" काय काय ?? " सगळ्यांनी एकच गोंधळ केला...
" माझा ड्रीम जॉब मला फायनली मिळाला आणि ....आता लंडनची पोस्टिंग पक्की..." विनयच्या या बातमीने सगळं घर आनंदाने न्हाऊन निघालं...गेल्या सहा महिन्यांपासून विनयची दिवरात्र मेहेनत शेवटी फळाला आली होती !
" वावं पप्पा म्हणजे आपण लंडनला जाणार...?" पिहू तर आनंदाने नाचू लागली...!
" किती वर्षांसाठी ? कधी निघायचं ? काय काय तयारी करावी लागेल ? आपण सगळे एकदम जायचं का की तू पुढे जाणार आधी ? पिहुच्या एडमिशन च बघावं लागेल आधी..." अनुला तर आनंदाच्या डोहात तरंगतो असच वाटत होतं...लगेच पंख लावून उडून गेली होती ती...
" अग हो हो ...किती एक्साईट होताय सगळे...जरा मला बोलू द्याल की नाही..." विनयने असे बोलताच
" थांब आधी देवापुढे साखर ठेवते...अनु काहीतरी गोडाधोडाचं करूया आज इतकी आनंदाची बातमी ....विनू चल आधी देवाच्या पाया पड...अरे वाह , शहाणा झालास की राजा पेढे आणलेस ! चल देवापुढे ठेव..." अत्यानंदात वसुधाबाई देवाचे आभार मानायला देवघरात सगळ्यांनाच घेऊन गेल्या...
सगळे जण देवाच्या पाया पडले...विनयने आई बाबांचा आशिर्वाद घेतला...
" पप्पा आता मस्त सेलिब्रेशन झालंच पाहिजे..." पिहूच्या उत्साहाला दाद देऊन विनयने सगळ्यांना तयार व्हायला सांगितलं ...
" चला आज मस्तपैकी \" लीला पॅलेस \" ला जाऊया ...आई आणि अनु काहीच बोलायचं नाही...आज तो पार्टी बनती ही है..."
" सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा , आताच कोणाला काहीच सांगायचं नाही बरं का , जोपर्यंत सगळं काही फायनल नाही होत तोपर्यंत कुठेच चर्चा नाही करायची...उगीच नजर लागेल ...लोक फार वाईट असतात...." आईची माया बोलली...
सगळ्यांनी हसून होकार दिला आणि तयारीला लागले...
" काय मग राणीसरकार खुश ना?आता मस्त मज्जा करूया..तुला वाटेल ते कर तिकडे गेल्यावर.कोणीच नसेल काही बोलायला...आपला राजा राणीचा संसार पुन्हा एकदा नव्याने मांडू..." अनुला मिठीत घेत विनयने तिच्या मनातलं ओठावर आणलं...
" अरे पण आई बाबांचं काय ? " स्वप्नाच्या जगातून बाहेर येत अनुने विचारलं ...
" त्यांना आता लगेच नाही येता येणार.आणि तसंही त्यांना तिकडे फक्त सहाच महिने राहता येईल ...आपण जाऊन सेटल होऊ मग त्यांचा व्हीसा वगैरे बरीच प्रोसेस असते...कंपनी फक्त आपल्या तिघांचीच व्यवस्था करेल.आई बाबांचं मग बघुया नंतर कसं होईल ते...आणि आता चल ना पटकन तयार हो...उगीच काहीतरी विषय काढून मुड नको घालवू...आपण बोलूया नंतर..." विनयने अनुला गप्प केलं आणि तयारीला लागला.
" मी काही येत नाही तुम्ही जा...तसही मी नाही जेवणार बाहेर येऊन काय करायचं ? अनिता जास्त काही करू नकोस पोळ्या टाक दोन मी खाऊन घेईन चटणी बरोबर ....आणि लवकर या .मला एकटीला सोडून जाताय ना...जवळच्या हॉटेलात जाऊन या , तसही सगळीकडे तेच असतं..." वसुधाबाईंनी नेहेमीप्रमाणे कुरकुर् सुरू केली...
अनिता तोंड पाडून कणीक भिजवायला गेली...तितक्यात दिलीपरावांची हाक आली " अनु अगं अजून दोन पोळ्या जास्त कर ...मी सुद्धा घरीच जेवतो..."
अनु काही न बोलता कणीक भिजवायला लागली..."लवकर आटप ग...फक्त चार म्हणजे चारच पोळ्या कर आणि ये पटकन..." विनय हळूच कानात बोलला...
तितक्यात आईंची , तिला अगदी पाठ असलेली वाक्य आलीच
" अनिता अगं चार म्हणजे चारच करू नकोस पोळ्या , उद्या उपवास माझा आणि भात नाही काही नाही फक्त पोळीच ना मग एखादी जास्तच लागेल बाबांना .आणि डब्यातही एखादी हवीच ना ठेवायला ....सात आठ तरी टाक पोळ्या .लागणार नाहीत पण असुदे... विनुला सुद्धा आवडत नाही बाहेरचं , आल्यावर लागलं तर असुदे एखादी जास्तीची पोळी..."
" आता इतक्या पोळ्या म्हणजे निदान अर्धा तास तरी लागेल तुला सगळं आवरायला , शी बाबा नेहेमीच मुड घालवते तू..." विनय वैतागला तशी अनुने त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि स्वयंपाकाला लागली ...आजचा प्लॅन नक्की कॅन्सल होणार हे ती समजून चुकली होती...एकीकडे कुकर लावून पटकन तिने पिठलं केलं आणि गरम पोळ्या करत सगळ्यांना जेवायला वाढलं... हिरमुसलेल्या पीहूला जेवल्यावर आईसक्रीम खायला नेण्याचं प्रॉमिस देऊन विनयने तिचा रुसवा घालवला .....
जेवणं झाली , सगळी आवारा आवर झाली ....अनु खरंतर खूप थकली होती पण तिला विनयच मन दुखवायच नव्हतं..तिची काहीही चूक नसताना सुद्धा तिला उगीचच अपराधी वाटत होतं.
पटकन तयार होऊन आई बाबांना काही बोलायची संधी न देता अनु म्हणाली , " आई बाबा तुम्ही झोपा , आम्ही किल्ली घेऊन जातोय ...वेळ लागेल आम्हाला. " पीहूला आईस्क्रिम खाण्याची गडबड होती त्यामुळे ती संधी साधून घाई घाईत तिघे निघाले.नाहीतर पुन्हा काहीतरी कारण काढून घरीच बसावे लागेल ....!
बाहेर मोकळ्या हवेत अनुला खूप बरं वाटलं... आईस्क्रिम पार्लर मध्ये आल्यावर पिहूने आईस्क्रिमवर ताव मारला आणि तिथे असलेल्या गार्डन मध्ये खेळायला पळाली...
विनयने अनुचा हात हातात घेतला !
" विनू खरंच आज खूपच आनंदाचा दिवस आहे...तुझ्या परिश्रमाचे चीज झाले...खरंच खूप भाग्यवान आहे मी...आता पुढचं कसं काय करायचं प्लॅनिंग...आपण परदेशात जाणार ही कल्पनाच खरंतर खूप एक्साईटींग आहे.मला सगळ्यांना ओरडुन सांगावस वाटतय .पण आई...पण मी प्लीज माई अप्पाना सांगते ना .त्यांना किती कौतुक वाटेल जावयाचं ..."
" खरंच माझीही अवस्था तुझ्यासारखीच आहे...अगदी क्लाउड नाईन म्हणतात ना तशी फिलिंग येतेय...आता पटापट पुढची प्रोसेस करायची आणि लवकरात लवकर निघायचं...फक्त तिघांनी लगेच जायचं की मी आधी पुढे जाऊन सेटल होतो आणि मग तुम्ही यावं हे काही ठरवता येत नाहीये...शिवाय आई बाबांचा प्रश्नही आहेच...त्यांना सगळं समजून सांगावं लागेल...आणि पुन्हा गावी ते एकटे...त्याचीच काळजी वाटतेय... तुझं काय मत आहे ? " विनयने आपली काळजी अनिताला बोलून दाखवली...
" खरंच त्यांना आता एकटं राहायची सवय नाहीये...इतकी वर्ष सोबत राहतोय आपण आता ते एकटे मॅनेज कसे करतील ? कुठल्याही कामाची सवय नाही त्यांना...आणि गावी सुद्धा तसं आता जवळचं कोणीच नाही आपलं.त्यांना असं एकटं ठेवून जाणं मला पटत नाहीये...तशी तब्येत एकदम ठणठणीत आहे दोघांची पण तरीही काळजी वाटणारच ...बोलूया त्यांच्याशी मग ठरवू.नाहीतर तू एकटाच जातोस का मी इथेच राहते आई बाबांसोबत...पण तुला सोडूनही नाही राहवणार मला..." अनिताला काहीच सुचत नव्हतं.तिने नेहेमीच सासू सासऱ्यांना आई वडील मानून त्यांना प्रेम देण्यात कुठलीही कसूर केली नव्हती.त्यामुळे आता त्यांना एकटं सोडून जाण्याची कल्पना तिला सहन होत नव्हती.पण विनयला सोडून राहणेही तिला शक्य नव्हते ...
थोडावेळ दोघे तसेच बसून होते.एक दोन दिवस विचार करू आणि आई बाबांशी बोलून डिसिजन घेऊया असे ठरवून त्यांनी पिहुला हाक मारली.
" पप्पा तिकडे स्कूल कसे असतात हो ? आणि आपण नक्की किती वर्ष राहणार तिकडे ? आपण सुट्टीत इकडे येऊ दरवर्षी ....मला माझ्या सगळ्या फ्रेंड्स ची आठवण येईल ना ...पण मला समजेल ना तिकडे नीट...रियाचा काका असतो ना लंडनला त्याचा मुलगा जरा वेगळाच इंग्लिश बोलत होता.रिया म्हणत होती की तिकडचा एसेंट वेगळा असतो म्हणून...आमची इंग्लिश ची टीचर स्पोकन इंग्लिश चे क्लास घेते , मी लावून टाकू का क्लास म्हणजे तिकडे गेल्यावर इझी होईल...मम्मा तू ही लाव क्लास...आपण तिकडे गेलो की दर संडे फिरायला जायचं ह...मला सगळं फिरायचे आहे आणि मग मी फोटो सगळ्यांना पाठवणार...किती मज्जा ना..." पिहुचा आनंद तिच्या अखंड बडबडीतून दिसत होता.
" बेटा अजून वेळ आहे सगळ्याला...आपण ठरवू लवकर.पण आत्ताचं कोणाला काही सांगायचं नाही. आपलं फायनल झालं की मग सांगायचं " विनयने पीहुला समजावलं
." आज्जी म्हणते तशी खरंच दृष्ट लागते का ? आणि म्हणजे नक्की काय होतं ? ऐरो सारखी लागते का दृष्ट ? पण दुसऱ्याच्या डोळ्यातून आपल्याला कसं काय होईल ...? " निरागस पीहुला अनेक प्रश्न पडले होते..
" अगं बाळा ते तुला मोठी झालीस ना की कळेल...आणि आपण सगळ्यांना सरप्राइज दिलं की किती मज्जा येईल ना ...मग तू प्रॉमिस कर की कोणाला काही सांगणार नाहीस " अनिताने कसबस पिहूला समजावलं आणि तिघे घरी आले ....
पीहू येतानाच झोपली होती .आई बाबा सुद्धा झोपले होते.
पण इतक्या आनंदाच्या प्रसंगी सुद्धा विनय आणि अनिताची झोप उडाली होती.अनेक प्रश्न निर्माण झाले होते , भेडसावत होते.
एकीकडे प्रगती , सगळ्यांसाठीच चांगल्या भविष्याची संधी दिसत होती आणि दुसरीकडे आई बाबांची चिंता....
विचार करत दोघांनाही कधी झोप लागली ते कळलंच नाही....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा