Login

त्या वळणावर..( भाग:-५ अंतिम)

बाप लेकाच्या नात्यातील अंतर दूर करण्यास कारणीभूत असणाऱ्या ईशा त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या तिच्या प्रेमात पडणाऱ्या रमणची कथा
#जलद लेखन स्पर्धा- २०२५

विषय:- नात्यातील अंतर

शीर्षक:- त्या वळणावर

भाग:- ५ (अंतिम)

मागील भागात:-

रमण ईशाला मनातले सांगतो पण ती त्याला नकार देते. तो उदास होतो. सिम्मीला सगळे सांगतो. तिला राग येतो.

आता पुढे:-

दुसऱ्या दिवशी सिम्मी ईशाला भेटायला गेली.

"तूच ईशा आहेस का? " तिला वरून खाली पर्यंत निरखून पाहत तिने विचारले.

"हो, मीच आहे ईशा राणे. काय झालं? कोण आपण? " तिने सिम्मीला विचारले.

"मी रमणची दीदी सिम्मी. लाज नाही वाटतं, तुझ्यापेक्षा लहान असलेल्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढायला. हेच शिकवतेस का तू काॅलेजमध्ये ? माझ्या भावापासून लांब राहायचं, त्याच्या आसपास जरी भटकलीस ना तर याद राख. माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल." सिम्मीने तिला चुटकी वाजवून बोट नाचवत फणकऱ्याने म्हणाली.

"हे पाहा तुमचा काहीतरी गैरसमज.." ईशा सांगण्याचा प्रयत्न करत होती तोच सिम्मी डोळे मोठे करत म्हणाली," ए मला लेक्चर देऊ नकोस. जेवढं सांगितले तेवढे लक्षात ठेवं, समजलं." असे म्हणून ती मानेला झटका देत निघून गेली.

ईशाच्या मनाला खूप लागलं. ती रडतच घरी निघून गेली. तिचे आईवडील गावी गेले होते. सध्या ती एकटीच राहत होती. घरी आल्यावरही ती खूप रडली.

इकडे सिम्मी घरी आल्यावर रघुनाथ यांच्या कानावर सगळी हकीकत सांगितली. ते खूप गंभीर होत विचार करू लागले ; परंतु ही गोष्ट रमणने ऐकली. त्याने तडक ईशाचे घर गाठले.

त्याने हिंमत करून दाराची बेल वाजवली.‌ एवढ्या रात्री कोण आले असेल विचार करत ईशा दार उघडणार तोच तिने कोण‌ म्हणून विचारले.

"दार उघडा मॅम, मी आहे, रमण." तो कातर आवाजात म्हणाला.

"तू का आलास इथे? प्लीज जा इथून. पुन्हा कधीही येऊ नकोस." ती दार न उघडताच आलेला हुंदका आवरत त्याला निघून जाण्यास सांगितले.

"मॅम, दी जे बोलली ते योग्य नव्हते. तिच्यावतीने मी तुमची माफी मागतो. प्लीज ओपन द डोअर." तो दारावर थाप मारत कळवळून म्हणाला.

"जा रे बाबा, तुला एकदा सांगितलेले कळतं नाही का रे. जा म्हंटले ना." ती वैतागत रडत म्हणाली.

"नाही जाणार मी तुम्हाला सोडून, तेही तुम्ही अशा रडत असताना तर मुळीच नाही जाणार. मला माहिती तुमचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. वयांचे अंतर आहे म्हणून ते तुम्ही मान्य करत नाहीत." तो दारावर डोकं टेकवून रडत म्हणाला.

"नाही म्हटलं ना प्रेम बिम काही. जा तू? " ती कसं बसं हुंदका दाबत म्हणाली.

तो काही गेला नाही. ती आतून आणि तो बाहेरून दोघेही दाराला पाठ टेकवून रडत होते.

थोड्यावेळाने तिने डोळे पुसले, विस्कटलेले केस सावरले आणि दार उघडले तसा तो डोळे पुसत उठून उभा राहिला.

"मॅम" म्हणत तो तिच्या जवळ जाणार तोच तिने त्याच्या गालावर ठेवून दिली‌ आणि रागात म्हणाली," किती वेळा तुला एकच गोष्ट सांगू? मी नाही करत तुझ्यावर प्रेम. चल जा निघ‌ं इथून. पुन्हा फिरून येऊ नकोस." ती त्याला हाताला धरत ओढत गेटजवळ आणले आणि त्याला ढकलून देत गेट लावून तोंडावर हात ठेवत पळतच घरात येत दार लावून घेत खाली बसली. दोन्ही गुडघे उभे करून त्याला दोन्ही हाताने विळखा घालत पाय छातीशी लावत त्यावर डोकं ठेवून दाराला पाठ टेकवून धाय कोलमडून रडू लागली.

"माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर, रमण. खूप प्रेम करते मी. पण हा समाज ते मान्य करणार नाही रे. माफ कर मला. तुझ्या प्रेमाचा स्वीकार नाही करू शकतं." ती रडतच एकटीच बडबडत होती.

तोही इकडे गेट बाहेर रडत रडतच म्हणाला,"तुम्ही मारलतं त्याचा मला अजिबात राग‌ आला नाही. उलट तुमची ही प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आवडली मला. तुमच्या डोळ्यांत ते स्पष्ट दिसतंय. फक्त वयांचे अंतरामुळे तुम्ही असे म्हणत आहात." असे म्हणत तिने मारलेल्या गालावर हळूवारपणे हात फिरवत हसत तेथून निघून गेला.

