त्या चांदराती.भाग-३

त्या चांदराती घडलेले रहस्य उलगडेल काय?
त्या चांदराती.
भाग-३


“आई? तुम्ही? तेही इतक्या रात्री?” समोर उभ्या असलेल्या उज्वलाला बघून अंतरा आश्चर्याने म्हणाली.


“हो गं. मीच. केव्हाची दार ठोठावतेय? झोपला होतात की काय? आणि आधी बाजूला हो. मला आत तरी येऊ देत. बहूतेक पावसाला सुरुवात होईल असे दिसतेय. बाहेर राहीन तर ओली होईल ना मी.” तिला बाजूला सारून स्मित करत उज्वलाताई आत आल्या.


त्या आत आल्या तशी गेलेली वीज देखील परतली. अंतरा मात्र अजूनही धक्क्यात होती.


“काय गं? जय कुठे आहे? मी नाहीये म्हणून एकत्र झोपला होतात की काय?” त्यांचा हसून प्रश्न.


“नाही आई, तसं नाही. अचानक जयला थंडी वाजायला लागली म्हणून मी त्याला आत झोपायला घेऊन गेले होते. तुम्ही फ्रेश व्हा ना. प्रवासाने थकला असाल ना?”


“आई? अचानक तू कशी आलीस?” जयेशच्या आवाजाने अंतराने वळून पाहिले. आतापर्यंत थंडीने गारठलेला तो आता अचानक ठणठणीत दिसत होता.


“यावं लागलं बाबा. मी सुनबाईला पूजेसाठी साडी दिली होती ती ते घरीच विसरली. मग विचार केला की मीच घेऊन येते. त्यात कॅलेंडर बघितलं तर कळलं की पौर्णिमा देखील आज रात्रीपासूनच सुरु होतेय आणि पूजेसाठी पहाटे अडीच ते तीनचा मुहूर्त अगदी शुभ आहे. मग काय लगेच कार काढली आणि निघाले.” उज्वलाताईंचे स्पष्टीकरण.


“पण आई, मी तर स्वतःच माझ्या बॅगेत साडी ठेवली होती. जयेशला तर काल नेसून देखील दाखवली होती, हो ना रे?” अंतरा आश्चर्याने म्हणाली.


“कुठे गं? मला साडीबद्दल काहीही ठाऊक नाहीये.”


“जय?”


“आणि काय गं? मी तर हॉलमध्ये झोपलो होतो, तर आतल्या खोलीत कसा गेलो?”


“अरे, तू थंडीने किती गारठला होतास? हातपाय बर्फासारखे गार आणि ओठ निळे पडले होते म्हणून मीच तुला आत घेऊन गेले.”


“एवढ्या गर्मीत थंडी कशी वाजेल गं? काहीही हं.” तो हसला तसे उज्वलाताई देखील हसायला लागल्या.


“जय, तुझ्या बायकोला आता तुझा विरह काही सहन होईना बघ. बरं झाले बाई मी वेळेत येऊन पोहचले. आता पुजा आटोपली की तुम्हाला जवळ यायला कुठल्या बहाण्याची गरज पडणार नाही हं.” त्यांनी हसतच बॅगेतून साडी काढून अंतराच्या हातात ठेवली.


“ही घे साडी. आंघोळ करून छान तयार हो. अगदी नव्या नवरीप्रमाणे साजशृंगार कर हो. तोवर मी माझे आवरून पूजेची तयारी करते.” त्या म्हणाल्या त्यावर मान डोलावून अंतरा आतल्या खोलीत गेली.


बाहेर काय चाललंय तिला काहीच अंदाज लागत नव्हता. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने कालच सासूबाईंनी दिलेली साडी आपल्या बॅगमध्ये ठेवली होती. जयेशला नेसूनही दाखवली होती. त्याने मात्र आता या गोष्टीला सपशेल नकार दिला होता. आत्ता आत्ता थंडीने तो किती गारठला होता; पण त्याला तेही आठवत नव्हते. हे असे अचानक तो का वागतोय तिला कळायला सोय नव्हती.


आपले म्हणणे खरे करण्यासाठी म्हणून तिने तिची बॅग बेडवर पालथी घातली तर तिलाच धक्का बसला. साडीसाठी ब्लाउज, परकर, दागिने, बांगड्या सर्व मॅचिंग वस्तू तिथे होत्या; पण साडी मात्र नव्हती. तिने किती वेळा आठवून पाहिले. साडी भरल्याचे तर तिला स्पष्ट आठवत होते आणि आता खरंच साडी तिथे नव्हती. अंतराचे डोके जड आले होते. असे कसे घडले, काहीच मेळ लागत नव्हता.


“हे गजरे! आईने खास तुझ्यासाठी आणलेत. पूजेच्या वेळी नक्की माळशील.” जयेश आत येत म्हणाला तसे ती उठून त्याच्याजवळ गेली.


“जय, मी काल तुला साडी नेसून दाखवले ते तुला खरंच आठवत नाहीये का रे?”


“नाही गं राणी, आपलं साडीबद्दल बोलणं झालंच नव्हतं गं.” तो अगदी सहजपणे म्हणाला.


“जय?”

“अंतरा, अगं कधी कधी असं होतं. आपल्याला वाटतं की ती घटना घडून गेलीये; पण ते केवळ आपल्या मनाचे खेळ असतात. त्याचा एवढा लोड घ्यायचा नसतो. कदाचित तुला मला साडी दाखवायची असेल आणि तेच तुझ्या सबकॉन्शियस माईंड मध्ये फिट झाले असेल आणि मग तुला तसे स्वप्न पडले असेल. म्हणून तुला ते घडून गेलेय असं वाटतेय, बाकी काही नाही.” तिच्या हातावरून हात फिरवत तो म्हणाला.


“जय मी वेडी झाले आहे का रे?”


“नाही गं राणी, ते फक्त एक स्वप्न होतं. जा आणि आवर आता. रात्रीचा एक वाजत आलाय. तुझ्याकडे केवळ दिड तास उरलाय.” तो.


“ही पूजा इतक्या रात्री करणे खरंच आवश्यक आहे?”


“शुभ मुहूर्तावर जर काही घडत असेल तर चांगलेच आहे ना गं? आणि आईची इच्छा आहे तर तिला नकार देवून कसे चालेल? जा आवर आता. आईचे झाले की मी माझे आवरून घेतो. पूजा झाली की मग आपल्याला एकत्र येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.” तिला एक फ्लाईंग किस देत तो बाहेर आला.


तो गेल्यावर अंतराने आपले आवरायला घेतले. मध्यरात्रीची गार पाण्याची डोक्यावरून केलेली आंघोळ, अंगावर ल्यालेली हिरवीकंच साडी, हिरव्या बांगड्या, ओलेत्या केसात माळलेले गजरे आणि अंगावर नव्या नवरीचा चढवलेला साज.

तिला सारे काही विचित्र वाटत असले तरी आरशातील स्वतःचे रूप बघून मात्र मनात गुदगुल्या होत होत्या. ही पूजा झाली की ती आणि जयेश कायमचे एकमेकांचे होणार होते. नुसत्या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारा उमटला.


“ब्युटीफूल!” आरशात स्वतःचे रूप निहारत असलेल्या अंतराला बघून जयेशने कॉम्प्लिमेंट दिले.


त्याचे तिच्याकडे नजर खिळवून बघण्याने तिने लाजून मान खाली घातली.

“हे सुंदरी, इथेच अशी लाजत राहणार आहेस की बाहेरही येणार आहेस? माझी चॉईस किती सुंदर आहे हे आईलाही एकदा बघू दे आणि आकाशातला चंद्र अस्ताला जाण्यापूर्वी आपली पूजा देखील पार पडू दे.” तिच्याकडे बघून तो मिश्किलपणे म्हणाला.


“बस, दोनच मिनिटं. तू पुढे हो. मी आलेच.” ओठावरून लिपस्टिक फिरवत ती म्हणाली.

ती बाहेर आली तेव्हा पूजेची सर्व तयारी झाली होती. एक अग्नीकुंड पेटत होते. त्याभोवती हळद आणि कुंकवाने रेघा आखल्या होत्या. लिंबू, मिरची, चार काळ्या बाहूल्या..

तिला हे सर्व विचित्र वाटले. ज्या कुलदेवतेची पूजा होती तिचीच मूर्ती कुठे दिसेना.


“जय, पूजेचा हा कुठला प्रकार आहे? आपली कुलदेवता कुठे आहे आणि आई? त्या कुठे आहेत?”
कुठलेतरी मंत्र पुटपुटत अग्नीकुंडात आहुत्या टाकत असलेल्या जयेशला तिने विचारले.


“मी इथे आहे.” उज्वलाताईंचा आवाज आला तसे तिने बाजूला पाहिले आणि ती स्तब्ध झाली. कारण तिथे
उज्वलाताई नव्हत्याच तर ती होती..

कोण होती ती? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

_______


🎭 Series Post

View all