मागील भागात आपण पाहिले की गौरी प्रथमच्या खोलीत जाते आणि अचानक प्रथम रडायला लागतो. पाहू आता पुढे काय होते ते..
" मी काही नाही केले तिला.." हे वाक्य गौरीच्या डोक्यात घुमत होते. ती सुन्न झाली होती. ते बघून सुखदाने सुचेताला गौरीला तिच्या खोलीत न्यायला सांगितले. सुचेताने गौरीला धरले. गौरी यांत्रिकपणे तिच्यासोबत गेली. सुखदाने प्रथमला औषध दिले. तो शांत झाला होता.
" तू थांब इथेच.. मी आले गौरीशी बोलून." सुखदा खोलीबाहेर पडली. अच्युतही तिच्यासोबत निघाला. दोघेही सुचेताच्या खोलीत आले. गौरी बधिर होऊन बसली होती.
" गौरी.." सुचेताने हाक मारली.
" प्रथमने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली? बाबा तुम्हीसुद्धा काहीच बोलला नाहीत. तुम्ही म्हणत होता ना, जशी सुचेता तशीच गौरी. मग सुचेतासोबत असे झालेले चालले असते तुम्हाला?" अच्युतने बोलायचा प्रयत्न केला.
" आम्हाला खरेच ही गोष्ट लपवायची नव्हती तुझ्यापासून. पण घटना अशा वेगात घडत गेल्या की तशी संधीच मिळाली नाही."
" कशी नाही मिळाली बाबा. तुम्ही साक्षगंध होताना सांगू शकत होता, खरेदीच्या वेळेस सांगू शकत होता. तुम्ही प्रयत्नच नाही केला तसा."
" खोटे आहे हे." प्रथम सवितासोबत आत येत होता.
" मी स्वतः तुला सांगायचा कितीतरी वेळा प्रयत्न केला. साक्षगंधाच्या वेळी ते झुरळ मध्ये आले आणि नंतर हॉटेलमधून तू निघून गेलीस." प्रथम बोलत होता. गौरीला आठवत होते प्रथमचे तिच्याशी बोलायचे प्रयत्न. पण हे असे काही असेल असे तिला वाटलेच नव्हते.
" तू बोलला होतास तू झोपेतून किंचाळत उठतोस. पण मगाशी तू जागाच होतास." गौरीने स्वतःची बाजू मांडायचा प्रयत्न केला..
" हो. पण का ते तू नाही ऐकलेस. ते ऐकायच्या आधीच तिथून निघालीस."
प्रथम बोलत होता.
" काय कारण देणार आहेस?"
" ऐकायचे आहे? मग ऐक."
" पण प्रथम.. " सविताने बोलायचा प्रयत्न केला.
"वहिनी थांब. त्यालाच तिच्याशी बोलू दे." सुखदा सविताला थांबवत म्हणाली.
"ऐक. बारातेरा वर्षांचा होतो मी. आम्ही आमच्या नवीन फार्महाऊसवर गेलो होतो. अख्खी उन्हाळ्याची सुट्टी आम्ही तिथे राहिलो होतो. बाबा पण जाऊन येऊन होते. खूप मज्जा येत होती. दिवसभर इथे तिथे भटकणे, झाडावर चढणे. या सगळ्यात माझ्यासोबत होती प्रिया. तिथे आमचे जे केअरटेकर होते त्यांची मुलगी. प्रियाही माझ्याच वयाची होती. सुचेता खूपच लहान होती. मग आम्ही दोघेच धुडगूस घालायचो. बाबांना तिथे खूप झाडे लावायची होती. त्यासाठी त्यांनी खूप रोपे आणली होती. अचानक एक वानरांची टोळी तिथे त्रास द्यायला लागली. बाहेर झाडे तोडत होते तोपर्यंत काही नाही पण नंतर त्यांनी घरात येऊन त्रास द्यायला सुरुवात केली.आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. त्यांच्या आग्रहाने बाबांनी वानरांना घाबरवायला एक बंदूक आणली. आधी त्या आवाजाने ते जायचे पण नंतर नंतर ते जास्तच निर्ढावले. अजून काही दिवसतरी आम्ही तिथे राहणार होतो म्हणून बाबांनी मग त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक खरी बंदूक आणली. एक दिवस बाबा दोन्ही बंदूक साफ करत असतानाच सुचिता खेळता खेळता पडली म्हणून तिला आईबाबा डॉक्टरांकडे घेऊन गेले. आजी आजोबा नेमके कोणालातरी भेटायला गेले होते. मी घरात एकटाच होतो. प्रिया नेहमीसारखी खेळायला येत होती. तिच्या हातात माझ्यासाठी पेरू होते. ते एका वानराने बघितले आणि तो ते घ्यायला झेपावला. प्रिया त्याला हाकलत होती. पण तो तिच्यावर चवताळून जात होता. मी ते पाहून घाबरलो. प्रियाला वाचवण्यासाठी काय करू मला सुचेना. आत बाबांची बंदूक पडली होती. ती उचलून मी बाहेर गेलो. गोळी झाडली. पण नेमकी प्रिया मध्ये आली. आणि ती जागच्या जागी.." प्रथम तोंड हातात धरून रडायला लागला.. " मला तिला वाचवायचे होते. मारायचे नव्हते. कधीच नाही. ते वानर तिला मारत होते. मी नाही वाचवू शकलो तिला."
" हो गौरी. प्रथमची गोळी प्रियाच्या पाठीला लागली होती. पण त्या वानराने तिला इतके चावे घेतले , ओरबाडले होते की ती वाचली नाही. आम्ही सगळे तिच्या मदतीला येईपर्यंत सगळे संपले होते." अच्युत सांगत होता.
" तो अपराधीभाव अजूनही प्रथमच्या मनात आहे." सुखदाने बोलायला सुरुवात केली. गौरीच्या चेहर्यावरचे भाव बदलत होते.
" पण तरीही ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवायला नको होती." गौरी म्हणाली.
" तुमच्यापासून नाहीच लपवली." दरवाजात आजी उभ्या होत्या. आजोबा त्यांना गप्प बसायची खूण करत होते.
" नाही. मला बोलू द्या. नाहीतर आपल्या सर्वांबद्दल हिच्या मनात किंतू रहायचा. गौरी शालिनीला मी फसवेन असे कसे वाटले तुला. आपण वॉटरपार्कला गेलो होतो तेव्हाच मी शालिनीला हे सांगितले होते. तू लग्नाला होकार दिल्यानंतर मला हे तुलाही सांगायचे होते. पण शालिनी नको म्हणाली. तिचा विश्वास होता की तू सगळे सांभाळून घेशील. तोच विश्वास आम्हालाही वाटतो तुझ्याबद्दल."
काय चालू आहे गौरीला काहीच समजत नव्हते. तासाभरापूर्वी ती किती आनंदात होती. तिचे नवीन जीवन खऱ्या अर्थाने सुरू होणार होते. आणि आता हे असे. ती गौरी जणू दुसरीच कोणीतरी होती. गौरी काहीच बोलत नाही हे बघून सगळे गप्प बसले होते. त्या शांततेचा भंग करत प्रथम बोलला.
"तिला एकटीला राहू दे. आय ॲम सॉरी गौरी.." प्रथम तिथून निघून गेला. हळूहळू एकेकजण तिथून बाहेर पडले. सुखदाने सुचेताला खुणावले. ती पण निघाली. सगळे बाहेर गेल्यावर मात्र गौरीचा आवेश निघून गेला. ती रडायला लागली. तिला आजीचे शब्द आठवायला लागले.. "माझी नात खूप धीराची आहे. कोणत्याही परिस्थितीतून आतताईपणा न करता शांतपणे मार्ग काढेल." ती स्वतःच हळूहळू शांत झाली. विचार करून करून तिचे डोके दुखायला लागले. ती तशीच उठून खिडकीत गेली. समोर चंद्र दिसत होता. त्या चंद्रामध्ये तिला मोठ्या स्लाईडवरून खाली आणणारा, गुंडांच्या कचाट्यातून वाचवणारा प्रथम दिसत होता. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. प्रथमच्या खोलीत प्रथमही परत तसाच खिडकीत बसून होता.
" परत एक आयुष्य उद्ध्वस्त झाले माझ्यामुळे. मी कधीच सुखी नाही का होणार?"
काय होईल प्रथम आणि गौरीच्या आयुष्यात पुढे. पाहू पुढील भागात..
तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा