तुझसे नाराजी नहीं जिंदगी..
(दिव्या खाली अंधार)
भाग (३)
करुणाचे मिस्टर अधिराज घरी आल्यावर तिच्या सासू सास-यांनी तिला त्याच्या बरोबर शिक्षणासाठी पाठवले. आधिराज ला सुद्धा तिने पुढे शिक्षण घ्यावे असे वाटत होते. लग्नानंतर कित्येक दिवसांनी ती आधिराज बरोबर रहायला आली. दोघांना थोडी मोकळीक मिळाली. दोन खोल्यांचे छोटेसे घर पण तिने खूप छान सजवले. तिचा हात घरावर फिरल्यावर घराचा जणू महाल झाला. आधिराजने तिला विचारले “तुला काय शिकायचे आहे?’ “ खरेतर मला सायन्स घेऊन काॅम्प्यूटर प्रोग्रॅमर व्हायचे होते. पण आता मी काॅमर्स घेऊन नौकरीसाठी प्रयत्न करीन. म्हणजे आई आणि भाऊला काका काकूंच्या दबावाखाली रहावे लागणार नाही.’ तिच्या इच्छेप्रमाणे आधिराजने तिला काॅमर्स काॅलेजाला घातले. बी. काॅम करता करता तिने एकीकडे आयसीडब्लूए करायचे ठरवले. तिचा आयसीडब्लूए एंट्रन्सचा क्लास सुरू झाला. एंट्रन्सची परीक्षा ती पहिल्या प्रयत्नात चांगल्याप्रकारे पास झाली. घरचे सगळे काम करून ती क्लास काॅलेज करत होती. तिच्या हातचे गरम गरम खाऊन अधिराज पण खुश होता. त्याची तब्येत सुद्धा छान सुधारली होती. अधेमधे गावाकडे जाऊन ती दोघे सगळ्यांना भेटून येत होती.
इकडे गावाकडे तिचे सासरचे सगळे छान होते. वेणु रेणू दोघी नीट अभ्यास करत होत्या. बघता बघता त्या दहावी मॅट्रिक झाल्या. आणि त्यांनीही खूप शिकायचे ठरवले. करुणाच्या बरोबरच्या आहिल्याचे लग्न तिच्या पसंतीच्या आणि शहरात रहाणार्या मुलाशी ठरले. लग्नासाठी करुणा आणि आधिराज दोघेही गावाकडे गेली होती. करुणा आणि आधिराजने शक्य ती सर्व मदत आई वडीलांना केली. अहिल्यासाठी दागिना ही केला. तिच्या आवडीच्या दोन साड्या करुणा येतानाच घेऊन आली होती. लग्नात दोघेही आनंदाने सहभाग घेत होती. आधिराज आणि करुणाला सुखात बघून त्याचे आई वडील ही खूश झाले होते. लग्न सुट्टीत होते म्हणून काॅलेज बुडले नाही. आहिल्याचे लग्न अगदी थाटामाटात झाले आणि वेणू रेणूला घरात अगदीच एकटे एकटे वाटू लागले.
करुणाचे सासू सासरे आणि आई सगळे बाळासाठी करुणाच्या मागे लागले. ती हसून विषय टाळत होती. पण “शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय नाही.’ हे तिने पक्के ठरवले होते. आधिराजने सगळ्यांना स्पष्ट सांगितले, “एकदा तिचे शिक्षण काही कारणाने अर्धवट राहिले होते. पण आता नको. ती खूप हुशार आहे. तिचे शिक्षण पूर्ण होऊ दे.’ आधिराजने असे सांगितल्यावर सगळे गप्प झाले. करुणा “आधिराजने आपली बाजू मांडली’ हे पाहून खूश झाली.
तीन वर्षात करुणा बी. काॅम आणि आयसीडब्लूए दोन्ही चांगल्या मार्कांनी पास झाली. इकडे परीक्षा पास झाली आणि तिने गूड न्यूज ही दिली. दोन्ही चांगल्या बातम्या एकदम समोर आल्या. आधिराज आणि करुणा दोघेही खूप आनंदात होते. दोन महिने झाले होते करुणाला, तीन पूर्ण झाल्यावर सासरी व माहेरी कळवायचे म्हणून ती शांत राहिली. तीन महिने झाल्यावर ती व आधिराज दोघेही गावाकडे गेले. रस्ता अतिशय खराब होता. एसटी खूप वरखाली होत होती. खूप हादरे बसत होते. करुणाला खूप त्रास झाला आणि अचानक तिचे अबाॅर्शन झाले. तिला दोन दवाखान्यात ठेवावे लागले. “अती दगदग” असे डॉक्टरांनी सांगितले. सासू सासरे आणि सगळीच नाराज झाली. घरी आल्यावर मात्र सासूबाईंनी तिला जागेवरचे हलू दिले नाही. पूर्ण विश्रांती दिली. गावाहून आठ दहा दिवसांत दोघे परत आले. पण करुणा कमालीची डिप्रेस्ड झाली होती. तिचे कशातही तिचे लक्ष लागत नव्हते. तिला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आधिराजने तिला बॅंकेच्या परीक्षांचे फार्म भरायला सांगितले. आणि तिला त्यासाठी प्रोत्साहन दिले. तिने बॅंकेच्या परीक्षेसाठी अर्ज भरले व अभ्यास ही सुरू केला. दोन महिन्यांनी परीक्षा होती. परीक्षेत पास होऊन तिला बॅंकेत नोकरी लागली. घरापासून बॅंक थोडी लांब होती. आधिराज रोज तिला बाईकवरून सोडत व आणत होता. नोकरी सांभाळून ती घरही व्यवस्थित बघत होती. आधिराज सुद्धा तिला जमेल तशी मदत करत होता. बघता बघता एक वर्ष झाले. ती पर्मनंट झाली. थोडे दिवसांनी तिला परत दिवस गेले. अधिराज्य आणि ती दोघेही खूप आनंदात होते. यावेळी पूर्ण काळजी घ्यायची असे दोघांनीही ठरवले. तिला वाटले “आपल्या आयुष्यात काही कमी नाही. आपण खूप खूप नशीबवान आहोत.’ तिच्या भावाचे शिक्षण चालू होते. गावाकडे आईपण खुशीत होती. पण… …
दोन तीन महिने नीट गेले असतील तोपर्यंत तिला बॅंकेत सोडून परत जाताना अधिराजचा अपघात झाला. चूक कुणाची होती कुणी काही बोलत नव्हते. तिला दोन तीन तासांनी समजले तशी ती धावत त्या ठिकाणी गेली पण तोपर्यंत त्याला दवाखान्यात नेले होते. तिच्या सह कर्मचारी मैत्रिणी़नी तिला दवाखान्यात नेले. डाॅक्टर त्याला बघत होते, त्याच्या डोक्याला जबरदस्त मार बसला होता. तो दवाखान्यात नेई पर्यंत जिवंत होता. डॉक्टर तपासणी करेपर्यंत तो गेला होता. ती तिथेच बेशुद्ध पडली. डाॅक्टरांनी तात्पुरते औषध दिले. तिला कोणीतरी घरी घेऊन गेले. तिच्या घरच्यांना कळवले. ते येईपर्यंत तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्या बरोबर बसून होत्या. तिच्या घरचे आल्यावर सगळे विधी झाल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीने अहिल्याला हळूच तिच्या प्रेग्नन्सी विषयी सांगितले. करुणाचे कशातच लक्ष नव्हते. अहिल्यानेच तिसऱ्या दिवसांनंतर आईशी बोलून घेतले. व तिच्या डाॅक्टरांना घरी येण्याची विनंती केली. तरुणाला बसलेल्या मानसिक धक्क्याने तिचे बाळ पोटात गेले होते. करुणाचे आयुष्य उध्वस्त झाले. पुन्हा एकदा करुणाच्या प्राक्तनाने तिची परीक्षा घ्यायचे ठरवले होते.
क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन कर्वे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा