Login

2 स्टेटस भाग १

Love Story Of A Couple From Different States
"मॉम , माझ्या एका कलिगला तुला भेटायचे आहे.." कवलजीत आपल्या आईला परमिंदरला सांगत होती. 
" का ग? काही खास गोष्ट आहे का?"
" हो मॉम, मला माहीत आहे.." कवलजीत भाऊ सुखविंदर मध्ये बोलला..
" तुमचे काय चालू आहे?" कवलजीतच्या वडिलांनी दिलजीतने विचारले..
" ओके.. इट्स बेटर टू गिव्ह यु आयडिया.. मॉम, डॅड मला माझ्या ऑफिसमधला श्रेयस आवडतो.. त्यालाही मी आवडते. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे.." कवलजीतने पटकन बोलून घेतले..
" श्रेयस? पंजाबी आहे ?" डॅडने विचारले..
" नो डॅड..महाराष्ट्रीयन आहे. पण तो खूप चांगला आहे. मी गेले चार वर्ष ओळखते त्याला.. आणि आम्हाला लग्न करायचे आहे.."
" हे बघ, कवल लव्हमॅरेजच्या आम्ही विरूद्ध नाही. पण थोडा विचार कर ना. आपले सण वेगळे, त्यांचे वेगळे , त्यांची भाषा , स्वयंपाक दिसते तसे नसते बाळा." आई कवलजीतला समजावत म्हणाली.( त्यांचे संभाषण पंजाबीमध्ये सुरू आहे.. पण इथे मराठीत लिहिले आहे.)
" म्हणजे तुम्ही नाही म्हणणार?" कवलजीतने रडायची तयारी केली..
" ना बेटा, बघ तुझी तयारी असेल तर आमचे काय? पण नंतर रडू नकोस, मला का समजावले नाही म्हणून.. आणि मला सांग ते नॉनव्हेज खातात का?" बाबा तिची समजूत काढत म्हणाले..
"नाही , तो ब्राह्मण आहे.."
" मग खूप विचार कर.. तुला तर नॉनव्हेजशिवाय चालत नाही.."
"मी प्रेमासाठी त्याग करायला तयार आहे.."
" ले सून, खाने में प्याज कम हो तो नही चलती और कह रही है नॉनव्हेज छोडेगी..." आईने कवलला सुनावले..
" ठिक आहे, आधी मुलाला भेटू. तो जर चांगला वाटला तरच पुढे बघू. ओके?"
" चंगा.. पापाजी तू सी ग्रेट हो.." कवल वडिलांना मिठी मारत म्हणाली.
" चल फिल्मी.."
 
हि आहेत आपल्या कथेतील पात्र, 
कवलजीत आणि श्रेयस. एकाच ऑफिसमध्ये काम करणारी जोडी.. आधी ओळख, नंतर प्रेम आणि आता दोघांनाही चढायची आहे लग्नाची पायरी. पण अडचण आहे कि दोघेही आहेत दोन टोकांवर.. बघू यांच्या घरातले होकार देतात का? त्यांचे लग्न होते का?

" आई, माझ्या एका सहकाऱ्याला तुला भेटायचे आहे.." श्रेयस आईला शोभाला सांगत होता..
" का रे , असे अचानक?"
" सहकारी तो आहे कि ती?" श्रेयसच्या भावाने सुमितने विचारले.
" तू गप रे.." श्रेयसने सुमितला झापले.
" अजिबात नाही.. आई अग रात्री उशिरापर्यंत चॅटिंग चाललेले असते.. माझा अभ्यासही होत नाही आणि झोपही.."
" काय रे श्रेयस?" शोभाने प्रेमाने विचारले..
"काय आज स्वयंपाकघरातच सभा भरलेली दिसते आहे.." श्रेयसच्या वडिलांनी सुरेशने विचारले..
" हो, अहो, श्रेयसच्या कोणा सहकाऱ्याला घरी भेटायला यायचे आहे. तेच सांगत होता तो."
" येऊ दे कि.. घरी येण्यासाठी परवानगी कधी पासून या घरात लागायला लागली?"
" बरं मी आणतो लवकरच तिला..." श्रेयस पटकन बोलून गेला..
" ती??? कोण आहे ती?" शोभा आणि सुरेशने एकदम विचारले..
" मी बोललो होतो ना.. " सुमित म्हणाला..
" सांगतो.. आमच्याच ऑफिसमधली कवलजीत आहे. खूप चांगली आहे. मला खूप आवडते. मला तिच्याशी लग्न करायचे आहे.."
" कवलजीत म्हणजे पंजाबी??" बाबांनी विचारले..
" म्हणजे ते , ते हि खातात?" आईचा प्रश्न .
" आई, या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत.. तुम्ही आधी तिला भेटा तर खरे.. मग ठरवा.."
" तुमचे आधीच ठरले आहे मग आता कशाला हि नाटके?"
" असं ग काय बोलतेस आई? तसे असते तर विचारले असते का मी तुम्हाला..?" श्रेयस नाराज होत म्हणाला..
" हे बघा, आधी आपण मुलगी बघू, मग कोणताही निर्णय घेऊ.." बाबा विषय संपवत म्हणाले..


श्रेयस आणि कवलजीत या दोघांचीही कुटुंबे गुडी गुडी , प्रेमळ अशी आहेत.. कवलजीतचे वडील दिलजीत यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे तसेच एक, दोन दुकानेही आहेत. त्यामुळे त्यांचे राहणीमान थोडे उच्चभ्रू थोडे छानछोकीचे . अनेक वर्ष महाराष्ट्रात राहिल्यामुळे मराठी छान समजते आणि थोडेफार बोलता हि येते.. तिची आई गृहिणी.. तर मोठा भाऊ वडिलांना मदत करत होता. तो हि हिच्या लग्नाची वाट पहात होता, कारण त्याशिवाय त्याला लग्न करता येत नव्हते. 
    श्रेयसचे कुटुंब हे उच्चवर्णीय सुशिक्षित कुटुंब आहे. आई शोभा हि शाळेत शिक्षिका आहे. वडिल सरकारी अधिकारी आहेत.. त्यामुळे घरात लक्ष्मी आणि सरस्वती दोघी पाणी भरत आहेत.. धाकटा भाऊ सुमित इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. आता बघूया हि गुडी गुडी , प्रेमळ माणसे नंतरही तशीच राहतात का?


   " श्रेयस, मी बोलले फायनली माझ्या घरी.."
" मी पण सांगितले, माझ्या घरी. हुश्श.. कसले बरे वाटतंय.. सो तू कधी येतेस घरी?"
" मी? ना आधी तू ये माझ्या घरी.. नंतर मी.."
" ओके.. कधी येऊ?"
" रविवारी?"
" डन.. आता झोप.. आणि झोपेत मलाच बघ.."
" चल.. बाय.. "कवलने हसत फोन ठेवला..

     ठरल्याप्रमाणे श्रेयस कवलजीतच्या घरी गेला. ती त्याची वाटच पहात होती.. " किती उशीर केलास.. कधीची वाट पाहते आहे.."
" ए बाई, आधीच मी टेन्स आहे.. आता अजून काही बोलू नकोस. "
" टेन्शन कशाला घेतोस? माझे मॉम आणि डॅड खूप चांगले आहेत.. " 
" ते तुझ्यासाठी.. माझे काय?"
" कवल, अरे बेटा, बाहेरच बोलत राहणार कि आतही येणार?" कवलच्या आईने ओरडून विचारले..
" आले आई" तिनेही त्याच सुरात सांगितले.. श्रेयसच्या डोळ्यासमोर त्याचे आणि त्याच्या आईचे बोलणे आले.. एवढ्या हळू आवाजात कि बाहेरच्या माणसाला ऐकूच येणार नाही.. यांचा आवाज आईसाठी लाऊडस्पीकर सारखाच आहे.. तो स्वतःशीच हसला. त्याला असे हसताना पाहून कवलने त्याला कोपराने मारले.." असा काय वेड्यासारखा हसतो आहेस? मॉम, डॅड बघत आहेत तुझ्याकडे.." 
" काही नाही, एक जोक आठवला.. चल आत जाऊ.."




पुढच्या भागात पाहू कवलच्या घरच्यांना श्रेयस आवडतो का?

कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
 दादर मुंबई

🎭 Series Post

View all