Login

तुझे नाराज नहीं... भाग १ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

जिंदगी
तुझसे नाराजी नहीं जिंदगी..

(दिव्या खाली अंधार)

भाग (१)

गरम गरम काॅफीचा घोट घेत ती टेरेसवर बसली होती. दुरून कुठूनतरी मंद आवाजात गाणी ऐकायला येत होती. “तुझसे नाराज नहीं जिंदगी” तिचे आवडते गाणे लागले आणि ती भान हरपून ऐकत राहिली. तिच्या जीवनातील घटनांचा पदर हळूहळू तिच्या डोळ्यासमोर उलगडू लागला.

१९८४ मधे करूणा खूप चांगल्या मार्कांनी बारावी पास होऊन शाळेत पहिली आली होती आणि तिने काॅम्यूटर सायन्सला एडमिशन घेतली होती. तिला प्रोग्रामर व्हायची इच्छा होती. काॅलेज सुरू झाले. नवीन मित्र मैत्रिणी मिळाल्या छान ग्रूप तयार झाला. चेष्टा मस्करी करत अभ्यास करत पहिली सेमिस्टर संपत आली. आठ दिवसांत दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा सुरू होणार होती आणि एक दिवस अचानक तिच्या वडीलांना हार्ट अटॅक आला. लगेचच ऑपरेशन होऊ शकत नाही, काही दिवस थांबावे लागते, म्हणून काही दिवस थांबून मग त्यांचे ऑपरेशन केले, पण ऑपरेशन करतानाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांना ऑपरेशन टेबलवर पुन्हा अटॅक आला. कसे बसे त्यांचे दिवस पार पडले आणि ऑपरेशनसाठी घेतलेले उधारी मागण्यासाठी लोकांनी गडबड सुरू केली. पैशांसाठी अक्षरशः तगादा लावला. करुणाच्या आईने तिच्या सासर्यांकडे पैसे मागितले. थोडे त्यांनी दिले थोडे करुणाच्या आईचे सोने विकून भागवले. काकांनी आणि आबांनी मात्र त्यांना तिघांना आता इथे राहू द्यायचे नाही हे पक्के ठरवले होते. चांगली बसलेली घडी विस्कटून गेली. करूणाला शिक्षण सोडणे भाग पडले. वडीलांच्या तटपूंज्या पेन्शन वर दोघांचे शिक्षण होणे अवघड होते. त्यांना ह्या मोठ्या शहरात तिघांनाही रहाणे देखील अवघड वाटत होते, म्हणून काका आणि आबांच्या सांगण्यावरून करूणा, तिची आई व भाऊ गावी रहायला गेले. वडीलांच्या जागी नोकरी करून पुढचे शिक्षण घ्यावे असे करूणाला वाटत होते, पण “वडीलांच्या नंतर तिच्या भावाला नोकरी मिळण्यासाठी क्लेम ठेवायचा” म्हणून आईने तिला क्लेम सोडायला सांगितला. ती गावी गेली आणि तिच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळाला. गावात बारावीच्या पुढे शिक्षणाची सोय नव्हती. आणि तिने पुढे शिकणे तिच्या काकांना व आबांना मान्य नव्हते. शिक्षणाचा ध्यास असलेली हुशार करुणा सगळे सोडून घरातले काम आणि शेतातील कामे करू लागली. त्यातच तिचा वेळ जाऊ लागला. वाचन, काही छंद, काही निराळे करायला तिला वेळच मिळत नसे. थकलेल्या आजीसाठी तिची कामे करायला आणि काकूला घर कामासाठी आयत्या बायका मिळाल्या. परत बाबांची येणारी पेन्शन ही घर खर्चासाठी द्यावी लागे. भाऊ शिकत होता, पण त्याचे शिक्षणही काकांच्या उपकारावर चालू आहे असे काका नेहमीच बोलून दाखवत. बाबांची पेन्शन ही त्यांनी दिलेल्या पैशाची परतफेड आहे असे समजून आई सगळे गप्प सहन करत होती. तिला दुसऱ्या कुणाचाही आधार नव्हता. हे सगळे बघून करूणाला परत शहराकडे जावे असे वाटत होते. “कारण नसताना आपण ही गुलामगिरी का सहन करायची?” असा प्रश्न तिला पडत होता. पण आई आणि भावाचा विचार करुन ती शांत होती. तिच्या भाऊ शिक्षण घेत होता, पण त्याच्याकडे लक्ष द्यायला ही तिला जमत नव्हते. त्याचा अभ्यास घेण ही तिला शक्य होत नव्हते. असंच काही दिवस उलटले. करूणाला अठरा वर्ष पूर्ण झाली. घरात तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. करूणाला इतक्या लवकर लग्न करायचे नव्हते. तिने तिचे मत मांडल्यावर “गावकीतले लोक शेण घालतील तोंडात. शहरा सारखे इकडे चालत नाही.” काका रागाने बोलल्यावर ती गप्प बसली. तसही त्या तिघांच्या बोलण्याला आणि मतांना तिथे काहीच किंमत नव्हती. तिला स्थळे बघायला सुरुवात झाली.

सहा आठ महिन्यात करूणाचे लग्न ठरले. मुलगा अधिराज बी. एससी. एग्रिकल्चर होता आणि तो सरकारच्या एग्रिकल्चर डिपार्टमेंटमधे नोकरीला होता. त्याचे आईवडील शेजारच्या गावात रहात होते. त्याला तीन बहीणी होत्या. हा सगळ्यात मोठा, त्यामुळे ह्याच्यावर थोडी जबाबदारी येणार होती. पण नोकरीला तो थोड्या मोठ्या गावात रहात होता. त्यामुळे करूणाला जरा हायसे वाटत होते. तिच्या मनात शहरात गेलो तर काहीतरी शिक्षणाचा आणि बुद्धीचा उपयोग होईल शिवाय आई आणि भाऊला पण नेता येईल असे तिला वाटले. तसही गावातल्या रिकामटेकड्या मुलांबरोबर त्याने जास्त वेळ राहू नये व त्याला वाईट संगत लागू नये असे तिला वाटत होते.


क्रमशः

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

0

🎭 Series Post

View all