त्या वळणावर भाग 3

त्या पत्रकाराच्या मनावर असलेल्या त्या अनाहुत ओझ्याची कहाणी.
त्या वळणावर
भाग ३.

@धनश्री भावसार बगाडे

आज सकाळी प्रतीक जरा निवांत उठला. त्याचा मूड चांगला होता. झोप पूर्ण झाल्याने त्याला फ्रेश वाटत होतं. सकाळच्या कोवळ्या उन्हात मस्त चहाचा कप आणि वृत्तपत्रांचा गठ्ठा घेऊन तो घराच्या बाल्कनीत बसला.

कालच्या अपघातानेच जवळपास सर्व पेपर भरलेले होते. मृतांची संख्या, जखमींची संख्या, त्यांच्यावरील उपचार, नातेवाईकांचा आक्रोश याचेच मथळे सगळीकडे दिसत होते. नव्या दिवसाची सुरुवात त्याने नव्या उत्साहात केली होती.

तेवढ्यात त्याच्या फोनची मेसेज टोन वाजली. त्यांच्या पत्रकारांच्या ग्रुपवर 'काय फालतूगिरीये' अशा कमेंटसह एक व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता.

व्हिडिओचं शीर्षक वाचून त्याची नजर त्यावरच खिळली.

शीर्षक होतं, ‘त्या अपघाती शापित जागेचं रहस्य’.

काय असेल रहस्य? म्हणून त्याने कुतुहलाने तो व्हिडिओ लावला. त्यात काही लोकांच्या मुलाखती होत्या.

‘हायवेवर अपघात झाला त्या ठिकाणच्या साधारण एक किलोमीटर अंतरात मध्यरात्री एक मुलगी बसलेली दिसते. ती जणार्‍यांना कधी पुढे, कधी मागे, कधी अचानक समोर आलेली अशी टप्प्याटप्प्याने दिसते असं म्हणतात.’ अशी प्रतिक्रिया अपघातग्रस्त भागाजवळच्या एका रहिवाशाने दिली होती.

तर दुसर्‍या प्रतिक्रियेत,
‘ती मुलगी तिथून जाणार्‍या गाडी चालकाला लिफ्ट मागते. तेवढ्या टप्प्यात गाड्यांचा वेग आपोआप कमी होतो आणि आपल्या गाडीवर मागे कोणीतरी बसल्याचा भास होतो पण कोणी दिसत नाही’, असं बोलले जात असल्याचं म्हटलं होतं.

या व्हिडिओत कमी जास्त फरकाने अशाच आशयाच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. हे सर्वच ऐकीव पातळीवर होतं. हे सगळं बघून प्रतीकचं डोकं बधीर झालं होतं. त्याची पत्रकार बुद्धी या सगळ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती.

'हे सगळं याने त्याने सांगितलेलं, कुठून तरी ऐकलेलं असंच आहे. मग या अफवांवर विश्वास कसा ठेवायचा? पण मग सतत त्याच जागी होणार्‍या वाढत्या अपघातांचं कारण काय? शिवाय काल माझ्या बाबत जे घडलं...'

'छे! कालचा सगळा योगायोग होता. त्याचं काय एवढं मनावर घ्यायच?'
असा विचार करत ह्या वाढत्या अपघातांवर बातमी करावी या विचाराने तो पोलिस अधिकारींना भेटायला गेला. तिथे अजून एक योगायोग घडला. प्रतीक पोलिस ठाण्यात पोहचला तेंव्हा नेमके पोलिस अधिकारीही तोच व्हिडिओ बघत होते. क्राईम बीट त्याच्याकडे असल्याने अर्थातच त्याची त्या अधिकार्‍यांशी चांगली ओळख होती.

प्रतीक आलेला बघताच त्यांनी व्हिडिओ बंद केला आणि त्याला 'ये' म्हटलं. तसा तो हसतंच त्यांना म्हणाला,

“तुम्ही पण असे व्हिडिओ बघता?”

