तुझ्या प्रीतीची आस अंतरी - भाग ४(अंतिम)

दोन प्रेम करणारे प्रेमी पुन्हा नव्याने एकत्र येतात


तुझ्या प्रीतीची आस अंतरी - भाग ४ (अंतिम)

मनालीला गप्प बसलेलं पाहून सुमितने तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी विचारलं,

"मनाली तुझ्या मनात कुठेतरी एका कोपऱ्यात माझ्याबद्दल थोडेसे तरी प्रेम असेलच नाही का. मी तुला असं नाही म्हणणार की तू लगेच हो म्हण. तू आता घरी जाऊन विचार कर आणि मला सावकाश उत्तर दे."

"माझ्या बाबतीत हे सगळं खूप अनपेक्षित घडलं त्यामुळे मी खूप बावरून गेले आहे."

"तू फक्त हो म्हण मग मी तुझ्या घरी येऊन तुझ्या सासू-सासर्‍यांशी व्यवस्थित बोलेन आणि कायदेशीर रित्या तुझ्याशी रजिस्टर लग्न करेन. तू इथे कुठे राहतेस?

" मी तुमच्या जवळच मीना बाजार मध्ये बेडस्पेस वर राहते. ज्या स्त्रिया नोकरीसाठी इथे येतात त्या सुरुवातीला अशाच राहतात. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर रेंटने फ्लॅट घेतात."

"तुझ्या फ्लॅटमध्ये किती मुली आहेत. किती गर्दीत तू राहतेस."

"आम्ही बारा जणी एका फ्लॅटमध्ये राहतो."

"बापरे! तू लगेच जाणार आहेस की अजून व्हीसा आहे तोपर्यंत राहणार आहेस. तसं असेल तर माझ्या मित्राचा फ्लॅट माझ्याच बिल्डिंगमध्ये आहे तिथे मी तुझी सोय करू शकतो."

"नोकरी नाही मिळत इथे राहून तरी काय करू. मी माझं फ्लाईट तिकीट प्रीपोन करून एक दोन दिवसात जाईन परत."

"मनाली माझ्या बोलण्याचा नक्की विचार कर. तुला असं नाही वाटत का नियतीने म्हणूनच आपली भेट घडवून आणली. सर्व नशिबाचे फेरे असतात गं. माझ्यावर विश्वास ठेव मी तुला कायम सुखात ठेवेन. " दोघेही तिथून निघाले. सुमीत तिथून निघताना 'किसी नजर को तेरा इंतजार आज भी है' हे गाणं गुणगुणत होता.

मनालीच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. तिला कळत नव्हतं की आपण काय निर्णय घ्यावा. पूर्वीचे प्रेम आठवून एक मन सुमितकडे धाव घेत होतं. तर दुसरं मन म्हणत होतं आपल्या आई-बाबांना, सासू-सासर्‍यांना काय वाटेल. मिहीर या सगळ्याकडे कोणत्या नजरेने बघेल. तो सुमितला आपला बाबा म्हणून स्वीकारू शकेल का. त्याच्या बालमनावर विपरीत परिणाम तर होणार नाही ना.

ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी मनाली भारतामध्ये परतली. ती घरी आल्याबरोबर मिहीर तिला बिलगला.

"आई तू इतके दिवस बाहेर जाऊ नकोस मी तुला खूप मिस करतो."

त्याच्या या बोलण्याने तिच्यातल्या आईला गहिवरून आलं. त्याला कवटाळून ती बोलली,

" नाही रे राजा मी आता कुठे जाणार नाही. आता आपण कायम एकत्रच राहायचं." दुबईहून आल्यापासून मनाली कायम विचारात हरवलेली दिसायची. ते पाहून तिच्या सासूबाईंनी एकदा तिला विचारलं सुद्धा परंतु तेव्हा ती काही बोलली नाही. नंतर ती सासूबाईंना सांगून दोन दिवस आईकडे राहायला गेली. तिथे गेल्यावर ती आईच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडू लागली. आईने तिच्या पाठीवर हात फिरवून तिला शांत केलं आणि म्हणाली,

"मनाली काय झाले तू अशी का रडतेस. जे काही असेल ते सगळं मोकळेपणाने सांग बाळा." मनालीने दुबईला सुमित कसा भेटला ते सांगायचे टाळून बाकी सगळं आईला आणि बाबांना सांगितलं. त्याने तिला लग्नाचं विचारल्याचं सुद्धा सांगितलं. हे ऐकून आई-बाबांना खूप आनंद झाला. बाबा तिला म्हणाले,

"पोरी हे सगळं विधीलिखित असतं ग. यातच सर्वांचं हित असावं. तू सुमितच्या प्रस्तावाचा स्वीकार कर. तुझ्या बाबतीतला आमचासुद्धा सल सुद्धा थोड्या प्रमाणात कमी होईल. आम्ही तुझ्या घरी येऊन श्रीरंग आणि श्रीकला वाहिनींशी सगळं सविस्तर बोलू. एकच लक्षात ठेव की तू काहीही चुकीचं करत नाहीयेस." खरंतर मंदारचं अकस्मात निधन झाल्यानंतर मनालीच्या आई-बाबांनी आणि तिच्या सासू-सासऱ्यांनी तिला परोपरीने समजावून सांगितलं होतं की तुझं खूप मोठं आयुष्य तुझ्या समोर आहे. आम्ही तुला किती दिवस पुरणार. मिहीरला मोठं करण्यासाठी तुला एका खंबीर आधाराची गरज आहे. तू पुन्हा लग्न कर आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा बघू. फक्त तू हो म्हण. पण तिने सर्वांना स्पष्ट नकार दिला होता.

सुमित भेटल्यापासून मनालीच्या मनात पण त्याच्याशी लग्न करण्याचे विचार घोळत होते. तो मिहीरला आपलं म्हणेल त्याबद्दल तिला खात्री होती. आता मिहीरच्या मनाचा कौल घेणं आवश्यक होतं. काही दिवसानंतर मनालीचे आई बाबा तिच्या सासरी येऊन दुबईला जे घडलं ते त्यांनी सविस्तरपणे सांगितले. त्यांनाही सुमितच्या प्रस्तावात काही वावगं वाटलं नाही. त्यांनी मनालीला बाहेर बोलावलं आणि म्हणाले,

"मनाली तुझ्या आई-बाबांनी आम्हाला सर्व सांगितले
आहे आणि यात गैर काहीच नाहीये. तुझ्या आयुष्यात तुला हक्काचा आधार मिळाला की आम्हाला सर्वांना खूपच आनंद होईल. अर्थात सर्वस्वी निर्णय तुलाच घ्यायचा आहे. मिहीरला आपण सगळे समजावून सांगू." हे ऐकून आई-बाबांचा गैरसमज होऊ नये म्हणून मनाली बोलली,

"सुमितबद्दल मी मंदारला लग्नाआधीच सांगितलं होतं. तरी मनाचा मोठेपणा दाखवून त्याने माझ्याशी लग्न केलं होतं."

नंतर सुमित मुंबईत आल्यावर मनालीच्या आणि मंदारच्या आईबाबांनी त्याला बोलावून घेतलं आणि मोठ्या मनाने सुमित आणि मनालीच्या लग्नाला परवानगी दिली. मनालीचे बाबा त्याला म्हणाले,

"सुमित त्यावेळी तुमच्या प्रेमाचा स्वीकार मी केला नाही त्याबद्दल तू मला माफ कर पण मी शब्दबंधनात अडकलो होतो."

"नाही बाबा तुम्ही माफी मागू नका. एका वडिलांच्या भूमिकेतून तुम्ही योग्य तेच केलं. त्यावेळी जे शाश्वत वाटलं त्याचा तुम्ही स्वीकार केलात." मनाली सुमितला म्हणाली,

"मला तुझ्याशी थोडं बोलायचंय थोडा वेळ आतमध्ये ये ना. सुमित मला तुझ्याकडून वचन हवे की काहीही झाले तरी तू मिहीरला कधीच अंतर देणार नाहीस."

"अगं वेडी आहेस का मिहीर जसा तुझा मुलगा आहे तसा आता तो माझा सुद्धा मुलगाच आहे. माझं पूर्ण प्रेम त्याला मिळावं म्हणून आपण आपलं दोघांचं मूल नाही होऊ
द्यायचं."

"काय बोलू मी. देवाने दोन्ही वेळा माझ्या पदरात शंभर नंबरी सोन्याचे दान घातलं आहे. नियतीने पुन्हा एकदा तुझी आणि माझी भेट घालून दिली आहे."

"मनाली आपलं प्रेम खरं आहे. खरं सांगतो मला अविवाहित राहण्याचा कधीच पश्चाताप झाला नाही. मी जेव्हा पण कधी एकटा असायचो तेव्हा तुझ्या आठवणी काढून मनातल्या मनात तुझ्याशी बोलायचो. तुझ्या प्रीतीची आस माझ्या अंतरात कायमच होती. आज मी खूप आनंदात आहे."

समाप्त



🎭 Series Post

View all