त्या चांदराती.भाग -५(अंतिम भाग)

त्या चांदराती घडलेले रहस्य उलगडेल काय?
त्या चांदराती.
भाग-५(अंतिम भाग.)


त्या चांदराती नव्या सावजावर पुन्हा वार होणार होता. रक्ताच्या चिरकांड्या पुन्हा उडणार होत्या. एका नववधूच्या गर्भाशयातील रक्ताने पुन्हा एकदा उज्वलाची जिव्हा तृप्त होणार होती आणि तिच्या मातृत्वाचा मार्ग मोकळा होणार होणार होता.


‘खणऽऽ’

क्षणात तो धारदार सूरा अंतराच्या पोटावर चालण्याऐवजी बाजूला जाऊन पडला आणि त्याचा आवाज उठला, ‘खणऽऽ!’

संमोहित होऊन शांत बसलेल्या अंतराने अनपेक्षितपणे उज्वलाच्या हातावर लाथेने प्रहार गेला होता.


“मिस्टर जयदीप तुमचा खेळ खलास झालाय.”

अंतराने असे म्हणताच उज्वला चवताळून उठली आणि खाली पडलेला सुरा घेऊन तिच्या अंगावर धावून आली. त्याबरोबर जयदीपदेखील तिच्या मदतीला पुढे सरसावला.


“आमचा खेळ कोणीही खलास करणार नाही. कारण तो आम्ही सुरु केलाय. उजू, चालव तो सुरा.” अंतराचा गळा आवळून धरत तो ओरडला.

मोठ्या चालाखीने अंतराने तो वार वाचवला आणि जयदीपच्या हाताला हिसका देऊन ती जोरात ओरडली.

“घोरपडेऽऽ”

तिचा एक कडक आवाज वाड्यात घुमला आणि पुढच्याच क्षणी वाड्याचा दरवाजा पाडून चार ते पाच पोलीस आत शिरले.


“यस मॅडम.” घोरपडेसह त्याचे सहकारी तिला सॅल्यूट ठोकून उभे होते.


“महादू काका? तुम्ही?”


“महादू नाही, कॉन्स्टेबल महादेव घोरपडे. ॲक्टिंग काय तुमालाच जमते व्हय? कदीमदी आमी बी चॅन्स मारून घेतुया.” तो उज्वलाला आपल्या गावाकडच्या टोनमध्ये म्हणाला तसे त्याच्यासोबतचे सर्व हसायला लागले.

त्या बेसावध क्षणी उज्वलाने पुन्हा अंतराच्या पोटात सुरा खूपसायला घेतला तसे सावध होऊन अंतराने जोरात तिच्या कानशिलात लगावली.


“सुंभ जळला तरी पीळ गेला नाही अशी गत दिसतेय तुझी. तुझा खेळ संपलाय हे मी बोलले होते ना? घोरपडे यांना बेड्या ठोका.” अंतराच्या कडक आदेशाने घोरपडे समोर आला.


“एक मिनिट, कोण आहेस तू? आणि हे सगळे पोलीस इथे कसे?”


“या आहेत इन्स्पेक्टर अंतरा देशमुख. ज्यांनी तुम्हाला रंगेहात पकडण्यासाठी जयदीपशी लग्नाचे नाटक करून आपल्या जीवाची बाजी लावली.” घोरपडे.


“इन्स्पेक्टर अंतरा? काय बिघडवलं होतं मी तुमचं? का आमच्या आयुष्यात तुम्ही आलात? आजच्या बळीने माझे मातृत्वाचे स्वप्न पूर्ण होणार होते, का तो डाव तुम्ही उधळून लावलात?” हातात बेड्या असलेली उज्वला रडायला लागली.


“याचं कारण म्हणजे रती. जीला तुम्ही दोघांनी मागच्या वर्षी याच पौर्णिमेला ठार मारले. बेस्टी होती रे ती माझी. लहानपणापासून आम्ही एकाच अनाथाश्रमात वाढलो, एकत्र मोठे झालो. तिथून बाहेर पडल्यावर वाटा जरी वेगळ्या झाल्या असल्या तरी आमची मने एकमेकींशी जुळली होती. तिची बेस्ट फ्रेंड होते मी. तिची तारा.” हळवे होत अंतरा सांगत होती.


“मागच्यावर्षी तिच्या लग्नाबद्दल कळले तेव्हा मी ट्रेनींग पिरेडवर होते. त्यामुळे लग्नाला येऊ शकले नाही आणि लग्नाच्या तिसऱ्याच रात्र मला तिचा व्हॉइस मेसेज आला..

‘तारा.. मी फसलेय. दीपेशने मला फसवलंय. मी मृत्यूच्या दारात आहे तारा. मला वाचव..’

तिचा तो स्वर आजही माझ्या कानात गुंजतोय. माझं दुर्दैव म्हणा किंवा रतीचं दुर्दैव. ट्रेनिंग पिरेडमुळे माझा मोबाईल बंद होता त्यामुळे मला जेव्हा ते कळलं तेव्हा फार उशीर झाला होता. रतीचे शरीर अनंतात विलीन झाले होते त्यामुळे मला कसलीही ॲक्शन घेता आली नाही.”


“ओह, तो फोन ती तुला करत होती तर?” जयदीपचा प्रश्न.


“हो, कारण त्यावेळी तिला मी जास्त जवळचे वाटले असावे.”


“म्हणजे त्याही वेळी आणि आताही तुझ्यामुळे ही पूजा व्यर्थ गेली.”


“व्यर्थ काहीच जात नसतं. त्या पूजेने रतीचा नाहक बळी गेला असला तरी त्यामुळे मला सत्यापर्यंत पोहचता आलं आणि आजच्या पूजेने तर तुमचा गेम खलास झाला.अश्या अघोरी पूजा वगैरे करून, बळी देऊन मूल होते या भ्रामक कल्पना आहेत. मुळात आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?”


“म्हणजे काय म्हणायचंय तुला?”


“मी उज्वलाच्या डाक्टरांना भेटले. तुमच्या घरात असताना तुमची फाईल बघितली तेव्हा कळलं की उज्वलाला गर्भाशयच नाहीये. मग तिला बाळ कसे होईल? दुसऱ्यांच्या गर्भाशयाचे रक्त प्राशन करून तुमचा प्रश्न सुटला नसता मॅडम. उलट एखाद्या अनाथ बालकाला दत्तक घेतले असते ना तर आतापर्यंत तुम्ही एक आदर्श आईबाबा म्हणून समाजात मानाने मिरवला असता.”


“आमच्याबद्दल तुला सगळं कसं ठाऊक आहे?”


“मी पोलीस आहे हे विसरलात का? रतीच्या एका मेसेजने मी तिच्या मृत्यूचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. ठोस पुरावा असा नव्हताच. आमच्या टीमने मिळून सहा महिने तुम्हा दोघांची रेकी केली. त्यानंतर जय.. सॉरी जयेश, चुकलंच. काय नाव म्हंटलत? जयदीप? तर जयदीपच्या प्रेमात पडल्याचे नाटक केले आणि मग लग्न.


आमच्या घोरपडे दादाला देखील त्यासाठीच महादू बनवून वाड्यावर कामाला लावून घेतलं आणि हो जयदीप, तू जी माझ्या बॅगेतून साडी काढून ठेवली होतीस ना, ते मला ठाऊक होते रे. फक्त तुम्हाला काही जाणवू नये म्हणून मी नाटक करत गेले.” ती हसत उत्तरली.


“अंतरा तू फसवलंस आम्हाला. मी सोडणार नाही तुला.” हाताला हिसक्या देत उज्वला ओरडली.


“फसवलं ते मी नाही तर तुम्ही दोघांनी फसवलंत. एक किंवा दोन नव्हे तर तब्बल पाच निरपराध आणि अनाथ मुलींचे बळी घेतलेत. स्वतःच्या स्वार्थासाठी एकट्या आणि अनाथ मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करायचे आणि मग पौर्णिमेला त्यांचा बळी द्यायचा हा जो खेळ तुम्ही सुरु केला होता ना तो मी फक्त समाप्त केलाय. यातील साम्य केवळ एवढंच होतं की जे प्रेमाचे नाटक तुम्ही इतरांशी केलेत, यावेळी तेच नाटक मी तुमच्याशी केलंय. फिट्टमफाट! घोरपडे, घेऊन चला यांना.”

केसात माळलेला गजरा त्या अग्नीकुंडात फेकून अंतरा वाड्याबाहेर पडली. गाडीत बसताना तिने सहज मागे वळून पाहिले तर चिंचेच्या काळ्या सावलीत रतीसह आणखी चार आकृत्या तिच्याकडे बघून समाधानाने हात हलवत उभ्या होत्या.

-समाप्त-
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
_______


🎭 Series Post

View all