“अरे खूप व्हायरल झाला न व्हिडिओ, म्हणून म्हटलं बघू. बरं तू सांग कसं येणं केलं? कालच्या अपघाताचेच अपडेट्स घ्यायला ना?”

हसतंच अधिकारींनी विचारलं.

“हो, म्हणजे ते तुम्ही सांगालंच. पण मला जरा वेगळी माहिती हवी होती.”

“हम्म, स्पेशल स्टोरी. सांगा काय मदत करू?”

त्यांनी विचारलं

“सर, काल ज्या ठिकाणी अपघात झाला त्या भागातच गेल्या दोन महिन्यात सात अपघात झाले आहेत. शिवाय मृत्यूचे प्रमाण पण जास्त आढळून आलंय. या मागचं कारण काय असेल?”

त्या पोलिस अधिकारींनी एक मोठा श्वास घेत उसासा सोडला.

“हम्म, तिथे आजवर झालेले अपघात हे बहुतांश पहाटेच्या वेळचे आहे. साधारण यावेळत ड्रायव्हरला डुलकी लागली की घडतात अपघात. पण प्रमाण का वाढलं आणि त्याच ठिकाणी का? याविषयी अजून तपास सुरू आहे. आताच काही सांगता येणार नाही.”

त्यांच्या या उत्तराने प्रतीकचं काही समाधान झालं नाही. तो त्यांना खोदून प्रश्न विचारू लागला.

"तिथल्या रस्ता बंधणीत काही हलगर्जीपणा असं काही आहे का?"

प्रतीकची प्रश्नांची सरबत्ती चालूच होती.
शेवटी अधिकारी म्हणाले,

“तांत्रिक अडचणी अजून तरी काही समोर आलेल्या नाहीत. कारण त्या रस्त्याचं काम होऊन ४ वर्ष झालीत आणि अपघातांची मालिका मागील दोन महिन्यातली आहे. ऑन द रेकॉर्ड एवढंच सांगता येईल."

"काही माहिती तुला ऑफ द रेकॉर्ड सांगेन. पण तू ती छापू नये असंच मी सुचवेन.”

त्यावर माहिती मिळवण्याच्या उत्सुकतेने त्याने “चालेल” म्हटलं.

मग पोलिस अधिकारी सांगू लागले,

“कालच्या अपघातातला एक गंभीर जखमी सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्याला शुद्ध आल्यावर जबाब घ्यायला मी गेलो होतो. अर्थात त्याने जे सांगितलं ते आम्हाला मीडिया किंवा जनतेसमोर आणता येणार नाही.”

“असा काय जबाब दिला त्याने?”

उत्सुकतेने प्रतीकने विचारले.

“पहिले तर तो इसम काही बोलायला तयारच नव्हता. मग त्याला वेगवेगळ्या प्रकारे समजावत विचारलं. शेवटी मला एकट्याला सांगायला तो तयार झाला.”

“तो म्हणाला की, ‘आम्ही मुंबई सोडल्यावर पुण्याच्या अलीकडेच फूडकोर्टला थांबलो होतो. साधारण तासभर तिथे वेळ घालवला. त्यामुळे ड्रायव्हर तसा फ्रेश झालेला होता. बस फुल होती म्हणून मी ड्रायव्हरच्या शेजारच्या जागेवर बसलो होतो. आम्ही दोघे छान गप्पाही मारत होतो.
एक चार/पाच किलोमीटर पुढे आल्यावर आम्हाला त्या अंधारात सुनसान हायवेवर एक तरुण मुलगी एकटीच उभी दिसली. पण त्याकडे सुरूवातीला दुर्लक्ष केलं. आणि ड्रायव्हर म्हणाला सुद्धा एवढ्या रात्री एकटी तरुण मुलगी हायवेवर काय करेल? भास असेल. ती मुलगी मी पण बघितली होती, पण मी काही बोललो नाही.

