तुझ्या प्रीतीची आस अंतरी - भाग १

दोन प्रेम करणारे प्रेमी पुन्हा नव्याने एकत्र येतात


तुझ्या प्रीतीची आस अंतरी - भाग १


मनालीने मोबाईल मध्ये किती वाजले ते पाहिलं. संध्याकाळचे सात वाजले होते. ती वेळेतच आली होती. दुबईमधील एका थ्री स्टार हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ ती पोहोचली होती. एका मुलाची आई असलेल्या मनालीचं सौंदर्य तसूभरही कमी झालं नव्हतं. तिने सुंदर नक्षी असलेला आकाशी रंगाचा काॅर्ड ड्रेस घातला होता. तीच्या गव्हाळ रंगावर तो खुलून दिसत होता. मनालीच्या उजव्या गालावर गोड खळी पडत होती. रेशमी सरळ केस वाऱ्यावर भुरभुरत होते. बदामी डोळे असलेली मनाली बावरलेल्या नजरेने सगळीकडे पाहत होती. तेथील दारवानाने गेट उघडताच तेथील सौंदर्याची नजाकत पाहून मनाली अचंबित झाली. मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ माजला होता. आपण करतोय ते योग्य की अयोग्य हे तिला समजत नव्हते परंतु करणे भाग होते. एरव्ही सौंदर्याचा आस्वाद घेणाऱ्या मनालीने नजरेने तिथले सारे सौंदर्य टिपून घेतले असते पण आज तिचं कशातच लक्ष नव्हतं. का कोण जाणे आज तिला सुमितची प्रकर्षाने आठवण येत होती. सुमन कल्याणपुर यांनी गायलेलं तिचं आणि त्याचं आवडतं गाणं तिच्या मनात रूंजी घालत होतं,

"आस आहे अंतरी या, आसरा हृदयात दे
साद देते मी तुला अन् तू मला पडसाद दे"

विचारात हरवलेली ती हॉटेलच्या मुख्य डायनींग हाॅलजवळ आली. तेथील दारवानाने तिला थोडं झुकून कुर्निसात केला. तेथे सुंदर निळसर सौम्य प्रकाश होता आणि मंद आवाजात संगीताची धून ऐकू येत होती. ती आत मध्ये गेल्यावर बावरलेल्या नजरेनेच एखाद्या रिकाम्या टेबलावर नेव्ही ब्लू रंगाचा स्कार्फ दिसतो का पाहू लागली. नेव्ही ब्लू रंगाचा स्कार्फ ही खूण ठरलेली होती. इतक्यात तीचं लक्ष कोपऱ्यातील एका रिकाम्या टेबलावर असलेल्या नेव्ही ब्लू स्कार्फकडे गेले. ती विचारांच्या आवर्तनात त्या टेबलाजवळ पोहोचली. मंद स्मित करत समोरच्या व्यक्तीला ती हॅलो बोलणारच होती इतक्यात ती आणि समोरची व्यक्ती दोघेही आश्चर्याने एकदमच उद्गारले,

"तू!"

त्या व्यक्तीला पाहून मनालीच्या चेहऱ्यावर ओशाळलेपणाचे भाव होते तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर संतप्त भाव दिसत होते. मान खाली घालूनच मनाली त्या व्यक्तीसमोर बसली. ती तिच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हती कारण ती व्यक्ती म्हणजे सुमित, तिचा कॉलेजमधील अत्यंत जवळचा मित्र, तिचा प्रियकर होता. सुमित अतिशय उद्वेगाने तिला म्हणाला,

"मनाली तू अशा परिस्थितीत कधी भेटशील असं मला वाटलंच नव्हतं." मनाली काही बोलू शकत नव्हती कारण तिच्या डोळ्यातून सतत अश्रू ओघळत होते. सुमितने स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवला आणि तिला म्हणाला,

"मनाली आधी तू शांत हो." तिच्या डोळ्यातील अश्रूंना ती थोपवू शकत नव्हती. मग तो तिला म्हणाला,

"तू सर्व लोकांना दिसशील अशी बसली आहेस. तू ह्या बाजूला बस मी समोर बसतो" आणि सुमित समोर बसायला गेला आणि ती त्याच्या जागेवर बसली. मनाली अशा परिस्थितीत भेटल्यामुळे सुमित व्यथित झाला होता. त्याला कळत नव्हतं की मनालीवर अशी वेळ का बरं आली. अशा भेटीची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्याने मनालीला पाच मिनिटं शांत होऊ दिलं.

"मनाली आपली कॉलेजमधली मैत्री, निस्सीम प्रेम स्मरून जे काही आहे ते सगळं खरं खरं मला सांग आपण यातून मार्ग काढू. मी तुला खूप चांगला ओळखतो आणि तू हे पाऊल उचललंस म्हणजे तू नक्कीच मोठ्या अडचणीत असशील."

मनाली थोडीशी शांत झाल्यावर त्याला म्हणाली,

"हो सुमित तू म्हणतोस ते खरंच आहे. मी माझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून नोकरीच्या शोधात इथे आले आहे. ती मला म्हणाली होती की कोविड नंतर बरेचसे लोक आपल्या देशात निघून गेले आहेत त्यामुळे इथे जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत तू इथे ये तुला नक्कीच जॉब मिळेल. म्हणून मी दोन महिन्यांचा टुरिस्ट व्हीसा घेऊन इथे जॉब शोधण्यासाठी आले आहे. व्हीसा संपायला आता केवळ पंधरा दिवस शिल्लक आहेत. मला अजून जॉब मिळाला नाही. कोणीतरी मला सुचवलं की तू कन्सल्टंटला कॉन्टॅक्ट कर तुला जॉब मिळू शकेल. त्याप्रमाणे मी काल एका कन्सल्टंटला भेटले. तो म्हणाला की सध्या जॉब तर नाही मिळणार परंतु तू चार तास एखाद्या श्रीमंत व्यक्ती बरोबर घालवलेस तर तुला पैसे मिळतील आणि त्यांच्या ओळखीमुळे तुला जॉब मिळण्याचा चान्स आहे . मी या गोष्टीला स्पष्ट नकार दिल्यावर तो मला म्हणाला की तुला फक्त हॉटेलमध्ये तीन-चार तास गप्पा मारायच्या आहेत अॅज अ फ्रेंड. आणि आता मी तुझ्यासमोर बसले आहे. तुझं नाव आधी कळलं असतं तर मी कधीच अशी आले नसते."

"मनाली पण तुला स्वतःला एक खूप चांगला जॉब होता ना. तुझं मंदारशी लग्न झालंय तुला एक मुलगा पण आहे. सासु सासरे खरंतर खूप चांगले आहेत. एकंदरीत तुमचं खूप छान चाललंय. असं असताना देखील तू इथे आता काय करतेस?"

"सुमित माझ्याबद्दल तुला एवढी सगळी माहिती कशी?"

"मनाली आपल्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं, माझं अजूनही आहे. तू सुखात आहेस हे कळल्यानंतर मी तुझ्या आयुष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. खरंतर आपल्यातील मैत्री कायम राहावी अशी माझी इच्छा होती परंतु तुला ते शक्य नव्हतं."

"सुमित तू खरंच एक खूप चांगला मित्र आहेस पण आज मी अशा रितीने तुला भेटले हे प्लीज कधी कुणाजवळ बोलू नकोस."

"मनाली तू वेडी आहेस का मी असं कधी करेन का. मला एक सांग की तुला तर माहित होतं ना की मी इथे आहे मग तू मला का नाही कॉन्टॅक्ट केलं."

"अरे इतक्या वर्षांत मी तुझ्या संपर्कात नाही आणि आता मला गरज असताना तुला कॉन्टॅक्ट करायचं मला प्रशस्त वाटलं नाही."

मनालीच्या आयुष्यात असं काय घडलं हे जाणून घेऊ पुढील भागात

क्रमशः