तुझा हक्क नाही.. भाग ४
©अनुप्रिया
©अनुप्रिया
“बाबा, सध्याची परिस्थिती पाहता खर्च खूप वाढताहेत. मला वाटतं, ऋत्वाची रिक्षा बंद करावी. तुम्ही तिला शाळेत सोडायला आणि आणायला जात जा. तसंच येताना भाजीही आणत जा.. म्हणजे काय होईल, पैसेही वाचतील आणि तुमचा व्यायाम होईल. काय म्हणता? ”
तिच्या बोलण्यावर विनायकने मान डोलावली. अनघाला शुभदाचा डाव समजला होता; पण तिचा नाईलाज झाला होता. ती काहीच बोलू शकत नव्हती. आता विनायक रोज ऋत्वाला शाळेत सोडायला आणायला जाऊ लागला. ऋत्वाला शाळेत सोडल्यावर बाजारातून भाजीपाला, किराणा आणू लागला. त्याच्याकडून कधी काही कमी जास्त झालं तर शुभदा त्याला खूप टाकून बोलायची. इतके दिवस कधीही तोंड वर न करून बोलणारी शुभदा पदोपदी दोघांचा अपमान करू लागली. घरातल्या अडगळीसारखी त्यांची स्थिती झाली होती.
प्रसादही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागला. कधी कामाच्या व्यापामुळे, तर कधी स्वतःच्या बायकामुलांसोबत व्यस्त असल्याने आपल्या आई वडीलांकडे लक्ष द्यायला त्याचाकडे वेळ नव्हता किंबहुना स्वतःच्या त्रिकोणी कुटुंबापलीकडे दुसरं काही पाहण्याची इच्छा नव्हती. एकाच घरात राहून कित्येक दिवस प्रसाद आपल्या आईवडिलांशी दोन घटका शांतपणे बोलला नव्हता. वेळ नव्हता.. की प्रेम उरलं नव्हतं? सारेच प्रश्न अनुत्तरित. आयुष्यभर स्वाभिमानाने जगलेल्या आपल्या नवऱ्याकडे पाहताना अनघाचा जीव तीळ तीळ तुटत होता. त्याची अवस्था तिला सहन न झाल्याने अखेर एक दिवस तिनेच विनायकला बोलून दाखवलं.
“अहो, मी काय म्हणते, लेकाच्या घरी असं उपऱ्यासारखं राहण्यापेक्षा आपण आपल्या गावी जाऊया का? तिथे आपल्याला बोलणारं कोणी नसेल. गावी आपल्या लोकांत तुमचं मनही रमेल. जाऊया?”
“आणि मग सिद्धार्थचं काय? ईशुच्या लग्नाचं काय? त्यांची जबाबदारी आहेच नां? त्यांचं नीट मार्गी लागल्याशिवाय आपल्याला असं करून चालणार नाही.”
विनायकचं बोलणं अनघाला पटत होतं. तो पुढे म्हणाला,
“आणि तसंही अनु, आता किती दिवस राहिलेत? आठ गेले चार राहिले.. पिकलं पान कधीतरी गळून पडणार.. आपण सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. त्यांचा संसार आहे त्यांना त्यांच्या पद्धतीने करू देत नां.. तू लक्ष देऊ नकोस. मी ठीक आहे गं.”
विनायक आपल्या सुनेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकला होता पण अनघा मात्र फारच मनाला लावून घ्यायची. मुलाच्या एका भेटीसाठी त्या आतुर व्हायची. कधी कधी जुनी ट्रंक उघडून आत घडी घालून ठेवलेल्या आपल्या मुलांच्या लहानपणीच्या कपड्यांवरून उगीच हात फिरवत राहायची. त्यांच्या वस्तूंना हात लावून त्यांच्या स्पर्शाची भूक भागवून घ्यायची.
विनायक आणि अनघा दिवसेंदिवस आतून खूप खचत चालले होते. म्हातारपणामूळे विनायकची प्रकृती ढासळत चालली होती. आस्थमाचा आजार मागे लागला होता. त्यात शुभदाचे टोमणे होतेच. कायम तोऱ्यात जगलेल्या आपल्या स्वाभिमानी नवऱ्याला अशी नोकरांसारखी दिलेली वागणूक अनघाला रुचत नव्हती. सिद्धार्थला त्याच्या कामातून, मित्र परिवारातून आईवडीलांची विचारपूस करायला वेळ नव्हता. अनघा ईश्वरीजवळ आपलं मन मोकळं करायची. ईश्वरी कधी दादा वहिनीशी वाद घालायची तर कधी सिद्धार्थला समजावून सांगायची; पण दोघांत काहीच बदल दिसत नसल्याने एक दिवस तीच आईला म्हणाली,
“आई, इतकं सगळं सहन करण्यापेक्षा तुम्ही दोघं माझ्याकडे का राहत नाही? त्यांना त्यांचं पाहू देत नां. आई मी आहे न? मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही.”
ईश्वरी कळवळून म्हणाली.
“अगं तुझ्या बाबांचा ऋत्वावर किती जीव आहे माहितीये न तुला? ते तिच्याशिवाय राहू शकत नाहीत. शिवाय सिद्धार्थच्या जेवणाचं काय? त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत तरी मला त्याच्याकडे पाहावं लागेल नं? असं सगळं सोडून नाही येता येणार. आणि तुझ्या पप्पांचा दमा आता डोकं वर काढू लागलाय. तिथे हाकेच्या अंतरावर हॉस्पिटल आहे. तुझ्याकडे तशी कशी होणार बाळा? आणि दोन मुलं असताना लेकीच्या घरी राहणं बरं दिसेल का? लोक काय म्हणतील?”
अनघाच्या बोलण्यावर ईश्वरी उद्विग्न झाली.
“अगं आई, हे काय घेऊन बसलीस? कसला मुलगा मुलगी भेदभाव चाललाय तुझा? तुमची तब्येत महत्वाची नाहीये का? मला तुझं काही पटत नाही बघ.. निदान थोडे दिवस तरी येऊन जा गं..”
ईश्वरी काकुळतीला येऊन बोलत होती. अनघाने तिच्या बोलण्याला स्पष्ट नकार दिला. ईश्वरी पुन्हा पुन्हा आर्जवे करत राहिली, मग अनघा आणि विनायक काही दिवसांसाठी लेकीच्या घरी आले. चांगले आठ दिवस राहिले. ईश्वरीने आईबाबांची काळजी घेतली. एक दोन जागी फिरायला घेऊन गेली. खाऊपिऊ घातलं. आठ दिवसांनी विनायक आणि अनघा तृप्त मनाने पुन्हा आपल्या घरी परतले.
घरी आल्यावर पुन्हा पूर्वीचेच पाढे पंचावन्न सुरू झालं. त्या रात्री विनायक आपल्या खोलीत जात असताना प्रसाद आणि शुभदाच्या खोलीतून त्यांचं बोलणं ऐकू आलं.
घरी आल्यावर पुन्हा पूर्वीचेच पाढे पंचावन्न सुरू झालं. त्या रात्री विनायक आपल्या खोलीत जात असताना प्रसाद आणि शुभदाच्या खोलीतून त्यांचं बोलणं ऐकू आलं.
“प्रसाद, तुझ्या आईबाबांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त तुझीच आहे का? मीच का त्यांना सांभाळू? सिद्धार्थ आणि ईश्वरीने ही जबाबदारी का घेऊ नये? आता मला सर्वांचं करणं होत नाही. त्यात तुझे बाबा रात्रभर खोकत राहतात. माझी झोप पण होत नाही. त्यांच्यामुळे आपल्या ऋत्वालाही संसर्ग होऊ शकतो. हे बघ प्रसाद तू सिद्धार्थ आणि ईश्वरीशी बोलून घे. त्यांनी जबाबदारी झटकली तर त्यांना वृद्धाश्रमात पाठव. नाहीतर मी घर सोडून माहेरी निघून जाईन. मग तू बस तुझ्या आईबाबांसोबत..”
शुभदाच्या तोंडी वृद्धाश्रमाचं नाव ऐकताच विनायकला मोठा धक्का बसला. डोळ्यात पाणी साठू लागलं.
“आपल्या पोटच्या मुलांना आईवडील ही एक जबाबदारी वाटावी? या मुलांना मोठं करताना किती खस्ता खाल्ल्या.. किती कष्ट उपसले! त्यांच्या आजारपणात कित्येक रात्री त्यांच्या उशाशी बसून जागून काढल्या. आयुष्यभराची सर्व पुंजी यांच्या सुखासाठी खर्च केली. होतं नव्हतं ते सगळं अगदी राहतं घरही विकलं. आता आमच्याकडे यांना द्यायला मायेपेक्षा अधिक काही नाही म्हणताना आईवडील म्हणजे एक नको असलेली जबाबदारी वाटावी? प्रेम नाहीच का? यांना फक्त पैसा अडका दिला का आम्ही? आम्ही दिलेलं प्रेम, माया? त्याचं काय झालं? ते कुठे गेलं? आता ते आम्हाला वृद्धाश्रमाची वाट दाखवताहेत? आमच्यासाठी त्यांच्या मनात प्रेमाचा साधा लवलेशही नाही.”
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा