मागील भागात आपण पाहिले की गौरी प्रियाच्या आईशी बोलून खरेच प्रथम निष्पाप आहे का याची खात्री करून घेते. आता बघू पुढे काय होते ते..
" प्रथम, थांब ना जरा." गौरी प्रथमच्या मागे धावत बागेत गेली. तो न ऐकताच पुढे जात होता.
" आई ग.." गौरी जोरात खाली बसली. प्रथमने मागे वळून पाहिले तर गौरी पाय धरून खाली बसली होती.
" काय झाले?" तो पाठी आला.
" पाय मुरगळला बहुतेक."
" मग पळायला कोणी सांगितले होते?"
" मग तू हाक मारल्यावर थांबायचे होते ना. तुला चिडायला कोणी सांगितले होते?"
" म्हणजे? माझ्यामुळे तुझा पाय मुरगळला?"
" हो.." गौरीचा चेहरा वेदनेने पिळवटला होता.
" पाय खूप दुखतो आहे का?" प्रथमने काळजीने विचारले.
" हे बघ ना." गौरीचा पाय खरेच सुजायला लागला होता.
" तू पण ना.. मला अजिबात रागवू देऊ नकोस. स्वतः भरपूर मस्का मारून घे. आणि मी चिडल्यावर पण माझ्याकडूनच सेवा करून घे." प्रथम गौरीला सावरत म्हणाला.
" पण तू चिडला का होतास ते तर समजू दे?" गौरीने त्याचा हात धरून उभे रहात असताना विचारले.
"इथे नको. खोलीत गेल्यावर सांगतो."
" म्हणजे, इथं नको तिथं जाऊ.. आडोशाला उभं राहू.. तसे?"
" तू बरी आहेस ना की चुकून तुझ्या पायाऐवजी मेंदूला मार लागला आहे. की तुझा मेंदूच पायात आहे?"
" हो आहे माझा मेंदू गुडघ्यात. झाले समाधान ऐकून? सोड जाते माझी मी." गौरीने फणकार्याने प्रथमचा हात झटकला आणि पुढे पाऊल टाकायला गेली. तोच तिचा तोल गेला. प्रथमने तिला धरले. दोन्ही हातात उचलले आणि घराच्या दिशेने चालायला लागला. गौरीने आधारासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि डोळे मिटून घेतले. प्रथम तिच्याकडे बघून हसत होता. गौरीला असे बघून काकू घाबरल्या.
" काय रे प्रथम, काय झाले हिला? आता तर बरी होती.." त्यांचा आवाज ऐकून गौरीने पटकन डोळे उघडले. ती प्रथमला खाली ठेवण्यासाठी खुणावत होती. पण त्याने अजूनच घट्ट पकडले..
" काही नाही काकू. बाहेर चालले होते. एक बोका आडवा आला. त्याला वाचवायला गेले तर पाय मुरगळला." गौरी प्रथमकडे बघून बोलत होती.
" हो का? अग पण इथे मांजरी नाहीतच.. मग कुठून आला?"
" आला असेल बाहेरून.."
" मरो तो बोका. तू बस इथे. मी लेप लावून देते पटकन."
" नको काकू. मी खोलीत नेतो हिला. मग लेप घ्यायला येतो."
" तू नको येऊस मीच घेऊन येते लेप. तू जा तिला घेऊन वर." काकू लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या.
"मी बोका काय? थांब दाखवतोच." प्रथम तसाच तिला उचलून वर खोलीत जात म्हणाला. गौरीला या सगळ्यात खूप मजा येत होती. खोलीत जाताच प्रथमने तिला बेडवर ठेवले.
" जरा वजन कमी कर. उचलताना घाम फुटला मला."
" मी कुठे तुला उचलायला सांगितले होते. बरं आता मी एवढा पाय मुरगळून घेतला आहे तर तू का चिडला आहेस ते तरी सांग. "
" चिडणार नाहीतर काय, मी जरा तुझ्या जवळ आलो की तू पळून जातेस आणि मी माझे काम करायला लागलो की बोलायला येतेस. माणसाने करायचे तरी काय?" प्रथम वैतागला होता.
"काही नाही.. अशावेळेस शहाणी माणसे बायको जे बोलते ते ऐकतात असे म्हणतात."
" हो का? मग अशा परिस्थितीत बायको काय सांगते?"
" बायको म्हणते की जरा जवळ या." प्रथम गौरीच्या जवळ गेला.
" नंतर?" गौरीने प्रथमचा हात हातात घेतला. तो ती ओठांवर ठेवणार तोच काकू हळदीचा लेप घेऊन आल्या.
" हा लेप गरम गरमच लावते. म्हणजे पाय पटकन बरा होईल पोरीचा." गौरीने प्रथमचा हात सोडला.
" काकू मी लावू का?" प्रथमने विचारले.
"चटका बसेल रे हाताला. गरम आहे." काकू काळजीने म्हणाल्या.
" नाही बसणार काकू. तुम्ही आता रात्री जेवायला काय करणार? "
" काय करू तूच सांग."
" अशी एखादी गोष्ट जी करायला वेळ लागेल.." प्रथम पुटपुटला.
" काय बोललास?"
" मी म्हटले पटकन होणारी एखादी."
" बरे जाते मी.. हा लेप पटकन लाव."
प्रथमने हातात लेप धरला. गौरीचा ड्रेस हलकेच वर केला. हलक्या हाताने तो लेप लावायला सुरुवात केली.
" यासाठी मला लवकर लग्न करायचे नव्हते." गौरी म्हणाली..
" नाही समजले मला." प्रथम म्हणाला.
" मला अजून परिक्षा द्यायच्या आहेत. बाबांसारखे मोठे अधिकारी व्हायचे आहे. तुझ्या हे असे प्रेमात पडल्यावर मी अभ्यास कधी करणार? परिक्षा कशा देणार?" आज पहिल्यांदाच गौरीने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
" बस.. एवढेच?"
" तुला काहीच वाटत नाही माझ्या करिअर बद्दल?" गौरी थोडी रडवेली झाली होती.
" वेडाबाई.. एवढ्याशा गोष्टीचे टेन्शन घेतेस? अग तू तुझा अभ्यास करना. मी नाही येणार तुझ्या अभ्यासामध्ये." प्रथम हात धुवायला उठला.
" तू असे नाहीरे. पण मला नाही समजत." गौरी त्याचा हात पकडत म्हणाली.
" मला पण नाही समजत तुला काय हवे आहे ते."
" मला हे सगळे हवेहवेसे वाटते आहे. पण मला हे सुद्धा माहित आहे की मी एकदा संसारात गुंतले की परत करिअर शक्य नाही."
" पण तुला गुंतायला कोण सांगते आहे? तु तुझ्या अभ्यासावर फोकस कर. आणि मनापासून सांगतो तुला जर माझी भिती वाटत असेल तर मी दुसर्या खोलीत रहायला तयार आहे.. मग तर ओके?"
" नाही. " गौरीने मान हलवली.
"म्हणजे तुझ्या मनातले माझ्या विषयीचे सगळे गैरसमज दूर झाले म्हणायचे.." यावेळेस आश्चर्याने आ करायची पाळी गौरीची होती..
कोणते गैरसमज होते गौरीच्या मनात आणि ते प्रथमला कसे समजले.. पाहू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा