राज:"बाबा आपण संध्याकाळी निघुया"
राजचे बाबा अमोल :"तू जावुन ये,मी घरीच थांबतो"
राजला बाबा हेच बोलतील हे अपेक्षीत होते.
राज:"काय हे बाबा,किती वर्षाने काका येत आहेत भारतात आणि तुम्हाला भेटायची पण इच्छा नाही.असलं तुटक वागणं योग्य नाही बाबा"
अमोलने ऐकून न ऐकल्यासारखे केले.पुन्हा वर्तमानपत्र वाचू लागला.
राज ऑफिसला उशीर होत होता म्हणून निघाला.
बॅग खांद्यावर घेतली आणि आईला जातो म्हणून आवाज दिला.
त्याची आई राधा पदराला हात पुसतच बाहेर आली.
आई:"राज ,तुला कितीदा सांगितले आहे जातो नाही तर येतो म्हणावे"
राज:"बरं, येतो आई"
आई :"थांब राज,हे घे तुझा टिफिन"
राजने टिफिन ठेवला आणि मग तो निघाला.
राधा आणि अमोल दोघांचा संवाद सुरू झाला.
राधा :"खरंच तुम्ही राम भाऊजीच्या कार्यक्रमाला जाणार नाही का?"
डोळ्यावरील चष्मा सावरत अमोल म्हणाला..
"राधा तुला माहीत आहे ना माझं उत्तर ,मग का मला विचारते?"
राधा:"मला तुमचे उत्तर माहीत आहे,पण असं किती दिवस मनात राग धरणार.?झालं गेले गंगेला मिळाले असं म्हणून सोडून द्या आता."
अमोल:"राधा,काही गोष्टी मनात इतक्या कोरल्या जातात की सहजासहजी नाही विसरता येत आणि खासकरून आपल्या जवळच्या व्यक्तीने दिलेली जखम ही कधीच सुकत नाही.बोलतात प्रत्येक जखमेवर वेळ हे औषध असते पण ह्या जखमेला औषध नाही राधा "
राधा:"मला ठाऊक आहे हो सर्व पण ..
राधा पुढे काही बोलणार तोच अमोल म्हणाला "मला भूक लागली आहे ,नाश्ता झाला असेल तर दे"
राधा किचनमध्ये गेली आणि अमोलसाठी त्याला आवडतात म्हणून धपाटे केले होते ते आणले.
अमोल:"तू पण बस माझ्यासोबत"
राधा:"हो ,तुम्ही सुरू करा. मी आणते माझी प्लेट"
अमोल धपाटे पाहू लागला..आज खूप दिवसाने त्याला काहीतरी आठवले.
त्याचा लहान भाऊ अमेय. त्याला धपाटे खूप आवडायचे.
एक दिवस आईने धपाटे केले होते.
अमेयने त्याच्या वाटणीचे धपाटे खाल्ले आणि अमोलच्या ताटाकडे बघू लागला.
अमोलने अमेयकडे पाहिले.. अमेय त्याच्याच ताटाकडे पहात होता.
अमोलने स्वतःचे ताट त्याला दिले.
तो खूप खुश झाला.
असे अनेक क्षण येत जिथे ,अमोल मोठा भाऊ म्हणून अमेयसाठी स्वतःच्या वस्तू त्याला देत असे. वेळ प्रसंगी त्याला जे हवे ते देत .
अमेयलाही कळून चुकले , अमोल दादा आपल्याला सर्व काही देतो.
त्यामुळे ज्या गोष्टी हव्या असतील तो अमोलला सांगत असे.
अमोल आणि अमेय मोठे होऊ लागले.
अमेय जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याच्यात खूप बदल झाला.
त्याला सगळं ब्रॅण्डेड हवे, महागातल्या वस्तू.
अमोल मात्र आहे त्यात खुश.
चक्क एक दिवस अमेयने वडिलांच्या खिशातून पैसे चोरले.
हे अमोलने पाहिले.
अमोलने त्याला दम दिला..पुन्हा असे करायचे नाही ,वचन घेतले.
अमोल आणि अमेय दोघे कामाला लागले.
अमेय आता स्वतःच्या दुनियेत व्यस्त राहू लागला.
अमोलला मात्र अमेयची काळजी लागून राहायची.
अमेय मोठा झाला असला तरी ,अमोलसाठी तो लहानच होता.
कलांतराने अमेय आणि अमोल दोघांचं लग्न झाले.
दोघांचा संसार थाटला .
एकत्रच राहात होते.
अमेयला पगार जास्त होता.अमोलला पगार कमी.
अमेयची बायको ,नवऱ्याला पगार जास्त म्हणून रुबाबात रहायची.घरातली सर्व कामं अमोलच्या बायको राधावर पडत असे.
अनेकदा अमोल अमेयला ह्याबाबत सांगायचा पण लग्न झाल्यावर अमेयची बायको सर्वस्व झाली होती.तिला काहीच बोलायचे नाही.
एक दिवस आई आजारी पडली.
मोठं ओपरेशन झाले.
आईला घरी आणले.
राधाला नुकताच सातवा महिना लागला होता..तिला धड उठता बसता नव्हते येत.
राधा तरीही जमेल तसं सासूची सेवा करत होती.
राधा पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली..
घरात सर्वांना अमेयच्या बायकोकडून अपेक्षा होत्या, ती घराकडे लक्ष देईल.
अमोल:"अमेय, राधा काही महिने नसणार घरी .ती माहेरी गेली आहे .तर तुझ्या बायकोला आता घराकडे लक्ष द्यायला सांग"
अमेय:"दादा ,माझी बायको काही करणार नाही.तिला घरातल्या कामाची सवय नाही"
अमोल:"पण आई आजारी आहे.आपण कामाला गेल्यावर तिच्याकडे लक्ष द्यायला कोणीतरी हवे ना?
अमेय:"तीच्याने नाही होणार , पुन्हा मला चर्चा नको आहे"
अमोल स्वतःच आईची काळजी घेऊ लागला.घरात कामाला बाई लावली,बाईचे पैसे अमोलच देत होता ,घरात लागणाऱ्या वस्तूही तोच आणत होता.अमेयला पडली नव्हती.
आता अमेयच्या बायकोला काहीच करायचे नव्हते.दिवसभर मोबाईल,टीव्ही हेच चालू असायचे. घरातल्या कोणाशी काहीच बोलायची नाही.अमेय आला की दोघेही बाहेरच जेवायला जात.
घरातील हिस्सा असून नसल्यासारखे झाले.
राधाला दवाखान्यात नेहले.
सिजर झाले.गोंडस मुलाला जन्म दिला.
हॉस्पिटलचे खूप बिल झाले.अमोलने अमेयला फोन केला.
अमोल:"हॅलो, अमेय मला जरा पैसे हवे. हॉस्पिटलचे बिल भरायचे आहे.मी नंतर देतो तुला पैसे"
अमेय :"दादा, माझ्याकडे पैसे नाहीये"
अमोलने एका खास मित्राला फोन करून पैसे मागितले .त्याने देऊ केले.
राधा मुलासोबत घरी आली.
मुलाचे लाड होऊ लागले.
लहान बाळ ते.रात्री अपरात्री रडायचे.
घरात आवाज घुमायचा.
त्याचा अमेयच्या बायकोला त्रास होऊ लागला.
त्याचा अमेयच्या बायकोला त्रास होऊ लागला.
तिची झोपमोड होत होती.
ती चिडूनच अमेयला म्हणाली:"माझी झोपमोड होते आता,आपल्याला दुसरं घर बघा"
हे अमोलच्या कानावर पडले.
अमोलला वाईट वाटले.
दोन महीन्याचा काळ लोटला.
अमेयने फ्लॅट बुक केला आणि तो वेगळा निघून गेला.
अमोलला फार वाईट वाटले.तो खूप रडला.
घरातील सगळेच उदास झाले.शेवटी काय अमेयने निर्णय घेतला होता.तो गेला.
अमोलला अमेयची खूप आठवण यायची ,त्याला पहायची इच्छा होत असे,म्हणून तो स्वतःच महिन्यातून एक चक्कर त्याच्या घरी मारत असे.
कालांतराने, जेव्हा अमोल अमेयला भेटायसाठी येतो म्हंटला की तो थापा मारू लागला.
अमोलला कळून चुकले होते की, मी येऊ नये म्हणून असे बोलत आहे.
अमोलने जाणे सोडले.
अनेक वर्षे लोटली .
अमेय नोकरी निम्मित बाहेरगावी राहू लागला.अमोलला एका शब्दानेही सांगितले नाही, किंवा आई बाबांनाही सांगितले नाही.
दोघांचे बोलणे बंदच झाले होते.
एक दिवस आई देवाघरी गेली.
अमोलने अमेयला फोन लावला.आई गेल्याचे सांगितले.
अमोल अमेयच्या येण्याकडे वाट लावून बसला होता.तो आलाच नाही.त्याने नंतर फोन करून कळवले नाही येऊ शकत.
अमोलला प्रचंड राग आला.कमीत कमी आईसाठी तरी यावं.नाहीच आला..नंतर काहीच विचारपूस नाही.
खूप वाईट अनुभव आला अमोलला.
आठ दिवसाने वडील गेले.
आठ दिवसाने वडील गेले.
त्यानंतर अमोलने अमेयशी बोलणे सोडले.
ती गोष्ट अमोल सहन करू शकला नाही.
दोघे आपल्या संसारात मग्न झाले.
राज मोठा झाला.चांगलं शिक्षण घेतले.चांगल्या पगाराची नोकरी लागली.
एक दिवस फेसबुकवर राजची भेट त्याच्या काकाशी झाली . राज खूप मोठ्या हुद्द्यावर होता.स्टेटस होता..त्यात भावाचा मुलगा.फोन नंबर एक्सचेंज केले.
तो पुन्हा भारतात येणार होता.त्यासाठी त्याने पार्टी ठेवली होती.
सर्वांना बोलवले होते.
राज स्वतःच्या काकाला भेटण्यासाठी उत्सुक होता,पण अमोल बिलकुल नाही.
अमेय कडून मिळालेली अशी वागणूक अमोल विसरला नव्हता.खोलवर रुतलेला काटा निघणे अशक्य.
भावाकडून अशी वागणूक मिळाली ,तेव्हापासून अमोल बदलला होता.त्याला माणसं नको होती.
त्याच्यासोबत एक असा कटू अनुभव होता जो त्याचा गुरू बनला होता.समोरच्यावर कधीही अवलंबून राहू नये,पूर्ण विश्वास ठेवू नये ,अपेक्षा ठेवू नये. हा मूलमंत्र तो जाणून होता.
अमोल आणि राधाने राजपासून ह्या सर्व गोष्टी लपवल्या होत्या.राजला हे सर्व समजले असते तर त्याला काकाविषयी राग बसला असता.
आतापर्यंत धपाटे थंड झाले होते.
राधा:"अहो,धपाटे थंड झाले"
अमोलच्या डोळ्यात जुन्या आठवणींचा उद्रेक दिसत होता
राधा:"मी काय म्हणते, राजला सांगुया का सर्व?"
अमोल:"राधा,त्याची काही गरज नाही.जेव्हा राजला अनुभव येईल,तेव्हा त्याला कळेल. आपल्याला जसे अनुभवाचे चटके बसले तसे चटके त्याच्या आयुष्यात आल्याशिवाय त्याला आयुष्य काय असते,सत्य काय असते.कसे वागायचे हे कळणार नाही.तूर्तास त्याला माझं वागणं तुटक वाटत असेल ; पण जेव्हा तो माझ्या चष्म्यातून जगाला पाहिल तेव्हा त्याला कळेल माझ्या वागण्यापाठी उद्देश"
शेवटी अनुभव हाच मोठा गुरू असतो.
अमोलने स्वतःचा चष्मा नाकावर व्यवस्थित ठेवला आणि थंड झालेला धपाटा चवीने खावू लागला"
कथा आवडली असेल तर लाईक, शेअर ,कंमेंट करा.मला फॉलो जरूर करा.
©® अश्विनी पाखरे ओगले.मनातलं मनापासून.