Login

तुझ्यासाठी कायपण - भाग ७

It's Love Story


तुझ्यासाठी कायपण - भाग ७
विषय=प्रेमकथा

"हॅलो, डॉक्टर राघव तुम्हीच बोलतं आहात का? अहो कालपासून माझी पोरगी तापाने फणफणली होती. मी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, पण नवऱ्याने तुमच्या उपचारांची कमाल सांगितली. माझी पिल्लू एकदम ठणठणीत बरी झालीय...तुमचे खूप खूप आभार डॉक्टर साहेब."

"अहो मी तर माझं कर्तव्य केलं, मला नाही बघवत लहान मुल इतकं आजारी असलं माझ्यासमोर तर."

राघव बोलत होता, तेव्हढ्यात तिथे एक मुलगी आली.

"एक्स्क्यूज मी, डॉक्टर राघव तुम्हीच का?
"हो मीच डॉक्टर राघव, बोला." राघव फोन ठेवत म्हणाला.
"मी राधिका कारखानीस, नुकतीच जॉईन झालेय या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशीप पूर्ण करण्यासाठी. मला जाधव सरांनी तुमच्या अंडर काम करायला सांगितलं आहे."
"ओह छान, अभिनंदन पहिल्या इंटर्नशिपसाठी." म्हणत राघवने हॅन्डशेक केलं.

कळत नाहीये ना काय सुरु आहे इथे? हा डॉक्टर राघव कोण आला मध्येच, श्यामा आणि किसनाचं काय झालं?

अहो हा राघव म्हणजेच आपला किसना, नाव बदलून दुसऱ्या गावात एका हॉस्पिटलमध्ये काम करतोय. जेणेकरुन श्यामा त्याला शोधत कधीच इकडे येऊ शकणार नाही.

श्यामाने किसनाला खूप शोधलं पण तिला तो कुठेच सापडला नाही. राधिकाने मात्र त्याच्यावर बारीक नजर ठेवली होती, त्यामुळे तिला माहीत होतं तो कुठं आहे. आज राधिका त्याच्याच सोबत काम करतेय हॉस्पिटलमध्ये.

श्यामाला किसनाशिवाय जगणं खूप अवघड होऊन बसलं होतं. किसनाला सुद्धा श्यामाची रोज खूप आठवण यायची, त्यामुळे तो स्वतःला हॉस्पिटलमध्ये खूप व्यस्त करुन घ्यायचा. म्हणजे रात्री उशिरा हॉस्पिटलमधून रुमवर जाऊन जेवण करुन लगेच झोपता येईल. असं केल्याने श्यामाचा विचार करण्यासाठी त्याच्या मेंदूला आणि मनाला पुरेसा वेळ भेटतच नव्हता. आता राधिका त्याच्या आयुष्यात आल्यामुळे तिला सतत कामांमध्ये मार्गदर्शन करणे, तिला सगळी मदत करणे, दुपारी तिच्यासोबत जेवणाला सोबत बसणे आणि डॉक्टर राघव उशिरापर्यंत थांबतात म्हटल्यावर राधिकासुद्धा उशिरापर्यंत थांबत होती. ती राघवसोबतच निघायची राघव तिला वाटेत ड्रॉप करायचा आणि मग तो पुढे जायचा.

कसं आहे ना, काही गोष्टींची सवय व्हायला हवी. सवय छान जडली की त्या गोष्टींवर किंवा त्या व्यक्तीवर माणूस आपोआप आकर्षित होतो किंवा प्रेम करु लागतो. राधिकाचा पण हाच उद्देश होता. रोज राघवसोबत मिळेल तेवढा वेळ घालवणे हेच तिने मनोमन ठरवलं होतं. राघव कधीच त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी तिच्याशी बोलत नव्हता. असंच एकदा राघवचा वाढदिवस होता. राधिकाला ठाऊक होतं. राघवला सरप्राईज द्यावं या उद्देशाने ती त्याच्या रुमवर रात्री बारा वाजता केक घेऊन गेली. तिचं हे सरप्राईज बघून राघवला खूप आनंद झाला आणि त्याला भारावून सुद्धा आलं नकळत तो तिला बिलगला आणि रडू लागला. राधिकाने त्याच्या रडण्यामागील कारण विचारलं, तेव्हा राघवने त्याच्या भूतकाळाबद्दल सांगितले. त्याने सांगितलं की, "अशीच माझी एक प्रेयसी होती, जी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला असं छानसं सरप्राईज देत होती. आज अचानकपणे तिची आठवण आली."
राधिकाने तिच्याबद्दल अजून विचारपूस केली, राघवने तिला सगळं सांगितलं. राधिका बोलली, "राघव सर तुम्ही असं रडू नका, मी आहे ना तुमच्यासोबत, मला हक्काने तुमची मैत्रीण समजून सगळं शेअर करत रहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या दुःखात भागीदार मिळेल आणि भूतकाळ विसरायला सोप्पं जाईल."

त्यादिवसानंतर राधिका राघवशी जास्तच जवळीक साधू लागली. कामाव्यतिरिक त्याला कॉफी शॉपला,लॉंग ड्राईव्हला,डिनरला घेऊन जाऊ लागली. राघव मध्ये आजारी पडला, त्याचं जवळचं कोणीच नव्हतं त्या गावी त्याची काळजी घ्यायला. त्यादिवशी राधिकाने हॉस्पिटलमधील सगळी कामं सांभाळून घेतली आणि त्याला भेटायला त्याच्या रुमवर गेली. त्याला खायला सूप बनवलं ,त्याची देखभाल केली. राघवला आता राधिका आवडू लागली होती आणि त्यालाही वाटायचं की ही सतत सोबत असावी. तो सुद्धा तिला वेळातवेळ काढून दोघांच्या नात्याला अजूनच घट्ट करण्यासाठी प्रयत्न करू लागला.

अखेर तो दिवस उजाडला. राघवने राधिकाला सहजच बाहेर फिरायला नेलं. भंडारदरा येथे दरवर्षी काजवा महोत्सव असतो. निसर्गाच्या सानिध्यात रात्रीच्या गच्च काळोखात हजारो काजवे त्यांच्या प्रकाशाने सगळा परिसर उजळून टाकतात. राघवने राधिकाच्या डोळ्याला पट्टी बांधून त्या जंगलात नेलं आणि तिच्या डोळ्यावरील पट्टी काढली. इतकं सुरेख विलोभनीय दृश्य पाहून राधिकाला खूप भारी वाटलं. आनंदाच्या भरात तिने राघवला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या गालावर किस केलं. नंतर तिलाच तिचं वाईट वाटलं म्हणून ती सॉरी देखील बोलली, पण त्यावेळी राघवने गुडघ्यावर बसून तिचा एक हात हातात घेऊन तिला जवळच असलेल्या रातराणीच्या फुलांचा गुच्छ देऊन,
"मी तुझ्यावर प्रेम करु लागलोय. मला तुझा सहवास सतत हवाहवासा वाटतोय, लग्न करशील माझ्याशी, साथ देशील आयुष्यभर?" असं बोलून तिला प्रपोज केलं. राधिका नाही म्हणूच शकणार नव्हती, कारण हेच तर तिला हवं होतं.

मन चिंब झालं जणू,
हळूवार गुंग झालं जणू...
गालावर जणू उतरली गं चांदनी
आकाशीचं चांदण पसरलं अंगणी…!

नकळत झुरणं आठवात रमणं
काहीच नसूनही सारंकाही असणं..

सोबतीत वाटे तुझ्या खरंखुरं जगणं
रोज रोज दिसावं हे साधभोळं हसणं...

बघता बघता दोघांनी काही सहकाऱ्यांच्या साक्षीने कोर्ट मॅरेज केलं आणि दोघे सोबतच राहू लागले. राधिकासाठी राघव आणि राघवसाठी राधिका असं फक्त दोघांचं विश्व झालं होतं.

काय वाटतंय तुम्हाला "तुझ्यासाठी कायपण" या वाक्याला राधिका खरी उतरली आहे ना, शेवटी तिने किसनाला मिळवलंच ना? पण अजून एक भाग बाकी आहे.
आगे आगे देखो होता है क्या?...

क्रमश: