त्या चांदराती.भाग -१

त्या चांदराती घडलेले रहस्य उलगडेल काय?
त्या चांदराती.
भाग -१


बाहेर पसरलेला काळाकुट्ट अंधार. चांदण्यांनी सजलेले आकाश आणि हळूहळू वर सरकणारा पौर्णिमेचा चंद्र. वर्षानुवर्षे तिथे उभ्या असलेल्या विशाल चिंचेच्या झाडाआडून खाली उतरत असलेल्या चंद्रकिरणांनी काळ्याकुट्ट अंधाराला पळवून लावण्याचा केलेला असफल प्रयत्न. त्या अंधारात उठून दिसणारा एक पडका वाडा आणि वाड्यात असलेले तिचे ते सावज.

‘सप सप सप..’

मध्यरात्रीच्या निरव शांततेला भंग करणारा आवाज.

धारदार शस्त्राने ती तिच्या सावजावर वार करत होती. वेदनेने तळमळणारे शरीर, वाराने होणारा तो आक्रोश आणि तिच्या चेहऱ्यावर उडणाऱ्या रक्ताच्या चिरकांड्या.

चेहऱ्यावर उडलेला रक्ताचा थेंब हळूहळू खाली ओघळत तिच्या ओठावर आला आणि जीभ बाहेर काढून तिने त्याला अलगद टिपून घेतले.

त्या थेंबाच्या चवीने एक अघोरी आनंद तिच्या चेहऱ्यावर उमटला आणि तिचे हात पुन्हा वार करू लागले.. सप सप सप!


“..अंतराऽऽ अगं टोमॅटोला आणखी किती बारीक चिरशील? फोडणीत अजिबात दिसणारच नाहीत गं आणि तुला ठाऊक नाही म्हणून सांगते, तुझ्या नवरोबाला ना उपम्यात टोमॅटो दिसायला हवा बरं. नाहीतर तो थैमान घालतो हं.” कल्पनेत हरवलेल्या अंतराला वास्तवात आणत उज्वला म्हणजे तिच्या सासूबाई म्हणाल्या.


“आई, अहो माझ्या ध्यानातच आले नाही. सॉरी हं. मी दुसरा टोमॅटो चिरायला घेते.” गोंधळून अंतरा दुसरा टमाटर घ्यायला गेली आणि त्या गोंधळात हातातील चाकू तिच्या बोटावर चालला.


“स्सऽऽ आई गं.”


“अगं कशी गं वेंधळी तू? केवढं रक्त आलंय. तू बाजूला हो बाई, मी चिरते.” तिच्या हातातील चाकू घेऊन उज्वलाताई कामाला लागल्या.


“आई, एवढं काही नाही झालंय. मी करते की.” बोट पाण्याखाली घेत ती बोलत असताना आंघोळीला निघालेला जयेश स्वयंपाकघरात डोकावला.


“काय झालंय?”


“तुझ्या बायकोने बोट कापून घेतलाय. बघ तरी आणि कुठली क्रीम लावून दे त्यावर.” उज्वलाताई.


“बघू, कुठे कापलेय ते?” अंतराचा हात हातात घेत त्याने त्या बोटाकडे पाहिले. रक्ताचा एक टपोरा थेंब त्यावर जमा झाला होता. ते बघताच त्याने बोट ओठात घेतले.


“अहो काय करताय?” सासूसमोर त्याच्या अश्या वागण्याने अंतराचा चेहरा लाजेने लाल झाला.


“थोडासा रोमान्स करतोय तर करू दे की. तसाही तुम्हाला फारसा वेळ कुठे मिळालाय? लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी या गधड्याने ऑफिस जॉईन केले आणि आता सुट्टी नाहीये म्हणून तुमचा हनिमून महिनाभर लांबणीवर पडलाय.” खुद्द उज्वलाताईच अश्या म्हणाल्या ते ऐकून अंतरा गोरीमोरी झाली.


“आईऽऽ”


“संसारातल्या अश्या छोट्या छोट्या गोष्टींनीच नवराबायकोतील प्रेम वाढते गं. हे क्षण पुरेपूर अनुभवा. तोवर मी हॉलमध्ये थांबते आणि हो, थोडे उपम्याकडे देखील लक्ष असू द्या.” अंतराकडे हसरा कटाक्ष टाकून उज्वलाताई बाहेर निघून गेल्या आणि अंतराने तिचा चेहरा झाकून घेतला.


“किती गं ते लाजणे
जणू नभी फुललेय चांदणे.”

तिच्या कमरेभोवती हातांचा विळखा घालत जयेश कानात कुजबुजला.


“जयऽऽ”


“उफ्फ! तुझा हा कातिल आवाज.”


“काहीतरीच. जा ना.”


“आता आईनेच परवानगी दिलीय ना? तरी का नाही म्हणतेस?” तिच्या ओठाजवळ ओठ नेत तो म्हणाला.


“कारण साहेबांना ऑफिसला उशीर होतोय आणि माझ्यामुळे त्यांना उशीर झालेला मला चालणार नाही. जा बघू तुमचे आवरून घ्या.” त्याच्या ओठावर एक हात ठेवून तिने दुसऱ्या हाताने त्याला लाडिकपणे स्वयंपाकघरातून बाहेर काढले.


“व्हेरी अनरोमँटिक बायको.” तिच्याकडे खोट्या रागाने बघत तो बाथरूमकडे पाय आपटत निघाला.


“थँक यू हं.”


खुदकन हसून ती परत गॅसच्या ओट्याजवळ आली. ओटा आवरताना तिने चाकू उचलला आणि कापलेल्या बोटावरून अलगद फिरवला. टप, टप,टप.. त्यातून रक्त खाली पडू लागले आणि तिच्या ओठावर एक गूढ हसू उमटले.

_______


“बाय, येतो मी. आई येतो गं.”


“हो, नीट जा रे आणि दुपारी बायकोला फोन कर हं.” जयेश ऑफिसला निघाला तसे अंतराच्या मनातील ओळखून उज्वलाताई म्हणाल्या.


“काय गं अंतरा तू? आजकालच्या मुली कश्या धीट असतात आणि तू आपली लाजरी? तो तुझा नवरा आहे गं. त्याच्यावर हक्काने प्रेम दाखवायचे ना?” जयेश गेल्याच्या दिशेने टक लावून पाहत असलेल्या अंतराला त्या म्हणाल्या आणि लाजून अंतरा त्यांच्या कुशीत शिरली.


“आई, तुम्ही ना खरंच माझ्या सासू नाहीत तर आईच आहात हो. किती प्रेमळ आहात.”


“हो, हो. लाजाळूचं झाड. फक्त माझ्यासाठी लवकर एक छोटं खेळणं आणून द्या म्हणजे मी तुमच्या राजा राणीच्या संसारातून मोकळी होईन.” उज्वलाताई हसून म्हणाल्या तसे ‘ईश्श’ म्हणत अंतराने चेहरा झाकून घेतला.


“मी खरंच बोलतेय गं अंतरा. आपल्या घराण्यात ना आजवर दर पिढीत केवळ एकमेव वारस जन्माला आलाय. जयेशच्या पिढीच्या वारसाला मी माझ्या अंगाखांद्यावर खेळवावे एवढीच माझी इच्छा आहे. ती मला पूरी करू देशील ना गं?” बोलता बोलता उज्वलाताईंच्या डोळ्यात पाणी तरळले.


“आई, मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीय.” त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून अंतराला भरून आले.


“हो ना? मला माहिती होतं. माझी सून माझा शब्द खाली पाडणार नाही याची खात्रीच होती बघ. ही साडी घे.” अचानक त्यांच्या स्वरात आनंद झळकू लागला.


“साडी?”

“ही शगुणाची साडी गं. उद्या आणि परवा दोन दिवसासाठी तुम्ही दोघं आपल्या गावाला जा. आपल्या वाड्यात आपली कुलदेवता आहे. ही नवी साडी नेसून तिची ओटी भरून जोडीने पूजा करा. तिच्या आशीर्वादाने तुमच्या सांसारिक जीवनाला सुरुवात करा.”


“कुलदेवता?”


“हो अगं. मी आधी बोलले नव्हते कारण जयला हे देव-देव नाही गं आवडत. पण माझी श्रद्धा आहे आणि तू ती पूरी करशील हा विश्वासदेखील. त्याला आपल्या वाड्यावर घेऊन जाशील ना गं?” त्यांच्या डोळ्यात अर्जव होते.
______


“जय, मी कशी दिसतेय?” रात्री झोपताना नवी साडी नेसून दाखवत अंतराने विचारले.


“ही साडी?”


“ही साडी आईंनी दिलीय. उद्या सकाळी तू आणि मी आपल्या गावाकडील कुलदैवताची पूजा करायला जाणार आहोत.”


“गावाकडे?” तिच्या बोलणं ऐकताच त्याच्या अंगावर काटा उभा राहिला.


“हो. का? काय झालं?”


“अंतरा, आपण तिथे नको जायला.”


“का पण?”


“मी म्हणतोय ना म्हणून.”


“जय, मी आईंना शब्द दिलाय आणि मला तो मोडायचा नाहीये.” अंगाला गुंडाळलेली साडी काढत ती फणकऱ्याने म्हणाली.


“तिथे गेल्यावर अनर्थ होईल गं राणी. ऐक माझं.” तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत तो.


“काही होत नाहीये. उगाच बहाणे करू नकोस आणि मला तर अजिबात स्पर्श करू नकोस. देवीची पूजा केल्याशिवाय आपण त्या अर्थाने जवळ यायचं नाही हे आईंनी मला ठणकावून सांगितलेय.” तिने गाल फुगवून म्हटले तसा तो आणखी जवळ सरकला.


“ठीक आहे राणी सरकार. तुम्ही म्हणताय तर मी गावाला यायला तयार आहे, खुश?”


“खरंच? ओह! आय लव्ह यू जय.”


“लव्ह यू टू अंतरा. तू खूप गोड आहेस.” तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो बाहेर झोपायला गेला. कुलदेवतेच्या दर्शनाशिवाय दोघांना जवळ येता येणार नाही असा उज्वला ताईंनी नियम घातला होता ना.


हॉलमध्ये सोफ्यावर पडल्या पडल्या तो गावाचा विचार करत होता. त्या वाड्यात त्याला जाणवणाऱ्या नकारात्मक संवेदना.. अंतराला हे सारे कसे सांगायचे याच्या विचारात तो होता तर इकडे अंतरा गावातील त्यांच्या वाड्यात जायच्या स्वप्नरंजनात गुंतली होती.


काय घडले होते नेमके वाड्यात? कसल्या नकारात्मक संवेदना जयेशला जाणवत होत्या? कळण्यासाठी वाचा पुढील भाग.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

_______


🎭 Series Post

View all