त्या चांदराती.भाग -२

त्या चांदराती घडलेले रहस्य उलगडेल काय?
त्या चांदराती.
भाग -२

“जय, कसलं सॉलिड वाटतंय ना? गावाकडची बातच न्यारी असते रे. लहानपणापासून मी काँक्रीटच्या जंगलात वाढलेय त्यामुळे फार ओढ लागलीय. आपले गाव, आपला वाडा.. किती भारी ना?”

कारमधून बाहेरचे जग न्याहाळत असलेली अंतरा आनंदाने बोलत होती. जयेशला तिने गावाला जायला मनवले होते आणि आता दोघे प्रवासाला निघाले होते.


“हम्म. बरं तर वाटतंय पण वाड्यात पोहचल्यावर तुझे मत बदलू नकोस हं. तिथे आपल्या शहरासारखं कुलर, एसी वगैरे मिळणार नाहीये आणि ना ही स्वयंपाकाला गॅस आणि शेगडी. दोन दिवस तुला चुलीवर सारं करायला लागेल.”


“चालेल रे. एखाद्या वेळेस एवढं तर चालतंय.” ती हसून म्हणाली.


“चालेल तेव्हा चालेल. आता मात्र रात्रीचे आपण बाहेरून जेवून जाऊया. तिथे वाड्यावर गेलो की आवराआवरीलाच वेळ जाईल. मग स्वयंपाक केव्हा करणार आहेस?”

गाव तासाभराच्या अंतरावर असताना त्याने कार एका चांगल्या हॉटेलकडे वळवली. तसे त्याचे म्हणणे तिला पटले होते त्यामुळे तिनेही काही आढेवेढे घेतले नाही. जेवण करून ते हॉटेलमधून निघाले तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते.


महादवाडी.. रात्री दहाच्या दरम्यान जयेशची कार गावात शिरली. गाव तसे साधेच होते. अंधाराची छाया पडताच त्यात ते गुडूप झाले होते. अंतरा मात्र उत्साहाने भारली होती. कधी वाड्यावर जाते आणि कधी त्या वास्तूला भेटते अशी तिची गत झाली.


ते पोहचले तेव्हा अंधार चांगलाच गडद झाला होता. वाड्याबाहेरच्या भल्यामोठ्या चिंचेच्या झाडाखाली जयेशने कार थांबवली. उत्सुकतेने अंतरा बाहेर येत चौफेर बघत होती. त्या अंधारातही तिला तो भव्य वाडा काहीसा स्पष्ट दिसत होता. जणूकाही तिच्याच येण्याची वाट बघत होता.


‘कर्रऽऽ’

मोबाईलच्या प्रकाशात कुलूप उघडून दरवाजा उघडताच वाड्याच्या जुनाट दाराचा आवाज झाला.


“इथे कुणीच राहत नाहीत का रे?” आत येताच तिचा प्रश्न.


“अगं, एक काका असतात. ते काळजी घेतात वाड्याची. पण महिना झालाय, ते त्यांच्या लेकाकडे गेले आहेत. त्यामुळे सध्या वाड्याची ही दुर्दशा झालीय.”


“नो प्रॉब्लेम, अंतरा आहे ना? तेव्हा फिकर नॉट. ती सगळं नीट आवरेल.” दोघांच्या बॅगा आत घेत ती.

वाडा तसा सुव्यस्थित होता. फक्त महिनाभर कोणी नसल्याने धूळ आणि जळमटे जमा झाली होती. हाती झाडू घेऊन तिने भराभर तिथल्या दोन खोल्या, स्वयंपाकघर आणि समोरचे मोठे मोठी हॉलवजा बैठकघर झाडून काढले. तासाभराच्या आवराआवरीनंतर वाडा वापरण्यायोग्य तयार झाला.


“राणी सरकार, खूप कामं केलीत. आत बाथरूम आहे, तू तुझी आंघोळ वगैरे उरकून घे. तोवर मी झोपण्याची व्यवस्था करतो.”


“ठीक आहे पण तुला माहिती आहे ना, की आपल्याला वेगवेगळं झोपायचं आहे. जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत..”


“हो गं. जोवर वाड्यातील देवतेची पूजा होणार तोवर या देवीचे संपूर्ण दर्शन करता येणार नाही, हे सगळं मला अगदी तोंडपाठ आहे. जा तू आवर.” तो म्हणाला तसे हसून अंतरा फ्रेश व्हायला गेली.


अंगात उत्साह असला तरी आता थोडा थकवा आला होता. दिवसभराचा प्रवास, त्यानंतर इथली आवराआवर. कधी बेडवर अंग टेकवते असे तिला झाले होते. झोपायला म्हणून ती बेडवर पडली खरी; पण मग तिला कालचे जयेशसोबत झालेले बोलणे आठवले. कसल्या तरी नकारात्मक संवेदनेबद्दल तो बोलत होता.


“जय, झोपलास का?” ती खोलीतून उठून बाहेर हॉलमध्ये आली.

खाली जमिनीवर अंथरलेल्या गादीवर पांघरून घेऊन जय झोपला होता. सहसा इतक्या लवकर तो झोपत नसे; पण थकव्यामुळे झोपला असावा असे वाटून काही न बोलता ती तिथून जायला निघाली.


“अन्.. अंतराऽऽ..”

तिच्या खोलीच्या दाराजवळ ती पोहचली होती की तिच्या कानावर एक थरथरणारा आवाज आला.

“कोण?”

ती झटक्याने मागे वळली. झिरो लाईटच्या मंद प्रकाशात तिने पाहिले तर तिथे कोणीच नव्हते.


“अंतराऽऽ”

ती वळली तशी पुन्हा कानावर हाक आली. एक बारीक स्वर. कानोसा घेतल्यावर जयेश झोपलाय तिथूनच आवाज येतोय हे तिच्या लक्षात आले.


“जयऽऽ” ती पटकन त्याच्याजवळ येऊन ठेपली.

पांघरूणाच्या आतून होणारी हालचाल आणि पुसटसा आवाज तिला पुन्हा जाणवला.


“जय, काय होतेय? तू मला आवाज दिलाय का?”
त्याच्या अंगावरचे पांघरूण बाजूला करत तिने विचारले.

“अंतरा..”

पुन्हा तीच हाक आणि जयेशच्या ओठांची हळूवार झालेली हालचाल. डोळे मात्र मिटलेले.


“जय.” तिने घाबरून त्याला हात लावला आणि त्या स्पर्शाने तिच्या अंगावर सर्रकन काटा उमटला.


त्याचे शरीर थंडगार पडले होते. जणू काही बर्फच. थंडीने अंग कुडकूडत होते. चेहरा पांढूरका दिसत होता आणि निळसर पडत आलेल्या ओठातून बारीक स्वरात एकच साद ऐकू येत होती.. अंतरा!


“जय, काय झालेय? तू बरा आहेस ना?” त्याची अशी अवस्था बघून ती पुरती घाबरून गेली.

त्याचा काहीच प्रतिसाद नाही हे बघून तिने त्याच्या दोन्ही हातांना आपल्या हाताने घासून ऊब देण्याचा प्रयत्न करु लागली.


“जय, जय काय होतंय तुला? डोळे उघड ना रे.”


तो काही बोलत नाही हे बघून त्याला कसेबसे उभे करत ती बेडरूममध्ये घेऊन जात त्याला बेडवर झोपवले. तिथे होत्या नव्हत्या सर्व चादरी त्याला पांघरून दिल्या आणि त्याचा हात हातात घेऊन तो चोळत तिने तिथेच बेडला डोके टेकून डोळे मिटून घेतले.


“अंतराऽऽ”

काही वेळ गेला असेल, परत तिच्या नावाचा गजर कानावर ऐकू येऊ लागला. तिने दचकून जयेशकडे पाहिले. यावेळी तो अगदी गाढ झोपला होता. तिला ऐकू आलेली ही साद त्याने घातली नव्हती हे स्पष्ट होते.


“अंतराऽऽ” पुन्हा एकदा दबक्या स्वरातील साद आणि जोडीला दार ठोकल्याचा आवाज.


ठक ठक!

नुकताच डोळा लागलेल्या तिला त्या थापेने लागलीच जाग आली. कान टवकारून तिने अंदाज घेतला. कोणीतरी बाहेरून दार ठोठावत होते.

इतक्या रात्री तो आवाज ऐकून भीतीची एक थंड लहर तिला स्पर्शून गेली. तिथे गूढ असे काहीतरी जाणवत होते त्यामुळे अंतरा घाबरली होती.

“कोण आहे?” हातात मोबाईल घेऊन ती भीतभितच हॉलमध्ये आली.

“मी आहे. दार उघडतेस ना?” काहीसा ओळखीचा आणि तरीही अनोळखी वाटणारा तो आवाज होता.


मन नाही म्हणत असतानाही तिचे पाय मात्र तिला दाराकडे ओढत होते. यंत्रवत ती समोर सरकत होती. भीतीने गारठली असली तरी हात मात्र दार उघडायला पुढे सरसावले.

‘कर्र..’

दाराचा पुन्हा तोच भीतीवजा आवाज आणि त्याचवेळी वीज गेल्याने झालेला अंधार!

“कोण आहे?” मोबाईलच् टॉर्चच्या उजेडात तिने बाहेर पाहिले.

बाहेर अचानक सुटलेला वारा, आकाशात चमकलेली विज आणि त्या प्रकाशात दारात अंतराला उभी दिसलेली ती!

कोण असेल ती?
वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

_______


🎭 Series Post

View all