#जलद लेखन स्पर्धा -२०२५
विषय:- नात्यातील अंतर
शीर्षक:- त्या वळणावर
भाग:-१
"दी, मी बाहेर आलो आहे, प्लीज दार उघड ना." रमण त्याची मोठी बहीण सिम्मीला हळू आवाजात फोनवर म्हणाला.
तिने हाॅलमध्ये आराम खुर्चीत पेपर वाचत बसलेले त्यांचे बाबा रघुनाथ यांच्याकडे पाहिले. त्यांचे लक्ष नसलेले पाहून तिने आवाज न करता दार उघडले.
रमणने हळूच सशासारखे डोके घालून दारातून डोकावून रघुनाथ यांच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यासमोर पेपर होता त्यावरून ते वाचण्यात गर्क आहेत असे वाटून त्याने छातीवर हात ठेवून सुस्कारा सोडला व तो दाबक्या पावलांनी आत आला. हळूच दार लावून सिमीच्या खांद्यावर हात टाकत एका बाजूने तिला कवेत घेत हळू आवाजात म्हणाला,"थॅंक्यू, दी. लव यू."
तिनेही हसत त्याला एका बाजूने कवेत घेतले.
दोघेही तेथून जाऊ लागले तोच "थांब." रघुनाथ धारदार आवाजात गरजले.
गळ्यात हात टाकून चाललेली दोन्ही भांवंडांची पावले जागीच थांबली.
त्यांनी त्यांच्या समोरील टेबलावर पेपर जोरात आपटले. हात पाठीमागे बांधून त्या दोघांच्या दिशेने ताडताड पावले टाकत आले.
पप्पांचा ओरडा बसणार म्हणून रमणचा चेहरा कसानुसा झाला. काळजी करू नकोस मी आहे ना असे सिम्मीने त्याला डोळ्यांनेच खुणवून शांत राहायला सांगितले.
रघुनाथ यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो पाठमोरा असलेला वळून पुढे येत दोन्ही हात पुढे बांधून मान खाली घालून उभा राहिला.
"झालं का उंडरून, उनाडक्या करून? ही वेळ झाली का घरी येण्याची? " ते त्याला चढ्या आवाजात जरब आणत म्हणाले.
तो काहीच बोलला नाही.
"असा सुंभासारखा काय उभा आहेस? ऐकू येत नाही का? " तो त्याच्या डोक्यात टपली मारत रागात म्हणाले.
इतक्या उशीर संयम बाळगणारा तो रागात हाताची मुठ आवळत काही बोलणार तोच सिम्मी मध्ये पडत म्हणाली," काय पप्पा? मी इतक्या दिवसांनी आलेय माहेरी, प्लीज, जाऊ द्या ना. मी समजावते त्याला. तुम्ही शांत व्हा."
ती तसे म्हणताच ते रागात एक कटाक्ष त्याच्याकडे पाहत पुन्हा आराम खुर्चीत जाऊन बसले.
"चल रे, छोटे, आज काय खाऊ घालणार आहेस? ते मला सांग. खूप दिवस झाले तुझ्या हाताचे मी काही खाल्ले नाही." ती रमणच्या दंडाला धरत हसत त्याला ओढत दुसऱ्या रूममध्ये नेत म्हणाली.
तोही तिच्या हातावर हात ठेवून हसत म्हणाला," पुन्हा एकदा थॅंक्यू,दी. हिटलरपासून वाचवण्यासाठी."
त्याने रघुनाथ यांना हिटलर म्हटलेले तिला आवडले नाही म्हणून ती कमरेवर हात ठेवत डोळे बारीक करून नाक गोळा करत त्याच्याकडे पाहू लागली तेव्हा तो जीभ दाताखाली चावत कानाच्या पाळीला हात लावत म्हणाला," साॅरी, यार दी, ते जाऊ दे. तुझ्यासाठी मस्त कांदा भजी बनवतो. तुला आवडतात ना."
त्याने तिला मस्का मारला तशी तिने खुदकन हसत मान डोलावली.
सिम्मी रमणसाठी सर्व काही होती. आईच्या मृत्यूनंतर तिनेच आईच्या मायेने त्याला वाढवले होते. रघुनाथ यांच्या ओरडा खाण्यापासून ती नेहमीच त्याला वाचवायची. तिचे लग्न झाले होते. ती त्याच शहरात राहत होती. अधूनमधून ती माहेरी यायची.
