तुझे नि माझे जमेना भाग १३
मागील भागात आपण पाहिले कि प्रथम आजीला लग्न करण्याचे आणि परदेशी न जाण्याचे वचन देतो. पण गौरी या लग्नाला तयार होईल का? पाहू पुढे काय होते ते..
"सुनील, नंदिनी अरे लवकर या.." आजी ओरडत होत्या..
" आई काय झाले?"
" अरे, गायत्रीला हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे.. सिरियस आहे म्हणे.. मला भेटायचे आहे तिला.."
" अचानक काय झाले?"
" ते तिथे गेल्याशिवाय कसे समजणार? येतोस का तू?"
" हो.. चला.. सगळेच जाऊ.." गौरीचे पूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोचले..
" कशा आहेत काकू?" सुनीलने बाहेर थांबलेल्या प्रथमला विचारले..
" हो.. आता बरी आहे.." त्या सगळ्यांना बघून भांबावलेल्या प्रथमने सांगितले.. " तुम्ही सगळे इथे?"
" हो.. काकू हॉस्पिटलमध्ये आहेत ते कळले.. अच्युतचा फोन लागत नव्हता म्हणून थेट इथेच आलो.."
" सोडतात का रे आत भेटायला? " आजींनी विचारले.. "कधी एकदाचे गायत्रीला बघते आहे ,असे झाले आहे.."
" हो आजी.. सोडतात.." प्रथम म्हणाला..
" मी येते मग तिला भेटून.." शालिनीताई आत गेल्या.. आत जाताच आधी दरवाजा नीट लावून घेतला..
" गायत्री.. मी आहे.. उघड डोळे.." दरवाजाचा आवाज ऐकून डोळे मिटलेल्या गायत्रीबाईंना शालिनीताईंनी सांगितले..
" किती आणि काय काय करावे लागते ग या नातवंडांसाठी.." डोळे उघडत गायत्रीबाई बोलल्या..
" तू पण डेंजर आहेस हो.. लगेच आलीस पण हॉस्पिटलमध्ये.."
" अग मग काय करणार? यांचा रिझल्ट लागायची वेळ येईल.. हळूहळू करू म्हटले तर.. असो.. पण तुझ्यासाठी एक गुड न्युज आहे.."
" काय ग?"
" प्रथमने होकार दिला हो माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्नाला.. आता तुझी पाळी."
"बरं.. बघू मला जमतंय का ते.." दोघी खुदुखुदू हसत होत्या.. "चल आता निघते मी.. त्यांना आत पाठवते.. नाहीतर थांब.. मी आलेच.. तु फक्त तुझे बेअरिंग सोडू नकोस.." शालिनीताई बाहेर गेल्या.. येताना सगळ्यांना आत घेऊन आल्या.
" काय काकू, वाटते का आता बरे?"
" हो.. रे.. आता या प्रथमने लग्नाला दिलेला होकार ऐकून जगायची आशा आली आहे.. बघू अजून किती दिवस जगते ते.." गौरीने चमकून प्रथमकडे पाहिले.. तो नजर चोरत इथे तिथे बघत होता..
" जगशील ग.. खूप जगशील.." शालिनीताई गायत्रीबाईंचा हात हातात धरून म्हणाल्या.. " मी सुचवू का स्थळ तुला? माझी एक नातेवाईक आहे.. चालणार असेल तर बघ.."
"अग आई, काकूंची परिस्थिती बघ.. तू कुठे काय बोलते आहेस? " सुनीलने बोलायचा प्रयत्न केला.. या विचित्र परिस्थितीतून बाहेर जाण्यासाठी प्रथम वळला.. तोच गायत्रीबाईंचा आवाज त्याच्या कानावर पडला..
" एक मुलगी आवडली आहे ग.. पण तिने होकार दिला पाहिजे ना? आता प्रथम काय माझ्या शब्दाबाहेर नाही. पण त्या मुलीला आमचा प्रथम आवडला पाहिजे ना?" आजी खोल आवाजात बोलत होत्या.. इथे प्रथम आणि गौरीचा चेहरा पडला होता..
