तुझे नि माझे जमेना भाग १७
मागील भागात आपण पाहिले कि साडीखरेदी साठी सगळे जातात.. तिथे प्रथम गौरीसाठी साडी निवडत असतो. बघू पुढे काय होते ते..
" ताई.. तुमच्या घरातल्यांनी निवडलेल्या साड्या संपल्या.. आता तुम्हीच सांगा काय करू ते?" गौरीला साड्या नेसवून घामाघूम झालेला सेल्समन म्हणाला.. गौरीने बाजूला उभे असलेल्या प्रथमकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.. तो उठला.. तिकडच्या साड्या बघायला लागला.. त्याने तिकडच्या दोन तीन साड्या काढायला लावल्या.. त्यातली एक घेऊन तो गौरीजवळ आला.. त्याने ती साडी सेल्समनकडे दिली..
"दादा, हि बघा.."
" पण हा कोकमी रंग मला अजिबात आवडत नाही.." गौरी म्हणाली.. ते ऐकून तो सेल्समन पण थांबला..
" एकदा बघ.. नाही आवडला तर नको घेऊस.." गौरीने नाईलाजाने मान हलवली.. त्या सेल्समनने परत साडी नेसवायला सुरूवात केली.. प्रथमने गौरीला आरशात बघायला सांगितले.. गौरी बघतच राहिली.. कोकमी रंगाची ती साडी.. त्यावर असणारी सोनेरी नाजूक बुट्टी.. गौरीला तो रंग अगदी शोभून दिसत होता.. प्रथम तिच्यामागे जाऊन उभा राहिला..
" हि साडी.. कपाळावर छानशी चंद्रकोर. ओठांवर पुसटशी लिपस्टिक. अंगावर आजीने दिलेले दागिने. या लांबसडक केसांची सैलसर वेणी आणि माळलेले भरपूर गजरे.. बघ स्वतःला तरी ओळखू येशील का?" प्रथम तिच्या कानात पुटपुटला.. गौरी लाजेने लाल झाली..
" आमची सगळी खरेदी झाली पण. तुमची एकतरी साडी पसंत करून झाली का?" सुचेताने विचारले.. प्रथम पटकन पाठी झाला..
" गौरी. हिच का तू? तू आणि हा रंग?" नंदिनीने आश्चर्यचकित होऊन विचारले. गौरी काही बोलणार तोच सविता बोलली..
"सुंदर रंग आहे.. आणि हिला शोभूनही दिसतोय.. मग हि साडी घेणार का?"
" हो चालेल.. आई तुला चालेल ना?" गौरीने नंदिनीला विचारले..
" मला आवडतो हा रंग.. पण तुला आवडत नव्हता ना म्हणून जरा आश्चर्य वाटले.."
" एवढे आश्चर्य नको वाटून घेऊस हो नंदिनी.. लग्नाआधी आणि नंतर आवडीनिवडी फार बदलतात.. बरोबर ना गायत्री?" शालिनीताईंनी विचारले..
" हो ग. नंतर संसार करता करता आपल्या आवडीनिवडी कुठे जातात तेच समजत नाही ग."
"हो पण. आता कोणी नाही हो करत. बरोबर ना गौरी.. वहिनी.." सुचेता बोलली. गौरीने प्रथमकडे फक्त पाहिले..
" आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी बदलण्यापेक्षा त्यांच्या रंगात रंगून जायला आवडेल मला.." गौरी प्रथमकडे बघत म्हणाली..
" याला म्हणतात हुशार सून.." गायत्रीबाई गौरीचे कौतुक करत म्हणाल्या..
" हुशार सुनेने फक्त एकच साडी निवडली आहे.. चला अजून बाकीच्या साड्या घ्यायच्या आहेत.." नंदिनी हसत म्हणाली.. त्यानंतरच्या साड्या मात्र गौरीने पटापट घेऊन टाकल्या.
" आता? दागिने घ्यायला जाऊया?"
" अजून खरेदी बाकी आहे?" प्रथमने वैतागून विचारले.
" मग काय? आताशी फक्त साड्या घेऊन झाल्या आहेत. अजून तुझे कपडे, दागिने बाकी आहेत.." सविता म्हणाली..
" एका दिवसात एवढी खरेदी?"
" दादा आता फक्त चौदा दिवस राहिले आहेत.."
" आता आलोच आहोत तर प्रथमसाठी अंगठी घेऊयात का? म्हणजे त्याला परत परत यायला नको." नंदिनीने विचारले.
" चालेल कि.. गौरीसाठी मंगळसूत्र पण घेऊयात. मग त्यानंतर थेट साखरपुड्याच्या दिवशी.."
" म्हणजे? " प्रथमने पटकन विचारले.
" म्हणजे? वाघाचे पंजे आणि उंटाची मान. आता अध्ये मध्ये भेटायचे नाही." दोन्ही आजी एकदम बोलल्या.
" चला इथेच बोलत बसण्यापेक्षा सोनाराच्या दुकानात जाऊन बोलू."
" आणि साड्या?"
" ते फॉल बिडींग करून ठेवतील. नंतर घेऊन जाऊ."
सोनाराच्या दुकानात प्रथम वेगवेगळ्या अंगठीचे डिझाईन बघत होता.. त्याला एकही पसंत पडत नव्हती.. त्याचा वैतागलेला चेहरा बघून सुचेता त्याच्या मदतीला गेली.. पण खरेदी दूरच दोघांचे वादच वाढायला लागले.
" प्रथम, सुचेता आपण बाहेर आहोत.. लहान मुलांसारखे वागू नका.."
" अग पण आई.. याला इथे पण काहीच पसंत पडत नाहीये.."
" इथे पण म्हणजे?"
" अग मगाशी साड्यांच्या दुकानात मी बघत होते.. यालाच साडी पसंत पडत नव्हती.."
" तुला कोणी मध्ये नाक खुपसायला सांगितले होते?"
" आता बस करा दोघेही.. ये गौरी.. झाली का पसंती?" सविताने विचारले.
" हो काकू.. अंगठी आणि मंगळसूत्राची डिझाईन मी फायनल केली आहे.. बघायला येता का?"
" हो.." सविता आणि सुचेता गेल्या.
"हे बरे आहे.. तुझ्या खरेदीत मी मदत करायची आणि माझ्या वेळेस मी एकटाच.." प्रथम बोलला..
" माझी पसंती चालेल का?"
" सांगून बघ.. आवडली तर पुढे बघू."
गौरीने तिकडची एक हिऱ्याची अंगठी काढायला सांगितली..
" हिरा है सदा के लिए.... आल्या आल्याच माझी नजर त्यावर पडली होती. पण म्हटलं तुला आवडेल का?"
" मला आवडली.." प्रथम गौरीकडे बघत म्हणाला..
" मग पटकन बाकीची खरेदी पण डोळ्याखालून घालून घे.."
शेवटी एकदाची खरेदी झाली.. सगळेच खरेदी करून थकले होते. पण मनासारखी खरेदी झाल्याचा आनंदही होता..
" मी रात्री फोन करतो.. न विसरता उचल.." प्रथम कुजबुजला..
" हॅलो.."
" थॅंक यू.."
" कशासाठी?"
" पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलण्यासाठी.. नाहीतर फोन वाजतोय वाजतोय.."
" ते चुकून झाले होते.. एवढे काही ऐकवायला नको. "
" सॉरी.."
" कशासाठी?"
" तुझा नावडता रंग तुला माझ्यासाठी घ्यावा लागला म्हणून.."
" रंग नावडता असला तरी खुलून दिसत होता मला.."
" ऐक.. त्या साड्या कधी मिळणार आहेत?"
" दोन दिवसांनी. "
" मग त्या दिवशी भेटशील मला एकटी?"
" मला घरातले पाठवतील कि नाही माहित नाही.. आताच कसे सांगू?"
" काहिही कर.. आणि नक्की भेट."
"बघते.."
" आई, त्या साड्या आणायला जाऊ का?"
" गौरी, आता नाही हो तु कुठे जायचेस. लग्नाच्या आधीचे आता काहीच दिवस राहिले आहेत. तेवढे तरी रहा कि आमच्यासोबत. आणि तसेही आज तुझी मावशी पण येणार आहे.." नंदिनी म्हणाली.
" आई, अशी जाते आणि अशी येते. जाऊ दे ना ग.. मला पण परत असे जाता येईल का?"
" तू पण ना.. वाईट आहेस खूप. शब्दात गुंतव नुसती. पण लवकर ये. घरी आल्यावर तू दिसली नाहीस तर मावशी चिडेल."
" हो येते लवकर.."
गौरी प्रथमला भेटायला निघाली.. तो कोपर्यावर बाईक घेऊन तिची वाटच पहात होता..
" आज बाईक?"
" हो.. पटकन कोणी बघायच्या आत निघ.."
" कुठे चाललो आहोत आपण?"
" सरप्राईज." प्रथमने बाईक पळवली. ते जेव्हा थांबले तेव्हा ते एका रिसॉर्टच्या बाहेर होते.. आजूबाजूला भरपूर झाडी.. त्या झाडाच्या आतमध्ये असलेले एक छोटेसे हॉटेल..
" वॉव.. मस्त आहे हे.."
" हो ना.. हॉटेल ते हि बागेत.."
गौरीने चमकून प्रथमकडे पाहिले..
" एवढे काय बोलायचे आहे तुला? कि एवढा आटापिटा करतो आहेस?"
"कसे सांगू , सुचत नाहीये.."
" तोंडाने सांग.. आणि पटापट बोल.. कारण माझी मावशी आज येणार आहे. ती यायच्या आत मला पोचायचे आहे.."
" गौरी माझा एक प्रॉब्लेम आहे.."
" काय? प्लीज हे सांगू नकोस कि तू गे आहेस.."
" गौरी.. स्टॉप इट.. तुला कळते आहे का तू काय बोलते आहेस?" प्रथम चिडून म्हणाला.. गौरी शांत बसली.
"बघतेस काय ?"
" तूच थांब बोललास ना?"
" तू इम्पॉसिबल आहेस. ऐक मी.. मी.. रात्री झोपेत किंचाळत उठतो.." हे ऐकून गौरी जोरात बसायला लागली..
" बस.. हे तर मी पण करते.."
" गौरी हे एवढे सोपे नाहीये." प्रथम अजून पुढे बोलतच होता तोच गौरीचा फोन वाजला..
" गौरी मावशी पोचतेच आहे.. लवकर ये.."
" हो आई निघतेच."
" आणि साड्या घेऊनच ये.. नाहीतर प्रथमच्या नादात विसरशील.."
" आई.." गौरीने फोन ठेवला..
" हि आईपण ना.."
" काय झाले?"
" आईला कळले मी तुझ्यासोबत आहे ते.. तिने साड्या घेऊन बोलावले आहे. मावशी पोचतेच आहे.. उरलेले बोलू नंतर.. आणि थँक्स.."
" कशासाठी?"
" इथे घेऊन येण्यासाठी.. पण आजची ट्रीट बाकी राहिली.. चल मी निघू?"
" मी आहे ना सोडायला.."
गौरी बाईकवर बसली.. पहिल्यांदाच तिने प्रथमच्या खांद्यावर हात ठेवला.
त्याने एक क्षण डोळे बंद केले आणि गाडी सुरू केली..
हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा