तुझ्याविना मी अधुरा!
(टीम: मिळून साऱ्याजणी)
" प्रियांका माझा रुमाल कुठेय? माझे सॉक्स?
एक काम धड करत नाहीस. नुसती मेंगळटासारखी रहातेस. बाकीच्या बायका बघ कशा झटपट कामं आवरतात, टिपटॉप रहातात..." प्रशांतची नॉनस्टॉप बडबड चालू होती.
प्रियांकाने प्रशांतला रुमाल, डबा.. सगळं आणून दिलं. आज तिच्या लेकाच्या.. कैवल्यच्या शाळेत फॅन्सीड्रेस कॉम्पिटिशन होती. परिसरातल्या झाडांची पानं आणून तिने कैवल्यसाठी आदिमानवाचा ड्रेस शिवला होता.
सकाळी त्या तयारीत प्रशांतला सगळं हातात देण्यास प्रियांकाला अमंळ उशीरच झाला. प्रशांतने नेहमीप्रमाणे तिच्यावर तोंडसुख घेतलं.
------------
प्रियांकाने कैवल्यला उठवलं. त्याला अंघोळ घातली. जम्माडी जंमत सांगत भाजीपोळीचा रोल भरवला. मग त्याला आदिमानवाची वल्कलं घातली.
कैवल्यला मम्माने शिवलेला हिरव्यागार पानांचा ड्रेस खूपच आवडला. त्याने डोळे मोठे करत,बोटांचा मोर नाचवून दाखवला तसा प्रियांकाने लेकाचा गालगुच्चा घेतला.
"हे गं काय मम्मुडी. मोठा झालोय नं मी. मोठ्या माणसांची पापी घ्यायची नसते. बघ नीट बघ. मिशीपण आलेय मला. दिसली तुला?"
"अय्या हो की. मी पाहिलंच नव्हतं." प्रियांका भोळेपणाचा आव आणत म्हणाली.
"आबांना सेल्फी काढून पाठवतो मग ते झुम करुन बघतील आणि खूष होतील आणि मग आज्जीपण खूष होईल नि म्हणेल माझं गोडुलं ते. ए पण मम्मा, कधी येणार आज्जीआबा? मला खूप खूप बोलायचंय त्यांच्याशी. तिखट भाजी खाऊन दाखवायचीय. टिचकी मारता येते मला. मी शिकवणार आबांना. मला त्या सखीने शिकवली. ती नै का आमच्या आधीच्या स्टॉपवर उतरते तिने..ग्रे कलरचे डोळेवाली..डॉलसारखी दिसते ना!"
प्रियांकाला लेकाच्या बडबडीचं कौतुकमिश्रित हसू आलं.
"उगाचच हसतेस. तू पण ना मम्मुडी..चम्मुडी. माझ्या झाडांना पाणी घाल. आज रेड रोज फुललंय. बाप्पाला रेड कलर आवडतो ना!"
"हो खूप आवडतो बरं."
प्रियांकाने पुन्हा एकदा तिने केलेल्या कैवल्यच्या तयारीवर नजर फिरवली. मग दोघांचा क्युट सेल्फी काढला आणि फ्रेंड्सना शेअर केला.
"मी आलो की कमेंट्स दाखव हं मला." कैवल्य म्हणाला.
प्रियांका कैवल्यला शाळेत सोडायला गेली. शाळेत जणू जत्राच भरली होती. एवढासा भटजी, झाशीची राणी,जिजाऊ, बालशिवाजी,आंबेडकर,गांधीजी,सैनिक.. कित्ती गोड दिसत होती मुलं! नेहमीच्या अभ्यासाच्या धबडग्यातून जरा निवांत झालेली..हसतखिदळत होती. लक्ष्मीबाई पदर सावरत होत्या.
छोट्या भटजींना जोराची एकी लागलेली..त्याची मम्मा त्याला वॉशरुमच्या दिशेने घेऊन जात होती. प्रियांका मनात म्हणाली.."लवकर जा भटजीकाका. नाहीतर धोतरात..तिचं तिलाच हसू आलं. एक क्षण वाटलं छे! बीएड शिकले असते तर या मुलांत रमता आलं असतं.. आत्ताही येईल तसं पण प्रशांत थोडीच ऐकणार! तिला सकाळचा प्रसंग आठवला नि तिच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं. तितक्यात विठ्ठलच जणू कमरेवर हात घेऊन हसतहसत तिच्यासमोर उभा.
"आंटी मुझको पहेचाना?"
"नहीं तो।"
"अरे यार! मैं दिलवर!"
पंजाबी दिलवर..वरती केसांचा चंबू आणि बाकीचा विठ्ठलाचा पेहराव करुन उभा होता.
"देखो नं भाभी..इसको गुरु गोबिंद सिंग बनाने वाली थी मै। पर इसको विठ्ठलही बननेका है। आखिर बाजूवाले आज्जीने सब तय्यारी करके दी। देखोना..कुछ कमी तो नहीं रहीं ना।"
प्रियांकाने दिलवरच्या गालावर कडाकडा बोटं मोडली न् म्हणाली,"बडा सोणा दिख रहा है पुत्तर। युनिटी इन डायव्हरसिटी..एकदम युनिक कंसेप्ट. दिलवरची मम्मा हे ऐकून खूष झाली. शाळेचं गेट उघडलं तसे विठ्ठल नि आदिमानव हातातहात घालून आत घुसले. लुगड्याचा बोंगा सांभाळत जिजाऊ अंमळ उशिराच आत गेल्या.
---------
प्रियांकाने ताटात वरणभात वाढून घेतला. सोबत आईने पाठवलेलं तिळकूट घेतलं. ती घास घेणार इतक्यात वहिनीचा फोन आला,"हेलो ताई,आईचं हर्नियाचं ऑपरेशन सांगितलयं. माझं तर ऑडीट जवळ आलंय मला क्षणाचीही फुरसत नाही. डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन लवकरात लवकर केलं पाहिजे. ताई, तुम्ही घरीच असता. काही तरी अॅडजस्ट करा ना. कैवू आठवडाभर इथून शाळेत जाईल."
" बरं तू नको काळजी करुस. मी यांना विचारुन सांगते. आता काय करतेय आई?"
"झोपल्यात त्या, गोळी घेतली ना, त्याने डोळा लागला जरा. आज मी रजा घेतली, काय करणार!"
-----------
प्रियांकाने फोन ठेवला. ताटातल्या थंड झालेल्या वरणभाताचा घास तोंडात घातला. तो घशाखाली काही जाईना. तोंडातल्या तोंडात फिरु लागला. चिमटीत तिळकुट घेवून जीभेच्या अग्रावर ठेवताच आ SS ई असा हूंदका आला तिला. डोळ्यातलं पाणी झरझर गालावर ओघळू लागलं.
ताट बाजूला ठेवून प्रियांकाने पोटभर रडून घेतलं. घरातली धुणीभांडी आवरली. तोंड स्वच्छ धुतलं. केसांवरुन कंगवा फिरवला नी कैवल्यला आणायला गेली.
दमून आल्याने कैवल्य जरासं दूध पिऊन चटकन झोपला.
रात्री प्रशांत आला तोच करवादू लागला, "लाईट्स का नाही लावलेत अजून? कुठल्या जगात वावरते कुणास ठाऊक!"
प्रशांत फ्रेश होईस्तोवर प्रियांकाने टोमॅटो सूप गरम केलं व त्याला दिलं. कैवल्य तूपात रोस्ट केलेला ब्रेड हातात धरून भूम..भूम करत गाडी फिरवत होता.
जेवण वगैरे आवरल्यावर प्रियांकाने प्रशांतला वहिनीच्या फोनबद्दल व आईच्या आजारपणाबद्दल सांगितलं.
"आहे ना त्यांचा लेक तो बघेल. आपण हवं असल्यास रविवारी जाऊन येवू किंवा तू शनिवारी जा कैवल्यला घेऊन. रविवारी संध्याकाळपर्यंत ये मात्र परत. इथलं स्वैंपाकपाणी कोण करणार! जा झोप आत्ता. मला एका प्रेझेंटेशनची तयारी करायची आहे. रिकामा नाही मी तुझ्यासारखा. डोक्यात हजार विचार असतात माझ्या. तुझं आपलं बरंय."
----------
बेडवर कैवल्य निजला होता,दोन्ही हात वर करुन. प्रियांकाने आईला फोन लावला.
"आई,बरी आहेस ना!"
"हो गं बाळा. गोळ्या घेतल्या..डॉक्टरकडे जाऊन आले. आत्ता बरं वाटतय...अगदी फ्रेश.
"माझा नातू काय करतोय?"
"सगळे बरे आहेत गं आई."
"पियू, तू माझी काळजी करु नकोस. तुझ्या तब्येतीला जप. जावईबापूना विचारलय म्हणून सांग."
पियू मोबाइलवर आईचे,भावाचे फोटो स्क्रोल करीत राहिली. बालपण डोळ्यासमोर फेर धरुन नाचू लागलं..तुपसाखरपोळी भरवणारी आई, येताजाता खोड्या काढणारा दादा,माहेराचं अंगण, गिरक्या,फुगड्या..सुरात गायलेली गाणी आणि त्या सुरांतच तिचा डोळा लागला.
---------
सकाळी सहाच्या दरम्यान दारावरची बेल वाजली. एवढ्या सकाळी कोण आलं असेल..या विचारांतच प्रियांकाने मोकळे सोडलेले केस लगबगीने बांधले आणि हॉलमधे येऊन दरवाजा उघडला.
"जीजी,दादा अहो फोन तरी करायचात!" दारावर उभे असलेल्या सासूसासऱ्यांच्या हातातलं सामान आत घेत ती म्हणाली.
"असूदेत गं। स्टेशनवर इतक्या रिक्षा आहेत ओळखीच्या. तुमची साखरझोप कशास मोडायची! वर्षाने आलो ना गं. रिक्षातनं डोळे सगळ्या जागा चाचपत होते."
प्रियांका दादांचं ओघवतं बोलणं ऐकत राहिली. इतक्यात जीजी म्हणाली,"असं ओ काय म्हणता..गेल्या महिन्यात तर हिच्या भावाच्या लग्नाला आलो होतो. यावर प्रियांका व प्रशांत दोघे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले..कावरेबावरे झाले कारण प्रियांकाच्या दादाचं लग्न होऊन आत्ता दोन वर्षं उलटली होती. दादा विषय सावरत म्हणाले,"हो की, तू जा बरं न्हाऊन ये आणि कडी लावू नकोस बरं. थांब..मी तुझे बेगेतले कपडे काढून देतो."
इतक्यात प्रियांकाने कपाटातून जीजींचे कपडे काढले..पंचा व कपडे मोरीत सळीवर टांगून ठेवले. तिला जीजींची चालही थोडी संथच वाटली.
-----------
जीजी आत गेल्यावर दादा; लेकाला व सुनेला म्हणाले,"हे असं चाललंय बघा. सहाएक महिने झाले. स्मृतीभ्रंशाचा आजार जडलाय. कुकर लावला तर तो जळून गेला तरी ध्यान नसतं. कधीकधी तर नेहमीच्या ओळखीच्या माणसांनाही ओळखत नाही. मध्यंतरी शेजारच्या आळीतल्या सुशांतने हिला साद घातली..कुठे बरं..हां वाचनालयात. पण हिने अनोळखी चेहरा करत विचारलं, आपण पुर्वी भेटलोय का? मला आठवत नाही." मी कशीबशी वेळ मारुन न्हेली. असंच आणखी दोघातिघा नातेवाईकांशी झालं..म्हणतील काय..बुढी सटीया गई है..नैतर म्हातारचळ वगैरे. डॉक्टरांना दाखवलं..औषधगोळ्या चालू आहेत पण डॉक्टर म्हणतात..अल्झायमर आहे हा..बरा होत नाही. नियंत्रणात ठेवू शकतो फक्त. वयानुसार होतं म्हणतात साठीच्या पुढे..एकांतात रहाणाऱ्यांना लवकर पछाडतो हा आजार."
--------
"दादा,एकट्याने सोसलात. एका शब्दाने कळवलं नाहीत." प्रियांका काकुळतीला येत म्हणाली.
"अगं पियू हे चालायचंच. वयं झाली आमची आत्ता. अशा कुरबुरी होणारच. मेंदूचंही डेप्रिशिएशन होतं बरं. तुम्हांला कळवलं असतं पण प्रशांतच्या डोक्याला आधीच ऑफिसचा ताण असतो,प्रमोशनची परीक्षाही होती.. त्यात तू इतकी हळवी..तुला सांगितलं तर तू विचार करत बसणार..गाडी चालवतेस..म्हंटलं नको ती रिस्क नको."
"बरं आत्ता जाण्याचं नाव काढू नका हं दादा. या व्यापात तब्येतीचा तोळामासा झालाय तुमच्या."
"मासे आण गं आज, बरेच दिवस खाल्ले नाहीत. ते ऑनलाइन मिळतात म्हणे तसे मागव. उगीच मासळीबाजारात जाऊ नकोस."
"हो दादा,भरलं पापलेट करते आज. आवडतं नं तुम्हाला आणि जीजीसाठी करलीचा सार करते."असं म्हणत प्रियांकाने दादांच्या हाती चहाचा कप दिला तसा कैवल्य आबांच्याच कपातला चहा हवा म्हणून त्यांच्यासमोर जाऊन बसला.
जीजी टेरेसमधे गेल्या. तुळस मंजिऱ्यांनी छान फुलारली होती. बटशेवंतीचे झुपके हिरव्यागार पानांत उठून दिसत होते. ग्रीलवर चढवलेल्या क्रुष्णकमळाच्या वेलावर जांभळी फुलं उमलली होती. जीजीचा जीव त्या पानाफुलांत रमला. तिला अंमळ बरं वाटलं. समाधानाच्या रेषा तिच्या चेहऱ्यावर उमटल्या ज्या पाहून प्रियांकाला तिच्या बागकामाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.
जीजींच्या हाताला धरुन प्रियांका त्यांना आत घेवून आली. त्यांना दूध व उपमा दिला. दुपारी सगळ्यांनी मिळून मासळीभाताचा समाचार घेतला.
दादांनी प्रियांकाला आई कशी आहे विचारताच प्रियांकाचा चेहरा झरकन उतरला. तिने आईचं ऑपरेशन करायचं आहे वगैरे सांगितलं. दादा म्हणाले तू निश्चिंत मनाने जा आईकडे. आईचं ऑपरेशन झालं की थोडे दिवस रहा तिच्यासोबत."
"अहो पण दादा इथलं काय?.. तुमचं जेवण, तुमची काळजी कोण घेणार..मी नसले म्हणजे!"
ते बघता येईल गं.. आता तुझी तिथे जास्ती गरज आहे. स्वतःकडे बघ. काय अवस्था करुन घेतली आहेस स्वत:ची! अडचणीच्या वेळी परकीसुद्धा धावून जातात. तू तर पोटची लेक आहेस ग त्यांची.
दादांनी प्रशांतला प्रियांका व कैवल्यची रवानगी तिच्या माहेरी करण्यास भाग पाडलं.
-----
दादांना स्वत: वॉशिंग मशिनला कपडे लावताना पाहून प्रशांत पुढे आला व ते काम करु लागला. सकाळचा केरही काढू लागला. दादा चहा उत्तम बनवायचे पण आता भाजी, पोळ्या,आमटीभात झक्कास बनवू लागले होते.
आमटी भाताचा भुरका मारत प्रशांतने म्हंटलं," व्वा दादा व्वा, अहो एखादी सुगरण तोंडात बोटं घालेल एवढी झक्कास आमटी!" कसं आणि कधी शिकलात? मी तर तुम्हाला, कधी चहाचा कप उचलून ठेवतानादेखील पाहिलं नव्हतं.
इतक्यात जीजींच्या हातातला भात सांडला. बाजुला असलेला तांब्याही कलंडला. प्रशांतच्या कपाळावर नकळत आठी उमटली.
दादा जीजीसमोर बसले व तिला भरवू लागले. प्रशांतला जरा लाजल्यासारखं झालं.
दादा जीजीला घास भरवत म्हणाले,"अरे लाजतोस कसला! पतीपत्नी हे नातं क्षणाचं. आम्ही दोघं कितीतरी नात्यांत बांधले गेलो आहोत. जीजीने माझी आईसारखीच काळजी घेतली. बहिणीसारखी माया केली माझ्यावर, आणि या वयात पुन्हा लहान होऊन लेकीचं सुख अनुभवू देतेय मला. मुलगी नाही नं मला. आत्ता हीच माझी कन्या." असं म्हणत दादांनी जीजीच्या तोंडाला लागलेली भाताची शितं काढली. तिला पाणी पाजलं.
जीजी निजली तसे दादा म्हणाले,"आयुष्यभर तिरसट वागलो रे हिच्याशी. घरात बसूनच तर असतेस! करतेस काय! झोपून असतेस....कित्ती बोलायचो मी जीजीला पण त्यामुळेच जीजीने हळूहळू स्वतःला मिटून घेतलं. फुल कोमेजतं तसं कोमेजत गेली बिचारी. मी सांडासारखा उधळत राहिलो. माझ्या कर्तेपणाची नशा चढलेली मला..पण आत्ता साक्षात्कार झालाय मला. आत्ता जाणवतंय मला,हिच्याविना माझं आयुष्य म्हणजे निव्वळ वाळलेला पातेरा आहे.
प्रशांत, मी शुश्रूषा करणार तुझ्या आईची. माझा स्वार्थ आहे यात. मला सोबत हवी हिची. पत्नीविना पुरुषाचं आयुष्य निरर्थक असतं रे. बायको गेली की नवरा पोरका होतो..पुरुषार्थ गळून पडतो त्याचा." दादांनी डोळ्याच्या कडांवरून ओघळणारी आसवं बोटांनी टिपण्याचा प्रयत्न केला.
----------
प्रशांत दादांचा मित्रच बनला होता. त्यांच्या हाताखाली स्वयंपाक शिकत होता. जीजींशी लहानपणीच्या गुजगोष्टी करायचा. तिच्या मांडीवर डोकं टेकायचा. तिला जुने फोटो दाखवून त्या त्यावेळी घडलेल्या संवादांबद्दल दादांशी,तिच्याशी बोलायचा. आई तनाने जवळ असुनही मनाने कोसो दूर गेलेली त्याला मुळीच चालणार नव्हती. तसा तो आईबद्दल लहानपणापासनं पझेसिव्ह होता.
नाशकातल्या घराची देखभाल करण्यासाठी दादा त्याचा विरोध पत्करून तिथे रहात होते.
---------
डॉक्टर टूरवर गेल्याने प्रशांतच्या सासूबाईचं ऑपरेशन जरा उशिराच झालं. प्रशांतने सासरवाडीला जाऊन सासूची विचारपूस केली. निघताना ठराविक रक्कम प्रियांकाचा भाऊ नाही म्हणत असतानाही त्याच्या हातात कोंबली. प्रियांकाला नवऱ्याचा कोण अभिमान वाटला.
----------
"काय रे पियू काय म्हणते!" प्रशांत आला तसं दादांनी विचारलं.
"बरी आहे. चार दिवसात येते म्हणत होती."
" मग.. तू काय सांगितलस?"
मी म्हटलं, "तुझ्या आईला तुझी जास्त गरज आहे. महिनाभर रहा आणि येताना आईंना सोबत घेवून ये. हवाबदलासाठी."
अरेवा!! हे बाकी छान काम केलंस. जीजीच्या चंदेरी केसांची वेणी घालत दादा म्हणाले.
"दादा पण तुम्हाला, कळलंच नाही का हो. जीजीचं दुखणं!"
"अरे तुला ठाऊक आहे नं, कसला तिरसिंगराव होतो मी! अगदी मागच्या ग्रिष्मापर्यंत बरं का.
रिटायर्ड झालो म्हणून मित्रांसोबत फिरायला जायचो. पत्ते कुटायचो येवून जेवलो की परत कॅरम, बुद्धिबळ."
" मग चांगलच की खेळ हवेतच खेळायला."
" हो रे पण जीजीकडे दुर्लक्ष केलं मी. आदल्या दिवशीची घटना तिला आठवायची नाही. कधीकधी गॅस तसाच चालू ठेवून दुस-या कामात गर्क व्हायची. मी मग जाम चिडायचो हिच्यावर पण त्याने झालं विपरीत.. ही आणखी खचत चालली.
एकदा तर बाजारात गेली दोन तास झाले हिचा पत्ताच नाही. शेजारच्या विघ्नेशच्या बाईकवर बसून अख्खा बाजार फिरलो. सप्तशृंगी देवळाच्या पायऱ्यांवर बसली होती.
साधी परकराची नाडीही अर्धाअर्धा तास हातात पकडून बसते. गाठ मारायला जमत नाही. प्रशांत ऐक माझं, मी पूर्वीपासून हिचं मन, हिची तब्येत जपली असती तर... असो पण तू मात्र आतापासूनच जप प्रियांकाला. एकट्यानं जगणं भयाण असतं लेका. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे बदल कर तुझ्यात. मीही बदलतोच आहे. बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे."
प्रशांतने तज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली व जीजीला घेऊन गेला. जीजी ट्रीटमेंटला उत्तम प्रतिसाद देऊ लागली. प्रियांकाच्या वहिनीला डेंग्यू झाल्याने तिचं माहेरपण आणिक दिडमहिनाभर लांबलं.
-------------
कैवल्य व आईला घेऊन प्रियांका आली. जीजीने विहिणबाई़ना विचारलं," कशा अहात बरं वाटतंय ना!" शिवाय कैवल्यचे पटापटा मुके घेतले. जीजींत होत असलेली सुधारणा पाहून पियूचे डोळे चकाकले.
रात्री प्रियांकाने प्रशांतला जीजीतल्या सुधारणेचं गमक विचारलं तेव्हा तो म्हणाला ," डॉ. आहुजा नामक अनुभवी डॉक्टरांची ट्रिटमेंट सुरु केली आहे. शिवाय बाजूच्या पेंडसे आजी तिला योगवर्गाला घेऊन जातात."
सकाळी दादा, जीजीचा हात हातात धरुन तिला फिरवून आणतात थोडक्यात सुबह का भुला शाम को घर वापस आया है़।"
प्रियांकाला जवळ घेत प्रशांत तिच्या गालावर तर्जनी फिरवत म्हणाला,"मी मात्र यातून धडा शिकलो. माझ्या बायकोला मुळीच त्रास देणार नाही."
"खरंच!"
"अगदी अगदी खरं!" म्हणत प्रशांतने पियूला घट्ट मिठीत घेतलं.
" माझं एक मागणं पुरं कराल? मला बीएड करु द्याल."
" अशी कशी गं तू! तुला सोन्यानाण्याची भूक नाही..विद्येची भूक. शिक तुला हवं तेवढं," पियूच्या कपाळावर ओठ टेकत प्रशांत म्हणाला.
प्रशांतच्या उबदार मिठीत पियू स्वप्नात गेली.. जिथे ती शिक्षिका होती व तिच्या आजूबाजूला फुलांसारखी गोजिरी मुलं बागडत होती.
समाप्त
अक्षता कुरडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा