" विनू मला वाटतं की मी घरी जाते . आई घरी एकट्याच आहेत . काहीही झालं तरी आई आहे ती तुझी . उगीच त्यांनी त्रास करून घेतला आणि त्यांना काही झालं तर ? आणि पीहूला सुद्धा आणायला हवं घरी . मी घरी असले तर बरं . " अनिता म्हणाली . या परिस्थितीतही तिला आईंची काळजी वाटते हे बघून विनय खरंच थक्क झाला .
" खरंच धन्य आहेस तू अनु. तू घरी जावस असं मला वाटत नाहीये आणि तुलाही इच्छा नसणारच हे मला माहितीये . पण पिहुसाठी तू घरी गेलेली बरी . आईशी बोलू नकोस आजिबात . हवतर पिहुला घेऊन बाहेर जा कुठेतरी . आईचा फोनही आलेला नाहीये अजून . अशी का वागते ती मला कळत नाही . आता मात्र डोक्यावरून पाणी गेले आहे . तू आजिबात तिला बोलायला किंवा मनवायला जायचं नाहीस . फक्त ती ठीक आहे ना इतकं बघ आणि पिहुला घेऊन बाहेर जा . मग घरी आल्यावर ठरवू काय करायचं ते . सध्या फक्त बाबांची तब्येत महत्त्वाची आहे ." विनय म्हणाला .
अनिता बाबांना भेटली .
" बाबा मी घरी जाऊन येते . तुम्ही थोडावेळ अजून आराम करा इथेच . डॉक्टर म्हणालेत कुठलही टेन्शन घ्यायचं नाहीये तुम्ही . आम्हाला तुम्ही नेहेमी आनंदी आणि निरोगी हवे आहात बाबा . मला वचन द्या सगळे विचार सोडून आता रिलॅक्स राहाल म्हणून . काहीच काळजी करू नका आता . सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल . कुठेतरी छान फिरून येऊया का आपण ? फ्रेश वाटेल तुम्हाला ? "
" मी ठीक आहे बेटा . खरंच धन्य आहेस तू . घरी जा तू , ती पोर एकटी असेल . पण तुझ्या सासुशी काही बोलू नकोस . यावेळी अती झालंय तिचं . आपण सगळ्यांनी समज दिली तरच वठणीवर येईल ती . मी काळजी घेईन स्वतःची . तुम्ही दोघं आजिबात विचार करू नका कुठलाही . तू असं कर घरी जा आणि पिहुला घेऊन मॉलमध्ये जा . तो नवीन कुठला पिक्चर आलाय ना तो बघायचा म्हणत होती ती . मी आणि विनूसुद्धा येतो तिकडे इथूनच . डॉक्टर हो म्हणालेत मला फिरायला . कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवला तर मी लगेच बरा होईल असं त्यांचं म्हणणं आहे . तुम्ही आहात तितका वेळ तुमच्यासोबत छानपैकी राहणार आहे मी . " दिलीपराव अगदी मोकळेपणाने बोलत होते . त्यांचं बोलणं ऐकून अनिता आणि विनय अगदी रिलॅक्स झाले . बाबांचा प्लॅन त्यांना आवडला. त्याप्रमाणे अनिता घरी निघाली .
घरी वसुधा मात्र मनातून थोडी घाबरली होती .\" दिलीपराव कसे असतील ? इतका वेळ लागला म्हणजे काही प्रोब्लेम तर नसेल ना ? मला फोन करून सांगितलं सुद्धा नाही कोणी . यावेळी जरा जास्तच चिडलेत हे पण होतील थोड्यावेळाने पहिल्यासारखे. अनिताच काही नाही पण विनय मात्र चिडला जास्तच . त्याचाही राग जाईल लवकरच . माझ्यापासून तुटू देणार नाही मी त्याला . माफी मागावी का ? पण नाही आता जर नमतं घेतलं ना तर कायमचं स्थान हिरावून जाईल आपलं घरातलं. पण ह्यांनी खरंच डोक्यात राख घालून घेतली तर ? वृद्धाश्रमात जायचं म्हणतायेत ते खरं तर नसेल ना ? नाही नाही ही पोकळ धमकी असेल . मला एकटीला सोडून असे बरे जातील ? आणि ही दोघं थोडीच जाऊ देतील त्यांना ? आणि कीर्ती आहेच की ती असं होऊ देणार नाही . पण घरी आले की जरा गोड बोलेन आणि राग घालवेल त्यांचा . माझ्याशी कितीवेळ रागावून राहतील ? \" त्यांच्या मनात विचार सुरू होते .
शेवटी न राहवून त्यांनी विनयला फोन केला .
" विनू बेटा , काय म्हटले डॉक्टर ? बाबा ठीक आहेत ना ? घरी कधी येताय ? आणि पिहु कुठे गेलीय काय माहिती ? अजून घरी आली नाही . कितीवेळ झाला बाहेर आहे ती . " अगदी काहीच न झाल्याच्या आविर्भावात वासुधाबाई बोलल्या.
" हो बाबा ठीक आहेत . बीपी वाढलाय त्यांचा . रिलॅक्स रहा , टेन्शन घेऊ नका असं सांगितलं आहे . अजून काही वेळ इथे थांबावं लागेल . पिहुची काळजी करायची गरज नाही ." विनय कोरडेपणाने बोलला.
आता वसुधाबाई रिलॅक्स झाल्या .भूक लागली होती . घरात अनिता काही ना काही खायला करून ठेवतच असे नेहेमी .
अनिता पिहुला घेऊन घरी आली . वसुधाबाई चिवडा लाडू खात होत्या .
" किती वेळ झाला ? मला फोनही नाही केलात तुम्ही ? इतका वेळ वाट पाहून आता शेवटी खायला घेतलं . काही करून गेली नाहीस तू ? ही पोरही उपाशी फिरते आहे कधीपासून ? काहीच काळजी कशी नाही तुम्हाला ? " वसुधाबाई आपल्या नेहमीच्या आविर्भावात म्हणाल्या . इतकं मोठं रामायण झालं तरीही त्यांना काहीच फरक पडला नव्हता . मनातून जरी त्या थोड्या घाबरल्या असल्या तरीही अनितासमोर आजिबात नमतं घेणं म्हणजे आपलं घरातलं अस्तित्व घालवून बसणं असं त्यांना वाटत होतं.
अनिताला खरंतर खूपच राग आला होता. पण पिहुसमोर आपला ताबा सुटायला नको म्हणून ती आटोकाट प्रयत्न करत होती .
" डॉक्टरांकडे वेळ लागणारच ना . सगळं चेकअप, टेस्ट म्हणजे इतका वेळ लागतो . पीहू नेहाकडे होती . तिच्या आईने तिचं खाणं पिणं व्यवस्थित केलं . तुम्हाला काही हवं आहे का अजून खायला ? तुमच्यासाठी भाजी पोळी आणलीये बाहेरून . हवं तेव्हा खाऊन घ्या . पीहु चल बेटा फ्रेश होऊन घे ." अनिताने वसुधाबाईना आजिबात बोलण्याची संधी न देता आत निघून गेली .
पिहुला मूव्हीचा प्लॅन समजला तशी ती एकदम खुश झाली . पटापट आवरून ती तयार झाली . अनिताही फ्रेश होऊन तयार झाली .
तितक्यात विनयचा फोन आला . " काय ग, सगळं ठीक ना घरी ? आम्ही दहा मिनिटात निघू इथून . तुमचं झालं का आवरून ? निघा मग तुम्हीही . आई ठीक आहे ना ? "
" हो ठीक आहे सगळं. आई नॉर्मल आहेत . मी जास्त काही बोलले नाही त्यांच्याशी. बाहेरून येताना भाजी पोळी घेऊन आले होते आईंसाठी . आम्ही रेडी आहोत . निघतो लगेच . " अनिता म्हणाली .
" आम्ही बाहेर जातोय . यायला उशीर होईल . किल्ली आहे माझ्याकडे . बाबा आणि विनयसुद्धा डॉक्टरकडून येणार आहेत तिकडेच . आम्ही मूव्ही बघून जेवून परत येऊ .चल बेटा पटकन शूज घाल ." अनिता वासुधाबाईंकडे न बघता बोलली आणि त्यांना काही बोलण्याची संधी न देता पिहुला घेऊन पटकन बाहेर पडली .
हे काय चाललंय ते वसुधाबाईंना काहीच कळत नव्हतं. \" हे सगळेजण आपल्याला काहीही न सांगता बाहेर निघून गेले ? घरी स्वयंपाकसुद्धा केला नाही ? मला काय हवं नको ते काहीच विचारलं नाही ? नक्की काय होणार आहे पुढे ? आपल्याविरुद्ध काय कट कारस्थान सुरू आहे या लोकांचं ? \"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा