तुझ्या प्रीतीची आस अंतरी - भाग 3

दोन प्रेम करणारे प्रेमी पुन्हा नव्याने एकत्र येतात

तुझ्या प्रीतीची आस अंतरी - भाग - ३

सुमितला पळून जाऊन लग्न करणं मान्य नाही हे ऐकल्यावर त्याच्याबद्दल असलेला तिच्या मनातील आदर वाढला. तरीही मनाली निराश झाली आणि उदास स्वरात म्हणाली,

"मला नाही वाटत बाबा आपल्या लग्नाला परवानगी देतील. सुमित आता आपल्याला एकमेकांना विसरावंच लागेल."

"मी फक्त तुझ्यावरच प्रेम केलं आहे आणि करत राहणार. आयुष्यभर मी असाच राहीन. पण मनाली आपल्यातलं मैत्रीचं नातं राहील ना तसंच."

"सुमित मला तुझ्याकडे फक्त एक मित्र म्हणून नाही रे बघता येणार. मला कोणालाही फसवायचं नाही. मी लग्नाच्या आधी मंदारला पण आपल्या प्रेमाबद्दल सांगणार आहे."

"तो तुला समजून घेईल का पण. तुझी इच्छा नसताना मी तुला जबरदस्तीने माझ्याशी मैत्री ठेव असं कधीच सांगणार नाही. फक्त तू सुखी व्हावंस हीच माझी इच्छा आहे."

"नियतीच्या मनात असेल तेच होणार. म्हणतात ना 'मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस'. आपली साथ इथपर्यंतच होती. गुड बाय सुमित. तू सुद्धा लग्न करून आयुष्यात स्थिरस्थावर हो. " इतकं बोलून मनालीने सुमितला मिठीच मारली. दोघेही काही क्षण एकमेकांच्या बाहुपाशात मन मोकळं करत होते. सुमित मनालीच्या पाठीवर हात फिरवत होता. नंतर त्याने मनालीला समोर धरून तिच्या कपाळाचे चुंबन घेतलं आणि तो तिथून निघून गेला.

मनालीने सुमित समोर हात हलवला आणि त्याला म्हणाली, "सुमित लक्ष कुठे आहे तुझं" . सुमित भानावर आला. मनालीचं लग्न मंदारशी झालं सुमित मात्र अविवाहित राहिला. आज अचानक मनाली अशा परिस्थितीत त्याच्यासमोर होती. सुमित मनालीला म्हणाला,

" अगं मुख्य विषय बाजूलाच राहिला. ही वेळ तुझ्यावर का आली ते तू मला सांगितलंच नाहीस. मला सगळं नीट सांग मी यातून तुला नक्कीच बाहेर काढेन."

"मला तुझ्यापासून काही लपवायचं नाही. तुला मी सगळं सांगणारच आहे . सर्वप्रथम आपल्या प्रेमात मी तुला शेवटपर्यंत साथ देऊ शकले नाही त्याबद्दल मी तुझी माफी मागते. माझं मंदारशी लग्न झालं. मंदार सर्वार्थाने खूप चांगला होता. दिसायला देखणा, मुंबईत स्वतःचा फ्लॅट, गाडी. त्याची नोकरी पण खूपच चांगली होती." तिचं बोलणं मध्येच थांबवून सुमित म्हणाला,

"तू मंदार बद्दल बोलताना होता असं म्हणालीस. आता तो तुझ्याबरोबर नाही का! नक्की काय झालं"

"हो सुमित मंदार आता या जगात नाही. माझे सासू-सासरे, मंदार, सर्वांनीच मला खूप प्रेम दिलं. कुठेच काही कमी नव्हतं. दोन वर्षांनी मिहीरचा जन्म झाला आणि नोकरीची तशी आवश्यकता पण नव्हती म्हणून मी नोकरी सोडली. नंतर कोविड मुळे अनेक जणांच्या नोकऱ्यांवर गदा आली. त्यातच मंदारची नोकरी केली. कुठेतरी दुसरी नोकरी मिळेल या आशेवर जी काय जमापुंजी होती ती सुद्धा संपली. अशातच कोविडने मंदारचा बळी घेतला. माझे बाबा आणि सासरे दोघेही निवृत्त झाले होते. आमच्यावर खूपच कठीण परिस्थिती ओढवली होती. सगळ्यांचा मीच एकमेव आधार होते. मला एक नोकरी मिळाली त्याच्यावर आमची गुजराण होत होती. परंतु आता मिहीर मोठा होतोय. त्याच्या शिक्षणासाठी अधिक पैशांची गरज आहे. माझी एक मैत्रीण ऑलरेडी इकडे नोकरी करते. तिने मला इथे येण्याचा सल्ला दिला. मलाही वाटलं इथे चांगली नोकरी मिळाली तर त्या पैशांचा उपयोग मिहीरच्या शिक्षणासाठी होईल. म्हणून मी घरातल्या सगळ्यांची परवानगी घेऊन इथे आले. सासुबाई म्हणाल्या तू मिहीरची काळजी करू नकोस. त्याला त्या दोघांचाही खूप लळा आहे."

"तुझं नशीब चांगलं म्हणून मीच तुला या जागी भेटलो. खरंतर माझंच नशीब थोर म्हणायला हवं कारण मनाली तू माझ्यासाठी सारं काही आहेस. दुसरा कोणी येथे आला असता तर कदाचित तू एखाद्या घाणेरड्या विळख्यात अडकली असतीस."

"सुमित तू अजूनही एकटाच आहेस का? लग्न का नाही केलंस? लग्न केलं असतंस तर अशा रीतीने एखाद्या मुलीला भेटायला यावं लागलं नसतं. असा नेहमी येतोस का?"

"नाही गं. खरं सांगायचं तर मी सुद्धा आज पहिल्यांदाच आलो आहे ते सुद्धा मला खूप एकटं वाटत होतं म्हणून. शपथ सांगतो कोणीही मुलगी असती तरी मी फक्त गप्पाच मारणार होतो."

"माझा तुझ्यावर विश्वास आहे. आता पंधरा दिवसात माझ्या नोकरीचं काय जमू शकणार नाही. बहुतेक मला असंच परत जावं लागेल."

"मनाली तुझी कहाणी ऐकून खूप वाईट वाटलं. अशा संकटांच्या वेळी मी तुला काहीच मदत करू शकलो नाही ह्याची सुद्धा मला खूप खंत वाटते."

"आता थोडं ठीक आहे परंतु ते दिवस आठवले की अंगावर काटा उभा राहतो."

"माझं अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. मिहिरला पण आपलं म्हणायला मी तयार आहे. इतकंच नाही तर तुझ्या सासू-सासर्‍यांची, आई-बाबांची जबाबदारी पण आपण घेऊया. माझा बिझनेस खूप छान चालू आहे. मी काही काळ दुबईत तर काही काळ मुंबईत असतो."

"सुमित तुझ्यासाठी कितीतरी मुली हातात वरमाला घेऊन उभ्या असतील. माझ्यासारख्या विधवेशी लग्न करून तू काय साध्य करणार. मी तुझ्याशी नाही लग्न करू शकणार.

मनालीच्या मनात आलं खरंच आपल्या आयुष्यात आता काहीतरी वाईट घडलं असतं पण सुमित भेटल्यामुळे आपण वाचलो. सुमितच्या प्रस्तावावर मनाली काय निर्णय घेईल पाहूया पुढील भागात.

क्रमशः