अनिता म्हणाली तसा विनयने आईला फोन केला . पण मैत्रिणींसोबत गप्पांमध्ये मश्गूल असल्यामुळे त्यांनी फोन उचललाच नाही तशी दोघांची काळजी अजूनच वाढली .
आता शेजारी फोन करावा की आईच्या एखाद्या मैत्रिणीला फोन करावा अश्या विचारात असतानाच शांताचा फोन आला .
" बरं झालं शांता मावशी तुम्ही फोन केलात . मी आता तुम्हालाच फोन करणार होते . अहो तुम्ही कुठे आहात ? आईंचा फोन लागत नाहीये . बर्या आहेत ना त्या ? तुम्ही बघून येता का जरा ? " अनिता अगदी पॅनिक झाली होती.
" अहो ताई काहीच काळजी करू नका तुम्ही आज्जीची . त्यांच्या मैतरणी आल्यात ना . पार्टी करतात आहेत त्या . मीच सगळं करून दिलं आणि भाहेरून पण खाऊ आणून दिला त्यांना . बाकी पण सगळं घर एकदम चकाचक ठेवते मी . आज्जी जेवण बिवान एकदम बरोबर करतात . रोज नवीन कायतरी खमंग कर म्हणून संगत्यात मला . करून देते मी काय पायजे ते . तुम्ही बिनधास्त रावा. मला जरा लेकिकडे जायचं आहे म्हणून दोन दिवस मी नाही पण मी कमल ला सांगितलं आहे तुमच्या घरी काम करायला . ती सगळं चोख करेल बघा. तुम्ही काही काळजीच करू नका . आणि एक मला तीन हजार पाहिजे होते . लेकीला नड आहे . नाही म्हणू नका द्या कसही करून .आज्जी काही देतील असं वाटतं नाही म्हणून मागितले नाहीत मी ." शांता म्हणाली .
शांताशी बोलून अनिताच्या जीवात जीव आला . विनयने सुद्धा सगळं बोलणं ऐकलं आणि तो तिथून निघून गेला .
" बरं ठीक आहे . असं कर शेजारच्या प्रियाकडे जा . तिच्या मोबाईल वर पाठवते मी पैसे . ती देईल तुला . जास्त काही प्रॉब्लेम नाही ना लेकीकडे ? अजून हवे तर सांग पैसे मी पाठवते . कमल करेल सगळी कामे नीट याची खात्री आहे मला . जा तू निवांत . फोन कर . आणि जाताना माझ्याकडून खाऊ घेऊन जा लेकरासाठी. "
शांताने खूप आभार मानून फोन ठेवला . अनिताने लगेच प्रियाला फोन करून शांताला पैसे द्यायला सांगितले .
विनयला आईचा खूप राग आला . इतकं सगळं होऊनही ती अशी कशी वागू शकते याचं कोडं न उलगडनार होतं. त्याने सगळा राग अनितावर काढला . त्याचा वाढलेला आवाज ऐकून सगळे जण आले . अनिताच्या माई, अप्पा, दादा , वहिनी सगळ्यांच्याच चेहेर्यावर प्रश्नचिन्ह होतं. खरंतर ही मंडळी आल्यापासूनच काहीतरी विचित्र घडलंय हे सगळ्यांना जाणवलं होतं .
सगळ्यांना बघून अनिता विनय एकदम गप्प झाले . अनिता विषय बदलून मुलांच्या रूम मध्ये जाऊ लागली तशी दिलीपरावांनी तिला थांबवलं .
