त्या वळणावर भाग १.

एका पत्रकाराच्या आयुष्यात त्याने अनुभवलेला थरार.
त्या वळणावर
भाग १.

@धनश्री भावसार बगाडे

त्या काळोखात अंधारलेल्या रस्त्यावर फुल्ल बीमवर डोळ्यात जाईल एवढा गाडीच्या लाईट्सचा प्रकाश, एकदम कर्र्कचून मारलेल्या ब्रेकचा आवाज येत धडामऽधूमऽ असा जोरात आवाज झाला. सगळीकडे किंकाळया, पळापळ, रक्ताचे पाट वाहू लागले. खिडकीतून कोणाचातरी हात बाहेर आलेला, तर कोणाचं मुंडकं.

तेवढ्यात फोनची रिंग खणाणली आणि प्रतीकला दचकून जाग आली. स्वप्नातल्या या दृश्यांनी तो पुरता घामेघूम झाला होता. त्या रिंगच्या आवाजाने तो भानावर आला आणि

'हुश्श! ते स्वप्न होतं.' म्हणत त्याने घड्याळात बघितले. घड्याळात सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळी कोणी कॉल केला असेल? या विचारात त्याने फोन हातात घेतला. तोपर्यंत रिंग बंद झाली होती.

'जाऊ दे, झोपतो परत. कसलं भयानक स्वप्न होतं ते.' म्हणतच जरा वैतागत त्याने फोन सायलेंट मोडवर करण्यासाठी हातात घेतला. स्क्रीनवर 'निकम सर, ऑफिस' असं दिसलं. तो ज्या दैनिकात काम करत होता निकम सर तिथले मुख्य बातमीदार होते.
फोन बंद करणार तोच परत रिंग वाजली. परत निकम सरांचाच कॉल होता.

'एवढ्या सकाळी काय काम आहे आता ह्यांच? पण एवढ्या लवकर सर कधी कॉल करत नाहीत. बघायला हवं.' म्हणत डोळे चोळतच त्याने फोन उचलला.

त्यानंतर सर फोनवर जे बोलले ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते की काय असं त्याला वाटलं.

"अरे प्रतीक, ते तुझ्या घराजवळ, तिकडे हायवेला पहाटे एक मोठा ॲक्सिडेंट झालाय बघं. बरेच लोक दगावलेत. जरा पळ बरं तिकडे."

सरांनी एका दमात सांगितलं.

"अहो सर पण मी अजून.."

त्याचं वाक्य पूर्ण होत नाही तोच फोन कट झाला.

'आपलं स्वप्न आणि या अपघातचा काही संबंध तर नसेल ना? आपल्याला इंट्युशन तर झालं नसेल?'

असा विचार करत त्याने टीव्ही सुरू केला.

चॅनलवर सगळीकडे त्याच अपघाताची बातमी सुरू होती. टीव्हीवरच्या दृश्यांतून तर परिस्थिती भीषण दिसत होती.

अपघातात १४ लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. हा आकडा वाढण्याची शक्यता होती. कारण एक अख्खी बसच पलटी झाली होती. प्रतीकला परत आपल्या स्वप्नाची आठवण झाली आणि अंगावर काटा आला.

‘सकाळची स्वप्नं खरी असतात म्हणे’, या विचाराने तो अजूनच अस्वस्थ झाला.

टीव्हीवर अपघाताची परिस्थिती बघताच प्रतीकची झोप उडाली. तो दहा मिनिटांत सगळं आवरून स्पॉटवर पळाला.

तिथलं सगळंच वातावरण फार अंगावर येणारं होतं. पलटी झालेली बस अजून त्याच अवस्थेत होती. सगळीकडे फुटलेल्या काचा पसरलेल्या होत्या. तिथे मदत कार्य सुरू झालं होतं. बसमध्ये अडकलेल्या दोघा तिघांना बाहेर काढण्यात आलं होतं. पण ते सुन्न अवस्थेत एका बाजूला बसले होते. पहाटे चार-साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला होता. अपघात झाल्याने मागून येणार्‍या वाहनांपैकीच कोणी तरी घटनेविषयी पोलिसांना सूचना केली होती. दोन तास पूर्ण ट्रॅफिक जॅम झाला होता, तो आता हळूहळू सुरळीत होताना दिसत होता.

प्रतीक तिथे पोहचला तसे अजून काही इतर दैनिकातले पत्रकारही तिथे पोहचले. टीव्ही, युट्यूबचे पत्रकार तर आधीच तिथे होते. त्यांच्याकडून त्याने आतापर्यंतचे अपडेट्स घेतले. तो अजून काही माहिती मिळते का बघत होता. या सगळ्या धावपळीत त्याला आपल्या स्वप्नाचा विसर पडला.

हायवेच्या त्या अपघाती ठिकाणाच्या आजूबाजूला थोडी वस्ती होती. खालच्याबाजूने सर्व्हिस रोड होता. त्यामुळे अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची पण गर्दी होतीच.

“असा कसा गाडी चालवत होता हा ड्रायव्हर? सरळ डिव्हायडर तोडून पलीकडे पलटी झाला. आत अजून कोणी जीवंत असण्याची शक्यता कमीच वाटते.”

बघ्यांपैकी एक जण उसासे टाकत म्हणाला.

“हो ना, खरंतर या जागेची शांतीच करायला हवी.”

दुसर्‍याचं हे वाक्य प्रतीकच्या कानावर पडलं. तेवढ्यात पोलिस अधिकारी आले म्हणून माहिती घ्यायला सगळे पत्रकार तिकडे पळाले.

“आतापर्यंत १४ मृत आणि ३ जखमींना बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आलं आहे. मृतांमध्ये चालकाचाही समावेश आहे. अजून मदत कार्य सुरू आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.”
अशी माहिती त्या अधिकाऱ्याने दिली.

सर्व माहिती गोळा करून प्रतीक ऑफिसला गेला. तिथे निकम सर आलेलेच होते. त्यांनी लगेच त्याला बोलावून घेत परिस्थिती विचारली.

“हे बघ, आता पर्यंतची बेसिक माहितीची बातमी मी बनवलेली आहे. ती एकदा डोळ्याखालून घाल आणि जर काही अपडेट्स असतील तर ते ॲड करून आधी डिजिटलसाठी बातमी जाऊ दे. तू तिथे जे बघितलंस त्या वातावरणाची, भीषणतेची वेगळी बातमी सोड. नंतर या अपघातचे अजून काही अँगल्स सापडताहेत का बघ? खूप मोठा अपघात आहे.”

निकम सरांनी त्याला असा सगळा कामाचा आराखडाच दिला.

त्यानुसार तोही कामाला लागला. वेगळ्या अँगल्सचा विचार करत असताना त्याला एकदम त्या माणसाचं वाक्य आठवलं,

“या जागेची शांतीच करायला हवी.”

आणि त्याला एकदम आठवलं की, त्याच जागेवर झालेला गेल्या दोन महिन्यातला हा सातवा अपघात आहे. मागच्या महिन्यात असाच एक मोठा अपघात अगदी याच जागी झाला होता. ती बस हायवेच्या पूलावरुन खाली सर्व्हिस रोडवर उलटली होती. त्यातही १८ ते २० लोकं दगावले होते. त्यानंतर दुचाकी, चारचाकी, ट्रक यांचेदेखील त्याच भागात पाच अजून अपघात झाले होते, ज्यात लोकांचा मृत्यू झाला होता.

हे सगळं आठवून त्याच्या अंगावर एकदम काटाच आला. त्याचवेळी याचा शोध घ्यायला हवा असा विचार त्याच्या डोक्यात चमकला.
------------------------------------
क्रमश:-1
त्या वळणावर

प्रतीकचं स्वप्न आणि घडलेला अपघात यांचा खरंच काही संबध असेल का?
त्या एकाच ठिकाणी सारखे अपघात का होत आहेत?
दोन महिन्यात असं काय झालं, ज्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं?
हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

🎭 Series Post

View all