त्या चांदराती.भाग -४

त्या चांदराती घडलेले रहस्य उलगडेल काय?
त्या चांदराती.
भाग-४

“मी इथे आहे.”

उज्वलाताईंचा आवाज आला तसे तिने बाजूला पाहिले आणि ती स्तब्ध झाली. कारण तिथे उज्वलाताई नव्हत्याच तर ती होती एक नववधूच्या वेषात असलेली सुंदर तरुणी.

अंगावर ल्यालेली हिरवी साडी आणि केलेला शृंगार.. अगदी अंतराने केला होता तसाच. साडीही तशीच. ओल्या केसात माळलेले गजरेही तेच.


“जय, ही कोण आहे?” धक्का बसल्यागत अंतरा म्हणाली.


“ही माझी बायको.. उज्वला. उजू, ये, बैस ना. पूजेचा मुहूर्त चुकायला नको.” तो त्या तरुणीकडे पाहत म्हणाला.


“हो, मी केव्हाची रेडी आहे. तुझ्या या सो काल्ड नववधूलाच वेळ लागला. अंतरा ये बाई, बैस आता.” उज्वलाने अंतराचा हात पकडला तसे तिने तो त्वेषाने झिडकारला.


“कोण आहात तुम्ही? जय हे सारे काय चाललंय?” तिचा आवाज थरथरत होता.


“श्श! त्याला डिस्टर्ब करू नकोस. मंत्र म्हणू देत. मी आहे ना? मी तुला सांगते. मी उज्वला आणि हा जयदीप म्हणजे माझा नवरा. दहा वर्षांचा आमचा संसार सुरु आहे.”


“आणि जय? आणि त्याची आई?” अंतराने तोंडावर हात ठेवला.


“अगं ते देखील आम्हीच. हा दीप आहे ना, हाच तुझा खोटा खोटा नवरा आणि मी तुझी खोटी खोटी प्रेमळ सासू. महिन्याभरापासून मेकअप करून स्वतःला म्हातारी दाखवून दाखवून थकले बाई मी. आता शेवटी पूजेच्या निमित्ताने का होईना मला माझ्या मूळ रूपात येता आले.” उज्वला.


“पण का? तुम्ही माझ्याशी असं का वागलात? मीच का? मला असं का फसवलंस? आणि ही कसली अघोरी पूजा आहे?” एक हुंदका तिने देत विचारले.


“अघोरी पूजा! अगदी बरोबर ओळखलंस. ही पूजा अघोरीच आहे. कुठल्या कुलदेवतेची नव्हे आणि म्हणूनच या पूजेचा मुहूर्त अश्या मध्यरात्रीच्या वेळी ठेवण्यात आलाय. कारण काळ्या शक्ती याच वेळेत जाग्या होतात. आणि आम्ही दिलेला बळी फळास येतो.” उज्वला बोलत होती.


“बळी? कोणाचा बळी? कशासाठी?”


“ए, खूप प्रश्न पडतात गं तुला. त्या रतीसारखीच तूही दिसतेस. तिने असे प्रश्न करून आम्हाला बेजार केले. कुणाला तरी फोन करायलाही निघाली होती. मग काय करणार? पूजा पूर्ण होण्याआधीच आम्हाला तिचा जीव घेऊन तिला गप्प करावे लागले. तुझ्यावर ही पाळी येऊ द्यायची नसेल तर गप्प बस.” उज्वला तिच्यावर ओरडत म्हणाली.


“उजू, सगळ्या विधी झाल्या आहेत. आता तिला घेऊन ये आणि तुझ्या हाताने हा शेवटचा बळी आपल्या असुराला अर्पण कर.” जयदीप खूण करत म्हणाला.


“बैस इथे आणि हात जोड.” अंतराला अग्नीकुंडाजवळ ढकलून बसवत उज्वला म्हणाली.


“दीप हिच्या डोक्याला ही भुकटी लाव.”


“आता ऐक, हा विधी, ही पूजा कशाला? हा प्रश्न तुला पडलाय ना? त्याचे उत्तर ऐक.” तिच्या कपाळी भस्म फासल्यानंतर उज्वला बोलू लागली.


“लग्नाला पाच वर्ष होऊनही आम्हाला मुल झाले नाही. डॉक्टर्स, विज्ञान, तंत्रज्ञान सारं काही केलं तरी यश आलं नाही. शेवटी एका अघोरी बाबाने आम्हाला हा उपाय सांगितला. वर्षातून एकदा येणाऱ्या जेष्ठ पौर्णिमेच्या रात्री एक बळी द्यायचा. तोही एका नवविवाहितेचा. तिच्या गर्भाशयाच्या भोगाने माझ्या गर्भाशयात नवे अंकुर रुजणार अशी ग्वाही त्यांनी दिली होती. पाच वर्षात पाच नवविवाहीतांचे बळी दिले की पुढच्या जेष्ठ पौर्णिमेला मला मातृत्वाची चाहूल लागणार होती.


सौम्या, कांचन, विद्या आणि काव्या.. आमचे चार बळी पूर्ण झाले होते. रती ही आमचे पाचवे सावज ठरणार होते. मागच्यावर्षीची पूजा सफल झाली असती ना तर या पौर्णिमेला मी आई व्हायला सज्ज झाले असते गं; पण त्या रतीने सगळा घोळ केला. पूजेला बसण्यापूर्वीच तिला आमचा संशय आला आणि ती पळून जायला निघाली.


तरीही मी तिच्या पोटावर बरोबर वार केला होता.. सप, सप, सप! रक्ताच्या उडालेल्या त्या चिरकांड्या आणि माझ्या जिभेला झालेला गरम गरम रक्ताचा तो स्पर्श.. मला वाटले सगळं संपन्न झालं. पण नाही, तिच्या गर्भशयाचे रक्त माझ्या जिभेला लागले असले तरी इकडे दीपचे विधी पूर्ण व्हायचे होते आणि त्यामुळे तिचा बळी केवळ व्यर्थ गेला होता.” रागाने दातओठ खात उज्वला म्हणाली.


“रतीचा बळी व्यर्थ गेला असला तरी आता आम्हाला तुझ्या रूपात नवा सावज मिळाला. आता पूजा झालीये, बस तुझा बळी द्यायची वेळ झालीये.” हातात सुरा घेऊन खुनशी नजरेने अंतराकडे ती पाहत होती.


“उजू, मुहूर्त आलाय. चालव तो सुरा.” जयदीपचा आदेश येताच क्रूरपणे हसून उज्वला जागेवरून उठली आणि अंतराजवळ येऊन उभी राहिली.

अंतरा कसलाही विरोध न करता संमोहित होऊन बसली होती. तिच्या माथी लावलेल्या भस्माची ती जणू जादू होती. मृत्यूला विरोध न करता हसत हसत त्याला सामोरे जायला ती तयार झाली होती.

सप सप सप..

त्या चांदराती नव्या सावजावर पुन्हा वार होणार होता. रक्ताच्या चिरकांड्या पुन्हा उडणार होत्या. एका नववधूच्या गर्भाशयातील रक्ताने पुन्हा एकदा उज्वलाची जिव्हा तृप्त होणार होती आणि तिच्या मातृत्वाचा मार्ग मोकळा होणार होणार होता.

या पूजेने उज्वलाला खरंच मातृत्व लाभणार होते का? वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

_______


🎭 Series Post

View all