नंतरही त्याने खूप मेसेज, काॅल केले पण तिने कोणताच रिस्पॉन्स दिला नाही. तो ऑफिस सुटल्यावर कित्येक वेळा तिच्या घरी, काॅलेजवर चक्कर मारून तिला भेटायचा, बोलायचा प्रयत्न केला, ती मनावर दगड ठेवून त्याला दुर्लक्ष करून निघून जायची.

आता त्याला ते सहन होईना. त्याला खूप त्रास होऊ लागला. तो रोज रात्री रात्रभर तिच्या आठवणीत झुरत रडत बसायचा.

एकदा तर तो त्याच्या आईचा फोटो छातीशी कवटाळून रडत म्हणाला,"माॅम, का सोडून गेलीस तू मला? मला आता तुझी गरज होती."

हसत्या खेळत्या आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून रघुनाथ यांच्या पोटात कालवाकालव झाली. त्यांना गलबलून आलं. त्यांनी मनात काही तरी ठरवले.

सकाळ‌ होताच ते ईशाच्या घरी गेले. त्यांनी स्वतः ची ओळख सांगितली तेव्हा ती घाबरली. तेव्हा तिचा घाबरलेला चेहरा पाहून ते तिला मवाळ स्वरात म्हणाले," घाबरू नको बेटा. मी तुला काही बोलायला आलो नाही. उलट तुझी माफी मागायला आलो आहे. सिम्मीच्या वतीने मी तुझी माफी मागतो."

ते हात जोडत होते तोच ती त्यांचे हात पकडत म्हणाली," माफी नका मागू अंकल. मी समजू शकते."

"हम्म, खरं तर तुझा मी ऋणी आहे." असे ते म्हणताच तिने चमकून त्यांच्याकडे पाहिले.

तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव ओळखत ते म्हणाले," आज जो रमण आम्ही पाहतोय ते फक्त तुझ्यामुळे. तो आयुष्याकडे गांभीर्याने पाहायला लागला, जबाबदारीने वागू लागला. नियमित सगळे काही करू लागला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या बापलेकातील नात्यातील अंतर तू काढून टाकलेस. त्याच्यातील बदल मला दिसत होते. ते कोणामुळे हे मी शोधणार होतोच ; आता शोधावे लागणार नाही. मला माहित आहे हा समाज तुमच्या प्रेमाला मान्यता देणार नाही ; पण मला समाजाशी काहीही देणं घेणं नाही. मला फक्त माझ्या मुलाचं सुख पाहिजे जे तुझ्यात आहे. मला माहिती आहे तुझं ही त्याच्यावरती प्रेम आहे. तुमच्या दोघांच्या सुखातच माझं सुख आहे. चल बेटा, घरी चलं. तुमच्या नात्यातील अंतर दूर करून कायमस्वरूपी नात्यात बांधण्यासाठी, माझ्या रमणच्या आयुष्यात खुशी आणायला."

त्यांनी खूप समजावल्यावर ती त्यांच्याबरोबर जायला तयार झाली.

रमण उदास चेहऱ्याने ऑफिसला जाण्यासाठी निघाला होता. तोच दारात गाडी थांबलेली त्याला दिसली‌. त्यातून रघुनाथ आणि त्यांच्या पाठोपाठ ईशाही बाहेर आली‌.

ईशाला पाहून त्याची कळी खुलली. तो आश्चर्याने रघुनाथांकडे पाहू लागला. त्यांनी हसत डोळे मिचकावत त्याला गळ्याची लावत म्हणाले," बघ तुझे प्रेम मी घेऊन आलोय. आता तरी खुश आहेस ना बेटा?"

"पण तुम्ही? हे सगळं म्हणजे.. तुम्हाला?.." काय बोलावं हे त्याला कळेना. त्याला इतका आनंद झाला की "थॅंक्यू पप्पा" म्हणत तो पटकन त्यांच्या गळ्यात पडला. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

"रमू, मी आजपर्यंत पण जे वागलो, बोललो ते तुझ्या भल्यासाठीच होतं. मनात नसूनही मला तसं कठोर वागावं लागलं ; पण आज आपल्या नात्यातले अंतर संपले, ते फक्त ईशामुळे. सुखी राहा. तुम्हीही बोलून तुमच्या नात्यातील अंतर दूर करा. बाकी नंतर बोलू." असे बोलून त्याचा खांदा दाबून ते निघून गेले.

रमण ईशाला मिठी मारत म्हणाला," आज खूप खुश आहे. आय लव्ह यू, मॅम."

"आय अल्सो लव्ह यू टू, रमण.‌ पण अजूनही तू मला मॅमच म्हणणार आहेस का? " तिनेही त्याला मिठी मारत लटक्या रागात म्हणाली.

"हा मग तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात ना म्हणून." तो मिश्किल हसत पुन्हा तिला मिठीत घेत म्हणाला.

तिने लाजून हसत पुन्हा लटक्या रागाने हाताच्या मुठीने हलकेच त्याच्या छातीवर बुक्की मारली आणि त्याला बिलगली.

समाप्त -

एखाद्या व्यक्तीमुळे नात्यातील अंतर दूर होते.  प्रेमाला वय नसतं प्रेम कोणालाही होऊ शकते. मग वयातील अंतरही त्यास आड येत नाही. कधी कधी समाजाची पर्वा न करता मुलांच्या सुखाचा विचारा लागतो.

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कथेतील घटना, पात्र, स्थान यांचा वास्तवाशी, जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all