तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? भाग -३(अंतिम.)

एका व्यथेची कथा.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?


भाग -तीन.(अंतिम भाग.)


"आई तू एकदम अशी ओरडू नकोस गं." राकेशचे बाबा. "हळू बोलून देखील सांगू शकतो नं?"


"तिला रागावतेय असं वाटत आहे का? काय गं रिद्धी तुझ्यावर ओरडते का मी?" आजी.


तिने मान हलवून नकार दिला. डोळे मात्र पाण्याने डबडबले होते.


"अगं रडूबाई, गायी लगेच पाण्यावर आल्यात होय?" तिला मायेने जवळ घेत विनिता म्हणाली.


"अगं तुझी ही अवस्था बघवत नाहीये. मला, बाबाला आणि आईंना सुद्धा. म्हणून काळ रात्री आम्ही तिघांनी विचार करून निर्णय घेतला. म्हणजे आयडिया तशी आईंचीच होती पण आम्हा दोघांना पटली." विनिता.


"आई काय म्हणायचे आहे तुला? कसली आयडिया?" रात्री रिद्धी दुसऱ्या लग्नाचे बोलली होती. आजीच्या मनात तेच तर आलं नसेल ना म्हणून राकेश बावरल्यासारखा झाला.


"बाळाबद्दल बोलायचे आहे." बाबा.


"काय बोलायचे आहे?" इतका वेळ गप्प असलेल्या रिद्धीने भीतभीत विचारले.


"आपण बाळ दत्तक घ्यायचं का ?" तिच्या डोळ्यात बघत विनिता उत्तरली.


"आई दुसऱ्याचं बाळ चालेल तुम्हाला..?" रिद्धीने डोळे विस्फारून एकवार विनिताकडे आणि नंतर आजीकडे बघून विचारलं.


"आपलं -दुसऱ्याचं, असं काही नसतं. लेकरू ते लेकरू असते." चमचाभर उपमा तोंडात टाकत आजी म्हणाली.


"रिद्धी, अगं राजेश आणि रमेश माझेच मुलगे ना? पण त्यांचे लग्न झाले आणि ते एक दोन वर्षांत त्यांच्या बायकांसोबत वेगळे राहू लागले. त्यांच्यावर आणि राकेशवर मी सारखेच संस्कार केलेत गं. तुम्ही दोघे पाच वर्ष झाली तरी अजूनही इथेच आहातच की.

मुलं लहान असतांना आईवडिलांनी त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करावं. मोठे झाल्यावर त्यांनी आपली काळजी घ्यायची असेल तर घेतील. आता आपलेच बघ. कधी कुरबूरी होत असतील तरी एकमेकांना सांभाळून घेतोच ना आपण? आणि आईबद्दल म्हणशील तर त्या फणसासारख्या आहेत गं. वरून काटेरी आणि आतून गोड. म्हणून तर इतका चांगला उपाय त्यांनीच शोधला.


महागातल्या महाग ट्रीटमेंट करून आपण पाण्यासारखा पैसा खर्च केला. आता नको तो खर्च. दर महिन्याचा तुलाही त्रागा नकोच. त्या पेक्षा अनाथालयातून बाळ दत्तक घेऊया. त्या बाळाला आईबाबा मिळतील. त्याचं आयुष्य सुखकर होईल आणि तुम्हालाही एक वेगळाच आनंद मिळेल. बघा, म्हणजे हे आमचे विचार आहेत. तुम्हाला पटले तरच पुढचा निर्णय घ्या." विनिता त्या दोघांकडे पाहत म्हणाली.


"आईबाबा तुम्ही खरंच ग्रेट आहात आणि आजी तुझ्या डोक्यात ही कल्पना आली ती आम्हाला कशी सुचली नाही गं?" आजीला मिठी मारत राकेश.


"हम्म! ही मिठी तुझ्या बायकोला मार. तिला त्याची गरज आहे. सारखी रडत असते." त्याचा कान पकडून आजी.


घरच्यांचा विचार दोघांना पटला. आपल्या पदरात बाळ येईल या कल्पनेनेच रिद्धीला आई झाल्यासारखे वाटत होते.



यथावकाश एका अनाथाश्रमातून रिद्धी आणि राकेशने एक चार महिन्याची गोंडस परी घरी आणली.

 बाळाचे संगोपन करण्यात दोघेही आनंदी होते. घराला घरपण होतेच, आता एक बालपणही आले होते. त्या गोंडस परीच्या बाललिलांनी घर भरून गेले.


वर्ष सरले. परीचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. रात्री झोपतांना रिद्धी परीकडे टक लाऊन पाहत होती.


"अशी काय बघतेस? राणीसाहेब आंनदी आहात ना? की काही हवंय ?" राकेशने हसून विचारलं.


"मी खूप खूप आनंदी आहे रे. राकेश सुखी संसारासाठी काय लागतं? थोडे प्रेम, थोडा विश्वास, थोडा समजूतदारपणा! आपल्या घरात मला हे सगळं भरभरून मिळाले. तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवेय? " त्याच्या मिठीत विसावत ती उत्तरली.


   ******* समाप्त *******

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*


खरंच प्रत्येक घरात एकमेकांबद्दल थोडे प्रेम, थोडा विश्वास आणि थोडा समजूतदारपणा असला तर ते कुटुंब कोणत्याही परिस्थितीत नक्कीच आनंदी असेल.

सुखी संसाराचे हेच त्रिसूत्र असावे असे वाटते. तुम्हाला काय वाटते?

ही लघुकथा कशी वाटली नक्की सांगा. 

धन्यवाद!!


🎭 Series Post

View all