, पैसा अडका.. मी आहे आहे नं आई.. ”

आई काहीच बोलली नाही. ईश्वरीने आईला हात लावला तशी आई जमिनीवर घरंगळली. आईने प्राण सोडला होता. आपल्या नवऱ्याच्या माघारी मुलं अशी अवस्था करतील असं अनघाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आपलं कोणाला ओझं नको म्हणून ती बिचारी माऊली नवऱ्याच्या मागे मार्गस्थ झाली होती. ईश्वरी आईला बिलगून मोठमोठ्याने रडत होती. बाबांच्या पाठोपाठ आईनेही तिचा हात सोडला होता.

सगळ्या संपत्तीवरचा हक्क सोडूनही ईश्वरीच्या वाट्याला आईसुद्धा आली नाही. आता खरोखरीच तिचा कशावरच हक्क उरला नव्हता.