Login

तुझे नि माझे जमेना भाग १८

कथा प्रेमाची

तुझे नि माझे जमेना भाग १८



मागील भागात आपण पाहिले कि गौरी आणि प्रथमची साड्या आणि दागिन्यांची खरेदी एकमेकांच्या पसंतीने पूर्ण होते. आता बघू पुढे काय होते..



"मी तुला सकाळी जिथे भेटलो तिथेच सोडतो.." प्रथम गौरीला म्हणाला..

" नको. घरीच सोड. तसेही मी तुझ्यासोबत आहे हे सगळ्यांना माहितच आहे."

" नाही.. मी आज नाही घरी येत. नंतर कधीतरी बघू."

" आजी चिडेल माझ्यावर तू घरी नाही आलास तर.."

" आजीला मी काय ते सांगतो. तू या साड्या घेऊन जा.."

" हो.. मी विसरलेच होते.." गौरी जीभ चावत म्हणाली..

" आता आपली परत भेट?"

" डायरेक्ट लग्नात.." गौरी हसत बोलली.

" मग फोनवर बोलूयात?"

" जमले तर नक्की." गौरीला सोडून प्रथम निघाला.. गौरी घरी पोचली. तिची मावशी आणि आई दोघीही तिची वाटच बघत होत्या..

" आणल्या का साड्या?" आईने विचारले..

" जावईबापू नाही आले का घरी?" मावशीने विचारले.

" जावईबापू.. प्रथमने ऐकले तर वेडा होईल तो.."

" अरे बापरे.. एवढे माहीत आहे का आता त्याच्याबद्दल?"

" मावशी तू पण ना? मला सांग बाकीचे सगळेजण कुठे आहेत?"

" ते येतील लग्नाच्या दोन दिवस आधी.. मी आले इथे भाचीच्या लग्नाची तयारी म्हणून तर भाचीच गायब.."

मावशी आणि भाची दोघीही गप्पा मारत बसल्या आहेत हे पाहून नंदिनी आत निघून गेली..

" मग खुश आता?"

" असं नाही ग सांगता येत मावशी. तुला माहिती आहे , प्रथमचे आणि माझे कॉलेजमध्ये अजिबात पटत नव्हते."

" मग आता?" मावशी कौतुकाने भाचीचे बोलणे ऐकत होती..

" आता काय, थेट लग्नच.."

" तू खुश आहेस ना बाळा? फक्त त्याच्या आजीसाठी नाही ना करत लग्न?"

" तसे नाहीये मावशी.. मलाच कळत नाही एकीकडे तो खूप आवडतो.. कधी कधी त्याचा खूप राग येतो.."

" मग ठिक आहे.. हे तर आमचेपण होते. चला आता आत जाऊ.. शगुनाचे पदार्थ करायला घेऊ."

" अग आजच आलीस ना तू?"

" मी जरी आज आले असले तरी तुझे लग्न जवळ येत चालले आहे ना.. तयारी तर करायलाच हवी पटापट.. चला.."

     इथे प्रथमकडे पण त्याची आत्या आली होती. तिने आल्या आल्याच गायत्रीबाईंना गाठले..

" आई, तू फोनवर काही सांगत नव्हतीस. आता तरी सांग.. तुम्ही काय खरेच प्रथमचे लग्न करताय?"

" सुखदा शांत हो.. आधी सांग जावई आणि मुले कुठे आहेत?"

" ते येतील नंतर.. माझा विश्वास नव्हता म्हणून मी लगेच आले. अग, प्रथम अजून लहान आहे.."

" सुखदा, हे बघ. दोघेही सज्ञान आहेत. हे लग्न झाल्यामुळे प्रथम परदेशी जाण्याचा हट्ट सोडून देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचे त्या घटनेचे परिणाम प्रथमवर इतके झाले होते कि तो मुलींपासून लांब पळायचा, लग्नाला नकार द्यायचा.. आता गौरी त्याला आवडली आहे. त्याचं आयुष्य सुरळीत होत आहे."

" तुम्ही तिला या सगळ्याची कल्पना दिली आहे?" 

" सुखदा हात जोडते तुझ्यापुढे. तू कोणालाही काही सांगू नकोस. होऊ दे ग त्याचे चांगले.."

" आई, तुला काय वाटते मला प्रथमचे चांगले व्हावे असे वाटत नाहीये? मला फक्त एवढेच म्हणायचे आहे कि लग्नाच्या आधी या गोष्टी सांगितलेल्या बर्‍या. " सुखदा दुखावलेल्या स्वरात म्हणाली.

" हो ग.. मी बघते काय करायचे ते. पण तू काही बोलू नकोस. आता लग्नाचे बोलूयात का? आम्ही काही साड्या घेतल्या आहेत. तुला आवडल्या तर बघ नाहीतर तुझ्या आवडीच्या घेऊन ये." गायत्रीबाई तिची समजूत काढत म्हणाल्या.

" नको. मी पण बघते काय करायचे ते." सुखदा नाक उडवत म्हणाली. सुखदा खोलीच्या बाहेर आली.. समोरून प्रथम येत होता..

" आत्या, तू कधी आलीस? मला कोणीच काही बोलले नाही.."

" कोण कसे बोलणार? तुझी आई आणि सुचेता गेल्या आहेत खरेदीसाठी. आणि माझे आईबाबा बसले होते बोलत माझ्याशी.. तुला कोण कळवणार? आणि तसेही आता तुला नवीन माणसे मिळाली आहेत तर या म्हातारीला आता कोण विचारणार?" सुखदा मस्करी करत बोलली.

" आत्या तू आणि म्हातारी? तुला सकाळपासून मीच भेटलो वाटते. ऐक ना, आपण जरा माझ्या खोलीत बसून बोलूयात?"

" चला.. माझे काय, जो जे बोलेल ते ते ऐकायचे.."

" बोल.." सुखदा प्रथमच्या खोलीत बसत बोलली..

" आत्या, मी गौरीला सगळे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ग पण जमतच नाहीये. प्रत्येक वेळेस काही ना काही होते आणि राहून जाते.." प्रथम आत्याच्या मांडीवर डोके ठेवून बोलला..

" गौरी कशी मुलगी आहे?"

" ती माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे ग. खरे सांगायचे तर आम्ही जास्त बोललोच नाही कधी.. मला ना खूप भिती वाटते, हे जर तिला नंतर कळले आणि ती निघून गेली तर मी नाही परत स्वतःला सावरू शकणार.." प्रथम रडत होता.. आत्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती.

" माझा भाचा खऱ्या प्रेमात पडला आहे मग बहुतेक.. नको काळजी करूस. होईल सगळे नीट.. आणि काही झालेच तर मी आहेच ना.." सुखदा त्याची समजूत काढत म्हणाली..

" आत्या आली आहे.." सुचेताचा आवाज आला.. " आता मजा येणार.." प्रथम डोळे पुसत उठला.. सुखदाने त्याच्या खांद्यावर थोपटले. सुचेता दरवाजा उघडून आत आली.. " आत्या.." तिने सुखदाला घट्ट मिठी मारली.. तिचे लक्ष प्रथमकडे गेले. त्याचे लाल डोळे पाहून तिने विचारले..

" काही झाले आहे का?"

" नाही ग, काय होणार? आणि झाले तरी तुझ्यापासून लपेल का?" सुखदा तिला टपली मारत म्हणाली..

" मी असे ऐकले आहे कि जनरली मुली सासरी जायच्या आधी रडतात.. आपल्याकडे उलटे झाले आहे का? लग्नाच्या भितीने दादाच रडायला लागला आहे.." सुचेता हसत म्हणाली..

" पुरे झाला तुझा चावटपणा.. चल मला दाखव काय काय खरेदी केली आहे ती. आणि आता पटापट लग्नाच्या तयारीला लागा.."

      अच्युत आणि सुनीलने हॉल, जेवण, गुरूजी ही आघाडी सांभाळली होती.. तर घरातल्या बायका मानपान, आहेर, कुळाचार या गोष्टींमध्ये गुंतल्या होत्या.. बघता बघता साखरपुड्याचा दिवस उगवला.. दिवस कमी असल्यामुळेच साखरपुडा, सीमांतपूजन लग्नाच्या आदल्या दिवशी करायचे ठरले होते. हळद लग्नाच्या दिवशी सकाळी.. दोन्ही घरी पाहुणे आले होते. कितीही लहान प्रमाणात लग्न करायचे म्हटले तरी दोन्ही मिळून जवळची माणसेच दोनेकशे झाली होती. त्यामुळे दोन्ही घरे नुसती गजबजली होती.. गौरी घरातून निघाली.. निघताना तिने देवाला, घरातल्यांना नमस्कार केला. आजीच्या गळ्यात पडली.

" माझी नात खूप धीराची आहे. कोणत्याही परिस्थितीतून आतताईपणा न करता शांतपणे मार्ग काढेल.. बरोबर ना?" 

गौरीला खरेतर आजीचे म्हणणे समजले नाही तरिही तिने मान हलवली.. सगळे हॉलवर पोहचले.. विधींना सुरुवात झाली.. प्रथम हॉलवर पोहचला तेव्हा गौरी तिच्या खोलीत गेली होती.. त्याचे विधी पूर्ण झाले.. तो बाजूला मित्रांच्या गराड्यात जाऊन बसला.. तिथे जरी गप्पा मारत होता तरी नजर मात्र गौरीला शोधत होती. शेवटी वैतागून स्टेजकडे पाठ करून बसला.. 

" आयला गौरी कसली सॉलिड दिसते आहे रे.." अव्या बोलला..

" गौरी वहिनी म्हणायचे आता.. बरोबर ना प्रथम?" रमेश हसत म्हणाला.. प्रथमने मागे वळून बघितले.. मोती रंगाची साडी, त्यावर मोत्याचे दागिने, केस वरती बांधून केलेली केशरचना, कपाळावर लावलेली छोटीशी गोल टिकली, हातभर काढलेली मेहंदी.. गौरी समोरून प्रथमकडे हसत बघत होती.. नजरेनेच कशी दिसते असे तिने विचारले.. प्रथमने नकारार्थी मान हलवली.. ते बघून गौरीने नाक मुरडले आणि विधीसाठी जाऊन बसली..




हे दोघे लग्नात एकमेकांवर रूसतील की लग्न व्यवस्थित पार पाडतील बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

0

🎭 Series Post

View all