Login

तुझाच मी भाग दोन (अंतिम)

Lovestory

तुझाच मी भाग दोन ( अंतिम)
लघुकथा


नीरजच्या ऑपेरेशनची तारीख ठरली तशी साधना खिन्न वाटायला लागली. म्हणजे त्याला दृष्टी येणार म्हणून ती खुशच होती पण नंतर या नात्याचे काय होणार याची चिंता तिला सतवू लागली... ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी घृणा बघायची नव्हती तिला.  तिचे कॉलेजमध्ये लक्ष लागत नव्हते... अचानक नकळत तिच्या डोळयांतून अश्रू वाहू लागायचे....

तिने ठरविले... आता त्याला भेटायचे नाही... त्याच्याशी बोलायचे नाही... तसे त्याला सोबतीचीही गरज नाही.... रोहन येणारच आहे ऑपेरेशनच्या दिवशी... माझ्याशिवाय जगता आले पाहिजे त्याला...

सकाळचे दहा वाजून गेले तरी साधना आली नाही. इतका उशीर ती कधीच करायची नाही. कारण त्यानंतर तिला कॉलेजला जायचे असायचे. तो बेचैन झाला. शेजारच्या मुलाच्या मदतीने त्याने तिला फोन केला पण तिने उचलला नाही.. तो काळजीत पडला. इकडे तीही बेचैन झाली... मी न गेल्यामुळे त्याची काय अवस्था झाली असेल?... न राहवून त्याला शेवटचे डोळे भरून बघायसाठी संध्याकाळी ती घरी गेली.

"साधना?... आलीस ना तू?... कुठे गेली होतीस?.. फोन पण उचलला नाहीस.. मला माहीत आहे माझे उद्या ऑपेरेशन आहे म्हणून आज तू जास्तीचे काम केले असशील ना कॉलेजमध्ये?.. कारण उद्या तू माझ्यासोबत असणार आहेस." दरवाजा उघडल्याचा आवाज आला तसा तो बोलला.

काही न बोलता साधना त्याच्याजवळ गेली. तिने त्याचे हात हातात घेतले व त्याच्यावर आपले ओठ  टेकवले.
तिच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या हातांवर पडले.
त्याने हाताने तिचे डोळे चाचपले... आणि अलगद तिला कवेत घेतले... तीही त्याच्या ऊबदार मिठीत विसावली आणि हुंदकून रडू लागली.

"ए वेडे... नीट होईल माझे ऑपेरेशन... तू आहेस ना माझ्याबरोबर... तू असलीस कि सर्व ठीक होते. उद्या सकाळी नक्की ये. माझ्या डोळ्यांनी मला माझ्या प्रिन्सेसला बघायचंय..." तिच्या डोक्यावर थोपटत तो म्हणाला.

त्याने असे म्हटल्यावर ती केविलवाण्या नजरेने त्याला पाहू लागली.


खूप वेळ वाट बघून ही साधना न आल्यामुळे डॉक्टरांनी नीरजला समजावले.... तो ऐकत नव्हता... पण मग नर्स आणि रोहनने समजावल्यावर तो ऑपेरेशन करावयास तयार झाला... त्याला आशा होती कि ऑपेरेशन थिएटर मधून आल्या आल्या ती समोर असेल...


आजचा प्रसंग.....
नीरजचे ऑपेरेशन सक्सेसफूल झाले होते. साधना येईपर्यंत पट्टी काढणार नाही असा हट्ट  तो करत होता. ती आली नाही.... तो हताश झाला आणि शेवटी पट्टी काढावयास तयार झाला... त्याची दृष्टी पूर्ववत झाली होती.... पण तिच्याशिवाय रंगीबेरंगी जग त्याला बेरंग वाटत होते.

रोहनने त्याला घरी सोडले व काही वेळाने तो निघून गेला. त्याचे घर एकदम व्यवस्थित रचलेले होते. तिच्यामुळे घराला घरपण आले होते. त्याने घरभर फिरून बघितले.  सर्व घराला तिचा स्पर्श झाला होता.. त्यांचा न फुलणारा संसार तिने व्यवस्थित मांडला होता.
तो ड्रेसिंग टेबल जवळ आला तिथे एक चिट्ठी होती. त्याने घाईघाईत ती खोलली,


'प्रिय नीरज,

रागावू नको माझ्यावर... माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे....इतके कि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. पण हे प्रेम एक गोड आठवण म्हणून मला आयुष्यभर सांभाळायचे आहे.... म्हणून मी तुला न भेटलेलंच बरं... तू राजकुमार आहेस.... प्रत्येक मुलगी ज्याला स्वप्नात बघते तो..... आणि मी.... माझी तुझी काहीच तुलना होऊ शकत नाही... एकदम साधारण आहे रे मी....... तू मला बघशील तेंव्हा तुलाही हेच वाटेल. आणि मग तिरस्कार करशील माझा.... म्हणून त्याआधीच दूर जात आहे.... एखादी राजकन्या बघ आणि लग्न कर... पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव... अशी एक मुलगी या जगात कायम असेल जी तुझ्यावर जीवापाड प्रेम करत राहील.

तुझी आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझीच
साधना.'


'साधना.... साधना... इतकेच ओळखलेस का मला?.... माझी साधना... तु किती सुंदर आहेस हे मला विचारायचे ना... इंद्राच्या अप्सरेलादेखील लाजवेल इतके सुंदर मन आहे तुझे. म्हणूनतर काहीही ओळख नसतानादेखील माझी मदत केलीस तु........ माझ्या जीवनात एखाद्या परिसारखी आलीस आणि प्रेमाची जादू करून निघूनही गेलीस...कुठे शोधू तुला.... मी तुझाच आहे ग.... कसे कळले नाही तुला?... कसा जगू मी? तुझ्याशिवाय जगणे मला नाही जमणार..'
नीरज साधनासाठी व्याकुळ झाला होता.

आठवडा झाला तरी साधना त्याला भेटायला आली नाही. तिच्या आठवणीत झुरत होता तो. रोहनने समजावून सांगितले,

"ऑफिस जॉईन कर.... तिला विसरशील... तिने आपले कामाचे ठिकाण, घरचा पत्ता काहीच सांगितले नाही... ना डाक्टरांना ना इतर कुणाला... तिचा फोनपण बंद येत आहे.... कसे शोधायचे तिला?"

रोहनने समजावल्यावर नीरज ऑफिसला जायसाठी तयार झाला.

दुसऱ्यादिवशी सकाळी तो बसस्टॉपवर आला. साधना आधीपासूनच तिथे होती... इतक्या दिवसांनी तिने त्याला पाहिले त्याचे डोळे ठीक झाले आहेत हे पाहून तिच्या डोळ्यात आंनदाश्रू  आले....

तो समोरून रस्ता क्रॉस करत येत होता..आणि एक गाडी आली.. ते पाहून साधना च्या हृदयात धस्स झाले त्याच्याकडे जाण्यासाठी ती थोडी पुढे झाली. तिला वाटले पुन्हा तसेच घडते की काय... तो थांबला. आणि गाडी गेल्यावर त्याने रस्ता क्रॉस केला. बसच्या रांगेतल्या इतर लोकांनी साधनाच्या अशा वागण्याकडे चमत्कारीक नजरेने पाहिले. तशी ती मागे पूर्ववत आपल्या जागेवर आली आणि रुमालाने तिने आपल्या डोळ्यातले पाणी टिपले.  तिचे असे वागणे समोरून नीरजने ओझरते पाहिले आणि तो रस्ता क्रॉस करून नेमका तिच्या बाजूलाच येऊन उभा राहिला.... का कोणास ठाऊक वारंवार त्याचे लक्ष तिच्याकडे जात होते. आणि ती त्याच्याकडे पाहणे टाळत होती. थोड्यावेळाने साधनाच्याच कॉलेजमधील काही मुली... स्टॉपवर आल्या. आणि त्यांनी तिला अभिवादन केले,

'Good morning mam '

साधनाने काही न बोलता फक्त मान हलवून आणि मंदस्मित करत त्यांच्या अभिवादनाला प्रत्युत्तर दिले आणि बोलायचे टाळले.

नीरज हे सर्व निरखून पाहत होता. साधना प्रोफेसर आहे हे त्याला ठाऊक होते.

त्याची खात्री पटत चालली होती...

गर्दी खूप होती... त्यामुळे कंडक्टर लाईनमध्येच सर्वाना तिकिटे वाटत होता. तिला बोलते करण्यासाठी दोनशेची नोट पुढे करत त्याने तिला विचारले,

"Excuse me मॅडम .... तुमच्याकडे change आहे का?"

तिने मान हलवत नकार दिला. तो तिला अजून काही विचारणार इतक्यात कॉलेजमधील तरुणांचा मोठा घोळका तिथे आला.  आधीच गर्दी असल्यामुळे धक्काबुक्की झाली आणि साधना तोल जाऊन खाली पडणार इतक्यात नीरजने तिला आपल्या हातांमध्ये झेलले...........तो स्पर्श....... तो सुगंध तो अनुभवत होता.  तिचा स्पर्श ओळखण्यासाठी त्याने तिला अजून अलगद जवळ ओढले आणि तिचे हात हातात घेतले.....ती आजूबाजूच्या धक्काबुक्कीने गोंधळली होती. तिने पटकन आपले हात सोडवले व स्वतःला सावरून ती उभी राहिली....तिच्या हृदयात धडधड वाढली.  तो मात्र मंत्रमुग्ध होऊन तिला पाहतच राहिला... त्याचे प्रेम त्याच्या अगदी जवळ उभे होते..... त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.... त्याने तिला ओळखले याबाबतीत साधना अनभिज्ञ होती.... कंडक्टर तिकीट द्यायला पुढे आला. ती पैसे काढून कंडक्टरलां देणार इतक्यात नीरजने नोट पुढे केली आणि तो म्हणाला,

"कंडक्टर, दोन तिकिटे दया... साता जन्माच्या प्रवासाची.."

त्याने असे म्हणताच साधनाने त्याच्याकडे चमकून पाहिले..... त्याचे घारे डोळे अश्रूनी डबडबले होते.

'काय राव चेष्टा करता का सकाळी सकाळी....' कंडक्टर बडबडत पुढे निघून गेला.

तिच्याकडे पाहत तो पुढे म्हणाला,
"तुझ्यासाठी मी कायम आंधळा व्हायला तयार आहे. आतातरी ....."

त्याला पूर्ण बोलू न देता तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला.... आणि भावाविभोर होऊन ती त्याच्याकडे पाहत राहिली.


समाप्त

ही लघुकथा कशी वाटली वाचून नक्की सांगा.