तुझ्या प्रीतीची आस अंतरी - भाग 2

दोन प्रेम करणारे प्रेमी पुन्हा नव्याने एकत्र येतात

तुझ्या प्रीतीची आस अंतरी - भाग २

मनालीला असं अचानक पाहून सुमित स्वतःच्याच विचारात हरवून गेला. त्याच्या मनात आलं की मनालीचं आपल्याशी लग्न झालं असतं तर आज आपण दोघांनी एकत्र सुखाने संसार केला असता. मीहिर सारखा एक गोंडस मुलगा किंवा मुलगी संसार वेलीवर बहरली असती. त्याच्या डोळ्यासमोर कॉलेजमधले ते मोरपंखी दिवस तरळू लागले.

मनालीची आणि सुमितची ओळख एका मजेदार प्रसंगातून झाली होती. एक दिवस मनाली कॉलेजमध्ये शिरत असतानाच तिची सॅंडल तुटली. लेक्चरची वेळ झाली होती म्हणून तिने पर्समधून रुमाल काढून सॅंडल आणि पाय ती एकत्र बांधू पाहत होती. परंतु तिचा रुमाल आखूड पडत होता इतक्यात सुमितने पुढे होऊन त्याचा जेन्ट्स रुमाल दिला आणि खट्याळपणे म्हणाला,

"लेडीज रुमाल फक्त नाजूक चेहरे पुसण्याकरताच उपयोगात येतो. हा रुमाल मोठा आहे तुम्ही वापरू शकता." तिने मान वर करून पाहिले एक रुबाबदार देखणा तरूण तिला त्याचा रुमाल देवू पाहत होता. तेव्हा त्याला मनालीची मस्करी करायची लहर आली. तो तिच्याकडे एकटक पहात म्हणाला,

"हे बघा ही वेळ प्रसंग निभावून‌ नेण्याची आहे. तुम्ही माझा रुमाल परत करू शकता."

"ठीक आहे मी तुमचा रुमाल घेते पण मी त्या बदल्यात तुम्हाला नवीन रुमाल देईन."

"माझी काहीच हरकत नाही. पण असं म्हणतात ‌की नुसता रुमाल देत नाही. तुम्ही त्याच्याबरोबर एक कॅडबरी पण द्या." मनालीला त्याचा मिश्किल स्वभाव खूप आवडला आणि ती तिथून निघून गेली. मनाली गेली त्या दिशेला सुमित अनिमिष नेत्रांनी पाहतच राहिला. मनालीची राहणी साधी असूनसुद्धा ती खूप देखणी दिसत होती. गव्हाळ वर्ण, सुंदर सरळ पाठीवर मोकळे सोडलेले रेशमी केस, बदामी डोळे तिच्या सौंदर्यात भरच टाकत होते. तिने परिधान केलेला गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस तिला खूपच खुलून दिसत होता. पहिल्याच भेटीत मनालीने सुमितच्या मनावर गारुड केलं. नंतर रुमाल आणि कॅडबरी देण्याच्या बहाण्याने मनाली आणि सुमित पुन्हा संपर्कात आले. मनालीला पण सुमित मनापासून आवडला होताच. पावणेसहा फूट उंची, सावळा वर्ण असलेल्या सुमितच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य असायचे. दोन्हीकडे तितकीच ओढ निर्माण झाली होती. दोघेही पुन्हा पुन्हा एकमेकांना भेटण्यासाठी उत्सुकच होते. सुमित अचानक भेटल्याचा बहाणा करून मनालीला भेटत होता. नंतर नंतर ते दोघे ठरवून भेटू लागले. दोघांनी इंजीनियरिंगच्या पहिल्या वर्षाला एकाच स्ट्रीममध्ये ऍडमिशन घेतलं होतं. दोघेही खूप हुशार होते आणि मुख्य म्हणजे दोघांनी ठरवलं होतं की इंजिनिअरिंग पूर्ण होईपर्यंत इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष घालायचं नाही. पण प्रेमात कोणाचंच काही चालत नाही. हळूहळू त्यांचं प्रेम बहरु लागलं होतं. कॉलेजचे गुलाबी दिवस दोघांनाही मोहीत करत होते. दोघेही एकमेकांना न सांगता कधीच घरी राहत नव्हते. अचानकच जर कधी घरी राहावं लागलं तर लगेच ते एकमेकांना मेसेज करत होते. परंतु तो दिवस त्यांना एका युगासारखा वाटायचा.

इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला दोघांचंही नामांकित कंपनीमध्ये प्लेसमेंट झालं. नोकरी करता करता एमबीए करू असा दोघांचा विचार होता. मनालीच्या घरी मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं. एक दिवस रात्री जेवण उरकल्यावर मनालीच्या बाबांनी तिला जवळ बोलावलं आणि म्हणाले,

"आता तुझ्या शेवटच्या वर्षाची परीक्षा होईलच. माझा मित्र श्रीरंग आणि त्याच्या कुटुंबीयांना तू चांगलीच ओळखतेस. मंदारची आणि तुझी लहानपणापासूनच मैत्री आहे. आम्हाला दोघांनाही असं वाटतंय की ही तुमची मैत्री आता आपण लग्नबंधनात बांधूया. मंदार खूप चांगला मुलगा आहे आणि त्याच्याही मनात तू आहेसच."

हे ऐकून मनाली वर आभाळच कोसळलं. तिचे डोळे अश्रुंनी डबडबले.

"बाबा इतकी घाई काय मला अजून शिकायचं आहे."

"अगं श्रीरंग माझा चांगला मित्र आहे तो आणि श्रीकला वहिनी तुझ्या शिक्षणाला कधीच आक्षेप घेणार नाहीत. शिवाय मंदारचा तुला नक्कीच पाठिंबा असेल."

बाबा ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर मनाली घाबरत घाबरत म्हणाली, " बाबा माझं आमच्या कॉलेजमधील सुमितवर खूप प्रेम आहे. सुमित पण खूप हुशार आहे आणि चांगल्या कुटुंबातील आहे. त्याच्या घरी तो आणि त्याचे आई-बाबा तिघंच असतात."

"मनाली अगं तुम्ही दोघं लहान असल्यापासूनच आम्ही तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहत आहोत. शिवाय मी श्रीरंगला शब्द दिला आहे. मंदार आपल्या घरी यायचा तेव्हा तुला आमच्या बोलण्यातून तसं काही जाणवलं नाही का."

"बाबा तेव्हा मला वाटायचं की तुम्ही मस्करीत काहीतरी बोलत आहात. तुम्ही श्रीरंग काकांना समजावा आणि माझ्या आणि सुमितच्या लग्नाला परवानगी द्या."

"नाही असं नाही होऊ शकत. मंदारला पण तू खूप आवडतेस त्याच्याशी लग्न करण्यातच तुझं आणि आपल्या सर्वांचे हित आहे. मंदारशी लग्न झाल्यावर कदाचित तो कोण सुमित आहे त्याला तू विसरून पण जाशील. तुला त्या घरात खूप प्रेम आणि आदर मिळेल." आईला मनालीची बाजू पटत होती ती एकदा हळूच म्हणाली,

"अहो ती एवढं म्हणते तर आपण एकदा त्या सुमितला भेटूया. तिच्या मनाविरुद्ध काही करून ती खुश होणार नाही." हे ऐकून बाबा गरजले,

"ते काही नाही एकदा ठरलं म्हणजे ठरलं. मनालीचं मंदारशीच लग्न होणार."

दुसऱ्या दिवशी मनाली कॉलेजमध्ये गेली तेव्हा तिचा चेहरा पार उतरून गेला होता. सुमितने तिला दुरूनच पाहिलं आणि तो एकदम हरखून गेला. तो तिच्याजवळ आला आणि तिचा चेहरा पाहून तिला म्हणाला,

"मनाली काय झालं तुला बरं नाही का तू अशी का दिसतेस." सुमितचे शब्द ऐकून मनालीच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती एकदम बोलून गेली,

"सुमित आता सगळंच संपलंय रे. आपल्याला इथेच थांबावं लागेल."

"तू आधी माझ्याबरोबर कॅन्टीनमध्ये चल रडणं थांबव. आपण तिथे बसून शांतपणे बोलूया." दोघेही कॅन्टीनमध्ये गेले आणि एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसून सुमितने तिच्या हातावर थोपटत तिला धीर दिला. तिच्याकडे प्रश्नांकित चेहऱ्याने बघत विचारलं,

"मनाली नक्की काय झाले अगदी शांतपणे सांग."

"सुमित बाबांनी माझं लग्न त्यांच्या मित्राच्या मुलाशी ठरवले त्यांनी तसा त्यांना शब्द दिला आहे. आपली फायनल इयर ची परीक्षा झाली की ते माझं लग्न करणार आहेत."

"काsssय! अगं पण असं अचानक तडकाफडकी. तू माझ्याबद्दल त्यांना सांगितलंस ना."

"हो मी त्यांना सगळं सांगितलं पण ते काही ऐकायलाच तयार नाहीत. त्यांच्या निर्णयावर ते ठाम आहेत. आता आपल्यासमोर एकच पर्याय आहे. आपली परीक्षा झाली की आपण पळून जाऊन लग्न करूया."

"नाही मनाली आई-बाबांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न करणं मला मान्य नाही. लग्न करायचं तर त्यांच्या परवानगीनेच." सुमितचं हे बोलणं ऐकून मनाली त्याच्याकडे पाहतच राहिली.

सुमितने पळून जायला नकार दिल्याने मनालीला काय वाटले असेल?

क्रमशः



🎭 Series Post

View all