" थांब पोरी , ही सगळी आपलीच माणसं आहेत ना मग त्यांच्यापासून काय लपवायचे? माई, अप्पा, अमोल , सुधा बसा सगळे . मुलांना जरा बाहेर पाठवा खेळायला . खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे तुम्हा सगळ्यांना . पण ते चांगलं नक्कीच नाही . सगळ्यात आधी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो . तुमची पोर लाखात एक आहे . तिने अगदी तुमच्यासारखी काळजी घेतली आमची , तितकच प्रेम केलं . सेवा तर तुमचीही केली नसेल तितकी केली आहे आमची . आणि ते सुद्धा अगदी आनंदाने, कोणीही न सांगता . तुमचे संस्कार खरंच खूप छान आहेत पण आम्ही मात्र तिला तिचं हक्काचं प्रेम , सुख देऊ शकलो नाही . आमचा विनय खूप चांगला आहे . दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे . मलाही अनिता अगदी मुलीसारखी आहे . पण विनयच्या आईचा स्वभाव तुम्ही जाणताच. तिच्यामुळे अनुला खूप त्रास झाला. पण या पोरीने कधीही उलट उत्तर दिलं नाही . सगळं मायेने करत राहिली . आजही करतेय . पण आता मात्र डोक्यावरून पाणी गेलेय. त्यामुळे मी एक निर्णय घेतलाय. वृद्धाश्रमात जाण्याचा.ते ही एकटा..." दिलीपराव म्हणाले आणि सगळेजण अगदी धक्का बसल्यासारखे स्तब्ध झाले .
विनय आणि दिलीपरावांनी मिळून अनेक वर्ष घडत असलेल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मागच्या काही दिवसांत घडत असलेल्या घडामोडी सुद्धा सांगितल्या . सगळ्यांना खूप वाईट वाटलं.
" अहो काका तुम्ही असं करा आमच्याकडे येऊन रहा ही दोघं गेली की . इथे मस्त ग्रुप आहे अप्पांचा. तुम्हाला खूप छान वाटेल इथे . मुलं आहेत , गार्डन आहे वेळ छान मजेत जाईल तुमचा . आणि अनु आणि भावजीना सुद्धा काहीच काळजी राहणार नाही ." अमोल म्हणाला .
सगळ्यांनाच त्याचं म्हणणं पटलं.
" बाबा बरोबर आहे . तुम्ही इकडेच रहा . हवंतर फिरून या थोडे दिवस तुमच्या मित्रांसोबत. अप्पाना ही सोबत न्या . कधी ताईकडे जा , आत्या , काका सगळेच तुम्हाला बोलावतात . तुम्हाला हवं तिकडे रहा ." विनय म्हणाला .
" बरं बरं , तुम्ही सगळे म्हणाल तसं. माझी काहीच काळजी करू नका तुम्ही. मी आनंदात राहणार असे वचन दिले आहे ना मी .मज्जा करू आम्ही मस्त काय अप्पा? " दिलीपराव म्हणाले तसं सगळे रिलॅक्स झाले .
" हो बाबांची काळजी नाही पण आईंच काय ? " अनिता म्हणाली तसं वातावरण पुन्हा टेंस झालं. तो एक मोठा यक्षप्रश्न सगळ्यांपुढे होता . सगळे विचारात पडले . कोणीच काही बोलत नव्हतं .
वातावरण जरा हलकं फुलकं होईल म्हणून सगळे मुलांना घेऊन गार्डनमध्ये गेले . तिथे छानस मंदिर होतं. तिथल्या प्रसन्न वातावरणात सगळ्यांनाच खूप फ्रेश वाटलं.
आता सगळ्यांनीच हसत खेळत वेळ घालवायचा ठरवला. दुसऱ्या दिवशी रिसॉर्टवर जाण्याचं नक्की झालं . दोन दिवसांनी कीर्तीताई आणि मंडळी येणार होती त्यांनाही डायरेक्ट रिसॉर्टवर यायला सांगितलं.
अनिता मात्र खूप काळजीत होती . आईजवळ आणि वहिनी जवळ तिने आपलं मन मोकळं केलं . दोघींनीही तिला धीर दिला .
कीर्तीला यातलं काहीच सांगितलं नव्हतं . ती आल्यावर सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी तोडगा काढायचं ठरवलं .
एक मुलगी म्हणून कीर्ती आपल्या आईला नक्कीच सपोर्ट करेल असं वसुधाला वाटत होतं. आपली लेक आपल्या बाजूने सगळ्यांशी भांडून त्यांचं मन वळवेल अशी खात्री एका आईला होती .
काय असेल तो तोडगा ? कीर्ती खरंच आपल्या आईला सपोर्ट करेल ? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा