Login

तुझा हक्क नाही.. भाग २

कथा एका हक्काची..
तुझा हक्क नाही.. भाग २
©अनुप्रिया

“आईला मी कधीच असं पाहिलं नाही. किती सुंदर दिसायची आई! अगदी साक्षात वात्सल्यमूर्त देवीचं रूपच.. म्हणजे आईला पाहिलं की, मनाला किती गारवा मिळायचा. आईच्या कुशीत एक वेगळंच पण सुरक्षित असल्याचं फीलिंग असायचं. पण आता कशी झालीय ती.. काय ही तिची अवस्था!”

ईश्वरी आईकडे एकटक पाहत होती. तिला आईचं गोड साजिरं रूप आठवू लागलं. तिचं मन भूतकाळात वेगाने जाऊ लागलं. बालपणीचा दादा, सिद्धार्थ, ती, तिची गोड आई आणि रुबाबदार पप्पा तिच्या डोळ्यासमोर फेर धरू लागले. कॉटनची फिकट गुलाबी रंगाची साडी घालून साऱ्या घरभर फिरणारं आई नावाचं चैतन्य तिला कायम भुलवत राहिलं. तिचं ते सोज्वळ रूप तिला भुरळ पाडत राहायचं. आईच्या अंगावरच्या कायम फिकट रंगाच्या कॉटनच्या साड्या.. तिचा गोरा रंग.. लांबसडक काळेभोर केसांचा घातलेला छान अंबाडा, त्यावर माळलेली सोनचाफ्याची फुलं किंवा मग कधी मोगऱ्याचा, सायलीचा गजरा.. कानात डूलणारे सोन्याचे झुबे.. गळ्यात छान लांब मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्याची किणकीण.. नाकात छोटी हिऱ्याच्या खड्याची चमकी, कपाळावर लाल रंगाची मोठी ठसठशीत टिकली, पायात नाजूक जोडवी, छुमछुमणारं पैंजण, डोळ्यात किंचित फिरवलेली काजळकांडी.. सारं चित्र जसंच्या तसं तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आईचं ते साजिरं रूप मनात दाटू लागलं.

विनायक आणि अनघा सुस्वरूप जोडपं.. विनायक अतिशय महत्वकांक्षी.. गावी जमीनजुमला, टोलेजंग वाडा, नारळी, केळीच्या बागा अशा कोकणातल्या छोट्या खेडेगावातल्या सधन कुटुंबातून आलेल्या विनायकला मोठ्या शहरात जाऊन नशीब कमवायचं खूळ लागलं. स्वतःचं विश्व निर्माण करण्याच्या विचाराने तो प्रेरित झाला आणि मग जास्त विचार नं करता डोळ्यांत उद्याची स्वप्न घेऊन तो आपल्या पत्नीसमवेत मुंबई शहरात आला आणि मग इथेच स्थायिक झाला. दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत त्यांचा संसार सुरू झाला. विनायक एका खाजगी कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून कामावर रुजू झाला आणि मग निवृत्तीपर्यंत तिथेच राहिला. सुरुवातीला परिस्थिती फार अनुकूल नव्हती. जास्त शारीरिक कष्टाची सवय नसल्याने त्रास होऊ लागला पण आता माघारी फिरणे नाही असं म्हणून तो गावी परत गेला नाही. तिथेच त्रास काढत राहिला. अनघानेही आपल्या नवऱ्याला साथ दिली. नवऱ्याच्या महत्वकांक्षेपुढे तिने तिच्या सगळ्या सुखांना,हौशीमौजींना दूर ठेवलं. तुटपुंज्या पगारातही तिने अगदी नेटाने संसार केला. नंतर फारच चणचण भासू लागली तेंव्हा मग अनघाने घरीच शिलाईकाम सुरू केलं. शेजारच्या बायकांचे ब्लाऊज, लहान मुलांचे कपडे शिवणं सुरू केलं. लोकरीचे स्वेटर, पायमोजे, दारावरची तोरणं बनवून विकले. उन्हाळ्यात पापड लोणची करून विकली. तिला जमेल ती कामं करून ती विनायकला आपल्या संसाराला हातभार लावू लागली. त्यामुळे सर्व खर्च भागून गाठीशी चार पैसे पडू लागले. एक दोन वर्षात विनायकने कंपनीतून कर्ज घेतलं आणि स्वतः जवळची साठवलेली जमापुंजी गोळा करून ते घर त्यांच्या घरमालकाकडून विकत घेतलं. हक्काचं घर झालं. आता दोघे मिळून एकमेकांना साथ देत गुण्यागोविंदाने संसाराचा रथ ओढत होते.

दिवस छान सरत होते. पुढे काही वर्षात त्यांच्या संसार वंशवेलीवर प्रसाद, ईश्वरी आणि सिद्धार्थ ही तीन फुलं उमलली आणि त्या दोघांचं अवघं जीवन सुखाने भरून गेलं. तिच्या घराचं नंदनवन झालं. विनायक अजूनच नव्या जोमाने कष्ट करू लागला. आता त्याच्या समोर तीन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न होता. घरात खाणारी तोंडं वाढली. त्यात त्यांच्या मनमिळावू स्वभावामूळे घरी कायम पाहुण्यांचा राबता असायचा. अनघा जणू अन्नपूर्णाच होती. तिच्या घरातून कधीच कोणी पाहुणा उपाशी गेला नाही. कायम तृप्ततेची ढेकर देत दोघां उभयत्यांना त्यांच्या मुलाबाळांना आशीर्वाद दिल्याशिवाय जायचा नाही.

हळूहळू मुलं मोठी होत होती. मुलांची शिक्षणं, त्यांचं संगोपण यात अनघाचा सारा वेळ निघून जात होता. विनायक कंपनीत जास्त वेळ काम करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत होता. डोक्यावर घरासाठी काढलेल्या कर्जाचं ओझं होतंच. फार ऐशोआरामात नाही पण विनायक आणि अनघा आपल्या संसारात, मुलाबाळांसमवेत खाऊन पिऊन सुखी होते.

काळ पुढे सरकत होता. प्रसाद, ईश्वरी आणि सिद्धार्थ आता मोठे होत होते. बालपण सरलं आणि मुलांनी आता तारुण्यात प्रवेश केला होता. प्रसाद सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आणि एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीस लागला. ईश्वरीही आपलं शिक्षण संपवून पदवीधर झाली. ती एका नामांकित कंपनीत अकाउंट मॅनेजर म्हणून रुजू झाली. सिद्धार्थला शिक्षणात फारसा रस नव्हता त्याने त्याची बारावी पूर्ण केली आणि तो एका गॅस एजन्सीमध्ये काम करू लागला.

तिन्ही मुलं हाताशी आली त्यामुळे विनायकच्या डोक्यावरचा संसाराचा भार कमी झाला. हळूहळू कर्जाचा बोझा कमी होत होता. अनघाच्या अंगावर एकदोन सोन्याचे दागिने सजू लागले. प्रसादने आवडीने त्याच्या पहिल्या पगारातून आईसाठी सोन्याच्या पाटल्या घेतल्या. सिद्धार्थने आईसाठी पैठणी आणि पप्पांसाठी चांगले कपडे घेतले. ईश्वरीने आईसाठी ‘ए’ आद्याक्षर असलेलं पेंडन्ट अडकवलेली सोन्याची चेन घेतली. आपल्या मुलांचं प्रेम बघून विनायक आणि अनघाला गलबलून आलं होतं. विनायक गहिवरून अनघाला म्हणाला,

“पाहिलंस अनु.. आपली मुलं किती गुणी आहेत! त्यांचं आपल्यावर किती प्रेम आहे बघ.. अगं, आपली मुलं हीच आपली संपत्ती.. आपली मुलं कधीच आपल्याला अंतर देणार नाहीत. हाताचा पाळणा करून ते आपल्याला जोजावतील. बघच तू.. आपण फार नशीबवान आहोत, इतकी गुणी मुलं आपल्या पोटी जन्मास आली.”

त्याच्या बोलण्यावर अनघाने अश्रूपूर्ण डोळ्यांनी मान डोलावली आणि म्हणाली,

“सारं भरून पावले ओ.. माझ्या बाळांनी माझ्या मातृत्वाची लाज राखली. आपले संस्कार ते अजिबात विसरले नाहीत. बाळांनो, जसं आमच्यावर माया करता न अगदी तसंच तुम्ही भावंडे एकमेकांना धरून रहा.. एकमेकांवर माया करा.. कधी एकमेकांना अंतर देऊ नका.. कळलं का?”

“हो गं आई.. तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही कायम एकमेकांच्या सोबत असू.. कधीच एकमेकांना अंतर देणार नाही. आणि हो आई, ही चेन मी तुझ्यासाठी घेतलीय. आई, हे तुझं नाव आहे. कधीच तुझ्यापासून दूर करू नकोस हं.. आय लव्ह आई.. ”

असं म्हणत ईश्वरी किती प्रेमाने आईला बिलगली होती!