पुढे थोड्या अंतरावर परत तीच मुलगी टप्प्याटप्प्यांवर दिसत होती. तसे आम्ही दोघेही जरा साशंक झालो. या पूलाच्याजवळ होतो तेंव्हा तर ती अचानक समोर आली. तिने सामान्य माणसापेक्षा खूपच लांब हात करत लिफ्ट मागितली. ड्रायव्हर घाबरला आणि त्याने करर्कचून ब्रेक दाबला आणि मग हा अपघात झाला.” अशी हकीकत त्या जखमीने सांगितली.

“या ठिकाणी झालेल्या सर्वच अपघातांमध्ये थोड्या फार फरकाने असंच घडल्याचं आढळून आलं आहे.” पोलिसांचे हे बोलणे ऐकून प्रतीक सुन्नचं झाला होता.

“आता हे आम्ही ऑन द रेकॉर्ड सांगितलं तर परत अंधश्रद्धा पसरवतो म्हणून आमच्यावरच गदा येणार. त्यामुळे हे आम्ही आऊट करू शकत नाही.” असं पोलिस अधिकारी बोलत होते.

प्रतीकने त्या जखमी व्यक्तीचं नाव, नंबर पोलिसांकडून घेतला आणि तो आपल्याच विचारात हरवत तिथून उठला.

“खरंच घडू शकतं का असं?”
“की, हा त्यांचा भास असेल फक्त?”
“पण एवढे अपघात एकाच ठिकाणी?"

प्रतीक त्या व्यक्तीला भेटायला हॉस्पिटलला गेला. खात्री करून घेण्यासाठी त्या माणसाला त्याने पुन्हा सर्व हकीकत विचारली.

"कशी होती ती मुलगी?" प्रतीकने उलट तपासणी घेत त्या व्यक्तीला विचारलं.

"साहेब ती तरुणच होती. म्हणजे २५ ते ३० वर्षाची असेल. तशी मॉर्डन वाटत होती. म्हणजे केस खांद्यापर्यंत लांब, मोकळे होते. पंजाबी ड्रेस घातलेला."

"मग तिला बघून घाबरण्यासारखं काय होतं?" प्रतीकने विचारलं.

"एकटी मुलगी एवढ्या अंधारात, शंका तर येतेच ना, पण ती जेंव्हा पुढे पुढे टप्प्या टप्प्यावर दिसायला लागली तेंव्हा आश्चर्य वाटलं. आणि जेंव्हा ती समोर आली..." हे सांगतानाच त्या व्यक्तीचे हात भीतीने थरथरू लागले.

"तेंव्हा काय?" प्रतीकने जोर देत विचारलं.

"बसच्या लाईटमध्ये दिसलं ती जखमी होती. तिने लिफ्ट मागण्यासाठी हात लांब केला. साहेब, आपला हात किती लांब असतो? दोन, अडीच फूट. तिचा हात थेट ड्रायव्हरसमोरच्या काचेपर्यंत आला होता." सांगत तो व्यक्ती पुन्हा घाबरलेला दिसत होता.

त्याने पुढे त्या मुलीचे अजून थोडे वर्णन केले. प्रतीकला एकदम काही आठवल्यासारखा तो विचारांत हरवला. त्याच्या चेहर्‍यावर जणू त्या मुलीला ओळखत असल्यासारखे भाव होते. आणि त्याला दरदरून घाम फुटला होता.
-----------------------------------------------------------------

क्रमशः
त्या वळणावर 3
कोण असेल ही मुलगी?
प्रतीक तिला ओळखत असेल का?
तिचं वर्णन ऐकून हा का घाबरला? त्याच्या स्वप्नाचा काही संबंध असेल का?
काय असेल कहाणी?
जाणून घ्या पुढील भागात.

🎭 Series Post

View all