त्या वळणावर भाग २

बातमीदारी करताना सतत अनुभवायला येणारे ते योगायोग.
त्या वळणावर
भाग २.
@धनश्री भावसार बगाडे

वेगळे अँगल शोधण्यासाठी तो परत अपघाताच्या स्पॉटवर गेला. पण त्याला तिथं एकटं जायचं नव्हतं. तो पत्रकार असल्याने अर्थात भूताखेतांवर त्याचा विश्वास नव्हता. पण सकाळपासून त्याच्या स्वप्नाशी साधर्म्य साधणार्‍या या योगायोगांनी कसलं तरी अनामिक दडपण त्याला मनावर जाणवत होतं.

तोवर सकाळचे अकरा, साडे अकरा वाजले होते. ऑफिसमध्ये ट्रेनी रिपोर्टर्स यायला सुरुवात झाली होती. साक्षी आणि जय त्याच्याजवळ आले.

“सर, तो आज सकाळचा अपघात तुम्ही कव्हर करताय ना? खूपच भयानक झालं ना? आम्ही काही मदत करू का तुम्हाला?"

ते प्रतीकला म्हणाले. तसा प्रतीक जरा खूश झाला.

'चला सोबत मिळाली.'

“मी स्पॉटवरच निघालोय, तुम्ही येणार का सोबत?”

असं त्याने विचारताच ते दोघे एकदम उत्साहात “हो” म्हणाले.

आपला फोकस बातमीवर कायम ठेवत इथे एखादी मस्त ‘ह्युमन इंटरेस्ट स्टोरी’ मिळेल म्हणून तिकडे पोहचल्यावर अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना तो भेटला. त्यांचा आक्रोश कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करेल असा होता.

एक आज्जी नातवाला मांडीवर घेऊन जोरजोरात रडत होत्या.

“माझं पोर जेमतेम वाचलं, पण अनाथ झालं हो! काळाने आई-बाप हिरावून नेले त्याचे.”

तिचा आक्रोश सुरू होता. त्या आवाजाच्या दिशेने प्रतीक गेला. आणि ते दृश्य बघून त्याच्या छातीत एकदम चर्र झालं.

एक साधारण दीड दोन वर्षांचा मुलगा या अपघातात वाचला होता. त्याच्या आई-वडिलांचा या अपघातात मृत्यू झाला होता. चिमुकला तेवढा नशीब बलवत्तर म्हणून वाचला होता. हे त्याचं सुदैव की दुर्दैव हे ठरवणं कठीण होतं, कारण तो अनाथ झाला होता.

त्याच्या डोक्याला जखम झाली होती. त्यातून रक्त वाहत होतं. त्याला बिचार्‍याला आपल्यासोबत काय झालं हेही कळत नव्हतं, पण दुखण्याने विव्हळत तो रडत होता. नाक वहात होतं. एरवी लहान मुलं गोंडस वाटतात पण या सर्व प्रसंगात प्रतीकला तो मुलगा केविलवाणा पण भेसूर वाटत होता. कारण असंच एक बाळ रडताना त्याने स्वप्नांत पहिलं होतं. ते आठवून त्याला छातीत एक कळ आल्यासारखं वाटलं.

साक्षी आणि जय पण तिथे बाकीच्यांच्या प्रतिक्रिया घेत होते. बचावकार्य अजून सुरू होतं. नातेवाईक आणि बघ्यांच्या गर्दीने त्यात अडचण येत होती. साक्षी पुढे चालत गेली आणि एकदम किंचाळली.

“जय..”

तिच्या आवाजाने जय धावत तिथे पोहचला. साक्षीला जणू भोवळच आली. तसा प्रतीकही स्वतःला सावरत तिथे गेला. आणि तिथलं दृश्य बघून मट्कन खालीच बसला.

बसच्या चेपलेल्या भागाकडच्या खिडकीतून एक बाईचा हात बाहेर पडला होता. फुटलेल्या बांगड्या, रक्ताचे ओघळ, सारंच बिभत्स, अगदी हुबेहूब त्याच्या स्वप्नात दिसलं तसं.

आता मात्र त्याचा संयम सूटत होता. त्याने जय आणि साक्षीला घेतलं आणि थेट ऑफिस गाठलं. जेवढं जमेल तेवढं बातमीत दिलं आणि तो घरी निघाला.

त्याला खूप गळाल्यासारखं वाटत होतं. अंगात थोडी कणकण पण जाणवत होती. तरी सगळं आटपून घरी पोहचायला त्याला १० वाजले होते. त्याचा उतरलेला चेहरा पाहताच आईने विचारलं,

“काय झालं?”

तो शांतपणे येऊन सोफ्यावर बसला. आई जवळ आली तर तिला त्याचं अंग गरम लागलं.

“काय रे, तुला तर ताप आलाय. असा कसा अचानक? सकाळी तर बरा होतास की?”

आई काळजी करत होती. तिने त्याला जेवायला घालून मग औषध दिलं. थोड्यावेळ दोघे सोफ्यावर बसले होते. आईने टीव्ही लावला.

“आज सकाळचा तो अपघात किती भीषण होता. नाहीतरी ती जागा शापितच आहे म्हणे.”

आईच्या या वाक्यावर चमकून त्याने बघितलं. त्याच्या चेहर्‍यावरचे बदललेले भाव आईने हेरले.

“तू आज त्याच बातमीसाठी गेला होतास ना?”

त्याने ‘हो’ म्हणताच,

“अरे देवा!”
म्हणत आई आत गेली. येताना मीठ, मोहरी, मिरच्या घेऊन त्याच्यावरून उतरवून टाकू लागली.

“त्यामुळे तर ताप नाही ना आला तुला? कशाला मेलं अशा ठिकाणी जायचं असतं तुम्हाला? मिळवायच्या ना अशा बातम्या दुसर्‍यांकडून.”

आईची काळजी वाढली होती आणि बडबडही.

“नाही गं आई. पत्रकार आहे मी. क्राइम रिपोर्टिंग करतो म्हटल्यावर अशा सगळ्या ठिकाणी तर कायमच जावं लागतं मला. तू उगाच काहीही शंका काढत बसू नको.”

असं म्हणत त्याने आईची समजूत काढण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याच्या आत एक वेगळीच कालवाकालव सुरू होती.

“आपल्याला इंट्युशन झालं होतं का? की सिक्स्थ सेन्स?
एवढे योगायोग सारखे कसे घडू शकतात, तेही एकाच घटनेबाबत?”

या विचाराने तो थोडा बेचैन झाला.

त्याला पुन्हा त्या माणसाचं बोलणं आणि आईचं त्या जागेला शापित म्हणणं आठवलं.

'असं काय आहे त्या ठिकाणी? नुकत्याच झालेल्या या सलग अपघातांमुळे लोक असं बोलताहेत की, अजून काही?
उद्या सकाळी आपण याच अँगलने जरा काही माहिती मिळतेय का बघूया',

असा विचार करत तो झोपला.
---------------------------------------------
क्रमशः
त्या वळणावर -2

प्रतीकला वाटतंय तसं खरंच काही असेल का त्या जागी? त्याला हे गूढ शोधता येईल का? नेमकं कशामुळे ती जागा शापित आहे? जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा.

🎭 Series Post

View all