Login

तुझा हक्क नाही..

कथा एका हक्काची..
तुझा हक्क नाही
©अनुप्रिया

आई, पप्पांनी सांगितलं होतं ना, त्यांची सगळी संपत्ती आम्हा दोघां भावंडाच्या म्हणजेच माझ्या आणि सिद्धार्थ नावावर करायची? मग आता हे काय नवीन काढलंय?”

प्रसाद आईकडे पाहत रागाने म्हणाला तसं सांत्वनापर जमलेल्या सर्व नातेवाईकांनी त्याच्याकडे चमकून पाहिलं. प्रसादच्या चुलत्यानी, सदाशिवकाकांनी प्रसादकडे आश्चर्याने पाहत विचारलं,

“काय नवीन? कशाबद्दल बोलतोयस तू?”

“पप्पांच्या स्थावर मालमत्तेच्या वाटणीबद्दल बोलतोय मी.. यात ईशुचा हक्क असण्याचं काहीच कारण नाही.”

प्रसादने बेफिकीरपणे काकांना उत्तर दिलं. सदाशिवकाका काहीतरी बोलणार इतक्यात प्रसादच्या धाकट्या भावाने, सिद्धार्थने त्याचीच ‘री’ ओढत बोलायला सुरुवात केली,

“दादाचं बरोबर आहे आई.. ताईला काय गरज आहे? मुळात तिचा हक्क तरी आहे का? खरंतर तिने तिच्या लग्नानंतर तिचा हक्क तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या वडिलोपार्जित संपत्तीवर सांगावा. असंही लग्नानंतर तिला तिच्या नवऱ्याच्या इस्टेटीतला तिचा हिस्सा आपोआप मिळेलच की.. मग इथे कशाला आमच्यात वाटेकरी होतेय? इथे तिचा कोणताही हक्क नाही.”

सिद्धार्थच्या बोलण्यावर त्याच्या आईने, अनघाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा दुरवर कुठेतरी एकटक शून्यात हरवून गेली. जमलेल्या सर्वांनाच त्या दोघांच्या बोलण्याचं आश्चर्य वाटत होतं.

“काय चाललंय तुमचं? अरे निदान दादाचं कार्य तर होऊ द्या.”

सदाशिवकाका प्रसाद आणि सिद्धार्थला दरडावून म्हणाले.

“नाही काका.. आता सर्वजण एकत्र जमलेलो आहोतच तर जे काय व्हायचं ते आजच होऊन जाऊ देत. उद्या चर्चा करायला आमच्याकडे वेळ नाहीये. पप्पांचं कार्य झालं की, लगेच आम्हाला इथून मुंबईला निघावं लागेल. रजा संपत आलीय आमची.. शुभालाही लवकरच तिचं ऑफिस जॉईन करावं लागेल. ऋत्वाची शाळाही बुडतेय. मला वाटतं, सिद्धार्थलाही तितका वेळ नसेल. त्यालाही लवकरच या सगळ्या व्यवहारातून मोकळं व्हायचं असेल ना? काय रे सिद्धार्थ?”

प्रसादने सिद्धार्थकडे पाहून विचारलं. सिद्धार्थने होकारार्थी मान डोलावली.

“हो दादा.. बरोबर आहे तुझं.. मी तर खाजगी कंपनीत जॉबला आहे. तिथे सुट्टयांचा कायम प्रॉब्लेम.. मला तर मुळीच रजा मिळणार नाही. तेंव्हा आताच जे काही बोलायचं असेल तर बोलून घेऊया.”

सिद्धार्थच्या बोलण्याने जणू प्रसादला प्रोत्साहनच मिळालं आणि तो पुन्हा सदाशिवकाका आणि त्याच्या आईकडे पाहत म्हणाला,

“आई, आता ईशुच्या बाबतीतला निर्णय तुलाच घ्यायचा आहे. मी हे हक्कसोडपत्राचे सर्व पेपर्स करून आणलेत. त्यावर तिला सह्या करायला सांग. विषयच संपेल. काका, तुम्ही उगीच विषयांतर करू नका. आई, तू सांग, तू काय ठरवलं आहेस?”

प्रसाद काकांवर गुरगुरत म्हणाला. सिद्धार्थनेही त्याला दुजोरा दिला.

“अरे पण ईश्वरीचा हक्क नाही असं कसं म्हणतोस? अजून तिचं लग्नही झालं नाहीये आणि जरी झालं असतं तरीही आईवडिलांच्या सर्व मालमत्तेवर मुलींचाही समान हक्क असतोच. कायद्यातही तशी तरतूद आहेच की.. तू तिचा हक्क नाकारू शकत नाहीस. समजलं? अरे तुझ्या वडिलांना, विनूदादाला जाऊन अजून दहा दिवसही झाले नाहीत आणि तुम्ही हा काय विषय घेऊन बसलात? त्यांच्या वियोगाने आपल्या आई आणि बहिणीची काय अवस्था झालीय ते तरी बघा रे.. इतके निर्दयी नका होऊ रे..”

जिजाआत्या डोळ्यातलं पाणी पदरानं टिपत म्हणाली.

“जिजाआत्या, तू तर काही बोलूच नकोस. पप्पांनी तुम्हा सगळ्या बहिणींसाठी किती आणि काय काय केलंय ते आम्हाला चांगलंच माहित आहे. सगळा पैसा त्यांनी आज्जीआजोबांचं आजारपण आणि तुम्हा बहिणींची लग्न आणि बाळंतपणं करण्यातच वाया घालवला. तू आता आमच्यामध्ये बोलतेयस ना, याचं कारणही आम्हाला कळत नाही असं समजू नकोस प्लिज.. आई आणि ईशुची बाजू घेऊन तुलाही पप्पांच्या संपत्तीतला हिस्सा मागून घ्यायचा असेल. अजून दुसरं काय असणार आहे? एरवी तर तू आईला सारखी बडबडत असतेस. तिला नावे ठेवत असतेस. मग आता काय झालं? तू आईला किती आणि काय बोललीस ते तुला आठवतंय ना? की आठवण करून देऊ मी?”

सिद्धार्थ आत्याला उलटं बोलत होता.

“हो सिद्या, चांगलंच आठवतंय मला.. पण आता ही वाद घालण्याची वेळ आहे का? तुम्हाला काळ वेळ काही कळतं की नाही? बोलायचं म्हणून काहीही बोलायचं.. दादाने आम्हाला कधीच दुखावलं नाही आणि आता त्याच्या पोटची पोरं बघा, कसा आमचा पाणउतारा करताहेत.. मोठ्या माणसांचा काही मान ठेवणार आहात की नाही?”

जिजाआत्या त्या दोघांकडे पाहत चिडून म्हणाली.

“म्हणूनच म्हणतोय आत्या.. तू आमच्यामध्ये बोलू नकोस. तू आमच्या घरच्या भानगडीत नाक नाही खुपसलंस तर बरं होईल. आमचं आम्ही पाहून घेऊ. तुला टेन्शन घेण्याची गरज नाही. ”

प्रसाद जिजाआत्याच्या अंगावर खेकसला. जिजाआत्या काही बोलणार इतक्यात सदाशिव काकांनी तिला शांत राहण्यासाठी डोळ्यांनीच खुणावलं. दोघा भावंडांनी सर्व मर्यादा पार केल्या होत्या. आईवडिलांची संपत्ती, पैसा, जमीनजुमला, वाडा, आणि बँकेत फिक्स्ड डिपॉजिट्सच्या रक्कमा याव्यतिरिक्त त्यांना काहीच दिसत नव्हतं. ईश्वरीच्या डोळयांतून पाणी वाहू लागलं. तिची आई अनघा मात्र एकटक शून्यात पाहत होती. जणू काही तिचा यां जगाशी काहीच संबंध नाही. ती काहीच बोलत नव्हती. ईश्वरी आईला कुशीत घेऊन मायेने गोंजारत होती. खरंतर आईचा जीव तिच्या बाबांबरोबर निघून गेला होता. कुडी तेवढी मागे राहिली होती.

संपत्तीसाठी वाद घालणाऱ्या तिच्या भावंडांना पाहून ईश्वरीचा जीव तीळ तीळ तुटत होता. डोळयांतून पाण्याच्या धारा वाहत होत्या.

“दादा काय बोलतोयस तू हे? अरे आईची अवस्था तरी बघ ना.. केवढा मोठा दुःखाचा डोंगर आपल्या आईवर कोसळलाय! बघ किती कोलमडून गेलीय ती! पप्पा आपल्याला सोडून गेलेत तर तिच्या देहातला आत्माच हरपून गेलाय रे! तिला कसलंच भान उरलेलं नाहीये अरे.. तिचा श्वास सुरू आहे फक्त पण दादा, फक्त श्वास सुरू असला म्हणजे जगणं नसतं ना रे.. आता आपल्या आईला आपणच या दुःखातून बाहेर काढलं पाहिजे नं? आता तिला आपल्या तिघा भावंडांच्या आधाराची गरज आहे.. प्लिज, नको ना असं वागू.. मला खूप त्रास होतोय दादा..”

ईश्वरीचं मन आक्रंदत होतं. डोळ्यातली आसवं दादाला आर्जवे करत होती. आईसाठी तिचा जीव तुटत होता. आईचं ते पांढरं फटफटीत पडलेलं कपाळ पाहून तिच्या मनाला तीव्र वेदना होत होती.