Login

तुझेच सोबती भाग १

कुटुंबाची सोबत असलेल्या तिची कथा.
उद्या तिचा वाढदिवस होता. तिने तिच्या वाढदिवसासाठी तिच्या शाळेतल्या मित्र आणि मैत्रीणींना घरी बोलावलं होत. तिचं यंदाच दहावीच वर्ष होत. शाळेतलं शेवटचं वर्ष म्हणून तिच्या घरच्यांनी ह्या वर्षी तिच्या मित्र आणि मैत्रीणीना बोलवायची तिला परवानगी दिली होती. मग ती खूपच आनंदात होती.

ती राधा. आकाश आणि आशा ह्या दोघांची मोठी मुलगी. प्रतिक तिचा लहान भाऊ. तिच्या घरी तिचे आजी आणि आजोबा देखील राहत होते. असा त्यांचा सहाकोनी परिवार शहरातल्या मध्यवर्ती असलेल्या एका चाळीत गुण्यागोविंदाने नांदत होता.

आकाश हे सरकारी खात्यात क्लार्कच्या पोस्टवर होते. प्रतिक सातवीत होता. तर आशा पुर्णवेळ गृहिणी होती. तिचा दिवस सगळ्यांच्या आधी सुरू होऊन सगळ्यांच्या शेवटी संपायचा.

आकाशच्या वडिलांचं निवृत्तीवेतन आणि आकाश यांचा पगार यावरच ते घर चालत होत. तरी बऱ्याच वेळा आकाश त्याच्या वडिलांच्या निवृत्तीवेतानाला हातही लावत नसे. कारण ते पैसे त्यांचे होते. त्यांना त्यांच्या भविष्याच्या अडचणीसाठी बचत करायला आकाश सांगत राहायचा. आजवर त्यांनी आपल्याला सांभाळले. आता त्यांना सांभाळायची जबाबदारी आपली. ह्याच विचाराने तो त्यांचे पैसे काढत नव्हता. त्याला आहे त्या पगारातच तो त्याच घर चालवत असे. जेव्हा कधी अडचण आलीच तर त्याचे वडील जबरदस्तीने त्याच्या हातात त्यांचे निवृत्त्तीवेतानाचे पैसे ठेवत असत.

मुल मोठी होत होती. आई बाबांचा दवाखान्याचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च, वाढलेली महागाई यामुळे दोघा नवरा बायकोची घर चालवता चालवता दमछाक होऊन जात होती. त्यामुळे कधी कधी दोघा नवरा बायकोमध्ये जरा वाद देखील व्हायचे. पण दोघांव्यतिरिक्त बाहेर कोणाला ते समजत नसे.

कोवळ्या मनाची राधा आता वयात येऊ लागली होती. ती आता तिचं कुटुंब आणि तिच्या मैत्रिणींच कुटुंब यात तुलना करू लागली. आधीच तिला नामाकिंत शाळेत घातलेलं होत. जिथे उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंताचे मुल शिकायला येत होती. ज्यांची जगण्याची पद्धत जरा उच्च स्वरुपाची होती. त्यांची मुल पैसे खर्च करताना इतका विचार करत नव्हते. तर राधाला एक एक रुपयाचा हिशोब द्यावा लागत होता. पण राधा तर अगदी राधे सारखीच होती. तिच्या आधी तिच्या घरच्यांचा विचार करणारी. कधी कधी विचार यायचे. पण आपल्या आई वडिलांचे पाहिलेले कष्ट तिला आठवायचे. मग आलेले विचार ती झटकून टाकायची.

तिच्या वाढदिवसाला बाकीच्यांना बोलवायचे कारण फक्त तिचं त्या शाळेतलं शेवटचं वर्ष. नाहीतर ह्यावर्षी देखील ती घरातल्या घरात फक्त केक कापणार होती. त्यामुळे तिने आज शाळेत तिच्या सर्व मित्र आणि मैत्रीणींना उद्यासाठी घरी बोलावलं होत.

दुसऱ्या दिवशी ती नेहेमीप्रमाणे शाळेत गेली. तिला तिच्या वर्गात सर्वांनी शुभेच्छा दिल्या. शाळा सुटताना परत घरी यायचं सांगायला ती विसरली नव्हती.

ती घरी पोहोचलीच होती की तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तिच्या घरी तिचे दोन्ही काका, एक आत्या हे तर आलेच होते. वरून गावरून तिचे मामा, मावशी, त्यांची मुलही आले होते. त्यामुळे ते घर आज खूपच गजबजलेल दिसून येत होत. दोन्ही चाळींच्या मधेच खुर्च्या मांडून त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यांच्या सोबत गप्पा मारायला शेजारचे होतेच. मग काय? जसा काही मोठा कार्यक्रम असल्यासारखं तिथे वाटायला लागलं होत.

राधा तर खूपच खुश झाली होती. ती लगेचच तिच्या सर्व बंधू भगिनींमध्ये व्यस्त झाली. बऱ्याच दिवसांनी ते सगळेच जमले होते. अशा वेळेस क्लासला सुट्टी घेणे हे तर ते शास्त्रच असत. मग काय? गप्पांना बरच उधाण आल. इतक की कधी संध्याकाळ झाली ते सुद्धा कोणाला समजल नव्हत.

त्या दोन्ही चाळीच्या मधोमध तिच्या वाढदिवसाची तयारी केली गेली. जवळपास सर्व चाळच त्यांच्या मदतीला आली होती. कोणी त्यांच्या घरातली लायटिंग लावली. तर कोणी घरातला मोठा टेबल आणला. कोणाच्या घरची वाढदिवसाची डिझाईन असलेल्या वस्तू होत्या. सगळ्यांसाठी तो एक सोहळाच होता आणि ते सगळे मनापासून त्याचा आनंद घेत होते.

राधा बोलघेवडी होती. त्या चाळीतल्या पहिल्या घरापासून ते शेवटच्या घरापर्यंत तिचं सगळ्यांसोबत चांगल बोलण होत. तिचा तो स्वभाव सगळ्यांनाच आवडत होता. म्हणूनच आज ती सगळी चाळच तिचा वाढदिवस साजरा करायच्या मागे लागली होती. याच दुसर कारण असाही होत की ती तिच्या पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला जाणार होती. मग पुढच्या वर्षीपासून तिची भेट होण काही जमणार नव्हत. जेव्हा कधी सुट्टीला येईल तेव्हाच. मग ह्या वर्षीचा वाढदिवस जोरातच करायला घेतला होता.

संध्याकाळी जसे राधाच्या शाळेतले मित्र आणि मैत्रिणी तिथे पोहोचल्या. तसे ते तिथला तो गोंधळ पाहून क्षणभर थबकलेच. थोडावेळासाठी तर दुसऱ्या ठिकाणी तर नाही आलो ना? अस त्यांना वाटून गेल. जेव्हा प्रतीकने त्यांना पाहिलं, तेव्हा त्याने त्यांना यायला सांगितलं. तेव्हा कुठे ते त्यांच्या घरात येऊन पोहोचले.

पण घरात तर आधीच तिच्या बाकी घरच्यांनी त्याचं बस्तान मांडून ठेवल होत. मग ह्यांना बसायला कुठे जागाच दिसत नव्हती. जेव्हा राधाने त्या सगळ्यांची तिच्या आलेल्या घरच्यांसोबत ओळख करून दिली तेव्हा त्यांना बसायला जागा मिळाली.

आजचा तिचा वाढदिवस दणक्यात साजरा केला गेला. त्या चाळीतल्या एकाने तर त्याच्या घरातला मोठा स्पीकर बाहेर काढून त्यावर गाणी लावली. त्यावर चाळीतल्या सगळ्या मुलांनी उड्या मारून घेतल्या होत्या.

यावर्षी राधाला मिळालेल्या सगळ्या भेटवस्तूंपैकी तिच्या घरच्यांनी दिलेली भेटवस्तू तिला खूपच आवडली होती.

क्रमशः

अष्टपैलू लेखक स्पर्धा

🎭 Series Post

View all