Login

त्या चेहऱ्यामागची कथा भाग - १

रात्रीच्या खिडकीत दिसलेला चेहरा सान्वीला थरकाप उडवणाऱ्या रहस्यात ओढतो. सीसीटीव्हीतून ते मेसेजपर्यंत, तो चेहरा जितका अदृश्य, तितकाच घातक ठरत जातो.
त्या चेहऱ्यामागची कथा भाग - १


रात्रीचे बारा वाजले होते. दादरच्या शांत गल्लीत असलेला सान्वीचा फ्लॅट त्या वेळी नेहमीप्रमाणे शांत होता. अभ्यास करून ती थोडी निवांत होण्यासाठी खिडकीजवळ उभी राहिली. बाहेर थंड वारा वाहत होता. रस्त्यावर एकही माणूस नव्हता.

पण त्याच क्षणी, तिच्या नजरेला खालच्या पार्किंगमधल्या सावलीत काहीतरी हलताना जाणवलं. सान्वीने भुवया जवळ केल्या.‌“कदाचित मांजर असेल…” असं म्हणत ती मागे वळणार, तोच अचानक, सावलीतून एक चेहरा स्पष्ट दिसू लागला. तो चेहरा तिच्याकडे बघत होता. अगदी स्थिर. पण सर्वात विचित्र म्हणजे, त्याच्या डोळ्यांत चमक होती, पण शरीर कुठेच दिसत नव्हतं.

सान्वीचा हृदयाचा ठोका चुकला. ती थोडी पुढे झुकली, पण चेहऱ्याची जागा अंधारातच होती. तो हलत नव्हता… पापणीही मिटत नव्हती. ती घाबरली. लगेच खिडकी मागे घेतली आणि पडदे लावले. “कदाचित भ्रम असेल…”
अशी तिला स्वतःलाच समजूत घालावी लागली.

परंतु झोप येईना. तेव्हा तिने खाली जाऊन बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डला सांगावं असं ठरवलं. परंतु पहारा देणारा गार्ड, शेख कोपऱ्यात बसून झोपलेला होता.
“शेख! ए शेख! उठ… मी आत्ता खाली काहीतरी”
गार्डने डोळे चोळत विचारलं, “काय झालं मॅडम?”
सान्वीने सगळं सांगितलं. शेख खाली गेला, सगळीकडे टॉर्च लावली. पण कुणीच दिसलं नाही.

“हे जगातलं सर्वात सेफ बिल्डिंग आहे मॅडम. सीसीटीव्ही सगळं कव्हर करतो. तुम्ही टेन्शन नका घेवू.”
पण सान्वीला झोप लागली नाही.

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्येही तिचं लक्ष लागत नव्हतं.
लायब्ररीत ती बसलेली असताना तिची बेस्ट फ्रेंड स्वरा आली. “सान्वी, चेहरा कसा होता? तू इतकी घाबरलेली दिसत होतीस.”

सान्वीने कपाळ चोळत सांगितलं, “चेहरा…अतिशय स्थिर. जणू फोटोतला असावा. पण डोळे मात्र सतत माझ्याकडे बघत होते. आणि कुठलीही हालचाल नाही!”
स्वराने हसत म्हटलं, “अरे सोड. कुणीतरी प्रँक केला असेल.” सान्वीने मान हलवली, पण तिच्या मनात शंका वाढतच होती.

त्याच रात्री पुन्हा… सान्वी लॅपटॉप बंद करून बेडवर गेली. पडदे लावले होते. पण अचानक हवा थोडी हलली आणि पडद्याचा कोपरा सरकला. तिला सहज वाटलं, खिडकी उघडी राहिली असावी… ती खिडकीकडे गेली आणि तेच,
ती थरथरली. तोच चेहरा, तीच स्थिर नजर, ह्यावेळी मात्र… अगदी खिडकीच्या समोर.

सान्वी मागे सरकली, फोन हातात घेतला. पोलिसांना कॉल करण्याचा विचार केला… तेवढ्यात चेहरा हलला.
अगदी थोडासा. सान्वीच्या शरीरात शहारं उठलं.

ती खिडकीपासून दूर झाली आणि लगेच लाइट्स बंद केल्या. अंधारात तिला थोडा दिलासा मिळाला.
ती मोबाईलच्या टॉर्चने खोली तपासत असतानाच,
तिचा फोन व्हायब्रेट झाला.
मेसेज: “Stay away from the window.”
नंबर अननोन, तिच्या हातातून फोन सुटता सुटता वाचला.
“कोण आहे हा?!” गुडघे थरथरत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सीसीटीव्ही रूममध्ये जाऊन रात्रीचं फुटेज पाहण्याची मागणी केली. सुपरवायझर थोडा हट्ट करत होता, पण तिने सांगितलं, "माझ्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे."

फुटेज प्ले झालं. रात्री 12:47 वाजता, सान्वी खिडकीजवळ उभी होती. कॅमेऱ्याचा अँगल तिच्या इमारतीच्या खालील भागाकडे होता.
“पॉज करा!” सान्वीने म्हटलं.
स्क्रीनवर दिसलं, तिच्या फ्लॅटच्या खाली कोणीच नव्हतं.
अंधार, रिकामी पार्किंग.
“शेख म्हणत होता तसंच, खाली कोणीच नाही.”
सान्वीचं डोकं गरगरलं. “मग मी काय पाहिलं?”

त्या क्षणी सुपरवायझरने दुसरं कॅमेरा फुटेज उघडलं.
त्यात पार्किंग स्पष्ट दिसत होतं.
12:48:03, काहीच नाही.
12:48:10, काहीच नाही.
12:48:11, फुटेज थोडं गडबडलं. स्क्रीन हलली.
आणि पुढच्या दोन फ्रेममध्ये, सान्वीच्या इमारतीकडे तोंड करून एक हलका चेहरा उभा होता. अगदी जसा तिला दिसला होता.
सान्वीचा श्वास अडकला आणि तिचा थरकाप उडाला.
पण… सुपरवायझर म्हणाला,
“हे कॅमेऱ्यात गडबड असू शकते. फ्रेम जंप झालाय. मला वाटतं हे तांत्रिक आहे.”
सान्वीने स्क्रीनकडे पाहत विचारलं, “कुठलीही गडबड इतकी परफेक्ट मानवी चेहरा बनवू शकते का?”
सुपरवायझर शांत. त्या क्षणी तिला कळलं, ही काही साधी घटना नाही. काहीतरी मोठं सुरू होतं.

त्या रात्री सान्वीने खिडकीकडे न पाहण्याची शपथ घेतली.
पण रात्री तीन वाजता, दरवाज्यावर तीन वेळा टकटक झाली. टक…टक…टक.
ती हळूच दरवाज्याकडे गेली. डोअर-पीपमधून बघितलं.
कोणीच नाही, पण जमिनीवर एक छोटा कागद.

सान्वीने दरवाजा उघडण्याचं धाडस नाही केलं. तीने कागद खाली ओढून घेतला. त्यावर एकच ओळ लिहिलेली होती, “I SEE YOU.”
आणि खाली त्या अज्ञात चेहऱ्यासारखं एक छोटं स्केच.
सान्वीचं हृदय थांबल्यासारखं झालं. हा चेहरा कोणाचा?
तो तिला का पाहतोय? हे सगळं गुन्हेगारीचं संकेत आहे का?‌ आणि महत्त्वाचं, हा चेहरा प्रत्यक्ष आहे की कॅमेराचं भ्रम? की कोणीतरी तिला टार्गेट करतंय?

उत्तरं कुठेच दिसत नव्हती. पण रहस्य मात्र आता अधिक खोल जात होतं…