मागील भागात आपण पाहिले की गौरी प्रथमला घेऊन त्याच्या फार्महाऊसवर येते. दोघे बोलत असताना ती त्याला त्याच्या मैत्रीणीबद्दल विचारते. बघू आता पुढे काय होते ते..
" तुला कोण बोलले याबाबतीत?" प्रथम वैतागला होता.
" कोणी कशाला सांगितले पाहिजे? तूच तर गाडीत बडबडत होतास ते गाणे ऐकून."
" सॉरी. ते म्हणजे ना एखाद्या ॲटॅकसारखे झाले आहे. त्या वेळात मी काय बोलतो मला नंतर काहीच आठवत नाही."
" अच्छा. मग मी आठवण करुन देते. तू बोलत होतास की तू ही माझ्याशी खेळून निघून जाशील."
" ते??" प्रथम उठला आणि खिडकीत जाऊन उभा राहिला, बाहेर बघत म्हणाला, "गौरी, माझा भूतकाळ खूप विचित्र आहे ग. तो ऐकल्यावर तू निघून गेलीस तर?"
" तो ऐकायला नाही मिळाला म्हणून मी निघून गेले तर?" प्रथमने याची अपेक्षाच केली नव्हती. त्याने चमकून गौरीकडे पाहिले. गौरी प्रथमजवळ आली. तिने त्याच्या हातावर हात ठेवला.
" आपण भूतकाळातून बाहेरच आलो नाहीतर आपला वर्तमान आणि भविष्य दोन्ही धूसर होतील. समजतय का तुला?"
प्रथमने बाहेर बघत बोलायला सुरुवात केली. "प्रियाबद्दल तुला सगळे समजले. तो अपघात जणू माझ्या मेंदूत कोरला गेला होता. मला झोपायची भिती वाटायला लागली होती. कारण डोळे मिटले रे मिटले की ते वानर दात विचकत माझ्यासमोर यायचे, जख्मी प्रिया मला मदत कर असे रडत असायची. मी घाबरून उठायचो. आत्याने माझ्यावर उपचार सुरू केले." गौरीने प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
" हो. सुखदा आत्या मानसोपचारतज्ज्ञ आहे. खूप त्रास झाला आहे माझ्यामुळे तिला. तिचे नुकतेच लग्न झाले होते तेव्हा. पण माझा इश्शू बाहेर कोणापर्यंत पोचू नये असे आईबाबांना वाटत होते. म्हणून आणि माझ्यावर असलेल्या तिच्या प्रेमामुळे ती सतत येऊन जाऊन असायची. मला बोलके करण्याचा खूप प्रयत्न केला तिने. इथेही ये असा खूप आग्रह करायची, पण त्यात मात्र ती अयशस्वी ठरली. पण तिच्या उपचारांमुळे मी माझ्या कोशातून बाहेर आलो, माझे झोपेतले ओरडणे कमी झाले. तेव्हाच नेमके कॉलेज लाईफ सुरू झाले होते. प्रियाची आठवण धुसर होत होती. मी मित्रांमध्ये मिसळायला लागलो होतो. मुलींपासून लांबच रहायचो कारण प्रत्येक मुलीत मला प्रिया दिसायची. याच वेळेस माझ्या आयुष्यात आली मायरा.."
" मायरा?"
" हो. मायरा. आमच्या कॉलेजमधली सगळ्यात हुशार, सुंदर मुलगी."
" तू तिच्या पाठी होतास?" गौरी थोड्या जलसीनेच बोलली.
" काही जळतंय का?"
" नाही. मला तरी वास येत नाहीये."
" जो जळतो, त्याला येत नाही म्हणतात." प्रथम मिस्किल हसत म्हणाला..
" तू पण ना.." गौरी त्याला मारत म्हणाली.
" तुला ऐकायचे आहे की मारायचे आहे.. तसाही मला छान चहा हवा होता. पण मी इथे बसलो आहे माझे पुराने दर्द ऐकवत."
" मलाही कडक कॉफी हवी आहे पण नको.. आधी मायराची कथा मग बाकी सगळे. तू होतास मायराच्या मागे?" गौरी डोळे मोठे करत म्हणाली.
" नाही. आम्ही दोघेही एकमेकांच्या पाठी नव्हतो. ती माझ्या एका मित्राची दूरची बहिण होती. त्याच्यामुळे ती आमच्या ग्रुपमध्ये यायला लागली. सगळ्यांशी मिळून मिसळून बोलायला लागली. तिची आणि माझ्या मते जुळत असल्यामुळे ती कोणाशीही बोलायचे जरी असले तरी मला मध्ये घ्यायची. खरेदी करताना, लायब्ररीत जाताना तिला मीच हवा असातचो. आपण कोणाला हवे आहोत ही भावनाच छान वाटत होती. मी ही खूप वर्षांनी कोणत्यातरी मुलीशी बोलत असल्याने माझ्या मनात तिच्याबद्दल नाजूक भावना निर्माण होऊ लागल्या होत्या.. आकर्षण म्हण हवे तर त्याला.." प्रथम गौरीच्या चेहर्याकडे बघत म्हणाला.
