त्या वळणावर भाग ४

त्या पत्रकाराने माणुसकी जपत अनुभवलेला थरार.
त्या वळणावर.
अंतिम भाग -4
@धनश्री भावसार बगाडे


प्रतीक तशाच्या भेदरलेल्या अवस्थेत विचार करतच त्या माणसाजवळून उठला. वॉर्डच्या बाहेर येत हॉस्पिटलच्या प्रांगणातल्या एका बाकावर बसला. त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं. हुरहूर लागल्यासारखं. अचानक भीती आणि गिल्टी वाटू लागलं होतं. त्याच्या छातीची धडधड वाढली होती आणि तो

पुन्हा विचारांमध्ये तो भूतकाळात हरवला.

त्या दिवशी त्याला एका बातमीसंदर्भात मुंबईला जावं लागलं होतं. संध्याकाळपर्यंत परत येणं अपेक्षित होतं म्हणून तो त्याची दुचाकी घेऊनंच गेला होता. पण काम लांबलं आणि त्याला निघायलाच साडेसात, आठ वाजले.

परत येताना जोरात पाऊस पडत होता. पावसाळा असल्याने त्याने रेनकोट घातला होता पण पावसाच्या जोरापुढे त्याचा फारसा उपयोग नव्हता. डोक्यावर हेल्मेट असल्याने गाडी चलवणं तेवढं शक्य होतं. जशी मुंबई सोडली तसा पाऊस ओसरला पण रिपरिप सुरूच होती.

रात्र झालेली होती. त्याला हायवे वरच्या फूडकोर्टला थांबून चहा घ्यावसा वाटला. पण निघतानाच हॉस्पिटलमधून डोक्टरांचा फोन आला होता,

त्याच्या आईची तब्येत अचानक गंभीर झाली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून आई श्वसनाच्या आजाराने ॲडमिट होती. तब्येत सतत तोळामासा होत होती. त्यामुळे त्याला टेंशन आलं होतं.

तिच्याजवळ कोणीच नव्हतं म्हणून याला आईकडे पोहचण्याचे वेध लगले होते. म्हणून त्याने चहाचा प्लॅन कॅन्सल करत लवकरात लवकर आईकडे पोहचण्याचं ठरवलं.

पाऊस आता बर्‍यापैकी ओसरल्याने त्याने गाडीचा वेग थोडा वाढवला. थोडं अंतर पुढे येत नाही तोच एका मुलीची गाडी स्लीप होऊन ती डिव्हायडरला आदळली असल्याचं त्याला दिसलं. ती जखमी अवस्थेत त्याला मदत मागतेय असं त्याला वाटलं.

तो काही क्षण तिथे थांबलाही. पण तोवर ती कदाचित बेशुद्ध झाली. प्रतीकने पोलिसांना फोन करून अपघात झाल्याचं सांगितलं आणि तो तिला तिथे तसाच सोडून निघून गेला.

'माझ्याकडे दुचाकी आहे. हिला मी हॉस्पिटलला तर नेऊ शकणार नाही. पोलिसांना फोन केलाय. तेही पोहचतीलच एवढ्यात. आई वाट बघत असेल.' असा विचार करून तो पुढे निघाला.

दुसर्‍या दिवशी त्याने पोलिस ठाण्यात त्या मुलीची चौकशी केली सुद्धा, पण पोलिस पोहोचले तेंव्हा तिचा मृत्यू झाल्याचं त्याला कळलं.

हे कळल्यावर त्याला धस्स झालं.

'आपण थांबायला हवं होतं का?' असं वाटून त्याच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली.

या गोष्टीला ५ महीने उलटून गेले होते. काळाच्या ओघात प्रतीकला याचा विसर पडला होता. पण त्या जखमी व्यक्तीने केलेल्या वर्णनाने हा सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा उभा राहिला. आणि ती दुखरी सल आधिकच वेदना देऊ लागली.

'आपण तिचे अपराधी आहोत असं त्याला वाटू लागलं. त्यावेळी तिला मदत केली नाही म्हणून तर हे सर्व घडत नाहीये ना? आपल्याला पडलेल्या स्वप्नामागे आणि या अपघातामागे हेच तर कनेक्शन नसेल ना?' अशा अनेक शंकांनी त्याचं मन भरून गेलं.

अशा व्याकूळ मनानेच तो तिथून निघाला. पुन्हा पोलिस ठाण्यात जाऊन त्या ५ महिन्यापूर्वी झालेल्या अपघातातल्या मृत मुलीचे डिटेल्स त्याने मिळवले. शिवाय त्यावेळच्या काही वृत्तपत्रातल्या बातम्या पण तपासल्या. एका बातमीत तिच्या आईची प्रतिक्रिया होती.

"माझ्या लेकीला गती मिळालेली नाही. ती भटकत आहे." यातून त्या मातेचा त्रागा व्यक्त होत होता, पण या शब्दांनी प्रतीक फारच अस्वस्थ झाला.

'त्यावेळी मी तिला मदत केली नाही, लिफ्ट मागतच तिने अखेरचा श्वास घेतला. म्हणून आता हे अपघात?
' त्याच्या ह्या विचाराला त्याने तिथेच अडवलं. आपण भलताच विचार करतोय, असं मनाला तो समजावू लागला.

या सर्व प्रकाराने त्याच्या मनाला शीण आला होता. त्याला खूप थकवा जाणवू लागला. तो त्याच मन:स्थितीत घरी आला आणि सरळ झोपी गेला. रात्री झोपेतच त्याला

'हेल्प मी, मला वाचवा' असा आवाज सारखा ऐकू येऊ लागला. तो एका मुलीचा होता. तो त्या आवाजाने खडबडून जागा झाला. हे स्वप्न असेल असं वाटून तो पुन्हा झोपला, त्याचं मन अजूनही त्या आवाजचाच वेध घेत होतं.

शेवटी तो उठला आणि त्याच भारावलेल्या अवस्थेत थेट अपघात झालेल्या ठिकाणी पोहचला. तिथलं बचाव कार्य आता बर्‍यापैकी संपत आलेलं होतं, पण अजून पूर्ण न झाल्याने त्या भागात हॅलोजनच्या मोठ्या लाईट्सचा प्रकाश होता.

तो त्या ठिकाणाच्या आसपास फिरत होता. पुन्हा त्याला तोच आवाज आला.

'हेल्प मी, मला वाचवा.'

पण आता त्याला खात्री होती की हा आवाज बाहेरून कुठून नाही तर आपल्या आतून येतोय. तेवढ्यात त्याची नजर तिकडच्या झुडपात गेली. तिथे काहीतरी आहे असं त्याला वाटलं. तो त्या दिशेने जाऊ लागला, तसं एका बचाव कार्य करणार्‍या जवानाने त्याला अडवलं.

"तिकडे कुठे जाताय? त्या झुडपात उगाच साप वगैरे काही जनावर, कीटक चावेल तुम्हाला."

पण याकडे त्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तो तिथे गेला. तसा तो ओरडतच बाहेर आला.

"ओss अहोss, कोणी आहे का? इकडे या लवकर."

त्याचा आवाज ऐकून तिथले जवान घाबरले. ते धावतच त्या झुडपात त्याच्याजवळ पोहोचले. आणि तिथलं दृश्य बघून ते पण जरा घाबरलेच.

तिथे एक तरुण मुलगी जखमी अवस्थेत बेशुद्ध पडली होती. त्या बसच्या अपघातात ही जरा लांब झुडपात फेकली गेल्याने कोणाचं तिच्याकडे लक्ष गेलं नव्हतं.

'देव तारी त्याला कोण मारी' म्हणतात तेच खरं. अपघात होऊन पूर्ण ४० तास उलटून गेले तरीही ती मुलगी जीवंत होती, पण गंभीररित्या जखमी होती.

तिच्याकडे बघून प्रतीकला त्या मृत्यू झालेल्या मुलीची आठवण झाली. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला.

'आता निदान या मुलीला तरी वाचवण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत.' असं मनाशी निश्चय करून तिथल्या लोकांच्या मदतीने त्याने तिला सरकारी रुग्णालयात भरती केलं.

दुसर्‍या दिवशी बहुतेक सगळ्याच पेपर्समध्ये याविषयीची बातमी झळकली. प्रतीक वेळोवेळी जाऊन तिच्या तब्येतीचे अपडेट्स घेत होता. साधारण अजून २ दिवसांनी तिला शुद्ध आली. तिच्या तब्येतीत नंतर हळूहळू सुधारणा होऊ लागली. जीवाचा धोका टळला होता.

त्याला हायसं वाटलं. त्या मुलीला वाचवू शकलो नाही पण हिला वाचवू शकल्याने त्याच्या त्या दुखर्‍या नसेवर फुंकर घातली गेली होती.

त्याचं सगळीकडून कौतुक होत होतं. पोलिस, बचाव कार्य करणारे कोणालाही ती मुलगी दिसली नव्हती. पण प्रतीकच तिथे कसा पोहोचला? असा प्रश्न मात्र त्याला सारखा विचारला जात होता. पण त्यालाही तो नेमकं तिथंच कसा पोहोचला? याच कोडं पडलं होतं.

त्याला ऐकू आलेला तो आवाज या मागचं खरं कारण असलं, तरी हे तो कोणालाही सांगू शकत नव्हता.

बचावकार्य पूर्ण होऊन रस्ता पूर्ववत झाल्यावर तो पुन्हा तिथे गेला. नुकताच पाऊस पडून गेला होता. लांबूनच त्याला एक धूसर आकृती आकाशात हेलकावे खात दूर दूर जात लूप्त होऊन त्या जागी इंद्रधनुची एक कमान तयार झालेली दिसली..
---------------------------------------------

त्या वळणावर -4
समाप्त

🎭 Series Post

View all