Login

तुझे नाराज नहीं.. जिंदगी भाग २ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

जिंदगी
तुझसे नाराजी नहीं जिंदगी..

(दिव्या खाली अंधार)

भाग (२)


दोन महिन्यात करुणाचे लग्न झाले. गावातील छोट्या देवळात लग्न झाले. करुणाच्या काकांनी फक्त लग्न करून दिले. एकही दागिना तिच्या अंगावर घातला नव्हता. सासर्यांनी मात्र तिला गंठण आणि कानातली फुले केली होती. शिवाय शालू ही घेतला होता. काकांनी तीन साधारण साड्यांना तिची बोळवण केली. पण सासरच्या घरातली माणसे आणि नवरा सगळे खूप चांगले होते. तीन नणंदा पण चांगल्या होत्या, त्यापैकी दोघी शाळा शिकत होत्या. एक बारावी झाल्यानंतर घरीच होती. करुणाचे त्यांच्या घरात खूप चांगले स्वागत झाले. घरी आल्याबरोबर सासूबाईंनी तिला चांगली साडी देऊन तिची ओटी भरली आणि रात्री नव्या नवरानवरीची दृष्ट काढली. दोघांनाच देवदर्शनासाठी पाठवले. लग्न झाल्या झाल्या तिला नव-याबरोबर जाता आले नाही. घरातले बाकीचे मात्र तिला समजून घेत होते. मोठ्या अहिल्या बरोबर करूणाची छान मैत्री झाली. करूणाला घरी कामाची सवय होती. ती भराभरा घरातले काम आवरत होती आणि मग तिचे आवडीचे वाचत होती. अहिल्या करूणा आल्यामुळे थोडी मोकळी झाली होती. करूणाच्या सासूबाई ही करुणावर काम टाकून निर्धास्त शेतात कामाला जात होत्या. अहिल्या आणि करूणा संध्याकाळी देवळात फिरायला जात. फक्त आधिराज आला की ते दोघे फिरायला जात. पण इतर वेळी अहिल्या आणि करुणाचा देवळात जायचा नेम कधी चुकला नाही. देवळात जायच्या आधी करूणा बाकीच्या दोघींसाठी खाणे आणि सगळ्यांचा चहा करून ठेवत असे. करुणा आणि अहिल्याच्या खूप गप्पा रंगत होत्या. अहिल्याबाई शहराबद्दल खूप कुतूहल होते. ती तरुणाला सारखे शहरातील जीवनाविषयी विचारत असे. देवळातून घरी आल्यावर भराभर स्वयंपाक आवरायचा आणि टिव्ही बघायचा असे तिचे रूटीन होते. यावेळी तिच्या धाकट्या दोघी नणंदा सहामाही परीक्षेत तीन/चार विषयात नापास झाल्यावर तिच्या सास-यांनी दोघींनाही शाळा सोडून घरी बसवायचे ठरवले. तेव्हा ती म्हणाली, “मला थोडा वेळ द्या, मी थोडे दिवस दोघींचाही अभ्यास घेते. त्यातून त्या वार्षिक परीक्षेत नापास झाल्या तर मग ठरवा.” पण मुलींनीही शिक्षण घ्यायलाच हवे. त्यांना नव्या युगात चांगले रहाता येण्यासाठी, प्रत्येक ठिकाणी तोंड देता येण्यासाठी शिक्षण घेणे किती आवश्यक आहे हे तिने सास-यांना व सासूबाईंना समजावून सांगितले आणि ते त्यांना पटलेही. नापास झालेल्या रेणू आणि वेणू दोघींचाही करूणा रोज संध्याकाळी अभ्यास घेऊ लागली. एक दिवस वेणू म्हणाली, “वहिनी तू जशी समजावून सांगते तसे शाळेतले सर का सांगत नाहीत? ते आपले भराभरा वाघ मागे लागल्यासारखे शिकवतात. कोणाला समजले आहे की नाही हे सुद्धा बघत नाहीत.”
“ हे बघा, प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते. आपल्याला समजलं नाही म्हणून आपण कुणाला नावं ठेवू नाही. आपल्याला ज्ञान देणार्या गुरूला तर नाहीच नाही. त्यांच्यामुळे आपल्याला ज्ञान मिळते. आता तुम्हाला समजते आहे ना, मग चांगला अभ्यास करा, आणि चांगले मार्क मिळवा.” रेणू आणि वेणू ढ नव्हत्या, फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. गणित विषय सगळ्यांना अवघड जातो, पण करुणाने त्यांना सोप्या पद्धतीने गणित शिकवले व त्यांच्या मनातली गणिताची भिती कमी केली. शास्त्र आणि गणिताचा पेपर यावेळी दोघींना चांगला गेला आणि करूणाच्या प्रयत्नांना यश आले. वेणू आणि रेणूच्या परीक्षेतील मार्कांनी ते सिद्ध केले. त्यामुळे वेणू रेणू तर खूश झाल्याच पण सासू सास-यांना देखील करुणाचे खूप कौतुक वाटले. त्यांच्या मनात आले, “इतकी हुशार मुलगी आहे तर तिला पुढे शिक्षण घ्यायला काय हरकत आहे. त्यांनी करुणाला पुढे शिक्षण घेण्याची परवानगी दिली.
करुणाच्या आबा काकांनी मात्र विरोध केला. “मुलींना शिक्षण घेऊन काय करायचे आहे? मुलींनी चूल आणि मूल सांभाळावे” अशा मताचे ते होते. पण करुणाच्या सासर्यांनी “आता ती आमची मुलगी आहे. तिला पुढे शिकवावे हे आम्ही ठरवले आहे. आपल्या फक्त कानावर घातले.” इतके परखड उत्तर मिळाल्यावर काका गप्प बसले. आणि करुणाचा जीव भांड्यात पडला.

क्रमशः

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे


0

🎭 Series Post

View all