" अकरावी झाली. बारावीचा अभ्यास सुरू व्हायच्या आधी, आम्ही सगळ्यांनीच दोन दिवस पिकनिकसाठी जायचे ठरवले. भाऊच आहे सोबत म्हटल्यावर मायराला सुद्धा परवानगी मिळाली. आम्ही त्या कॅम्पवर पोहोचलो. मी मुद्दाम एकटाच टेन्टमध्ये राहणार होतो. मायरानेही मग माझ्या बाजूचा टेन्ट घेतला. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. दुसर्या दिवशी तिला विचारायचे असे माझ्या मनात होते. त्याच उत्साहात मी झोपायला गेलो. आणि रात्री किंचाळत ओरडत उठलो. माझे मित्र सगळे गोळा झाले. त्यांच्यासाठी हे सगळे नवीन होते. त्या दिवशी पहिल्यांदाच मला घरातल्यांचे न ऐकल्याचा पश्चाताप झाला. सगळे मला सांगत होते जाऊ नकोस. पण तारुण्याचा जोश आणि मायराच्या सहवासाचा लोभ यापुढे मला काहिही दिसत नव्हते. माझ्या मित्रांनी मला शांत केले. पाणी वगैरे दिले. मी थोडा भानावर आलो. मी तिथे मायराला शोधत होतो. ती होती. पण एका कोपर्यात. चेहर्यावर काहीतरी वेगळेच भाव. आधी तिच्या डोळ्यात मला सहानुभूती जाणवली पण नंतर फक्त आणि फक्त तुच्छता. नंतर सगळे झोपायला गेले. मला वाटले निदान मायरा तरी विचारेल, तुझ्याजवळ थांबू का? तुला नक्की काय झाले. पण नाही. सगळ्यात आधी तीच तिथून निघून गेली. मी रात्रभर तळमळत होतो. मला खूप गरज होती तिच्या मानसिक आजाराची. कधीतरी पहाटे माझा डोळा लागला. सकाळी उठलो तर माझ्या बाजूचा तंबू रिकामा होता. ते सगळे नाश्ता करायला गेले असे वाटून मी कँटीन मध्ये गेलो. तिथे फक्त दोघेजण होते. ते ही मला पाहून आधी थोडे चपापले. मी काही नाही झाले असे दाखवत पुढे गेलो. त्यांना मायराबद्दल विचारले. तर ती काही अर्जंट काम आले म्हणून तिच्या भावासोबत पहाटेच घरी गेली असे त्यांनी सांगितले. आपण पण लवकर निघूया असे त्यांनी सांगितले. आम्ही आवरून निघालो. पण जाताना जो उत्साह होता तो येताना नव्हता. त्यानंतर मायरा काही दिवस कॉलेजलाही आली नाही. तिचा मोबाईल लागत नव्हता. घरचा नंबर तिने कधीच दिला नव्हता. माझे ते सगळे मित्र माझ्याशी जेवढ्यास तेवढेच बोलत होते. आधीचा मोकळेपणा, गप्पा सगळ्या संपल्या होत्या. म्हणजे त्यांच्या चालू असायच्या पण मी दिसलो की ते गप्प बसायचे. मी त्यांना काही बोलत नव्हतो. बोलू इच्छित नव्हतो. मी वाट बघत होतो मायराची. ती जर माझ्यासोबत असती तर मला या सगळ्यांना माझी खरी परिस्थिती समजली असती. काही दिवसांनी मायरा आली. मी तिची वाटच बघत होतो. मला बघून तिने माझ्याकडे दुर्लक्ष केले. तिने मला पाहिले नाही असे समजून मी तिच्याशी बोलायला गेलो. तिने एखाद्या ओंगळवाण्या प्राण्याकडे बघतात तसे माझ्याकडे पाहिले आणि स्पष्ट शब्दात तिला माझ्या सारख्या मानसिक आजारी असलेल्या माणसासोबत रिलेशन ठेवण्यात इंटरेस्ट नाही असे सांगितले. ती तिच्या मैत्रिणींसोबत काहिच झाले नाही असे दाखवत निघून गेली. माझ्या मनातला प्रेमाचा अंकुर बहरण्यापूर्वीच जळून गेला. मी खूप निराश झालो. मी आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केला.." प्रथम बोलत होता. त्याचे ते शब्द ऐकून गौरी शहारली. तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला.. प्रथमचे तिकडे लक्ष नव्हते. त्याचे बोलणे थांबले नाही.
" मला डिप्रेशनचा खूप मोठा झटका आला होता. कसेतरी आईबाबांनी मला वाचवले. आत्याला बोलावून घेतले. माझे अभ्यासात मन लागत नव्हते. काहीच सुचत नव्हते. परत लोकांची भिती वाटू लागली होती. दोन वर्ष मी घरीच होतो. हळूहळू मी यातून बाहेर येऊ लागलो. सगळ्यांनी परत समजावले. मी परत शिक्षण सुरू केले. पण आता मुलींपासून कटाक्षाने चारहात लांब रहायला सुरुवात केली. तीन वर्ष राहिलो ही.. पण हा निश्चय मोडून काढायला तू आलीस.."
" मी??" गौरीने आश्चर्याने विचारले.
गौरीने प्रथमचा निश्चय कसा मोडून काढला पाहू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा