Login

त्यागातले प्रेम

दोन प्रेमी जीवांची प्रेमातल्या त्यागाची कथा
जलदकथा लेखन स्पर्धा ऑगस्ट 2025
विषय - अपूर्ण प्रेमकहाणी
शमिका तानपाठक

त्यागातले प्रेम
नम्रता आपल्याच विचारात पर्स खांद्यावर अटकवून रस्ताने झपझप चालली होती. ती रस्ता ओलांडायला गेली आणि बाजूने येणारी गाडी तिला दिसलीच नाही. अचानक तिला काय झाले हेही तिच्या लक्षात आले नाही डोळे उघडले तेव्हा ती हॉस्पिटलला होती .
तीचे सारे अंग दुखत होते.डोक्याला, पायाला ड्रेसिंग केले होते .तेवढ्यात तिथल्या सिस्टर ने तिला पाणी दिले .”माझ्या घरी कळवले का”? तिने क्षीण आवाजात विचारले. “हो तुमचे मिस्टर आणि मुलगा येऊन गेले पण किरकोळ मार लागला आहे आणि संध्याकाळ पर्यंत घरी सोडणार म्हणून एक दोन महत्वाचे कामे करून येतो म्हणून परत गेले.’’ सिस्टरच्या उत्त्तरावर ती खिन्न पणे हसली.
मँडम पण ज्या गृहस्थांच्या गाडी ने तुमचा अपघात झाला ते तुम्ही शुद्धीवर येण्याची वाट बघत थांबले आहे. त्यांनी तुमच्या मिस्टरांची पण भेट घेऊन माफी मागितली आणि उपचाराच्या खर्चाची पण जबाबदारी घेतली सिस्टर च्या मन मोकळे बोलल्याने नम्रताला भरून आले .
तिने त्या सद्गृह्स्थाना भेटण्याची इच्छा व्यक्त केली ‘’खरे तर झाल्या प्रकरणात त्यांची काहीच चूक नव्हती’’ . ‘’माझेच लक्ष नव्हते.’’ ती सिस्टरला म्हणाली.
सिस्टर रूममधून निघून गेल्यावर ती आपल्याच विचारात असतांनाच दारावर नॉक करून ती व्यक्ती आत आली आणि नम्रता तिच्याकडे बघतच राहिली .राकेश हो हो हा राकेशच आहे तिचे मन ओरडून सांगू लागले. ‘’कशी आहेस आता, मला माफ कर माझ्यामुळे तुझा अपघात झाला’’ .राकेश हात जोडून म्हणाला .
‘’नाही रे चूक माझीच होती’’ पटकन आपली चूक मान्य करत ती म्हणाली .’’ तू कसा आहेस’’ ?नम्रता ने विचारले . ‘’मी ठीक. ‘’ मंद स्मित करत तो म्हणाला . ‘’आज पुन्हा एकदा माझ्या मुर्खपणामुळे तुला भोगावे लागले .’’ नम्रता अपराधीपणाने म्हणाली .’’पुन्हा म्हणजे’’ न समजून राकेशने विचारले. भिंती कडे तोंड करून ती बोलली ‘’माझ्या एकतर्फी प्रेमामुळेच तू कॉलेज बदलले आणि आज पुन्हा .....’’
‘‘नाही नाही तू कधीच चुकीची नव्हतीस उलट मीच तुझ्या लायक नव्हतो मी तेव्हा तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला होता .त्या गुन्ह्याची शिक्षा आजही मी भोगतो आहे आणि अपराधीपणाचे ओझे घेऊन जगायचे म्हणून जगतो आहे’’. ती प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्या कडे पाहायला लागली एकमेकाकडे पाहता पाहता दोघ्रही भूतकाळात हरवले.




भाग २ त्यागातले प्रेम
राकेश अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होता . पूर्ण कॉलेज मध्ये तो सुसंसृत ,सभ्य, नाकासमोर चालणारा हुशार मुलगा म्हणून प्रसिध्द होता.नम्रता बडबडी, हुशार, हसरी, आयुष्य भरभरून जगणारी मुलगी होती. राकेश तिसऱ्या तर नम्रता पहिल्या वर्षाला शिकत होती. राकेशच्या घरची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती त्यामुळे तो कॉलेज सांभाळून नोकरी देखील करत होता .
सुरवातीला दोघेही एक्मेंकाशी फारसे बोलत नव्हते. पण दोघेही त्यांच्या कॉमन मित्र - मैत्रिणीमुळे एकमेकांच्या संपर्कात होते.
एकदा कॉलेजला ‘ आजची स्त्री खरेच मुक्त आहे का ?’ ह्या विषयावर वकृत्व स्पर्धा होती. त्यात एक पुरुष असून हि राकेशने मांडलेली स्त्रियांची बाजू , त्याचे अभ्यासपूर्ण विचार , भाषाशैली, ह्या मुळे नम्रता प्रभावित झाली आणि हळू हळू तिने त्याच्याशी मैत्री करायला सुरवात केली .राकेशला हि तिचा मनमोकळा साधा स्वभाव खूपच आवडू लागला दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले.
नम्रता तिचे प्रेम व्यक्त करायला धडपडत होती तर राकेश मात्र जबाबदारीच्या ओझ्यामुळे स्वतःच्या भावना दाबू पाहत होता. असेच दिवस चालले होते आणि वर्षं संपून परीक्षेचा शेवटचा दिवस उगवला.
आज काही झाले तरी आपण राकेश समोर व्यक्त व्हायचे हा विचार पक्का करूनच नम्रता परीक्षेला गेली. पेपर संपला तसा त्यांचा ग्रुप नेहमीच्या जागेवर जमला खूप गप्पा झाल्यावर सगळे एकमेकांना शुभेच्छा देत आपापल्या घरी जायला निघाले.नम्रता राकेश पाठोपाठ पार्किंग कडे निघाली
“राकेश !” तिने पाठीमागून आवाज दिला. “मला थोड बोलायचे होते” ती म्हणाली. “बोल न काय म्हणतेस’ राकेश ने विचारले. ‘’राकेश माझ्या मनात तुझ्या बद्दल काही खास भावना आहेत.मला तू आवडतोस.’’ ती पटापट बोलून लाजेने खाली मान घालून उभी राहिल्री .
‘’ मला माफ कर”. राकेशच्या आवाजाने तिने मान वर केली.राकेश पुढे म्हणाला, “माझ्या मनात तसे काही च नाही आणि येणार हि नाही तुही हे सगळे मनातून काढून टाक आणि अभ्यासावर लक्ष दे ते सगळ्यात महत्वाचे आहे “.एवढे बोलून तो निघून गेला. आणि काहीच न सुचून नम्रता मात्र कितीतरी वेळ तिथेच थांबून राहिली.
नंतरचा सुट्ट्यांचा काळ सगळा तिला स्वतः ला सावरण्यातच गेला

भाग ३ त्यागातले प्रेम
सुट्ट्या संपून कॉलेज पुन्हा सुरु झाले . राकेश मात्र कॉलेज ला आलाच नाही त्याने दुसऱ्या कॉलेज मध्ये अॅडमिशन घेतल्याचे तिने ऐकले आणि तिला खुपच अपराधी वाटू लागले . त्यानंतर त्यांचा कधीच संपर्क झाला नाही तिने आपले पहिले प्रेम मनाच्या एका कोपऱ्यात तसेच जिवंत ठेवले , आणि आज असा अचानक तो तिच्यासमोर होता .
भूतकाळाच्या आठवणीने दोघांचे डोळे भरून आले होते. राकेश त्याच भावनेच्या भरात म्हटला “चूक तुझी नव्हती आणि तुझे प्रेमही एकतर्फी नव्हते. माझेही तुझ्यावर खूप प्रेम होते पण माझ्या जबाबदऱ्या खुप होत्या त्यात तू भरडली जावी असे मला वाटत नव्हते आणि प्रेम ,लग्न ह्या गोष्टींसाठी मला वेळच नव्हता “.
“अरे पण एकदा बोलायचे न तुझ्या जबाबदाऱ्या मला कधीच ओझ वाटल्या नसत्या आणि मी तुझ्यासाठी कितीही काळ थांबली असती निदान मन मारून जगावे तर लागले नसते”. ती पटकन बोलली आणि त्याने चमकून तिच्याकडे पहिले.
“मला विचारण्याचा हक्क नाही पण तूझ्या वैवाहिक आयुष्यात तू सुखी आहेस ना?” राकेशने विचारले.
तशी तिने नजर खाली झुकवली आणि शांतपणे म्हणाली
‘’शिक्षण झाल्यावर घरच्यांनी स्थळ पाहायला सुरवात केली मी त्यांनी पसंद केलेल्या मुलाशी मनापासून संसार करायचा प्रयत्न केला पण मला सतत कमीपणा दाखवणे , छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालणे , सतत स्वतःचाच हेका चालवणे हा त्यांचा स्वभाव मी बदलू शकले नाही. माझा मुलगाही माझ्याशी तसेच वागायला लागला आहे’’.
‘’अपघाताच्या वेळेस मग तू अशाच विचारात होतीस का’’ ? त्याने विचारले तिच्या डोळ्यातल्या अश्रुने त्याला सत्य कथन केले .
“माझे सोड तू कसा आहेस?’’तिच्या प्रश्नावर खिन्न हसत तो म्हणाला ,बहिणीचे लग्न ,शिक्षण बाबांचे आजारपण ह्या जबाबदाऱ्या पार पडता पडता लग्नाचे वय उलटून गेले आणि तुझे मन दुखवल्याची टोचणी इतकी लागली होती की , लग्नाची इछाच राहिली नाही.”
दोघांचे डोळे भरून आले खूप वेळ शांततेत गेला. शेवटी तो म्हणाला, ‘’चल मी निघू काळजी घे स्वतःची”. “नको त्रास करून घेऊस”. त्याच्या काळजीने तिचे डोळे भरून आले. पण ती हसत हसत म्हणाली” ह्या जन्मात सोडते पण पुढच्या जन्मात अजिबात सोडणार नाही तुला”. त्यानेही हसून मान हलवली आणि आपल्या भावनांना आवर घालत पटकन निघाला ती मात्र कितीतरी वेळ पाहत राहिली आपल्या प्रेमाला परत दूर जातांना....
0