रमण एकदम हॅंडसम, स्मार्ट असा बारावी पास झालेला. थोडासा हट्टी असल्याने पप्पांसोबत त्याचे जमायचे नाही. ते नेहमी त्याला ओरडत असतं. आजही तो रात्रभर घराच्या बाहेर मित्रांसोबत होता म्हणून ते चिडले होते. तो करीअरला घेऊन सिरियस नाही म्हणून तो त्यांचा नेहमी ओरडा खायचा.
दुसऱ्या दिवशी सिम्मी त्याला उठवायला गेली. तो अजूनही झोपेतच होता.
"छोटे उठ लवकर, नाही तर पुन्हा पप्पांचा ओरडा खाशील." ती त्याच्या अंगावरचं पांघरूण ओढून काढत त्याला म्हणाली.
"अम्म, दी, पाच मिनिटं झोपू दे ना मला. आणि हो पप्पांचं काही नको सांगूस मला, असंही ते मला ओरडतच असतात. सो प्लीज, मला झोपू दे ना." तो डोळे झाकूनच म्हणाला आणि पुन्हा पांघरूण ओढून घेतलं.
ती काही बोलणार तोच रघुनाथ यांनी त्याच्या अंगावरील पांघरूण खसकन ओढून काढत रागात म्हणाले, "झोपाचं काढ तू? दुसरं येत काय तुला? कोणत्या गोष्टीचं तुला गांभीर्यच नाही. दिवसभर नुसतं बोंबलत हिंडायचं, रात्री अपरात्री कधीही यायचं, आयुष्यात कोणतं ध्येय नाही ठेवलंस. घरचं बिझनेस जाॅईन कर म्हटलं तर ते पण नको आहे तुला? "
तोही उठून रागात म्हणाला, "हो, नाही घेत मी काही सिरियसली, नाही काही येम माझं. आणि राहिली गोष्ट घरचं बिझनेस जाॅईन करायचं तर ते मी अगोदरच सांगितले आहे तुम्हाला, तुमच्या त्या सो काॅल्ड बिझनेसमध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही."
"मग तुझा इंटरेस्ट कशात आहे? ते बायकांसारखं किचनमध्ये लुडबुड करण्यात? हं.." ते उपहासात्मक म्हणाले.
"त्याला लुडबुड करणे नाही, स्वयंपाक करणे म्हणतात, आवडतं ते मला. फक्त बायकांचं स्वयंपाक करत नसतात, पुरुषही करत असतात. तुमच्या त्या कबाडखान्या बिझनेसपेक्षा ते बेटर आहे." तोही रागाने धुसफसत नाकपुड्या फुगवत म्हणाला.
सटाक.. रघुनाथ यांनी रमणच्या कानाखाली जोरात जाळ काढत म्हणाले,"मला उलट उत्तर देतोस. नालायक कुठला?"
त्यांनी हात उचलल्यावर सिम्मीचा हात तिच्या तोंडावर गेला आणि रमणचे डोळे भरून आले तो गालाला हात लावून त्यांच्याकडे रोखून पाहू लागला.
"बघतोस काय असा ? तुला तर.." ते पुढे अजून काही बोलणार तोच सिम्मी पुन्हा दोघांच्या मधात येत म्हणाली, "पप्पा, शांत व्हा. आता तो लहान नाही त्याच्यावर हात उचलायला."
"कसा बोलतोय ते ऐकलेस ना तू? तरीही तू या कार्ट्याची बाजू घेतेस?" ते पुन्हा त्याच्याकडे रागात पाहत म्हणाले.
"मी समजावते त्याला. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जा मी बघते." ती त्यांना विनंती करत म्हणाली.
"समजावून सांग याला, म्हणावं बाप आयुष्यभर पुरणार नाही." ते रागात हातवारे करत म्हणाले आणि तेथून निघून गेले.
ते तेथून निघून जाताच तोही रागात कपडे बदलून बाहेर निघून गेला.
क्रमशः
सिम्मी रमणला समजावेल का ? तो रघुनाथ यांचे बिझनेस जाॅईन करेल की स्वतःच्या मनाचे करेल?
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कथेतील घटना, पात्र, स्थान यांचा वास्तवाशी, जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा