Login

तुझे नाराज नहीं.. जिंदगी भाग ५(अंतिम) (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

जिंदगी
तुझसे नाराजी नहीं जिंदगी..

(दिव्या खाली अंधार)

भाग (५)


करूणा जरा सावरते न सावरते तोच एक दिवस तिची आई व भाऊ तिच्या दारात हजर होते. ती बॅंकेतून घरी आली तर दोघे जण तिच्या दारात बसून होते. “नवरा गेल्यावर हट्टाने नोकरी करून शहरात राहिली.” म्हणून आईचा करुणावर राग होता, म्हणून ती कधी करुणाच्या घरी येत नव्हती किंवा तिला तशी मोकळीक नव्हती. भाऊ मात्र कधीतरी यायचा. पण आज दोघांना बघून करुणाला आश्चर्य वाटले. तिने दार उघडून दोघांना आत घेतले. तिने दोघांना प्यायला पाणी दिले आणि चहा करायला गेली. चहा घेऊन ती बाहेर आल्या आल्या आईने डोळ्यांना पदर लावला आणि भावाने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. “माझ्या बापाच्या पैशावर आणि शेताच्या वाटणी वर डोळा आहे ***चा. म्हणून आम्हांला घराबाहेर काढले त्यांनी. फेडतील ह्याच जन्मी. माझे तळतळाट भोवती साल्याला. वाटोळ होईल.”
“शू… शांत. आवाज कमी. आपण ज्या इमारतीत राहतो तिथे आणखी लोक रहातात.” करुणाने भावाला शांत केले. “आई न पडता मला काही सांगितलेस तर मला कळेल. काय झाले.”
“काका काकांनी चोरीचा आळ घेऊन आम्हांला घरातून हाकलून लावले. फक्त कपडे घेऊ दिले. बसभाड्यासाठी पण पैसे नाही दिले. कालपासून पोटात अन्नाचा कण नाही. नुसती रखरख रातभर.” आईने उत्तर दिले. अग पण बाबांची पेन्शन मिळते ना तुला, ते ठेवायचे बाजूला, आत्ता कमीतकमी बसभाड्यासाठी तरी उपयोगी झाले असते. असो. आधी दोघांना जेवायला काहीतरी करते. मग निवांत बोलू.” जेवणं झाल्यावर तिने एका खोलीत दोघांची सोय केली. आणि ती तिच्या खोलीत जाऊन झोपली. सकाळी तिची रोजची स्वयंपाकाची बाई आल्यावर ती तिला काम सांगू लागली. तो पर्यंत आई आली “चहा मिळेल का घोटभर. केव्हापासून जागी आहे. पण करावा की नाही समजले नाही.” तिने मावशीने चहा करायला सांगितला आणि म्हणाली. “इथेच आहे सगळं, फक्त बघितले की झाले. तुझेच घर आहे, काहीही करू शकतेस इथे.” तिने आईची आणि मावशीची ओळख करून दिली. “मावशी, ही माझी आई. माझी आई आणि भाऊ आज पासून इथेच रहाणार आहेत. त्यांचाही स्वयंपाक करायचा आहे आजपासून. बाकी मी नंतर बोलते.” आणि ती आवरायला खोलीत गेली. तिची आई सतत मावशीच्या कामाकडे बघत स्वयंपाक घरातच बसून राहिली होती.

थोडे दिवस आई आणि भाऊ दोघेही जरा शांत होते. नंतर रोजच स्वयंपाकाच्या मावशीच्या तक्रारी सुरू झाल्या. “सगळे इतके मिळमिळीत करते. जरा चवदार करायला सांग तिला.”
“आई ती एकाच चवीचा स्वयंपाक बनवते. मला असाच लागतो सौम्य, नाहीतर मला दवाखान्यात जायची वेळ येते. तुम्हाला हवे तर तुम्ही चटणी लोणचे घ्या. किंवा नंतर त्यात तिखट घालून घेऊ शकता ना.”. आई आणि भाऊ रोज नवीन प्रश्न घेऊन येत होते आणि करुणा शांतपणे एकेक प्रश्न सोडवत होती. एक दिवस ती भाऊला म्हणाली, “ तू काहीतरी शिक किंवा काम बघ. तुलाच उपयोग होईल. दिवसभर नुसता घरात कशाला बसतो? तुला हवे तर माझ्या ओळखीच्या गॅरेज मध्ये मी शब्द टाकते. ते काम शिकून घे.”
“अगदी मनातले बोललीस ताई. मी जातो गॅरेज मध्ये कामाला. जरा तरी चांगला वेळ जाईल.” अनपेक्षितपणे भाऊने होकारार्थी उत्तर दिले. “तो काय आहे” हे करुणाला चांगले माहिती होते. तरी तिने गॅरेज मध्ये शब्द टाकला. भाऊ तिथे जाऊ लागला. आणि त्याची टवाळ मुलांच्यात उठबस वाढली.

करुणा बॅंकेत मॅनेजर होती. तिला बॅंकेचा “सर्वोत्कृष्ट कर्मचारी” सन्मान मिळाला. तिचा सत्कार समारंभ होता. तो आवरून खूप आनंदाने ती घरी परतली. आई टिव्ही पहात बसली होती, पण तिचे त्यात लक्ष आहे असे वाटत नव्हते. तिने आईला विचारले, “तुमची जेवणं झाली का?”
“भाऊ आला नाही अजून. मी वाटच बघत होते तुमच्या दोघांची.” तिने आईचे व तिचे ताट वाढून घेतले. जेवणं झाल्यावर खूप दमल्यामुळे ती लगेच खोलीत जाऊन झोपली. तिला जाग आली ती पहाटे बेल वाजल्यानंतर. बघते तर दारात पोलीस होते.
“साॅरी बाई, तुम्हांला यावेळी उठवले. पण मला माझे काम करायलाच हवे.” इन्स्पेक्टर तिच्या ओळखीचे होते म्हणून सभ्यपणे बोलत होते.
“हरकत नाही. बोला काय काम आहे?” करुणाने विचारले.
“तुमचा भाऊ आहे का घरात?”..
तिने जाऊन आईला उठवले, पण आई उठतच नव्हती. तिने आईला हलवून तिच्या तोंडावर पाणी मारून पाहिले, पण काहीच प्रतिसाद नाही, हे बघून ती जोरात ओरडली “आई”. इन्स्पेक्टर धावत खोलीत गेले. आई गेली होती. इन्स्पेक्टरने सगळे चेक केले. “ह्यांचा गळा दाबून खून झाला आहे. हे ही तुमच्या भावाने केले असावे असे वाटते.” ते म्हणाले.
“म्हणजे?” करुणाने जरा स्पष्ट विचारले.
“काल तुमच्या भावाने शेठ चौधरींचा खून केला आहे आणि दुकानातून रोख रक्कम घेऊन तो पळाला आहे. त्यासाठीच आम्ही आलो आहोत. तुमचे घर ही चेक करा.” इन्स्पेक्टर म्हणाले.
ती बेडरूम मधे गेली आणि तिने कपाट उघडले. तिचा पूर्ण लाॅकर रिकामा होता. रोख रक्कम आणि सोने चांदी सर्वच गायब होते. ती चक्कर येऊन पडली.
यथावकाश तिच्या भाऊला अटक झाली. तिचे काका काकू तिच्या भेटीसाठी आले तेव्हा म्हणाले, “दिव्या खाली अंधार. बाप आणि बहिणीने सचोटीने काम करून इज्जत मिळवली आणि भावाने घराण्याची काही घालवली.” काका.
“ह्याला तुझी आईही तेवढीच जबाबदार आहे. जेव्हा त्याने पहिल्यांदा घरात चोरी केली तेव्हाच त्याला शिक्षा करायला हवी होती पण तिने त्याचा आळ स्वतःवर घेतला आणि पोरगं बिघडत गेले. दारू पिऊन गोंधळ घालायला लागले.” करुणा शांतपणे सगळे ऐकून घेत होती. पण मनातल्या मनात मात्र ती खूप आक्रंदत होती.

समाप्त

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

0

🎭 Series Post

View all