"नाव तर सांग त्या मुलीचे.. हवे तर मी बोलते तिच्याशी.. "
"नको ग बाई.. मुलीचे नाव ऐकलेस तर चिडशील माझ्यावर.."
" अग मी का चिडेन?"
" कारण मला गौरी पसंत आहे प्रथमसाठी.." आजींनी बॉम्ब फोडला.. प्रथम आणि गौरी दोघेही हे ऐकून शॉकच झाले..
" गौरी? आमची गौरी? अग कसे शक्य आहे? तिला तर अजून कसल्या कसल्या परिक्षा देऊन या सुनीलसारखे मोठे अधिकारी व्हायचे आहे.."
" मला वाटलेच होते.. असं काहीतरी असणार आहे.. मी मरते अशीच.." गायत्रीबाई सुस्कारा सोडत म्हणाल्या.
" नको ग असं बोलूस.. काळजाला घरे पडतात.. पण तिच्या आयुष्याचा निर्णय मी कसा घेऊ? हो कि नाही ग गौरी?" असा प्रश्न थेट आपल्याकडे असा येईल असे न वाटल्याने गौरी थोडी भांबावली..
" हो.. म्हणजे.." गौरीने प्रथमकडे पाहिले.. तो बहुतेक तिच्या उत्तराची वाट बघत होता..
" अग, लग्नानंतर पण ती परिक्षा देऊ शकते कि? तू नाही शिकलीस लग्नानंतर? पण जाऊ दे.. मरत्या जीवाची इच्छा पूर्ण होत नाही असे दिसते.." गौरीने आईबाबांकडे अपेक्षेने पाहिले..
" आम्हाला थोडा वेळ देता का काकू?" नंदिनीने विचारले..
" आता कसला वेळ? माझ्याकडेच वेळ नाही.. आता गौरीलाच प्रथम आवडत नसेल तर विषय संपलाच."
" तसे काही नाही आजी.." गौरी पटकन बोलून गेली.. सगळे तिच्याकडे बघतच राहिले..
" गौरी? करशील मग आमच्या प्रथमशी लग्न?" गायत्रीबाईंनी परत विचारले.. गौरीने आईबाबांकडे पाहिले.. त्यांनी मान हलवली.. तिने पुढे होऊन आजींचा हात हातात घेतला आणि म्हणाली..
"आजी फक्त तुमच्यासाठी मी लग्नाला तयार आहे.."
" आता मी घरी जायला मोकळी.." आजी हसत म्हणाल्या..
" काय?"
" मी वर जायला मोकळी.. असे म्हणते आहे मी.. " आजी परत बोलल्या.. "चला आता लागा लग्नाच्या तयारीला.. लवकरात लवकर चा मुहूर्त काढू.." सगळे निघाले.. प्रथम पण यांना सोडायला बाहेर आला..
" काका.. मी जरा गौरीशी बोलू?"
" बोल ना.. गौरी आम्ही गाडीजवळ आहोत.." ते सगळे खाली गेलेले पाहून प्रथम गौरीसमोर आला..
" थॅंक यू.. माझ्या आजीची इच्छा पूर्ण केल्याबद्दल.. पण एवढा मोठा निर्णय? "
" हो.. कधी कधी घरातल्यांच्या आनंदासाठी मोठे निर्णय घ्यावे लागतात.. पण आशा करते कि याचा माझ्या करिअरवर परिणाम होणार नाही.."
" मी वचन देतो तुला.. हे लग्न तुझ्या प्रगतीच्या आड येणार नाही.." गौरी जायला वळली..
" गौरी.." प्रथमने हाक मारली..
" काय?"
" फ्रेंड्स?"
" आता तर ओळखीला सुरुवात झाली आहे.. जरा वेळ जाऊ दे.. मग ठरवेन तुझ्याशी मैत्री करायची कि नाही.."
आजी फायनली डिस्चार्ज घेऊन घरी गेल्या.. दोन्ही कुटुंबांचा होकार तर होताच.. त्यामुळे वेळ न दवडता लग्नाची तयारी सुरू झाली.. त्यासाठी दोन्ही कुटुंबांनी भेटायचे ठरवले.. प्रथमचे घर बाकी कोणी बघितले नसल्यामुळे तिथेच साक्षगंध उरकायचे ठरले..
" अग आवरा पटापट.. किती तो मेकअप.. " शालिनीताई ओरडत होत्या..
" आई झालेच.. गौरीचे आवरून झाले कि निघू.."
"राज.. प्रथमसाठी घेतलेल्या वस्तू घेतल्यास का?"
" हो आजी.. एक विचारू का ग?"
" विचार कि.. ती प्रथमची आजी बघ.. तिला नातवाच्या लग्नाची किती घाई आहे.. आणि तू बघ.."
" हत् मेल्या.. थांब हिचे लग्न झाले कि लगेच तुझा मुहूर्त बघते.. एवढा बोलतो आहेस म्हणजे मुलगी ठरवलेली दिसतेस.."
" नाही ग बाई. मी कसली मुलगी ठरवतो.. मी तर आजी जिला हो म्हणेन तिच्या गळ्यात माळ घालीन."
" हो ना.. मग थांब जरा.. हिचे झाले कि तुझाच नंबर लावू.."
यांचे बोलणे होईपर्यंत नंदिनी आणि गौरी आल्या.. गौरीने छानशी मोरपिशी रंगाची साडी नेसली होती.. त्यावर मॅचिंग दागिने, छोटीशी टिकली..
" अरे वा.. गौराई नटली का माझी?" आजी तिची दृष्ट काढत म्हणाली..
" चला निघायचे का?" सुनील विचारायला आले.. नटलेल्या गौरीला बघून त्यांचे डोळे पाणावले..
" कसे असते ना, आत्तापर्यंत आपली असणारी मुलगी, एक विधी आणि सगळेच बदलून जाणार.."
"म्हणून मी लग्न करायला नाही म्हणत होते.." गौरी रडवेली होत म्हणाली.
" अग वेडे ती जनरीतच असते.. तुझी आई, मी आम्ही नाही का आलो आमचे माहेर सोडून. एक ना एक दिवस प्रत्येकालाच नवीन आयुष्य सुरू करावे लागते.." आजी समजावत म्हणाली..
" हो आणि तुझे लग्न झाल्याशिवाय माझे होणार नाही ना.." राज मस्करी करत म्हणाला..
" आई बघना हा काय म्हणतो आहे.."
" मी काही तुमच्या मध्ये पडणार नाही.." आई म्हणाली..
" ठिक आहे.. बघून घेईन मी तुला दादा.."
" आता या धमक्या प्रथमला द्यायच्या.. तो तरी घाबरतो का बघ.." राज म्हणाला.. सगळे हसायला लागले..
" चला लवकर नाहीतर इथेच आपल्याला उशीर होईल.." बाबा म्हणाले.. यांची गाडी प्रथमच्या घरी पोचली.. सुचेता आपल्या बाबांसोबत बाहेरच यांच्या स्वागतासाठी उभी होती.. गौरीला बघून ती ओरडलीच..
" दोघेही मॅचिंग मॅचिंग.." कोणाला काही कळलेच नाही.. तोच प्रथम बाहेर आला.. त्यानेही त्याच रंगाचा कुर्ता घातला होता..
" हि चिटींग आहे.. तुम्ही दोघांनी मिळून ड्रेसकोड ठरवला?" सुचेताने विचारले..
" नाही ग.. माझ्याकडे कुठे त्याचा नंबर आहे.." गौरी कशीबशी म्हणाली.
" अरे व्वा.. न बोलताही आवडी जुळत आहेत वाटते.. तुमचे छान जमेल वाटते.." राज दोघांकडेही बघत म्हणाला..
प्रथम आणि गौरी एकमेकांशी जुळवून घेतील कि नाही बघू पुढील भागात..
हा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा