तुझे नि माझे जमेना..
"सुचेता, असा कसा ग झुरळाला घाबरणारा तुझा भाऊ.." आपले हसू आवरत गौरी बोलली..
" तसाच आहे तो. मनाने खूप चांगला आहे.. एक गोष्ट सोडली तर.."
" कोणती गोष्ट?
" झुरळ.." दोघी परत हसायला लागल्या..
" काय ग प्रथम का ओरडला? गौरी चावली कि काय त्याला?" गायत्रीबाईंनी हसत विचारले..
" आजी.." गौरी लाजली..
" अग नाही.. झुरळ होते.. जास्त भितीदायक कोण होते हे न कळून तो किंचाळला.." सुचेता उत्तरली..
त्या घरातले वातावरण पाहून नंदिनीच्या मनातली गौरीच्या लग्नाबद्दलची उरली सुरली शंकापण निघून गेली होती..
" जेवायला बसायचे ना? कि अजून वेळ आहे?" सविताने विचारले..
" नाही.. बसूया लगेच.. तू पाने वाढायला घे.. आणि हो नव्या जोडीला शेजारी बसव.. सुचेता ताटाभोवती रांगोळी काढायला घे.. आणि बाहेर राधाबाई आणि मंगेशकाका असतील. त्यांना सूनबाई बघायला बोलव.." गायत्रीबाईंनी पटापट सूचना दिल्या..
" हे मंगेशकाका आणि राधाबाई कोण? सगळ्यांना पडलेला प्रश्न विचारून शालिनीताई मोकळ्या झाल्या..
"अग राधाबाई आमच्याकडे असतात वरकामाला.. आणि मंगेश माळीकाम, रखवाली अशी दोन्ही कामे करतो.." गायत्रीबाई म्हणाल्या..
सुचेता दोघांनाही बोलावून आली.. कोणीही न सांगता गौरीने त्यांना नमस्कार केला.. ते पाहून राधाबाईंनी तिची अलाबला घेतली..
" सोन्यासारखी पोर आहे.. छान शोभतो आहे हो जोडा.." डोळ्यातले पाणी पुसत त्या आत गेल्या.. मंगेशकाका निघणार तोच आजींनी सांगितलं ," वेगळा स्वयंपाक करत बसू नकोस रे. पाठवून देते तुझा डबा."
हो म्हणत ते हि गेले.. तोपर्यंत सुचेताची रांगोळी काढून झाली होती.. सविताने ताटे करायला घेतली होती.. नंदिनी आणि गौरी मदत करायला जात होते पण सविताने नको सांगितले..
" आज पहिल्यांदाच आला आहात घरी.. आज नको.. परत आलात कि हक्काने सांगेन.."
सगळे जेवायला बसले.. सविता आणि राधाबाई काय हवे नको ते बघायला थांबल्या.. त्या थांबल्या म्हणून मग नंदिनी सुद्धा थांबली..
" आजी आता उखाणा घ्यायला लावायचा ना?" सुचेता उत्साहाने म्हणाली..
" नाही ग पोरी.. उखाणा लग्नाच्या वेळेस.. गौरी भरपूर उखाणे पाठ करून ठेव हो.." आजी म्हणाल्या..
खेळीमेळीत जेवणे चालली होती.. सविता आणि नंदिनीचे जेवण सुरू असताना अच्युतने त्याच्या बहिणीला सुखदाला फोन लावला..
" सुखदा.. हि गौरी.. प्रथमची होणारी बायको.. आणि यांना ओळखलस का?"
" थांब.. या शालिनीकाकू.. राईट?"
" एकदम राईट.. कशी आहेस ग पोरी?"
" मी छान काकू.. अच्युत आणि हे काय डायरेक्ट लग्न ठरल्यावर सांगतो आहेस?" सुखदा चिडली होती..
" अग ती खूप मोठी स्टोरी आहे.. सांगतो नंतर.. आणि तयारी करायला घे.. गुरूजींनी पंधरा दिवसांनंतरचा मुहूर्त ठरवला आहे.."
" पंधरा दिवस?" प्रथम आणि गौरी दोघेही ओरडले..
" बघ.. यांना पण माहित नाहीये.. चल ती तुला नंतर परत फोन करतो.. "
" अरे पण मला आईबाबांशी बोलू देशील का?"
" नंतर बोल.." अच्युतने फोन ठेवला.
जेवणखाण आटोपल्यानंतर सुनीलने विचारले..
" आता आम्ही निघू का? आता तयारीला लागले पाहिजे.."
" थोडं थांबा हां.. सविता.." गायत्रीबाई म्हणाल्या.. सगळ्या बायका आत गेल्या.. सविताने आजींच्या हातात किल्ली दिली..
" मी कशाला.. तूच काढ.." आजी म्हणाल्या.. सविताने कपाटातून दागिने काढले.. नथ, वाकी, हार असे सगळे दागिने होते.. ते गौरीच्या हातात देत आजी म्हणाल्या..
" हे आपले पिढीजात दागिने आहेत.. माझ्या आजेसासूबाईंपासून चालत आलेले.. माझी इच्छा होती कि तू लग्नात घालावेत.. मुलाचे लग्न झाले कि सासू या दागिन्यांवरचा हक्क सोडते.. आता सविताने हे तुला दिले आहेत.. नसतील आवडले तर लग्नात नाही घातलेस तरी चालतील हो.. तुला हवे तसे आपण बनवून घेऊ.." आजी सांगत होत्या.. सविता मान हलवत होती..
" अजून एक मंगळसूत्र वगैरे तुला कसे हवे आहे ते हि बघून ठेव.. एक दिवस ठरवून सगळी खरेदी करून टाकू.."
सविता म्हणाली..
"माझे असे काही नाही.. तुम्हाला हवी ती डिझाईन चालेल मला.. आणि आजी मी घालेन हे दागिने.. मला नको नवीन दागिने.." गौरी गडबडून म्हणाली.. गायत्रीबाईंनी तिला परत जवळ घेतले.. "अशी कशी ग आमच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण करते आहेस तू.. आमचेच गतजन्मीचे काहीतरी पुण्य असावे.." बाहेर उभा राहून प्रथम हे सगळे बघत होता..
शेवटी गौरी आणि तिचे कुटुंब घरी निघाले.. प्रथमची चुळबुळ चालली होती..
" तुला काही बोलायचे आहे का? " राजने प्रथमच्या खांद्यावर हात ठेवत विचारले..
" हो.. ते म्हणजे.. माझ्याकडे गौरीचा नंबर नाहीये.. तो जर मिळाला असता तर.."
" हो का.. ए गौरी.. प्रथम बघ काय म्हणतो आहे.." सविताशी बोलत असलेल्या गौरीला राजने हाक मारली.
"जा.. बघ जा.." सविताने तिला पाठवले..
" काय झाले दादा?"
" याला तुझा मोबाईलनंबर हवा आहे.. तू याला अजून तुझा फोननंबर दिला नाहीस?" राज गौरीची फिरकी घेत होता..
" नाही.. तशी वेळच आली नाही.."
" मग आता आली आहे.. दे पटकन.. आणि ये.. चल बाय प्रथम.." राज तिथून निघाला..
" देतेस ना नंबर?" गौरी काही बोलत नाही हे बघून प्रथमने विचारले.. गौरीने नंबर दिला..
"मी फोन करतो तुला नंतर. मला बोलायचे आहे तुझ्याशी.."
" गौरी निघूया ना?" गाडीत बसलेल्या नंदिनीने आवाज दिला..
" मला तर वाटतय गौरीला सॉरी वहिनीला इथून जायचेच नाहीये.." सुचेता हसत म्हणाली.. तशी गौरी तिथून निघाली.. घरी आल्यावर सगळे हॉलमध्ये बोलत बसले..
" आई, किती जुने दागिने होते ते.. तुम्ही पाहिले होते आधी?" नंदिनीने शालिनीताईंना विचारले..
" हो.. अग गायत्री इतर वेळेस नाही पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी न चुकता ते दागिने घालायची.. शंकरराव तिला घालायला लावायचे.. कसली लक्ष्मी सारखी सुरेख दिसायची सांगू.."
" आजी अजून तुमच्या जुन्या गोष्टी सांग ना.." राज रंगात आला होता..
" सांगते.. पण त्या आधी एक महत्वाचे काम करू दे.. जा आत जा. आणि माझी पेटी सांभाळून घेऊन ये."
राज आत जाऊन पेटी घेऊन आला. आजींनी ती पेटी उघडली.. त्या बोलायला लागल्या..
" आपण काय गायत्रीसारखे श्रीमंत नाही.. पण हे माझे दागिने आहेत.. अर्धे गौरीला आणि अर्धे राजच्या बायकोला.. तुम्ही दोघे जे हवे ते निवडा.. पण दोघांनाही सारखेच मिळणार हे लक्षात ठेवा.."
" आजी.. पण हे दागिने वगैरे?" गौरी म्हणाली..
" अग, स्त्रीधन असते ते.. आणि तुझ्याकडे तुझ्या आजीची आठवण नको का काही? आणि नंदिनी आपल्याला गौरीला या व्यतिरिक्त छोटे मंगळसूत्र, नथ, कानातले, अन्नपूर्णा बाळकृष्ण सगळे घ्यायचेच आहे.. तू एकदोन दिवसात जाऊन ते करून घे.. आणि जाताना त्या प्रथमला पण बोलावून घे.."
" प्रथमला कशाला?" गौरीने विचारले.
" त्याचे काय आहे.. लग्नाच्या आधी आपल्याकडे साखरपुडा असतो.. तेव्हा नवराबायको एकमेकांना अंगठी घालतात.. त्या अंगठीचे माप कोणाचेही असून चालत नाही ना म्हणून.. बरोबर ना आजी?" राज म्हणाला..
" नंदिनी..खाऊन घे ग बाई.."
"आई म्हणजे?"
" तुझ्या लेकाला झाली आहे लग्नाची घाई.. म्हणून तो वाट पाहतो आहे गौरीच्या लग्नाची.. आणि माझी आई नेहमी म्हणायची.. लेक होईपर्यंत लेवून घ्यावे आणि सून येईपर्यंत खाऊन घ्यावे म्हणून म्हटले.."
" आजी तू पण ना.." राज लाजला..
" चला तुमचे चालू द्या.. मी फक्त साडी बदलून येते.." गौरी म्हणाली.. आत तिचा मोबाईल ब्लिंक होत होता.. तिने बघितले तर प्रथमचे मिस्ड कॉल्स होते..
काय बोलायचे आहे नक्की प्रथमला गौरीशी.. बघू पुढील भागात.. तोपर्यंत कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा