Login

तुझा हक्क नाही.. भाग ३

कथा एका हक्काची..
तुझा हक्क नाही.. भाग ३
©अनुप्रिया

आज ईश्वरीला सर्व घटना आठवत होत्या. ईश्वरी पुन्हा भूतकाळात गेली. कंठात उमाळे दाटून येऊ लागले. आईबाबांच्या केसात आता रुपेरी कडा आता डोकावू लागल्या होत्या. अनघाचेही गुडघे आता कुरकुर करू लागले होते. शरीरासोबत आता मनही हळूहळू वृद्धत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागलं होतं. अनघाला आता घरातली सारी कामं जमेनात. तिची फार दमछाक होऊ लागली. प्रसाद आता लग्नाच्या वयाचा झाला होता. त्यामुळे आता त्याचे दोनाचे चार करण्याची वेळ आली होती. त्याच्यासाठी वधूसंशोधन सुरू झालं. विनायक आणि अनघाने आपल्या नात्यातलीच प्रसादला अनुरूप अशी एक मुलगी पसंत केली आणि मोठ्या थाटामाटात दोघांचं लग्न लावून दिलं. मुलाच्या सुनेच्या सगळ्या हौशीमौजी पूर्ण केल्या. उरलीसुरली सर्व पुंजी प्रसादच्या लग्नात खर्च केली. आता फक्त एक राहतं घर तेवढं विनायकच्या नावावर होतं. शुभदा लग्न करून प्रसादच्या घरी आली.

दिवस भराभर सरकत होते. प्रसाद आणि शुभदाचा संसार सुरू झाला. प्रसादच्या कामात बढती मिळत गेली. पुढे वर्षभराने प्रसाद आणि शुभदाच्या संसारात ऋत्वाचं आगमन झालं. विनायक आणि अनघाचं आज्जी आजोबा म्हणून प्रमोशन झालं. थकलेल्या डोळ्यांना नातीच्या बाललीला पाहण्याचं सुख लाभलं. विनायक आणि अनघा प्रसादचं यश आणि त्याचा भरला संसार पाहून तृप्त झाले. सिद्धार्थही त्याच्या कामात रूळला होता. ईश्वरीनेही एका नामांकित कंपनीत काम छान सुरू होतं. आता घरात माणसं वाढली. घर अपूरं पडू लागलं. एक दिवस जेवणाच्या टेबलवर प्रसादने आई बाबांसमोर विषय काढला,

“पप्पा, तुम्ही पाहताय न, आता आपलं कुटुंब वाढत चाललंय. ऋत्वा मोठी होतेय. पुढे जाऊन उद्या सिद्धार्थचीही फॅमिली येईल तर मी काय म्हणत होतो, आता आपण मोठं घर घेऊया. थ्रीबीएचके फ्लॅट घेऊ. सर्वांना प्रशस्त वाटेल. हे आपलं घर विकून चांगली रक्कम येईल. ते पैसे आपण नवीन फ्लॅटच्या डाऊन पेमेंटसाठी वापरू आणि मी बँकलोन करून उर्वरित रकमेची सोय करता येईल. काय म्हणता?”

विनायकला प्रसादचं म्हणणं पटलं.

“बरोबर आहे तुझं प्रसाद.. आता आपलं कुटुंब वाढत जाणार.. आपल्याला मोठं घर घ्यावं लागेल. आपण लवकरच हे घर विकून टाकू आणि त्यासोबत नवीन फ्लॅट बुक करूया.”

त्याच्या बोलण्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. नवीन घरात जायचं म्हणून ऋत्वा तर आनंदाने उड्याच मारू लागली. सर्वजण आनंदात होते पण अनघा मात्र उदास झाली. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले. रात्रीची जेवणं उरकली. अनघा आणि विनायक फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेल्यावर अनघाने विषय काढला,

“अहो, तुम्ही घर विकण्याचा निर्णय फार घाईत घेताय असं तुम्हाला वाटत नाही का? अजून आपल्या ईशुचं लग्न व्हायचंय. सिद्धार्थचंही अजून नीट बस्तान बसलेलं नाहीये. आपण घर विकून सगळे पैसे प्रसादला दिले तर ईशुचं लग्न कसं करणार आहात? सिद्धार्थलाही नंतर पैशांची गरज पडली तर कुठून आणण्याचे आपण? उद्या ईशु आणि सिद्धार्थला असं वाटायला नको की, त्यांच्या आईवडिलांनी एकदुसरेपणा केला. संपत्तीतलं सगळं प्रसाददादाला देऊन टाकलं आणि आमचा साधा विचारही केला नाही. आईबाबांचं प्रसादवर आपल्यापेक्षा जास्त प्रेम आहे. बघा म्हणजे मला असं वाटतंय की, तुम्ही थोडा विचार करावा.”

“अगं अनु, असं काय करतेस? आपली पोटची मुलं आहेत ती.. त्यांच्यावर आपले संस्कार आहेत. ती अशी मुळीच वागणार नाहीत. आणि आपला प्रसाद.. त्याच्याबद्दल असा कसा विचार करतेस? आपल्यानंतर प्रसाद आणि शुभदाच तर ईशु, सिद्धार्थचे आईबाबा असणार आहेत. आपल्या प्रसादला त्याची जबाबदारी चांगली समजते. तो चुकीचं वागणार नाही. तोच आपल्या ईशुचं लग्न थाटामाटात पार पाडेल. कसलीच कमतरता भासू देणार नाही. बघ तू.”

विनायकचं बोलणं ऐकून अनघाचा नाईलाज झाला.

“ठीक आहे मग.. तुमचा त्याच्यावर विश्वास आहे न? मग झालं तर.. माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही म्हणाल तसं.. मला कसलाच मोह नाही. तुम्ही सोबत आहात इतकंच पुरेसं आहे मला.. ”

अनघाने स्मित हास्य करत विनायककडे पाहिलं. मुलांच्या विचारांनी त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं.

काही दिवसांनी कसलाही विचार न करता विनायकने राहतं घर विकून टाकलं आणि आलेले पैसे प्रसादला देऊन टाकले. प्रसादने थ्री बीएचके फ्लॅट बुक केला. चाळीतलं जुनं घर सोडताना, स्नेही, शेजारी पाजारी यांचा निरोप घेताना अनघा खूप रडली होती. त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि सर्वजण मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला आले. सर्वजण आनंदाने एकत्र राहू लागले. हळूहळू अनघा आणि विनायक दारात बसून गप्पा मारण्याची सवयी सोडून नव्या घरी बंद फ्लॅट सिस्टमशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला थोडं जड गेलं पणं नंतर हळूहळू सवय होऊ लागली.

सारंच गोडीगुलाबीने सुरळीत सुरू होतं. ईश्वरी कामानिमित्ताने दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली. तरी रोज आईला कॉल करून ती सर्वांची विचारपूस करायची. त्यांची काळजी घ्यायची. ऋत्वा आता मोठी झाली. आता ती शाळेत जाऊ लागली. ईश्वरी पुण्याला गेल्यानंतर मात्र हळूहळू अनघाला शुभदाच्या वागण्यात बदल दिसू लागला. शुभदा आपल्या सासूसासऱ्यांशी फटकून वागू लागली. सुरुवातीला अनघा आनंदाने घरातली सर्व कामे करायची. आता ती कामे त्यांनीच केली पाहिजेत असा हट्ट होऊ लागला. “आपल्या घरी यांना फुकट का पोसायचे?” असा विचार करत शुभदाने मोठ्या चलाखीने घरातल्या कामवाल्या मावशींना काढून टाकत घरातली सगळी कामं अनघावर सोपवली. सिद्धार्थचं काम सुरू होतं. खाजगी कंपनीत असल्याने त्याला घरी यायला रात्री खूप उशीर होऊ लागला. त्यामुळे शुभदाला ते आवडत नव्हतं. शुभदा काहीबाही कारणांनी त्याला टाकून बोलू लागली. घरात खटके उडू लागले. आणि एक दिवस रागाच्या भरात तो घर सोडून निघून गेला. भाड्याने घर घेऊन राहू लागला.

अनघाची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली होती. धाकट्या मुलाच्या काळजीने तिचा जीव कासावीस होत होता. शेवटी विनायकने ‘सिद्धार्थचं लग्न होईपर्यंत अनघाने त्याच्या सोबत राहावं’ असा निर्णय घेतला. म्हातारपणात त्या दोघांना एकमेकांपासून असं वेगळं राहावं लागत होतं. अनघावर आता दोन्ही घराच्या जबाबदाऱ्या आल्या होत्या. सिद्धार्थच्या घरचं उरकून ती प्रसादच्या घरी येऊन सारी कामे करायची. तिची फार दमवणूक होत होती पण तरीही शुभदाचं समाधान होत नव्हतं. तिची कुरकुर सुरूच होती. एक दिवस तर तिने कहरच केला. ऋत्वा शाळेतून घरी आली. आज्जीने तिचे कपडे बदलले आणि तिला फ्रेश करून त्या तिला जेवण भरवत बसल्या. विनायककडे पाहत शुभदा म्हणाली,