Login

त्याचे तुटक वागणं भाग चार शेवट

Experience Is Best Teacher

गेल्या भागात आपण पाहिले की, राजला अमेयचे वागणे पटले नाही. खरा चेहरा समोर आला .पाहू पुढे.


राकेशच्या ओळखीत एक चांगली मुलगी होती. राकेशने अमोलला ह्या बाबतीत विचारले

“अमोल , मुलगी छान आहे .संस्कारी आहे. शिकलेली आहे . फक्त परिस्थिती बेताची आहे.” राकेश

“राकेश, तू माझा खास मित्र आहेस , तू चांगलीच मुलगी शोधली असणार . मला पूर्ण खात्री आहे. हो बोल त्यांना” अमोल
“आधी मुलगी तर पहा, राजला पसंत पडू दे.” राकेश
राज आणि राधा दोघेही ऐकत होते.
 राज म्हणाला
“काका , तुम्ही पाहिली आहे मुलगी , तुम्हाला आवडली . मलाही आवडणार .”
राधा “ हो भाऊजी,तुम्ही घरातलेच आहात . मलाही खात्री आहे तुमची” किती तो विश्वास
राकेशला भरून आले
“ठीक आहे उद्या बघायला जावूया मग”
“हो जावूया” अमोल
कोमल नाव होते. नावाप्रमाणे होती . शिक्षित होती. तिच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. कोमल पाहताक्षणी आवडेल अशीच होती.
सर्वाना कोमल आवडली
कोमलच्या वडिलांनी राकेशला बाजूला घेतले आणि म्हणाले
“राकेश , मुलाकडचे श्रीमंत दिसत आहे. त्यांच्या अपेक्षा मला पूर्ण करता येतील की नाही . तू माझी परिस्थिती सांगितली आहे ना?
“काळजी करू नको , त्यांना माहीत आहे सर्व . त्यांना काही अपेक्षा नाही. फक्त मुलगी आणि नारळ हवा बाकी काही नको” राकेश
कोमलच्या बाबांचा जीव भांड्यात पडला .
थोड्याच दिवसांत लग्न झाले .
कोमल लगेच त्या घरात रुळली
सर्वाना तिने बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला .
कोमलचाही सर्वाना लळा लागला .
अमोल तर राकेशचे नेहमी आभार मानत . कोमलसारखी गुणी मुलगी त्याने शोधली होती.
एका वर्षाने कोमलला आई होण्याची चाहूल लागली . ही बातमी ऐकून सर्व खुश झाले.
सगळेच तिचे डोहाळे पुरवू लागले .
राधा तर सतत काही ना काही तिला बनवून खायला द्यायची .
कोमलसुद्धा खुश होती. राज सुद्धा घरी येतानी काही ना काही खायला आणत असे.
कोमलचे आई बाबा आले की , लेकीचे होणारे लाड पाहून सुखावून जात.
पाहता पाहता नऊ महिन्याचा काळ लोटला . कोमलने गोंडस परीला जन्म दिला . जल्लोषात तिचे स्वागत केले.
कोमल आईपणात नाहून निघाली. राधा आणि अमोल नातीचे दिवसभर लाड पुरवत . राजही आता बाबा म्हणून अजून जबाबदार झाला होता.
राकेश आपल्या मित्राचा आनंद पाहून खुश होता.
बघता बघता दहा वर्ष लोटली . परी दहा वर्षाची झाली .
एक दिवस कोमल राजला म्हणाली “आपण परीचा हा वाढदिवस वृद्धाश्रमात जावून साजरा करूया”
“मला आवडली तुझी कल्पना,आपल्या परीला किती आशीर्वाद मिळतील . नक्कीच आपण तिथेच साजरा करूया” राज
तीच्या वाढदिवसादिवशी सगळेच छान तयार झाले. परीसुद्धा सुंदर दिसत होती.तिचा आवडता पिंक रंगाचा फ्रॉक घातला होता.
जवळच वृद्धाश्रमात गेले.
सर्वाना वाटायला शाल , कपडे ,जेवण असे आणले होते.
सगळे मिळून सामान वाटत होते. अमोलसुद्धा.
एका व्यक्तीला त्याने शाल दिली . त्या व्यक्तीने अमोलला आवाज दिला .
दादा .
अमोलने त्याचा चेहरा पाहिला .. हा तर अमेय होता. अमोलला धक्का बसला . अमोल मटकन खाली बसला.
अमोलला पाहून राधा त्याच्या जवळ आली . तिने अमेयला पाहिले. तिला सुद्धा धक्का बसला .
“भाऊजी” राधा जोरातच म्हणाली.
अमोल आणि राधा एका ठिकाणी थांबले हे पाहून राज आणि कोमल आले.
राजने अमेयला पाहिले .. तो सुद्धा आश्चर्यचकीत झाला . काकाची अशी अवस्था.
तोच वृद्धाश्रम चालवणारी व्यक्ती आली आणि तो सांगू लागला .“खूप पैसेवाला होता साहेब हा. त्याची बायको देवाघरी गेली आणि ह्याला धक्का बसला . निराश झाला,डिप्रेशन मध्ये गेला . त्याकाळात पोराने सर्व पैसा उधळला . रस्त्यावर आला साहेब हा. नियती कधी काय खेळ खेळेल सांगत येत नाही.”
भावाची अशी अवस्था पाहून अमोल रडू लागला .
सगळे त्याला धिर देवू लागले .
“सर , हे माझे काका आहे . ह्यांना मी सोबत घेवून जातो” राज

“सर्व फॉरमॅलिटीज पूर्ण करून अमेयला घरी आणले.
अमोल , राधा, राज सर्वांसाठी धक्का होता.
कोमललाही वाईट वाटले .
“दादा, मला माफ कर” अमेय
थरथरणारे हात जोडत तो अमोलला माफी मागत होता.
“नाही , अमेय . तू काही चुकला नाही . माफी नको मागू” अमोल
अमेयचे हात पकडून त्याने त्याला बसवले .
आधीच अमेयची अशी अवस्था पाहून अमोल रडवेला झाला होता .कित्येक वर्षाची ती बोचणारी सल अमेयची अवस्था पाहून कुठल्या कुठे पळून गेली.

“दादा, मी खूप चुकीचा वागलो.तू तर आधी पासून मोठ्या मनाचा आणि मी फक्त स्वार्थी. स्वतः पुरते जगणारा.”
अमेयला खोकला आला .
अमोल लगेच उठला आणि त्याच्या पाठीवर हात फिरवू लागला
“राधा पाणी आण” अमोल
राधानेही लगबगीने पाणी आणले .
“घ्या भाउजी” राधा
अमेय राधाकडे पाहत म्हणाला “वहिनी मी तुमचाही गुन्हेगार आहे”
“अमेय शांत हो तू , काही बोलू नको” अमोल काकुळतीला येवून म्हणाला .
“दादा , प्लीज आज बोलू दे . मन मोकळे करू दे. खूप त्रास होतो आहे मला. मनात इतके साठले आहे त्याचा निचरा होऊ दे. किती स्वार्थी झालो . तू नेहमी मला घासातला घास दिला आणि मी फक्त स्वताचे पोट भरत राहिलो . पैसा, संपत्ती , प्रसिद्धी हेच हवे होते मला. आई , बाबांचा स्वर्गवास झाला तरी आलो नाही.ज्यांनी जन्म दिला त्यांच्यासाठीही वेळ नव्हता माझ्याकडे . किती लालच . शेवटी काय राहिले हातात , काहीच नाही. ना संपत्ती , ना प्रसिद्धी .. काहीच काहीच नाही. अश्विनी गेली. माझ्या मुलाने सगळी संपत्ती वाया घालवली . ह्या आयुष्याने शिकवलं मला . सर्व नाती तोडली मी . हव्यासापोटी मी असा तुटक वागलो . माझं असे तुटक वागणं , मला रस्त्यावर आणेल स्वप्नातही वाटले नव्हते . दादा ,वहिनी मी माफीच्या लायकीचा नाही . पण जमल्यास माफ करा”

असे म्हणून तो रडू लागला
राज, कोमल आणि परीसुद्धा होते.
सर्वांचे डोळे अश्रूंनी भरले होते.
सर्वच निशब्द झाले .

“अमेय झाले ते झाले, आज तू माझ्या सोबतीला आहे हेच पुरेसे आहे माझ्यासाठी” अमोल.

“हो , झाले ते झाले . आता डोळे पुसा भाऊजी , दोन घास खावून घ्या.” राधा.

सगळे ताटावर बसले
राधाने धपाटे केले होते.
अमेयला आवडायचे म्हणून
अमोल अमेयच्या बाजूलाच बसला होता .
अमेयने पहिला घास अमोलला भरवला आणि म्हणाला “दादा तुझे ऋण कधीही फिटणार नाही”



अमोलने अमेयला छातीशी कवटाळले आणि रडू लागला . तुटलेलं नातं आज प्रेमाने पुनः जोडले गेले होते.

आयुष्यातला सर्वात मोठा गुरु म्हणजे आपले अनुभव हेच असतात . अनेक माणसे भेटतात , चांगल्या वाईट गोष्टी घडतात . माझ्यामते अनुभव हाच मोठा गुरु आहे. तुमचा गुरू कोण हेही नक्की सांगा.

समाप्त

अश्विनी ओगले.

वाचकांनो आवडला का शेवटचा भाग. खरं तर हे लिहिताना माझ्याही डोळ्यात पाणी आले. पात्र काल्पनिक होते,कथा काल्पनिक होती , भावना मात्र काल्पनिक नसतात. बरोबर ना ?.कथा आवडली असेल तर लाईक, कंमेंट आणि share करा. लवकरच नवीन कथेसह तुमच्या भेटीला येईल.धन्यवाद.

🎭 Series Post

View all