मागील भागात आपण पाहिले कि प्रथम आणि गौरीचा साक्षगंध विधी होतो.. गायत्रीबाई गौरीला त्यांचे पिढीजात दागिने देतात. पुढे बघू काय होते ते..
"बोल प्रथम..."
" तू फोन का नाही उचलत लवकर?"
" फोन आत होता. मी बाहेर होते. तू हे विचारायला फोन केला आहेस?"
" नाही. गौरी मला तुला भेटायचे आहे.."
" आजच तर भेटलो.. आणि दोनेक दिवसात भेटावेच लागेल.."
" म्हणजे?"
" अरे अंगठी खरेदी करायला.."
" पण गौरी मला लग्नाआधी तुझ्याशी बोलायचे आहे.."
" मग बोल ना.."
" गौरी, कपडे बदलायला गेली होतीस ना? कोणाशी बोलते आहेस?" नंदिनीचा आवाज आला..
" प्रथम आई आली.. मी बोलू का नंतर? थोडे थकले पण आहे.."
" उद्या भेटूया?"
" उद्या मी साड्या खरेदी करायला जाणार आहे.."
" कुठे ते सांग.. मी पण येतो.."
" आता तू कशाला?"
" सांगितले ना बोलायचे आहे तुझ्याशी म्हणून.."
" ठिक आहे.. मग मी आईला सांगते तसे.." गौरी हसत म्हणाली..
" वेडी आहेस का? तू नको सांगूस.. मी करतो काहीतरी जुगाड.. फक्त निघताना कुठे जाताय ते कळव.."
" ओ हो.. प्रथमबाबू.. ती इथे आल्या आल्याच बिरहा कि आग जाणवायला लागली कि काय?" गौरीच्या हातातला फोन खेचत राज बोलला..
" असे नाही रे.. मी असाच फोन केला होता.. बोलतो नंतर.." प्रथमने पटकन फोन ठेवून दिला..
" दादा.. धिस इज टू मच आणि थ्री मच.. तू आमचे बोलणे चोरून ऐकलेस?" गौरी रागावली होती..
"ए शहाणे.. तू काय करते आहेस हे बघायला आईने पाठवले म्हणून आलो होतो.. मला नाही आवडत कोणाच्या गप्पा ऐकायला.." राज तिला टपली मारत म्हणाला..
" पण एवढे काय गुलुगुलु बोलत होतीस ग? आधी त्याच्या घरी.. मग आता फोनवर.."
" मी तुला का सांगू?"
" मला ना गौरी काहीतरी खटकते आहे. असे सांगता नाही येणार.. पण काहीतरी आहे. आता बघ ना मला प्रथम जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा तो मला बोलला परदेशी जाणार.. आता तुमची परिक्षा झाली तर लगेच लग्नाची तयारी.. इथे मी नोकरीला लागलो तरी माझ्या लग्नाचा विषय नाही. आणि तिथे त्याची परिक्षा झाल्या झाल्या लग्न?"
" अच्छा. हा तुझा प्रॉब्लेम आहे का? आपण बघू हा दादासाठी छान वहिनी. पण आता तू बाहेर जा.. मला हि साडी बदलू दे.."
राज बाहेर जाताच गौरी कपडे बदलायला गेली. पण राजचे वाक्य तिच्या मनात राहिलेच.. प्रथमशी बोलून घेतलेच पाहिजे असा विचार तिने केला..
प्रथमला काही करून गौरीला भेटायचे होतेच.. काय करावे हा प्रश्न पडला होता. तोच समोर आजी आली.
" काय कोणाशी बोलत होतास?"
" ते गौरीशी.."
" अरे व्वा.. काय बोलली ती? आवडले का तिला आपले घर? दागिने? "
" अग दोनच मिनिटे बोलली.. ती उद्या साडीखरेदी करायला जाणार आहे म्हणे.."
" अरे हो.. माझ्या डोक्यातच आले नाही.. पंधरा दिवसात लग्न आहे म्हटल्यावर साड्या हव्याच ना.. त्यावर ब्लाऊज.. सविता ए सविता.."
" काय झाले आई? "
" अग ती गौरी उद्या साड्या खरेदी करायला जाणार आहे म्हणे.. आपल्याला पण तिला शगुनाच्या काही साड्या घ्यायला पाहिजेत ना.. तिच्याच आवडीच्या घेऊया का? ती बिचारी आपली प्रत्येक गोष्टीला हो ला हो करते आहे.."
" आई.. तुम्ही आधी शांत व्हा.. एवढे एक्साईट नका होऊ.. आत्ताच दवाखान्यातून आला आहात.."
" मला मेलीला काय धाड भरली आहे?" प्रथम तिथे आहे हे बघून आजींनी शब्द बदलले..
" अग आता प्रथमचे लग्न आहे.. यमराज जरी आला ना तरी त्याला थोपवून धरीन.. तू खरेदीचे बघ.."
" मी एक काम करते.. नंदिनीशी बोलून घेते.. त्या कुठे खरेदी करतात ते बघू.. आपल्याला आवडल्या तर तिथे बघू.. नाहीतर आपल्या नेहमीच्या दुकानात जाऊ.. प्रथम येशील उद्या आमच्या सोबत?"
" मी? नको ग आई.. मी पकेन तिथे.. पण आजीला सोबत हवी म्हणून येईन.." प्रथम आढेवेढे घेतल्यासारखे बोलला आणि पटकन खोलीबाहेर पळाला..
" आई.. हा मुलगा बदलला आहे.. असे नाही वाटत?" सविता थक्क होऊन म्हणाली.. तिने नंदिनीशी बोलून भेटायची वेळ ठरवली.. आणि साड्यांच्या दुकानात भेटायचे ठरले.
" आई, मी काय म्हणते.. आपण त्यांच्यासाठी पण मानाच्या साड्या घेऊयात का?"
" विचारतेस काय? तुझ्या मुलीचे लग्न आहे.. तुला हवे ते कर.."
" तसे नाही.. पण आपण जिथून खरेदी करणार तिथे त्यांना पसंत पडेल का? त्यांच्या स्टेटसला शोभेल अशाच साड्या घ्याव्या लागतील ना?"
" हे बघ.. आपण ऋण काढून सण करायचा नाही हि पहिली गोष्ट.. दुसरी आपल्याला जे परवडेल जमेल तसे आपण करायचे.. कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही. आणि गायत्रीचे तसे काही नसते.. त्यामुळे तू एवढा विचार करू नकोस.."
" आई त्यांची श्रीमंती बघून थोडे दडपण आले आहे.. आपण मध्यमवर्गीय.. गौरीचा निभाव लागेल ना तिथे?"
" अग पण माणसे चांगली आहेत.. म्हणूनच तर हो म्हटले ना मी.. आणि माझी गौरी लेचीपेची नाही. ती खंबीर आहे.. घेईल ती सांभाळून.."
गौरी, नंदिनी आणि आजी टॅक्सीने साडीच्या दुकानापाशी आल्या. प्रथम घरातल्यांना कारने घेऊन आला.. त्याने या सगळ्यांना सोडले आणि तो गाडी पार्क करायला निघाला..
" तू एकटाच चाललास?" सुचेताने विचारले.
" मग? मला वाटले वहिनीला घेऊन चालला आहेस.. तेवढेच बोलता येईल तुम्हाला.."
" तू पण ना?"
" जा ग.. गौरी. नाहीतरी तो एकटाच चालत येणार. पण पटकन या. आपल्याला आजच साड्या घ्यायच्या आहेत.." आजी म्हणाल्या.. गौरी गाडीत बसली.. प्रथमने गाडी पार्किंग मध्ये आणली..
" बोल काय बोलायचे आहे ते.."
" इथे??"
" नाहीतर मग?"
" एखाद्या हॉटेलमध्ये बसून बोललो असतो.."
" मी म्हटलं असतं.."
" काय??"
" एखाद्या पार्कात किंवा समुद्रावर जाऊन बोललो असतो.."
" मला जास्त गर्दी नाही आवडत.."
" मग आता काय?"
" काही नाही.. जाऊ साडी खरेदीला.." प्रथम असे बोलताच गौरी गाडीतून उतरली.. तोच तिची ओढणी पाठून खेचली गेली.. गौरी पाठी न बघताच लाजून बोलली..
" प्रथम.. आपण पब्लिक प्लेस मध्ये आहोत.. ओढणी सोड ना.."
" तुला पण अशी बडबडायची सवय आहे?" प्रथम समोर येऊन म्हणाला..
गौरीने पाठी पाहिले.. तिची ओढणी दरवाजात अडकली होती..
" बडबडत नव्हते.. स्वतःलाच शहाणपणा शिकवत होते.. चला.."
दोघेही साड्यांच्या दुकानात शिरले.. तिथे आधीच या बायकांनी साड्या निवडायला सुरुवात केली होती.. गौरीला बघताच त्यांनी निवडलेल्या साड्या तिला बघायला सांगितल्या. तोच तिकडचे सेल्समन पुढे आले..
" तुम्ही निवडलेल्या साड्या यांना नेसवून दाखवू का? म्हणजे तुम्हाला अंदाज येईल.." सगळ्यांनी होकार दिला..
" तुम्ही हिला साडी नेसवणार?" प्रथमने विचारले..
" सर हे आमचे रोजचे काम आहे.. तुम्ही बघा तर खरे.." त्याने गौरीला बघता बघता साडी नेसवली.. ती साडी सगळ्यांना आवडली.. गौरीने प्रथमकडे बघितले.. त्याचा चेहरा बघून गौरीने ती साडी बाजूला ठेवायला सांगितली.. आणि दुसरी साडी निवडली.. हळुहळू नाकारलेल्या साड्यांची संख्या वाढली आणि निवडलेल्या साड्यांची कमी व्हायला लागली.. कंटाळून बाकीचे सगळेजण आपापल्या साड्या घ्यायला गेल्या..
काय वाटते गौरी आणि प्रथमच्या पसंतीची साडी होईल खरेदी करून? बघू पुढील भागात..
हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा